औदुंबरच्या पाठीवर जन्मलेली सुनीता अभ्यासात हुशार होती. खेड्यात राहूनही शिकण्याची जिद्द असणाऱ्या पोरीला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून सुखदेवाने तिला ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण दिलं. कॉलेजमध्ये असतानाच अभ्यासात फारशी गती नसणाऱ्या मात्र रंगरूपाने चिकण्या चोपड्या व्यक्तिमत्वाच्या दिनकरवर तिचा जीव जडला. दोघांमध्ये प्रेमबंध तयार झाले. दिनकरचा स्वभाव आणि रागरंग सुखदेवास ठीक वाटत नव्हते तरीही पोरीचा हट्ट म्हणून त्यानं मान्यता दिली. औदुंबरच्याही आधी त्याने सुनिताचं लग्न मोठ्या थाटात लावून दिलं. सुनीताचा नवरा दिनकर हा भयंकर पाताळयंत्री नि अप्पलपोट्या स्वभावाचा होता. सुनीताची स्थावर जंगम संपत्ती पाहूनच त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं. सुनीताला हे कधीच कळलं नाही, सुखदेवच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या मुलीला सावध करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यांवर त्याच्या प्रेमाची पट्टी बांधली होती. तिला ते कधी पटलंच नाही. ती सदैव आपल्या पतीची बाजू घ्यायची. आता माहेरकडे प्रवास करताना तिच्या मनःचक्षूपुढे भूतकाळातील सर्व घटनांचा पट तरळत होता. कर्नाटक एक्सप्रेसमध्ये बसल्यापासून ती अस्वस्थ होती. मथुरेमध्ये तिच्या पतीची पोस्टिंग होती, मागील तीन वर्षांपासून ते युपीमधील मथुरा इथे राहत होते. रात्री साडेनऊ वाजता गाडीने मथुरा रेल्वे स्टेशन सोडले तेव्हापासून सुनीताच्या मनात विचारांचा एकच कल्लोळ निर्माण झाला होता. मध्यरात्री उशीरपर्यंत ती जागीच होती. तिच्या कंपार्टमेन्टमधील सर्व सहप्रवासी झोपी गेले तरी तिला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. तब्बल पंधरा वर्षे तिने माहेराशी संबंध तोडले होते, कसलाही संवाद नव्हता. धाकटी बहीण वगळता तिने कुणालाही साधा फोनदेखील केला नव्हता की चार ओळींचे पत्रही पाठवलं नव्हरं. माहेरहुन देखील तिच्याशी कुणी संपर्क साधायचा प्रयत्न केला नव्हता. आता एकदम आई अत्यवस्थ असल्याचा फोन आला होता त्यामुळे एकाच वेळी अनेक विचारांनी तिच्या मनात कोलाहल माजवला होता. काय झाले असेल आईला, अण्णा कसे असतील? आपले भाऊ, भावजया कशा असतील? आपली भाचे मंडळी किती मोठी झाली असतील? आपल्याविषयी सर्वांच्या मनात काय भावना असतील? आपल्या नात्यातला कडवटपणा कमी झाला असेल का? एक ना अनेक सवाल काहूर उठवत होते. पहाटेच्या सुमारास तिला झोप लागली. सकाळी साडेसहाच्या सुमारास गाडी भोपाळमध्ये पोहोचली तेव्हा तिला जाग आली होती. गावाकडे एखादा फोन करावा असं तिला राहून राहून वाटत होतं, तिने औदुंबरला फोन लावला. त्याचा आवाज तिला खूप खोल गेल्यासारखा वाटला. मनात शंकेची पाल चुकचुकली. तो काय सांगत होता हे तिला नीट कळत नव्हते कारण रेल्वेतला कर्कश्श आवाज काहीच कळू देत नव्हता. रात्री किती वाजता सोलापूरला पोहोचणार असल्याचं तो विचारत होता इतकंच काय ते उमगलं. ती विचारात गढून गेली.
सकाळचे साडेआठ वाजले होते. ईटारसी जंक्शन मागे सोडून ट्रेन वेगाने पुढे निघाली होती. अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रेन खांडवा स्टेशनला पोहोचली तेव्हा औदुंबरचे दोन तीन फोन येऊन गेले, अनंता आणि अनिताचाही फोन येऊन गेला. फोन कनेक्ट करेपर्यंत कट होत होता. अक्कलकोट तालुक्यातलं बोरोटी हे तिचं माहेर. तिची ट्रेन रात्री दहाच्या सुमारास सोलापूरला पोहोचणार होती. तिथून तिला बस नाहीतर खाजगी जीपने गावाकडे जायचं होतं, म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास ती घरी पोहोचली असती. आपण वेळेत जाऊ का असा विचार करत असतानाच तिच्या नवऱ्याचा दिनकरचा फोन आला. तो नेहमीप्रमाणे सासरबद्दल नकारात्मक बोलत होता, त्याच्या फोनवर अद्यापही कुणी फोन केला नसल्याची तक्रार करत होता. जावयाला यांनी कधी मानपानच दिलं नाही आता संसार अर्धाअधिक उरकल्यावर हे लोक काय किंमत देणार असं गाऱ्हाणं मांडत होता. सुनीता नेहमीप्रमाणे कात्रीत अडकली, मुकाट गप्प राहिली. गाडीने वेग पकडला होता. बारा वाजण्याच्या सुमारास एक मोठा आवाज झाला, बहुधा अर्जंट ब्रेक लावला होता. सगळे स्तब्ध झाले. एकदोन मिनिट गाडी जागेवरच उभी होती. सुनीताच्या फोनवर पुन्हा एकदा औदुंबरचा फोन येऊन गेला. ट्रेन पुन्हा सुरु झाली, दरम्यान ती भावाला फोन लावतच होती तितक्यात तिच्या डब्यात एक विलक्षण ओजस्वी गौरकांतीची, कृशदेहाची वृद्धा शिरली. चालत्या गाडीत ही आज्जीबाई कशी काय शिरली याचा तिला प्रश्न पडला. तिच्या हातातला फोन सुरूच होता, औदुंबर काय बोलतोय काहीच ऐकू येत नव्हतं. तिचं सारं लक्ष फोनकडं होतं. तेव्हढ्यात ती वृद्धा थेट तिच्या शेजारील सीटवर येऊन बसली. फिकट लाल रंगाची साडी तिला खुलून दिसत होती. तिची काया पिवळट पडली होती, चेहऱ्यावर अत्यंत तेज होते. डोईची चांदी झाली होती नि कुरळ्या चंदेरी केसांची महिरप तिच्या चेहऱ्याला शोभत होती. हातातल्या बांगड्या किणकिणत होत्या, कपाळावरचं बंद्या रुपयासारखं कुंकू, गळ्यातलं सोन्याचं डोरलं, कानातली इवलीशी कर्णफुलं साक्ष देत होती की वृद्धा चांगल्या घरातली असावी. औदुंबरचा फोन लागेनासा झाला तेव्हा ती अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता पाहून ती वृद्धा बोलती झाली, "मुली काही अडचण आहे का बाळा?"
मध्यप्रदेशातील त्या स्टेशनववर चालत्या गाडीतून आत शिरलेली वृद्धेने मराठीत प्रश्न केल्याने सुनीताला नवल वाटलं. एकतर ती वृद्धा एकटीच होती, हाती एक छोटीशी बॅग वगळता तिच्यापाशी काही सामान नव्हतं. तिचा आवाज अगदी मृदू होता. बोलताना डोळ्यात वेगळंच आव्हान जाणवत होतं. पाहता पाहता ट्रेनने वेग पकडला. एका मागोमाग एक स्टेशन्स मागे पडू लागली आणि इकडे रेल्वेत या दोघींची गट्टी जमली. आज्जीबाई अगदी अमृतवाणीची होती, तिने सुनीताला बोलतं केलं. तिच्या मनातलं काहूर बाहेर काढलं, तिची अस्वस्थता जाणून घेतली. तिचं गाऱ्हाणंही ऐकून घेतलं. सुनीता रडून रडून सांगत होती. आईच्या आठवणींनी व्याकुळ झाल्याचं जाणवत होतं. सुनीता आणि दिनकरचं लग्न थाटात झालं. दिनकरने लग्नातदेखील सुखदेवला खिंडीत गाठून आपल्या सर्व मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या जे सुनीताला कधी कळू दिलं नव्हतं. पहिल्या दिवाळसणाला सासरी आल्यावर त्यानं आपल्या बायकोच्या वाटणीची जमीन मागितली होती. सुखदेव याला राजी नव्हता मात्र पारुबाईनं त्याचं मन वळवलं. मग दिनकरने नवं खुसपट काढलं. त्यानं रोडलगत असणारा भाग मागितला ज्यात सुखदेवच्या वडिलांची समाधी होती. त्यांच्या घरात यावरून भयंकर वादळ उठलं. दिनकरनं सुनीताला भडकवलं, आपला हिस्सा दिला जात नाही असं तिच्या मनावर बिंबवत माहेरी पाठवलं. लहानपणापासून अतिलाड झालेल्या सुनीताला तसाही बोलण्यातला आचपेच नव्हता, ती रागाच्या भरात आपल्या जन्मदात्याला वाट्टेल ते बोलून गेली. अनिताची आर्थिक स्थिति तिच्यापेक्षा कमजोर होती तरीही तिने आपल्या वडिलांची भावांची बाजू घेतली त्यामुळे सुनीता एकटी पडली. दिनकरने मग अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या. सुखदेवने मधला मार्ग काढला, सुनीताच्या हिश्श्याच्या वाटणीची बाजारभावाने जी काही किंमत होती तेव्हढे पैसे दिनकरला दिले. मात्र त्या दिवसापासून सुनीताला माहेरचे दरवाजे बंद झाले कारण गावात अत्यंत स्वाभिमानाने जगलेल्या सुखदेवला हा मोठा धक्का होता, शिवाय त्यांच्या परंपरागत वैर असणाऱ्या जाधव कुटुंबास तसेच अख्ख्या भावकीत दिनकरने त्यांची बदनामी केली. सुखदेव पार्वतीचा आत्मा तळतळला. त्यांनी दिनकरशी नातं तोडलं. त्या दिवसा नंतर सुनीता आजच माहेरी निघाली होती.
तिची हकीकत ऐकून त्या वृद्धेने तिची चूक तिला दाखवून दिली. हक्क बजावण्याआधी आपली कर्तव्ये निभावणं महत्वाचं असतं हे दाखवून दिलं. वाटा अवश्य मागावा मात्र त्याला काही नैतिकता असली पाहिजे, आपल्या जन्मदात्यांचा अवमान करण्याआधी हजारदा विचार केला पाहिजे कारण ते आपल्यासाठी झिजलेले असतात. जीवनाचा जोडीदार जे सांगेल ते नक्की ऐकावं मात्र त्यामागचा हेतूही ओळखता आला पाहिजे. सत्य असत्य आणि नैतिक अनैतिक यातले भेद ओळखता आले नाहीत तर आयुष्य सार्थकी लागत नाही. संपत्तीचा हव्यास माणसाला नात्यागोत्यातून माणसातून उठवतो त्यामुळे हाव किती करायची यालाही मर्यादा असली पाहिजे नि ज्याचं चुकतं त्याला सुनवता आलं पाहिजे! आज्जीबाई एकापाठोपाठ एक टोचण्या देत होत्या. त्यांच्या बोलण्यातलं वास्तव कळून चुकलेल्या सुनीताच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तिचं मन पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघालं होतं. ती ओक्साबोक्शी रडू लागल्यावर वृद्धेने तिला मायेने जवळ घेतलं. तिच्या केसांतून आपला सायमाखला हात फिरवला. तिचं सांत्वन केलं. सुनीताने तिच्या मांडीवर आपलं शिणलेलं मस्तक टेकवलं. तिच्या मायेने ओथंबलेल्या स्पर्शाने झोप कधी लागली ते कळलंच नाही. ती जागी झाली तेव्हा दुपार मध्यान्ही आली होती. सुनीताचा नकार डावलत आज्जीबाईंनी तिला आपल्या हाताने आग्रह करू करू खाऊ घातलं. विलक्षण चव होती त्याला, गेली कित्येक वर्षे सुनीताने अशी चव चाखली नव्हती. विमनस्क स्थितीत असूनही ती पोटभर जेवली. बोलता बोलता सुनीताने वृद्धेला तिच्याविषयी विचारलं तेव्हा ती नुसतीच हसली! तिचं हास्य केविलवाणं करुण होतं! सुनीताने पुन्हा पुन्हा विचारल्यावर हातातल्या वृद्धेने तिच्याकडील बॅगेवर असणारा छापील मोबाईल नंबरच तिला सांगितला. संध्याकाळ झाली तेव्हा दोघी शांत बसल्या होत्या. सुनिताचं सारं लक्ष खिडकीबाहेर होतं, रेल्वेसोबत पळणाऱ्या झाडांच्या पाठशिवणीतुन तिला बालपण आठवलं, गाव आठवलं, निसटलेला भूतकाळ नि उसवलेली नात्यांची वीण आठवली! ती कासावीस झाली. तिची तगमग आज्जीबाईंनी निमिषार्धात ओळखली, तिच्या पाठीवरून आपला मायेचा हात त्या हळुवार फिरवत राहिल्या. सुनीताचे दुःखाचे कढ शांत होत गेले. का कुणास ठाऊक पण सुनीताला त्या क्षणी वृद्धेचे डोळे अतिव पाणवलेले वाटलॆ. वृद्धेने आपल्या डोळ्यातलं पाणी चतुरतेने टिपून घेतलं नि बुडू लागलेल्या सूर्यबिंबावर आपली नजर खिळवली. त्या दोघी बराच वेळ गप्प बसून होत्या. कोणताही संवाद नव्हता तरीही त्यांना परस्परांचे भाव अवगत होते. मधेच एका स्टेशनवर गाडी बराच वेळ खोळंबली. सहा तास लेट होऊन ती पुन्हा मार्गस्थ झाली. रात्र डोळ्यावर आली तेव्हा सुनीता पुन्हा वृद्धेच्या मांडीवर डोकं टेकून झोपी गेली. वृद्धा अत्यंत आस्थेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. आता सुनीताचा चेहरा विलक्षण शांत तृप्त वाटत होता. पहाटेच्या सुमारास सोलापूर स्टेशन आलं तेव्हा वृद्धेनेच तिला जागं केलं, उठ पोरी तुला उतरायला हवं!
निघताना सुनिताने तिला गच्च मिठी मारली. काळजातलं उरलं सुरलं मळभ रितं केलं. गाडी थांबताच ती उतरली. प्लॅटफॉर्मवरून पुढे जाताना तिने मागे वळून पाहिलं तर डबडबल्या डोळ्यांनी ती वृद्धा रेल्वेच्या दारापाशी उभी होती. सुनीताने हात हलवले तसे तिचेही थकलेले भेगाळलेले हात हलले. निरोपाची निरवानिरवी झाली. सुनीता स्टेशनबाहेर आली तर अनंता तिला न्यायला आला होता. ती त्याच्या गळ्यात पडून रडली. आई बरी आहे का म्हणून विचारत राहिली. तो प्रश्नांना बगल देत राहिला. जीपने ते तासाभरात ते बोराटीला पोहोचले. आपलं गाव, आपला परिसर बऱ्याच वर्षांनी पाहताना ती हरखून गेलीय असली तरी तिच्या डोळ्यात आईच्या आठवणींचा समुद्र गोळा झाला होता. पांदीचं रूप तिला ओळखू आलं नाही. गावात शिरल्यापासून तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या वस्तीचा रस्ता लागला तशी तिची बेचैनी वाढली कारण साऱ्या रस्त्याने अनंता काहीच बोलला नव्हता. वस्तीपाशी माणसांची गर्दी दिसली तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. सुनीताने चालत्या गाडीतूनच उडी टाकली नि वस्तीच्या दिशेने धाव घेतली! मात्र तिथे जे दिसलं त्यानं तिच्या हृदयाच्या चिंधड्या उडाल्या! एका कोपऱ्यात सारवण करून दिवा लावून त्यावर दुरडी झाकली होती नि जवळच आईचा हार घातलेला फोटो ठेवलेला होता! सुनीताने जोराने किंचाळी मारली, आईच्या नावाने हंबरडा फोडला नि ती धाय मोकलून रडू लागली. आईचा धावा करू लागली. अनिता तिच्याजवळ आली, तिने तिला कवेत घेतलं. माणसांच्या घोळक्यात बसलेले थकलेभागले अण्णा तिथे आले नि सुनिताचं अवसान गळून पडलं! आपल्या म्हाताऱ्या बापाच्या गळ्यात पडून ती लहान मुलीसारखी हमसून हमसून रडू लागली! माझं चुकलं आई मला माफ कर गं माय, मला पोटात घे गं माय म्हणत ती अण्णांच्या कुशीत शिरून रडू लागली. अण्णांनी तिला शांत केलं. जिथं पारुबाईच्या देहाला अग्नी दिला होता त्या बांधाच्या कोपऱ्यापाशी सुनीताला नेण्यात आलं! पारुबाई कधीच निघून गेली होती. मायलेकीची भेट चुकली होती! सुनीताला आयुष्यभर डागण्या देईल असा तो क्षण होता!
आदल्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारासच पारुबाईचं प्राणपाखरु उडून गेलं होतं. सुनीता येईपर्यंत अंत्यविधी केले जाऊन नयेत म्हणून सुखदेवने बऱ्याच विनवण्या केल्या मात्र गावाकडे सांज होण्याआधीच अंत्यविधी केले जातात त्याला अपवाद केलेच जात नाहीत. शिवाय सुनीताचा प्रवास लांबचा होता, ती कधी येईल याचा नेम नव्हता नि गेल्या दीड दशकापासून तिचं गावाशी नातंदेखील नव्हतं त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच पारुबाईच्या देहाला मुखाग्नी देण्यात आला. पारूबाईचं देहावसान झालं तेव्हा औदुंबरने सुनीताला बरेच कॉल केले होते मात्र आवाजामुळॆ काहीच कळलं नव्हतं. आपल्या आईचं अंतिम दर्शन आपण घेऊ शकलो नाही ही आपल्या कर्मांची शिक्षा होय हे एव्हाना तिनं ओळखलं होतं. अस्थीविसर्जनाच्या आधी तिने दिनकरला गावी बोलवलं नि त्याला सडकून सुनावलं. तो बधला नाही मात्र सुनीताच्या रुद्रअवतारासमोर त्याचं काहीच चाललं नाही. अखेर त्यालाही त्याची चूक मान्य करावीच लागली. दशक्रियाविधी झाल्यावर सुनीता आणि दिनकर मथुरेला परत निघाले. सुनीताचं अख्खं माहेर तिला निरोप द्यायला स्टेशनवर आलं होतं. भरल्या डोळ्याने तिने सर्वांचा निरोप घेतला. अण्णांनी आसावल्या डोळ्यांनी तिला अलविदा केलं. सुनीताचा परतीचा प्रवास सुरु झाला नि तिला येतानाच्या प्रवासात भेटलेल्या वृद्धेची आठवण झाली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने फोन करायचं ठरवलं. आज्जीबाईनी सांगितलेलं नाव पत्ता आणि बॅगेवरचा छापील नंबरही सुनीताच्या ध्यानात होता. तिने लगबगीने फोन लावला. पलीकडून रिंग आली, एका पोक्त स्त्रीचा आवाज आला. सुनीता बोलत होती नि बोलता स्तब्ध झाली, धाय मोकलून रडू लागली! काय करावं काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं! तिच्या डोळ्यांचं पाणी काही केली थांबतच नव्हतं. अखेर तिने दिनकरने तिच्या हातातला फोन घेतला नि तो बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगाने बदलत गेले! झालं असं होतं की त्या वृद्धेने जे नाव सांगितले होते त्यांचाच तो मोबाईल नंबर होता, जिने फोन उचलला होता ती त्या स्त्रीची एकुलती एक मुलगी होती. तिने सांगितलं की पंधरा वर्षांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालंय. तिच्या आईचं वर्णन आणि स्वभाव सारं त्या वृद्धेशी मिळतंजुळतं होतं! त्या वृद्धेचा स्पर्श ओळखीचा का वाटला नि तिच्या हातची चव आपल्या परिचयाची का वाटली याचं उत्तर सुनीताला मिळालं होतं! आपली आई आपल्याला भेटून गेली पण त्याचा चकवाही आपल्याला ओळखता आला नाही याचं तिला विलक्षण दुःख झालं नि त्याच वेळी आईची भेट झाल्याची अतिव तृप्तताही लाभली! काही चकवे जिवघेणे असतात तर काही जिवाला चटका लावणारे असतात!
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा