रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नवरंग 2020 - रेड लाईट डायरीज


पहिला रंग - राखाडी 
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ 
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा  
तुमची सुटका तुम्हालाच करून घ्यायची आहे, तुमच्यातल्या दुर्गेला बळ लाभो...
आदिशक्ती उत्सवाचा अर्थ असाही जाणून घेऊया.. 

In her teen age pregnant Kamini fled with an escort agent, later she was forced for prostitution. She was blackmailed by brothel owner making theat to her little angel daughter Meena. Three decades passed. Now Kamini is nomore, but Meena is still in the sink of slavery by means of skin currency. With help of Darbar ngo She will likely to return in this December 20. This is her own fight, and she faught it very well.
I pray for my all sisters and mothers for their freedom and rights..
amen..

_________________________________________

दुसरा रंग केशरी.. 

रजिया बेगमची मुलगी रोज रात्री तिला अडवायची. मात्र तिला भूलथापा देऊन रजिया घराबाहेर पडायची आणि पहाट उजाडताना घरी यायची. समज आल्या क्षणापासून रजियाचा एकही दिवस असा गेला नव्हता की तिच्या काळजात दुःख वेदनांनी साद घातली नव्हती. तिचे जन्मदाते कोण होते हे ही तिला ठाऊक नव्हते. तिचं बालपण कुठं गेलं आणि कसं गेलं हे ही तिला माहिती नव्हतं. तिच्या स्मृतीत ती जिथवर मागं जायची तिथवर 


तिचा वेश्याव्यवसायचा  पेशा तिच्या मागं यायचा. वयाच्या कितव्या वर्षी तिच्याशी पहिल्यांदा शय्यासोबत केली गेली हे ही आठवत नाही. थोडक्यात तिच्या स्मृतीत सगळा अंधःकार होता. एका व्यक्तीने तिच्याशी संधान बांधलं. लगट केली, विश्वास संपादन केला आणि निकाह लावतो म्हणून फुकटात ओरबाडत राहिला. तिच्या कमाईवर त्यानं डोळा ठेवला. तिच्या गर्भात बीज रोवलं आणि त्याचा फायदा घेत तो तिला राजरोसपणे ब्लॅकमेल करू लागला. अखेर त्यानं तिला फसवलं, दोघांच्या नव्या संसारासाठी घर घ्यायचं म्हणून तिची सगळी कमाई घेतली आणि पळून गेला.

तिची पाचावर धारण बसली कारण पोट पाडणं देखील
रजिया आणि अब्बास 

आता शक्य नव्हतं. तिने धैर्याने  प्रसूत व्हायचं ठरवलं. दिवस भरताच तिची प्रसूती झाली. मुलगी झाली. त्या मुलीसाठी तिनं जगायचं ठरवलं. तिने घर बदलून पाहिलं, दुसरं काम शोधून पाहिलं मात्र तिचं दुर्दैव आड येत राहिलं. तिला पुन्हा त्या दलदलीत जावं लागलं. आधीच्या मालकिणीने तिच्यावर दावा केला. अंगावर देणं काढलं आणि त्या देण्यापायी तिची पिळवणूक सुरु झाली. बघता बघता काळ पुढे जात राहिला. मुलगी मोठी झाली आणि तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना रजियाची भंबेरी उडू लागली. रजियाला आता खऱ्या अर्थाने स्वतःची भीती वाटू लागली. तिला आता आधार हवा होता. तिच्या या असहायतेचा नेमका फायदा घेत पुन्हा काहींनी तिला वापरलं आणि तिलाच लुटून सोडून दिलं.
 
त्या नंतर तिनं मग कधी आधार असण्याचा आग्रह केला नाही. तिनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या विचारांनी जगायचं ठरवलं. तिला कधी कुणीच जवळ केलं नाही मग निर्व्याज प्रेम वगैरे गॊष्टी दूरच्या झाल्या. मात्र एके दिवशी थोडंसं वेगळं घडलं. नाक्याबाहेरील रस्त्यावर असणाऱ्या विराण झाडाखाली रजिया उभी होती. पाऊस धोधो कोसळत होता. रजिया त्या दिवशी प्रचंड तणावात होती. घरी खायला काही नव्हतं आणि वय वाढत चालल्यामुळे कमाईही घटत चालली होती. त्यादिवशी तर कुणीच फिरकलं नाही. तिथून काही रुपये कमवून दलालाच्या हाती दिल्याशिवाय तिची खैर नव्हती. खरं तर जीवनाला ती कंटाळून गेली होती. त्या क्षणी तिला मोठ्याने रडावं वाटत होतं, टाहो फोडावासा वाटत होता. तिचं अंग गळून गेलं होतं मन खचून गेलं होतं. 

इतक्यात तिचं लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या एका तरुण भिकाऱ्याकडे गेले, किंबहुना तिने त्याच्याकडे पाहावं म्हणून तो बळेच खोकला होता. त्याच्या नजरेत अपार माया होती, प्रेम होतं. त्यानं एक हिसका देऊन व्हीलचेअर पुढे नेली आणि हातात असलेली चुरगाळलेली नोट तिच्या हाती कोंबली. इतक्या पावसात वादळात तरी पुन्हा इथं येऊ नको असं विनवून तो निघून देखील गेला. रजिया अवाक होऊन पाहत राहिली. अशीही माणसं या जगात आहेत हे तिनं पहिल्यांदा अनुभवलं होतं. त्या तरुणाने तिला सहज मदत म्हणून काही रुपये दिले आणि ओल्या रस्त्यानं तो सरळ निघून गेला. 

नंतर तिच्या लक्षात आलं की हा तरुण भिकारी गेले काही दिवस आपल्यावर लक्ष ठेवून होता मात्र आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. त्यानंतर बरेच दिवस तो दिसला नाही. रजियाने त्याला शोधण्याचा खुप प्रयत्न केला मात्र तिला यश आले नाही. एके दिवशी त्याच झाडाखाली तो व्हीलचेअरवर दिसला. रजियाने ठरवलंच होतं, तो भेटला की त्याच्याशी बोलून मन मोकळं करायचंच ! रजियाला गहिवरून आलं कारण तिला आजवर कुणी काही दिलं नव्हतं. तिच्याकडून काही वसूल न करता पैसे तर कधीच कुणी दिले नव्हते. ठरल्याप्रमाणे रजियाने त्याला थेट विचारलं, "आजवर कुणी मला प्रेमाने पाहिलं नाही. मात्र तुझी ही व्हीलचेअर मी आयुष्यभर ढकलू शकते. तुझी तयारी आहे का?"

यावर त्या तरुणाचं उत्तर खूप बोलकं होतं. त्यानं हसून म्हटलं, "अंतःकरणात प्रेम असल्याशिवाय कुणी असं उगीच करूच शकत नाही !" त्याच्या उत्तरावर तिने सूचक मौन बाळगलं मात्र तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहिलं. रजियाने त्याचं मन जाणून घेतलं. लग्नानंतर अपघातात अपंगत्व आल्याने पत्नीने त्याला सोडून दिलं होतं. त्याचं नाव अब्बास होतं. दोघांची मने जुळल्यानंतर त्या दोघांनी रीतसर निकाह केला.
 
आज त्यांच्या विवाहाला सहा वर्षे पूर्ण झालीयत. अब्बासने दिलेला शब्द पाळला, त्यानं रजियाची साथ सोडली नाही. प्रेम आणि आधार मिळाल्यावर रजियाने वेश्याव्यवसाय सोडून दिलाय. त्याच्यासाठी नवीन चांगली व्हीलचेअर घेतली आहे. ते दोघे मिळून कमावतात, त्यात त्यांचं भागत नाही मात्र एक चपाती एका ताटात दोघात मिळून खातात. या प्रेमामुळे त्यांचा संसार सुखाचा झाला आहे. एनजीओच्या मदतीने तिचं देणं फेडून झालंय...
आताही त्यांचा संघर्ष सुरुच आहे मात्र जो जगण्याचा आहे, पोटाचा आहे. 

आत्मसन्मान त्यांनी कधीच मिळवला आहे, त्यासाठीचं प्रांजळ मन त्यांच्याकडे आहे आणि परस्परांच्या देहापलीकडचं त्यांचं प्रेम आहे. 

बालपणापासून नरक यातना भोगणाऱ्या रजियाचं अंतःकरण विशाल आहे. प्रेमाचं एक बीज काय तिच्या मातीत रुजलं तिनं थेट अस्मानालाही ललकारलं आणि स्वतःचं विश्व नव्याने उभं करतानाच दुसऱ्या जीवाला आधार दिला !

रजियामध्ये मी दुर्गेला पाहतो.
असीम प्रेम, त्याग आणि विद्रोह सगळं तिच्या ठायी आहे..
___________________________

तिसरा रंग - शुभ्रधवल..

फोटोत डाव्या बाजूस असलेली शुभ्रवस्त्रावृता हसीना खार्भीह 

एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो खूप काही करू शकतो त्यासाठीची इच्छाशक्ती मात्र प्रबळ हवी. एका स्त्रीने ऐंशीहजारहून अधिक बायकापोरीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलं असेल यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. मात्र हे सत्य आहे. ही दास्तान आहे हसीना खार्भीहची. हसीनाला किशोरवयात असताना पासूनच समाजसेवेची आस लागली होती. १९८७ मध्ये तिने वयाच्या सतराव्या वर्षी लिडरशीप ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखला घेऊन आपली मनीषा भक्कम केली. १९९३ मध्ये तिने स्वतःची एनजीओ सुरु केली. इम्पल्स तिचं नाव !

हसीनाने या संस्थेच्या माध्यमातून उत्तरपूर्वेतील ह्युमन ट्राफिकिंगला जमेल तितका आळा घातला. सुरुवातीला तिची टवाळी व्हायची आता तिची स्वतंत्र ओळख आहे. मेघालयची आयडॉल म्हणून ती ओळखली जाते. खासी समूहाने उभं केलेल्या आंदोलनाला तिने नवी दिशा दिली मात्र त्याच वेळेस अखिल नॉर्थइस्टच्या मुलींना तिने साद घातली. सुरुवातीला तिच्याशी दबकून वागणाऱ्या, भीड बाळगणाऱ्या स्त्रिया तिच्यापासून अंतर राखून राहत. मात्र जेंव्हा त्या सगळ्या जणींना कळून चुकलं की ही आपल्याला वाचवू शकते, आपलं आयुष्य बदलू शकते तेंव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत हसीना पोलीस आणि सरकारी इन्फोर्मर झाली. तिने मुलींचं जाळं उभं केलं आणि एक मोठा समूहच निर्माण केला. या समूहाच्या माध्यमातून तिने मानवी व्यापारास आळा घातला.

आजही देशभरातील कोणत्याही लहानमोठ्या शहरातील मुख्य वेश्यावस्तीत गेलं तर तिथं नॉर्थइस्टकडील मुली आढळतात. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात हे प्रमाण सर्वाधिक होतं. यांची संख्या सर्वाधिक होती. दलाल आणि ब्रॉथेल मालकीण यात चलाखी करत. या बायकापोरी नेपाळी आहेत असं सर्रास सांगून यांची ओळख लपवली जायची. पोलिसांचा ससेमिरा आपसूक कमी होई.

वयाने लहान / किशोरवयीन असूनही केवळ अंगचणीने मोठ्या वाटणाऱ्या कित्येक अल्पवयीन मुलींचे यामुळे सहज शोषण केलं गेलं. नेपाळी मुलींचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांनी यात आपले हात धुवून घेतले. मात्र हसीनाच्या प्रयत्नांना हळूहळू यश लाभत गेले. हसीनाने केवळ महिलांनाच वाचवलं आहे असंही नाही, तिने बालमजुरी करणाऱ्या हजारो मुलांना त्यातून बाहेर काढलं आहे. आजघडीला हसीनाने तीसहजारहून अधिक स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं केलं आहे ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे.
पाहता पाहता हसीनाचं नाव सर्वांच्या मुखी झालं आणि तिच्या 'इम्पल्स'चा पसारा इतका वाढत गेला की नॉर्थइस्टकडील राज्ये वगळून म्यानमार, बांग्लादेश आणि नेपाळमधील स्त्रियांनीदेखील तिच्याकडे मदतीची याचना सुरु केली. हसीनाने त्यांनाही मदत केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजसेवेला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नॉर्थइस्टमधील विशिष्ठ झाडांच्या कटाईस मज्जाव करणारा आदेश दिला. पर्यावरणाच्या दृष्टीने हा आदेश गरजेचा होता मात्र याचा विपरीत परिणाम तिथल्या जनजीवनावर झाला. लाकूडतोड करून पोट भरणारी अनेक कुटुंबे उघड्यावर आली. यातूनच स्त्रिया आणि मुलांचा व्यापार फुलू लागला. ही वेळ कठीण होती आणि न्यायालयीन मुद्दा असल्याने कुणी पुढं येत नव्हतं. अशा प्रसंगी हसीना आणि तिची इम्पल्स पुढे झाली. त्यांनी या बायकांना मदतीचा हात दिला, कल्पक पद्धतीने उदरनिर्वाहाचं नवं साधन दिलं. शहरात विकली गेलेली लहान मुलं परत मिळवली आणि अनेकांचा विश्वास संपादन केला. या घटनेनंतर हसीनाने कधी मागे वळून पाहिलं नाही.

हसीनाचा संघर्ष आता सत्तावीस वर्षांचा झालाय. आगामी काळात तिला जागतिक पातळीवर काम करायचं आहे. जगभरात अडकलेल्या भारतीय आशियाई मुली सोडवून आणायच्या आहेत. ध्येय मोठे असून चालत नाही तर त्या ध्येयाने झपाटलेलं जीवन जगावं लागतं मग आपली स्वप्ने सत्य होऊ लागतात यावर हसीनाचा विश्वास आहे. समाजाने धुत्कारलेल्या, शोषण केलेल्या जीवांना आधार देणारी हसीना नवदुर्गा आहे जी दुष्प्रवृत्तीचा नाश करतानाच नवचैतन्याचे बीज रोवते आहे.

हसीनाला एकदा का होईना भेटायचं आहे आणि थँक्सगिव्हींग करायचं आहे.
हसीनास संपर्क साधून काही माहिती द्यायची असल्यास या पत्त्यावर कनेक्ट होता येईल -
Address: Riatsamthiah, Block 4, Shillong, Meghalaya 793001
Phone: 0364 250 3140

हसीनाला सलाम आणि तिच्या कार्याला शुभेच्छा !
__________________________________



फोटोत मध्यभागी आपल्या सहकारी रणरागिणीसमवेत उभ्या असलेल्या दीपा परब    

चौथा रंग - लाल.. 

काहींना आजही वाटतं की अमुक काम हे स्त्रियांच्या कुवतीत बसणारं नाही. छे हे काम बायकांना काय जमणार ? असा अनेकांचा अजूनही तोरा असतो. अशा कामांची यादी लोक आपल्या कुवतीप्रमाणे बनवत असतात. यातलंच एक काम बाऊन्सर्स वा बॉडीगार्ड्सचं आहे. इथं ताकद लागते, स्टॅमिना लागतो. काहींना वाटतं की हे बायकांना कसे जमणार ? मात्र एका स्त्रीने हे करून दाखवलं, नुसतंच करून दाखवलं नाही तर आपल्या वाटेवर चालण्यासाठी अनेकींना हात दिला आणि पाहता पाहता एक मोठा समूह निर्माण केला. आधी लोक तिच्यावर हसले. काहींनी टर उडवली, काहींनी या बायकांचा कस जोखण्यासाठी कामही दिलं. मात्र हे काम खूपच किरकोळ होतं. जसं की कुठे एखाद्या पबबार मध्ये कुणी एक टल्ली झाली वा तिला हँगओव्हर झालं तर सांभाळून घ्यायचं. वा यापुढचा टप्पा म्हणून केवळ स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी द्यायची वा वयस्क व्यक्तींच्या रक्षणाचा जिम्मा सोपवायचा. या असल्या कामांवर ती रणरागिणी खुश होणारी नव्हती. तिने थोडं कठीण आणि कणखर काम मागून पाहिलं मात्र तिला कुणी सिरीयस घ्यायला तयार नव्हतं. मग तिनेच आपला रस्ता स्वतःच शोधायचं ठरवलं. त्यासाठी तिने मायानगरी मुंबई सोडली आणि पुण्याचा रस्ता धरला. यात तिच्या पतीची मदत झाली. पुण्यात आल्यावर तिला काम मिळू लागलं, मग तिच्याकडे काम मागायला येणाऱ्या स्त्रियांचा ओघ सुरु झाला. मात्र तिने एक गोष्ट कटाक्षाने पाळली, अत्यंत नवतरुणी असं ज्याला आपण म्हणतो तशा तरुण मुलींना तिने हे काम दिलं नाही. अशा मुलींना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. तिनं बायका निवडल्या, नवऱ्याची मारझोड सहन करणाऱ्या, त्याची व्यसनं झेलणाऱ्या, कौटुंबिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना तिने प्राधान्य दिलं. त्यांना आधी निर्भीड बनवलं, स्वतःची ताकद त्यांना दिली आणि शारीरिक व मानसिक रित्या सुदृढ होण्यास सर्वतोपरी मदत केली. यातूनच तिचा स्वतंत्र समूह उभा राहिला. 'रणरागिणी लेडीज बाऊन्सर अँड वुमन पॉवर ग्रुप'ची निर्मिती ही अशी झाली. ही कथा आहे दीपा परब या धाडसी आणि लढवय्या स्त्रीची.

दीपा परब यांचं हे वर्तमान सुखवणारं असलं तरी त्यामागं जुन्या दिवसांच्या आठवणीचे दुःखद कढ आहेत.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली दीपा ही चार बहिणी आणि एक भाऊ या भावंडांपैकी चौथी मुलगी ! साहजिकच मुलींच्या शिक्षणाकडे आई वडिलांनी दुर्लक्षच केलं . पण तरीही घरची बेताची आर्थिक परिस्थिती, कमावणारे एकटे वडील त्यामुळे दीपा जिद्दीने रद्दी विकणे, कागदाच्या पिशव्या बनविणे यासारखी विविध कामे करून घरखर्चाला हातभार लावत होती. दीपाच्या कुटुंबावर अडचणींचा डोंगर कोसळावा तशी एक आपत्ती समोर आली ती म्हणजे दीपाचे वडील कॅन्सरने गंभीर आजारी पडले, अंथरुणाला खिळायच्या बेतात आले तेंव्हा सर्वात धाकटी असूनही मोठ्या बहिणींच्या लग्नासाठी सारसबागेत वडापाव विकून तिने पैसे उभे केले. खरं तर पोलिसात जाण्याची दीपाची खूप इच्छा होती पण आपल्या घरच्या मुली पोलिसात काम करत नाहीत म्हणून आईने भरलेला फॉर्म फाडून टाकला आणि दीपाची स्वप्नांवर पाणी पडले. दरम्यान दीपक सारखा तिच्या स्वप्नांना बळ देणारा मित्र तिला भेटला होता. आता पुढे कोणते काम करायचे, काय करायचे कसे करायचे असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला. पडेल ते काम करण्याची तयारी असणाऱ्या दीपाने विविध क्षेत्रातील वस्तूंच्या होम टू होम मार्केटिंगच्या कामात दीपाने हळूहळू जम बसवला. हे काम करताना अनेक स्त्रियांशी तिचा संपर्क येवू लागला. इतकेच नाही तर गरजू, अत्याचारित बायका तिच्याकडे मदत मागायला येऊ लागल्या. अनेकजनींना दीपाने स्वतःच्या पायावर उभे केले. काहींना ड्रायव्हिंग शिकवून, काहींना मार्केटिंग शिकवून आणि ज्या इच्छुक होत्या आणि शरीराने तंदुरुस्त होत्या त्यांना लेडी बाऊन्सर चे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले. आतापावेतो दीपाकडे तब्बल डझनभर प्रकारच्या विविध मार्केटींग क्षेत्रात दीपाचा अनुभव गाठीशी आला होता. तिथे काम करत तिने जवळ जवळ 1500 स्त्रियांना काम मिळवून दिले, त्यांचे संसार उभे केले आणि त्यांना कायमचे आपलेसे केले. मग पुढे दीपा मेकअप आर्टिस्ट म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीत शिरली. विविध कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी संपर्क येऊ लागला आणि एक दिवस दीपाला तिच्या रफ अँड टफ पर्सनॅलिटी मुळे ‘इंदू सरकर’ या सिनेमात चक्क पोलिसाची भूमिका करायला मिळाली आणि तिचं पोलीस होण्याचं स्वप्न एकप्रकारे पूर्ण झालं. पण तेव्हढ्यावर दिपा कुठली स्वस्थ बसणार ?

दीपाला आता दीपकच्या रूपाने आयुष्याचा साथीदार मिळाला. दीपक चणीने लहानखुरे पण उत्तम खेळाडू आहेत. दीपक यांची स्वतःची 'पूना स्पोर्ट्स परब अकॅडमी' आहे. नेहरू स्टेडियम येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी आपापले क्रिकेट करिअर घडवले. दीपादेखील हे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या बरोबर कोच म्हणून मैदानावर उतरली. रनिंग, सायकलिंग, गोळाफेक यासारख्या अनेक शारीरिक प्रशिक्षणात मुला-मुलींना तयार करण्यात दीपकना मदत करत होती. पोलीस होण्याचं तिचं स्वप्न कदाचित ती त्यांच्यात पाहत होती. पतीच्या खंबीर पाठबळाच्या जोरावर दीपाने बी.ए. पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले .

फिल्मी क्षेत्रात काम करताना अनेक कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेसाठी बाऊन्सर्स लागतात हे ती पाहत होती. पण त्या क्षेत्रात कुठेही महिला दिसत नाहीत. पण योगायोगाने एकदा दीपाला अशा कामाची संधी मिळाली पण हे महिलांचे काम नाही असं म्हणून तिला डावलले गेले. स्त्रिया करू शकत नाहीत असे कोणते काम असूच शकत नाही हा तिच्यातील आत्मविश्वास उफाळून आला. या घटनेने दीपाच्या डोक्यातील पोलिसात जाण्याच्या इच्छेने परत एकदा डोके वर काढले. पोलिसात जाता आले नाही तरी लेडी बाऊन्सर म्हणून आपण तेच काम स्वतंत्रपणे करू शकतो. अनेक क्षेत्रातील स्त्रियांची मोठी संपर्क यादी दीपाकडे तयारच होती. दीपाच्या या कल्पनेला तिच्याच आत्मविश्वासाने खतपाणी घातले आणि नवरा दिपक चा भक्कम पाठिंबा यातून 'रणरागिणी'ची स्थापना झाली. उत्तम शारीरिक शिक्षणातून स्वसंरक्षण आणि पोलिसांच्या मदतीसाठी समाजात शिस्त आणि संरक्षण देण्यासाठी स्त्रियांची समांतर पलटणच दीपाने उभी केली. आज या संस्थेत साधारण 500 रणरागिणी रजिस्टर्ड आहेत आणि दररोज सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे. 'मी एकटी काय करू शकणार असा नुसता विचार करून काहीच न करण्यापेक्षा दीपाने छोटीशी मशाल घेऊन धावायला सुरुवात केली आणि पाहता पाहता याला विराट स्वरूप लाभलं ! आज वुमन इम्पोवरमेन्ट क्षेत्रातील 102 पुरस्कारांनी दीपाला सन्मानित केलं गेलं आहे. पंजाब पासून कर्नाटक पर्यंत अनेक स्त्रिया मदतीसाठी तिला संपर्क करतात. आत्तापर्यंत अनेक वृत्तपत्रात, वाहिन्यांवर तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. रात्री अपरात्री जरी मदतीसाठी फोन वाजला तरी ही रणरागिणी लगेच निघते! 

"स्त्रियांनो रडगाणी गाऊ नका रणरागिणी व्हा." हा दीपाचा मंत्र खरेच अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. आजच्या काळात स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर असण्याची नितांत गरज आहे, त्या दृष्टीने दीपा ही दीपस्तंभ बनून जावी !

('रणरागिणी'साठी काही काम असलं तर या नंबरवर संपर्क साधता येईल - ९६२३०१८४३५)    
_____________________________________

पाचवा रंग - रॉयल ब्ल्यू..

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेंव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेंव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला ? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर !

अशोक अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचे पुत्र. इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. तर अशोक हे मॅकिनस्की अँड कंपनीमध्ये वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत होते. एड्सच्या साथीचे इशारे जेंव्हा जाहीर केले जाऊ लागले तेंव्हा अनेकांच्या पोटात भीतीचे गोळे उठू लागले. अनेकांनी यासाठी काही तरी केलं पाहिजे यावर जोर दिला जाऊ लागला. याचवेळी तगड्या पगाराची ही नोकरी सोडून अशोकनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या एड्सविरोधी कॅम्पेनची निवड केली. तब्बल दोन दशकं त्यांनी यासाठी खर्ची घातली. या अनुभवावर त्यांनी - 'ए स्ट्रेंजर ट्रूथ : लेसन्स इन लव्ह, लीडरशिप अँड करेज फ्रॉम इंडियाज सेक्स वर्कर्स' हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वाचताना आपल्या देशातील वेश्यांनी केलेली कमाल लक्षात येते. इतकं होऊनही यांचे बिचाऱ्यांचे अपवाद वगळता कधी कुणी साधे आभार देखील मानले नाहीत. सरकारी यंत्रणांनी तर साधा नामोल्लेखही केला नाही. सर्वसामान्य नागरिकांना यांच्या विश्वाशी घेणंदेणंच नसतं त्यामुळे या जगल्या काय किंवा मेल्या काय याच्याशी त्यांना सोयरसुतक नसतं. असं असूनही या बायकांनी जे करून दाखवलं त्यामुळेच हे संकट प्रामुख्याने टळलं असं ठामपणे म्हणता येते.

समलिंगी, ट्रान्सजेंडर्स आणि वेश्या या तीनही घटकांनी आपआपला वाटा उचलला. आन्ध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमधून याची सुरुवात झाली. आपल्याकडे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि गावात सेक्सवर्किंगच्या ठिय्यांची, ठिकाणांची धाटणी वेगवेगळी आहे. मध्यप्रदेशात हायवेवरती, तर युपीमध्ये भकास बकाल वस्त्यात, राजस्थानमध्ये ढाब्यांवर, दक्षिणेत सार्वजनिक ठिकाणालगत, नॉर्थइस्टमध्ये ग्रामीण भागात अशी यांची वर्कसिस्टीम आहे. आंध्रमध्ये बस स्थानके, रेल्वे स्थानके, सार्वजनिक उद्याने, पार्किंग लॉट्स, बकाल वस्त्यात हा उद्योग चालतो. बिल गेट्स फाउंडेशनच्या 'आवाहन' या प्रोग्रामअंतर्गत या घटकांना सामुहिक रित्या एकत्र आणून त्यांना एड्सविषयीची माहिती देणं हे काम सर्वात कठीण होतं. चार बायका एकीकडे तर चार बायका नाक्याबाहेर तर दुसऱ्या दोन बायका कुठेतरी बसडेपोच्या मागे ! असा सगळा पाठशिवणीचा खेळ होता. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला डाटा मागितला गेला तेंव्हा त्यांनी पोलिसयंत्रणेकडे बोट दाखवले. पोलिसांचा डाटा निव्वळ भोंगळ असतो. मागील पानावरून पुढे असा खाक्या त्यात जास्ती दिसतो, फेक रेड्स आणि कुंटणखान्यातील बायकांशी चालकांशी असलेले लागेबांधे यामुळे हा धंदा जिथे चालतो तिथली खरी माहिती सरकारी कागदपत्रात कधीच आढळून येत नाही हे वास्तव आहे. यामुळे मोठी पंचाईत झाली. नेमक्या बायका किती आहेत आणि कुठे कुठे आहेत याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. लाखो अदृश्य बायकांना काही महत्वाचं सांगायचं आहे मात्र त्यांचे ठावठिकाणे हाती नाहीत अन हाती असलेला वेळ पाऱ्यासारखा सहज वेगाने निसटून चाललेला अशी विचित्र स्थिती ओढवली. यात बऱ्याच एनजीओंनी प्रामाणिक मदतीचे प्रयत्न करून पाहिले मात्र ठोस काहीच हाती लागत नव्हते.

अखेर काही वेश्याच पुढे आल्या. यात एक होती, थेनू. थिरूवेली नेंपेल्ली. तिचं टोपणनाव थेनू. तिच्या साथीला कामाठीपुरा (मुंबई), बुधवार पेठ (पुणे), सोनागाची (कोलकता), जीबी रोड (दिल्ली), गंगा जमुना (नागपूर), कबाडी बाजार (मेरठ), नक्कास बाजार (सहारनपूर), शिवदासपूर दालमंडी (वाराणसी), रेशमपूर (ग्वाल्हेर) या मुख्य रेड लाईट एरियाशिवाय लखनौ, कानपूर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, झाशी, दरभंगा, भोपाळ अशा अनेक छोट्यामोठ्या शहरातील बायका त्यांना जॉईन झाल्या. ग्राहकांनी निरोध न वापरता सहवास करू नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला जो मूलतः पुरुषांच्या सेक्सविषयक जाणिवात खोल दडलेला आहे. निरोध वापरला नाही तर खरे सुख मिळत नाही आणि पौरुषत्व घटत जातं अशा विचित्र समजुतींनी लोकांना ग्रासलेलं होतं. त्यापायी या बायकांकडे मुक्त सहवासाची मागणी होते. एड्सची भीती असूनही अनेक पुरुष या बायकांकडे निरोधशिवाय शरीरसुखाची अट ठेवत. जोवर या बायकांना एड्सचं भयावह स्वरूप माहिती नव्हतं तोवर त्या त्याला बळी पडत गेल्या, मात्र जसजशी वेश्यांना बाधा होऊ लागली तसा एकच हाहाकार या बायकांत माजला. बायका ज्यांच्यासाठी काम करत त्या अड्डेवाल्या आणि दलाल हे केवळ पैशाचे भुकेले असल्याने त्यांना याच्याशी फारसं देणंघेणं नव्हतं. खेरिज निरोध वापरण्याची जबरदस्ती केल्यास दमदाटी मारहाण होऊ लागली. काहींवर अशीच जोरजबरदस्ती केली जाऊ लागली.

2004 मध्ये मुंबईत अशा काही घटना उघडकीस ज्यात काही एड्सबाधित पुरुषांनी हेतूपुरस्सर बायकांना फसवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवून त्यांना बाधित केलं. पोलिसांपर्यंत प्रकरणे गेली मात्र यावर पुढे काहीच झालं नाही. अखेर या बायकांनी हिम्मत दाखवत अशा पुरुषांना ठोकून काढण्याची तयारी करून ठेवली. मेरठ, जयपूर इथे अशी काही प्रकरणेही घडली. मग सर्वच वेश्यांची मानसिकता बदलली. दरम्यान सरकारी पातळीवरूनही सूत्रे वेगाने हलू लागली. वेश्यावस्तीत कॉईन बॉक्सच्या धर्तीवर निरोध बॉक्सेस ठेवण्यात येऊ लागले. एनजीओंना हाताशी धरून समुपदेशन आणि आरोग्य जागृती अभियान सुरु करण्यात आले. यातला एक महत्वाचा टप्पा धार्मिक बाबींशी निगडीत होता तो कसोटीचा मुद्दा होता मात्र तिथेही संयमाने काम केल्याने सरशी झाली. विस्ताराने सांगता येईल मात्र इथे आपण पुणे आणि मुंबईचे उदाहरण घेऊ. पुण्यात गणेशोत्सव काळात वेश्यागमन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, मुंबईत नववर्ष आगमनाच्या पूर्वसंध्येस वाढ जाणवते. या दोन्ही पर्वात विशेष खबरदारी घेतली जाऊ लागली. यास सामाजिक सहकार्यही मिळाले हे ही नमूद करावे लागेल.

वेश्यांकडे येणाऱ्या पुरुषांनाच निर्बंध लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पुढचा संसर्ग टळला इतकंच याचं वार्तांकन नसून याला आणखी एक पदर आहे, तो खरं तर अखिल समाजाचा आहे मात्र आजवर त्यासाठी कुणी यांना साधे ऋणनिर्देश देखील दिले नाहीत. या बायकांकडे येणाऱ्या पुरुषांना निर्बंध लावले नसते तर एका पुरुषामुळे संसर्गाची जी साखळी सुरु झाली असती त्याचे वाहक होऊन त्याच्या संपर्कात आलेल्या वेश्येने तिच्या संपर्कात आलेल्या अनेक पुरुषांना याचा संसर्ग बहाल केला असता. आणि तितक्या पुरुषांचे त्यांच्या घरच्या स्त्रीशी संबंध आल्यानंतर तितक्याच मोठ्या प्रमाणात सामान्य पांढरपेशी स्त्रियादेखील हकनाक बाधित झाल्या असत्या. हा मुद्दा कधी सामान्य जनतेने अधोरेखित केला ना माध्यमांनी यावर कधी चर्चासत्र घेतलं. यात काही एनजीओंनी जीव लावून काम केलं तर काहींनी निव्वळ आपलं उखळ पांढरं करून घेतलं. बिलकुल अक्षरशत्रू ते अल्पशिक्षित वेश्या ज्यांना आरोग्य जतन कशाशी खातात हे माहित नाही त्यांना एका भयानक रोगाची माहिती देऊन त्याविषयीच्या अभियानात त्यांना सामील करून घेऊन त्यांच्याच आधारे सर्वसामान्य जनतेचं संभाव्य नुकसान टाळणं हे एक अशक्य कोटीतील काम होते मात्र या बायकांच्या जिद्दीमुळे ते शक्य झाले.

2007 मध्ये अरुणा सोभन हिने अशोकना एक सवाल केला होता, त्याचा उल्लेख करून लेख आटोपता घेतो. एड्सबद्दल जागृतीसाठी आरोग्यसेवक सोनागाचीते पोहोचले होते. बाधा झाल्यास शारीरिक अवस्था किती वाईट होते, रोगी माणूस कसा झिजत जातो आणि शेवटी मरण पावतो याचं मुद्देसूद वर्णन त्या बायकांना ऐकवलं जात होतं. चाळीशीत पोहोचलेली अरुणा अचानक पुढे झाली आणि म्हणाली, "बाधा झाल्यास किती वर्षांनी माणूस मरतो ?"
अचानक आलेल्या या प्रश्नाने गोंधळून गेलेली आरोग्यसेविका उत्तरली, "जेमतेम दहा वर्षात माणूस मरण पावतो !" हे उत्तर ऐकून अत्यंत निर्विकारपणे थंड चेहऱ्याने अरुणाने प्रतिप्रश्न केला, "दहा वर्षे जगायचं कुणाला ? इथे खायचे वांदे आहेत. चार दिवस धंदा केला नाहीतर उपाशी मरून जाईन. धंदा सोडला तर पहिले चारपाच दिवस मनाला बरं वाटेल मात्र आमची असलियत कळली की पब्लिक लचके तोडेल, मग पुन्हा इथं यायला लागेल, मग नव्याने जम बसवावा लागतो. भुकेलं मरण्यापेक्षा साताठ वर्षे जगून मेलेलं बरं नाही का ?"
तिच्या प्रश्नाने सगळे अवाक झाले.
ही अतिशयोक्ती नव्हती. अरुणाच्या विचारांशी सहमत असणाऱ्या शेकडो, हजारो स्त्रियांनी एड्सच्या काळात जाणीवपूर्वक स्वतःचा बळी दिला. यात चाळीशी पार केलेल्या वेश्यांचे प्रमाण लाक्षणिक होते. ज्यांची कमाई घटलेली होती त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरं तर पुरुषी मानसिकतेने केलेले हे खून होते.
माझं हे विधान अतिरंजित वाटेल मात्र कुठल्याही एनजीओला वा आरोग्य - पोलिस वा तत्सम यंत्रणेला विचारून याची खात्री करून घेऊ शकता. झालं असं होतं की जेंव्हा 2003 पासून निरोध वापरल्याशिवाय शय्यासोबतीस मोठ्या प्रमाणात नकार समोर येऊ लागले तेंव्हा ज्यांची कमाई अगदी नगण्य होती त्या बायका आपल्या पोटाची आग विझवण्यासाठी अशा पुरुषांना यास राजी झाल्या होत्या. यात काही पुरुष हे एड्स बाधित असूनही जाणीवपूर्वक या बायकांच्या आयुष्याशी खेळत राहिले, त्यातून या बायका आणि त्यांच्याकडे येणारे पुरुष अशी संसर्ग साखळी होत गेली. काही बायकांनी देखील सूडाचा प्रवास म्हणून हा प्रयोग केला हे विदारक सत्य टाळू शकत नाही. 2012 नंतर जेंव्हा यावर मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध झाली आणि सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात झालेल्या जागृतीमुळे व्यापक दक्षता बाळगली जाऊ लागलीय. मात्र या दोन दशकांत ज्यांनी आपलं पोटपाणी पणाला लावलं, ज्यांनी माहिती असूनही जीव टांगणीला लावले त्यांना काय मिळालं याचं उत्तर समाज नावाचा हा अजगर कधीच देऊ शकला नाही आणि देऊ शकणार ही नाही ...

कोलकत्यात दुर्गोत्सवास सुरुवात होते कुंभारवाड्यातील मातीपूजनाने. त्यासाठी सात ठिकाणची माती आणली जाते त्यातले एक ठिकाण वेश्यावस्तीचेही आहे. तिथली माती आणल्याशिवाय दुर्गामातेच्या मूर्तीची निर्मिती होत नाही. या मातीत पावित्र्य आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, या स्त्रियांचे शील केवळ त्यांच्या शारीरिक अवयवात असेल तर त्या शीलभ्रष्ट ठरू शकतात मात्र नैतिकतेचे सच्चे मापदंड लावायचे ठरल्यास त्यांच्या देहात दुर्गेच्या अभिनिवेशाची आणि गुणांची प्रतीके नक्की सापडतात. फक्त आपली नजर तशी हवी !

सलाम !

_____________________________________

सहावा रंग सोनचाफा अर्थात पिवळा !


एरव्ही दुसऱ्याच्या इशाऱ्यावर थिरकणारी पावलं स्वतःच्या आंनदासाठी लखलखतात तेंव्हा त्यातली छमछम वेगळीच असते.
पोस्ट जुनीच आहे. तीन वर्षे झालीत.
बंगालच्या दक्षिण दिनाजपूर मधील ठाकूरपूर हाट मधल्या अर्पिताच्या बहिणीच्या 'हल्दी'सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या बंगबाला !
अर्पिता आणि तिचा ग्रुप फ्लोअरवर असायचा तेंव्हा अक्षरशः आग लावायचे.
बार बंद झाले आणि ही सगळी मंडळी पांगली. मात्र समारंभप्रसंगी एकत्र आल्यावर देहातली दामिनी चमकतेच ! तिचं लक्षणच आहे ते !
मुंबईमधील शौकीन लोकांना यातल्या एक दोघीं नक्की लक्षात असतील.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उद्भवलेले नाना तऱ्हेचे त्रास मात्र कुणीच विसरू शकत नाही..
असो..
काही नात्यांना नावाची गरज पडत नाही !
_______________________________________



सातवा रंग - हिरवा...

2005चं साल होतं. जुलै महिन्याचा धुंवादार पाऊस कोसळत होता. सगळीकडे मेघांची दाटी होऊन अंधारून आलं होतं. कोलकत्यातील हलदर पाडा रोडवरील कालीघाट पोलीस स्टेशनमध्ये पावसामुळे वर्दळ रोडावली होती. दुपार सरून संध्याकाळ यायच्या बेतात होती. पोलीस स्टेशनमधलं वातावरण आळसावून गेलं होतं. साऱ्या आसमंतात एक जडत्व आलं होतं. पोलीस नाईक स्टेशन डायरी तपासत होते. तितक्यात त्यांच्या समोर चिंब भिजलेली अपुऱ्या कपड्यातली षोडशवर्षीय तरुणी धावत येऊन धापा टाकत रडू लागली. तिच्या नाकातून रक्त येत होतं आणि गालावर मारल्याचे लालनिळे वळ होते. ओलेते केस पार विस्कटलेले होते. तिची मॅक्सी खांद्याजवळ किंचित फाटली होती. पोलिसांनी गांभीर्य ओळखत तिला आधी शांत केलं, धीर दिला आणि तिचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. तिची तक्रार ऐकताच ते थिजून गेले.

आपल्या जन्मदात्या वडिलांविरुद्ध ती तक्रार द्यायला आली होती. तिचा दोष इतकाच होता की ती एका वेश्येच्या पोटी जन्माला आली होती. तिच्या बापाला तिला धंद्याला लावायचे होते आणि वेश्या असलेल्या तिच्या आईचा याला तीव्र विरोध होता. या गोष्टीवरून त्यांच्या त्या छोटेखानी खोलीवजा घरात रोज मारझोड व्हायची. तिचा बाप दारू पिऊन यायचा आणि तिच्या आईला गुरासारखी मारहाण करायचा. नंतर नंतर त्यानं आपल्या मुलीवरही हात उचलायला सुरुवात केली. त्याचा अत्याचार त्या मायलेकी मुकाट सहन करत राहिल्या. ती माऊली तशाही काळात आपल्या मुलीने शिकत राहावं यासाठी झटत राहिली.

मात्र त्या दिवशी आक्रीत झालं. कॉलेजची पहिल्या वर्षीची फी भरण्यासाठीची रक्कम तिच्या आईने कशीबशी गोळा केली होती मात्र तिच्या बापाने ती रक्कम परस्पर चोरून नेली आणि त्या पैशाची दारू ढोसून चैन केली. आपल्या बापाने आपली फी उडवून टाकली याचा तिला मनस्वी संताप आला. तिने बापाशी वाद घातला. त्यावर त्यानं तिलाच झोडून काढलं. या खेपेस तिची सहनशक्ती संपली आणि तिनं निर्धार केंला की याचा अत्याचार आता अधिक सहन करायचा नाही. तिने भर पावसात पोलीस स्टेशन गाठलं. तिची कैफियत ऐकून पोलिसांनी त्वरित कारवाई केली. तिच्या बापाला जेरबंद करून त्याला यथेच्छ कुटून काढलं. त्या दिवसापासून त्या मुलीचं आयुष्य बदलून गेलं. तिचं नाव टुम्पा अधिकारी. ही तिचीच यशोगाथा.

टुम्पाची आई वेश्या होती, मात्र ती स्वेच्छेने या घाणीत आली नव्हती. तिच्या नवऱ्याने तिला फसवून धंद्याला लावलं होतं आणि तिच्या कामाईवर तो ऐश करत होता. कालीघाटच्या बदनाम गल्लीत तिच्यासारखीच कथा असणाऱ्या सगळ्या बायकापोरी असल्याने तिचं दुःख काही वेगळं नव्हतंच. त्यामुळे तिला सहानुभूती लाभून तिचं दुःख दूर होणं अशक्य बाब होती. किंबहुना ज्या कालीघाटपाशी विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रचाराचा नारळ फोडायला येतात त्यांना देखील या वस्तीतल्या बायकांचं किड्यामुंग्याहून वाईट जीवन नजरेस पडत नव्हतं. एरव्ही आपल्या धार्मिक भावनांचे गळू मोठ्या अहंगडांने जोपासणाऱ्या कुण्या धर्मप्रेमीस देखील साक्षात देवीच्या नावाने असणाऱ्या त्या वस्तीत जिवंत देवतेची राजरोस विटंबना होत असताना काहीच वाटत नव्हतं. बाकी सामान्यांच्या बद्दल तक्रारीचा मुद्दाच उरत नाही. टुम्पाने धंदा करू नये, वेगळा मार्ग स्वीकारावा असं तिच्या आईला वाटे. त्यासाठी ती मायमाऊली आपल्या पोरीची ढाल झाली होती.

त्याच भागात एनजीओ चालवणाऱ्या प्रोमिता बनर्जीशी एकदा त्यांची भेट झाली. प्रोमिताला ती माऊली म्हणाली "आम्हाला कुणी बाहेरचा मसीहा वाचवू शकणार नाही, आमच्यातीलच कुणाला तरी पुढं यावं लागणार आहे जो आमच्यासाठी दीपस्तंभ ठरेल." तिचे हे उद्गार प्रोमिताला प्रेरणा देऊन गेले. प्रोमिता बनर्जीनी टुम्पाला यासाठी प्रेरित केलं. त्यातून भरारी घेत टुम्पाने दिशा नावाची एनजीओ सुरु केली. रस्ता भटकलेल्या आईबहिणींच्या वस्तीत ती आता दिशादर्शकाचं काम करणार होती. सुरुवातीला तिला विरोध झाला, नंतर नंतर सर्वच बायकांनी तिच्यावर विश्वास टाकला. त्या रेड लाईट एरियातील लहान मुलामुलींचा ती आधार झाली. यासाठी तिने धंद्यातून बार झालेल्या खुडूक बायकांची मदत घेतली. त्या देखील मनापासून तिच्या कार्यात सामील झाल्या. कालीघाट रेड लाईट एरियाचे पाच भाग केले गेले. प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यासाठी एका वयस्क वेश्येची नियुक्ती करण्यात आली. पाचही भागातील मुलांची यादी बनवून त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीवा याबद्दल त्यांना नेमकी माहिती दिली जाऊ लागली. यातूनच बदल घडत गेला. टुम्पाचं लक्ष आता खिदीरपूर रेड लाईट एरियावर आहे, हा बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. इथल्या मुलींसाठी टुम्पा आता रोल मॉडेल झाली आहे.

टुम्पा भेटली आणि काली घाटमधल्या देवीचा कालीमातेचा माझा शोध संपला. तिला दशभुजा नाहीत की हाती कुठली आयुधंही नाहीत मात्र तिने शेकडो मुलींच्या हाती वही पेन दिलंय जे त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणेल ! 

सलाम !!
_____________________________________ 

आठवा रंग - मोरपंखी ...


ज्या समाजात केवळ मादरचोद, बहनचोद अशा शिव्या आहेत. तिथं बापचोद, भाईचोद अशा शिव्या दिल्या जात नाहीत कारण केवळ 'बाई' हीच निव्वळ आणि निव्वळ भोगवस्तू असते, तिच्यावर पडून तिला भोगायचं हेच पक्के रुजलेले असल्याने या संभोगवादी शिव्या केवळ स्त्रीसाठी आहेत.
स्त्रीवर बलात्कार झाला म्हणजे तिचं सर्वस्व लुटलं गेलं अशा भ्रामक कल्पना जिथे जाणीवपूर्वक रुजवल्या गेल्या आहेत तिथे आणखी काय अपेक्षा करणार ?
स्त्रीचं शील जर तिच्या योनीत आहे तर मग पुरुषाचं शील कशात आहे ?
त्याच्या लोंबत्या जननेंद्रियात त्याचं शील का नाही ?
की शील ही संज्ञा फक्त 'बाई'साठी आहे ?
स्त्रीला योनी वगळता कर्तृत्वाचा भाग आहे की नाही ?
मग तिचा सन्मान तिच्या जननेंद्रियापुरता का मर्यादित केला गेला ?
याचं कारण स्त्रियांनी या पुरुषी वर्चस्वाच्या शोषणवादी समाजरचनेचं सहनशील अंग व्हावं आणि त्या योनीरक्षणापुरतं स्वतःला मर्यादित करून घ्यावं, जेणेकरून बाह्य जगाची ओढ त्यांना लागू नये, त्यांनी बंड करू नये हे आहे. वास्तवात हे अब्रू नावाचं लॉलीपॉप आहे !

सुनीताचं म्हणणं इथं पटतं, बलात्कार हा एक शारीरिक अत्याचार आहे. मात्र बलात्कार झाला म्हणजे सर्वस्व लुटलं गेलं, आता आपण जगाला तोंड दाखवायला लायक उरलो नाही हा केवळ भ्रामक आणि निखालस खोटारडा समज आहे. खरं तर ज्यांनी अत्याचार केला त्यांनी तोंड लपवत फिरलं पाहिजे. बलात्काराच्या घटनेला आयुष्यातून बरबाद झाल्याची फिल देता कामा नये. या उलट स्त्रीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारला पाहिजे आणि समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

पूर्वीच्या काळी नित्य युद्धे होत, चकमकी होत तेंव्हा रक्तपातासोबतच स्त्रियांवर बलात्कार करण्यावर जोर असे. आजही कुठेही अन्य पद्धतीचे गुन्हे (जसे की दरोडा, खून) घडले की जोडीने बलात्कार ही केले जातात. यामागची मानसिकताच मुळात स्त्रियांवर दहशत पसरवण्याची आणि त्यांच्यावर काबू मिळवण्याची आहे. जोवर स्त्रिया याला बळी पडत राहतील तोवर बलात्कार पिडीत महिला स्वतःला दोष देत जीव देण्याची भाषा करत राहील. या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी मला सुनीता कृष्णन महत्वाची वाटते...

एका सधन उच्चभ्रू उच्चजातीय वर्गातलं सुनीताचं कुटुंब होतं. घरी सगळी सुखे पाणी भरत होती. समृद्धी नांदत होती, कुठे नाव ठेवायला जागा नव्हती. मात्र एके दिवशी त्यांच्या कुटुंबास मोठा हादरा बसला. पंधरा वर्षे वयाच्या कोवळ्या सुनीतावर आठ नराधमांनी बलात्कार केला.
कुटुंब पुरतं थिजून गेलं. पण सुनीता धीट होती. तिने त्या परिस्थितीचा सामना केंला. मनोबल वाढवत स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं.
तिच्यावर झालेला बलात्कार जाणीवपूर्वक आणि नियोजित होता !
याचं कारण महत्वाचं आहे.
वयाच्या आठव्या वर्षी तिने शोषित घटकातील मुलींसाठी नृत्याचे वर्ग सुरु केले होते जे तिथल्या दलालांना आणि कुंटणखान्याच्या मालकिणींना मान्य नव्हतं. ही हकीकत आहे सुनीता कृष्णनची.

सुनीताचे वडील नकाशे बनवण्याच्या विभागात होते. त्या कामानिमित्त त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची देशभर भ्रमंती झाली होती. आईवडिलांसोबत राहणाऱ्या सुनीताने या काळात त्या त्या भागातील वंचित शोषित घटकावर जीव लावला. यातून तिच्या मनात मायेचा आस्थेचा करुण झरा सदैव पाझरत राहिला.
सुनीताच्या बलात्कारास त्या कुटुंबाने नव्या दृष्टीकोनातून पाहिलं. ते त्याला चिकटून राहिले नाहीत. त्यातून ते घट्ट उभे राहिले.
सुनीताने बंगळूरुमधील सेंट जोसेफ महाविद्यालयातून पर्यावरण विज्ञान विषयातून पदवी घेतली. मंगलोरमधील रोशनी निलयमधून तिने एमएसडब्ल्यू केलं. 1996 साली ती हैदराबादेत असताना मेहबूब गली रेड लाईट एरियातील वेश्यांना त्यांच्या राहत्या घरातून बेदखल करण्यात आलं. तेंव्हा तिने एक जोरकस पाऊल उचललं. या बायका पोरींना तिने आश्रय दिला. त्यांच्यासाठी तिने लढा उभारला. या क्षेत्रात सुनीताचं नाव झालं.

आंध्रप्रदेश सरकारने मानवी तस्करी रोखण्यासाठी तिच्याकडून आराखडा बनवून घेतला. सुनीता एका मल्याळी दांपत्याची मुलगी असली तरी तिचा जन्म बंगळूरूला झाला होता त्यामुळे तिची ओढ साहजिकच जन्मभूमीकडे होती. आंध्रनंतर तिने कर्नाटकमधील वेश्यांसाठी आवाज उठवला. त्यांच्या आरोग्य आणि संरक्षण विषयक प्रश्नांवर लक्ष दिले. एड्सबाधित स्त्रियांसाठी सेंटर्स उभे केले.

सुनीताच्या कार्याने भारावून गेलेल्या केरळ सरकारने 2011 साली तिच्या मार्गदर्शनानुसार निर्भया पॉलिसी बनवून घेतली. दक्षिण भारतातल्या वेश्यांसाठी सुनीता आईसमान आहे.
राजू आणि नलिनी कृष्णन यांच्या पोटी जन्माला आलेली सुनीता आता 48 वर्षांची आहे मात्र धंद्याच्या लाईनमधून बाद झालेली 84 वर्षांची उमर ढळलेली दुर्गाम्मादेखील तिला सुनीता अम्मा म्हणते. ती या सर्वांची आई आहे.

एकीकडे या बायका तिच्यावर जीव टाकतात तर दुसरीकडे असेही घटक आहेत ज्यांच्या नजरेत ती सलते. आजवर तिच्यावर तब्बल चौदा वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यात ती बऱ्याचदा जखमीही झाली आहे.

सुनीताला कुणी विचारलं की, "तुझं आयुष्य कशामुळे बदललं ?" तर ती उत्तरते की, "माझ्यावर झालेल्या बलात्काराने मी अधिक दृढ निश्चयी आणि मजबूत झाले ! त्याला माझा वीक पॉईंट समजले नाही. इथे पाच वर्षाच्या मुलीसोबत लोकांना शय्यासोबत करताना पाहिलं तेंव्हा माझ्यावर झालेला बलात्कार हा एक शारीरिक अत्याचारच होता हे मला कळून चुकलं. "

सुनीताच्या 'प्रज्वला' या एनजीओने आजवर बारा हजार मुलींची सुटका केली आहे. संरक्षण, सुटका, पुनर्वसन, आधार आणि विधी सहाय्य अशा पाच पातळ्यांवर तिचे काम चालते. सुनीताकडून शिकण्यासारखे काय आहे हे व्यक्ती विचारसापेक्ष आहे. मी मात्र तिच्यात देवता पाहतो, किंबहुना त्याहून अधिक पाहतो...

सलाम !
_________________________________________________________________________________

नववा रंग जांभळा....



जांभळ्या साडीतली ही स्त्री म्हणजे कुणी सामान्य शिक्षिका नाही. तिच्यासमोर बसलेले विद्यार्थी समाजाने भोगलेल्या स्त्रियांची बालके आहेत. ही स्त्री मायेचा अथांग सागर आहे जिला कधी काळी खूप काही सहन करावं लागलं. तिची कहाणी जाणून घेण्यासाठी तिच्या बालपणात डोकावं लागेल. तिचं नाव सीतव्वा. पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षाच्या सीतव्वाला सलग नऊ दिवस हळद लावली गेली, लिंबाची पाने घातलेल्या पाण्याने स्नान घातले गेलं. नवव्या दिवशी नवं लुगडं नेसवलं गेलं, हातात हिरव्याकंच बांगड्या चढवल्या गेल्या, गळ्यात लालपांढऱ्या मण्यांचं दर्शन बांधलं (माळ घातली). त्यादिवशी ती फार खूष होती. तिच्या बिरादरीतल्या लोकांना जेवण दिलं गेलं. माणसांची वर्दळ दिवसभर होती, सीतव्वाला त्यादिवशी खेळायला जायचं होतं पण तिचं बालपणच त्या दिवशी कुस्करलं गेलं हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपण कुठल्या तरी आनंदोत्सवात आहोत आणि त्याचे केंद्रबिंदू आहोत याचा तिला विलक्षण हर्ष झाला होता. 

सीतव्वा एका गरीब कुटुंबात जन्मलेली. तिच्या वडीलांना नऊ मुली होत्या. पहिल्या तीन मुली दगावल्यानंतर त्यांनी यल्लमाला नवस बोलला की माझी एक मुलगी तुला अर्पण करेन. योगायोगाने उर्वरित सहा मुली जगल्या आणि दरम्यान आजारपणात सीतव्वाचे वडील वारले. नवरा मेलेला, घरची अत्यंत बिकट परिस्थिती आणि खाणारी तोंडे वाढलेली अशा कात्रीत सीतव्वाची आई अडकली. अखेर तिने सीतव्वाला यल्लम्माला अर्पण करायचा अप्रिय निर्णय घेतला. सीतव्वा सातव्या इयत्तेत असताना तिला जोदत्तीच्या एका उच्चवर्णीय जमीनदारासोबत ‘झुलवा’ म्हणून होळकेरी गावी ठेवलं गेलं. त्या दिवशी ती लुटली जाईपर्यंत तिला यातलं काहीच ठाऊक नव्हतं.

त्या जमीनदाराला आधीच्या दोन बायका होत्या, त्या दोघींवरही त्याचं प्रेम होतं. तरीही त्यानं सीतव्वाला झुलवा म्हणून ठेवलं. त्याच्यापासून सीतव्वाला दोन अपत्ये झाली. सीतव्वापासून झालेल्या मुलांवरही त्याने माया केली. त्यांना कपडेलत्ते देण्यापासून ते अन्नधान्य पुरवण्याचे काम त्याने केले पण आपले नाव त्यांना दिले नाही. सीतव्वातला चार्म संपत आला तसा तो होळकेरीला तिच्याकडे कमी प्रमाणात येऊ लागला. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले नाही. या काळात सीतव्वाच्या मनात अनेक वादळे उठली आणि शांत ही झाली. दरम्यान कर्नाटक सरकारच्या वतीने देवदासी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाऊ लागला. यातील उपक्रमात ती हिरीरीने भाग घेई. महिलांवरचा अन्याय, शोषण आणि देवाच्या नावावर चालत असलेलली स्त्रीत्वाची लुबाडणूक यावर तिची मते पक्की होऊ लागली. 

१९९० च्या सुमारास बेळगावमध्ये या अभियानाने काम थांबवलं तेंव्हा आपणच अशी संस्था काढावी असे तिला वाटू लागले. विचारांना मूर्त स्वरूप देत तिने सप्टेबर १९९७ मध्ये ‘महिला अभिवृद्धी मत्तू संरक्षण संस्थे’ (MASS) ही संस्था काढली. आता ती या संस्थेची सर्वेसर्वा आहे. आजघडीला ३६६२ देवदासी या संस्थेच्या सभासद आहेत. यातली सर्व पदे देवदासींकडेच आहेत. ५६१ मागास महिलांनादेखील यात सामील करून घेतले गेलेय. संस्थेकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात समन्वयक ते प्रशिक्षकाच्या जबाबदाऱ्या बहुतकरून देवदासीच पार पाडतात. देवदासी महिलांना अर्थसहाय्य, विधीसहाय्य, गृहबांधणी. अपत्यांसाठी शिक्षण, तंटामुक्तीतून विवाद सोडवणे अशा विविध पातळ्यांवर ही संस्था काम करते. तिने महिला स्वावलंबन समूह (SHG) बनवून या महिलांना आपल्या पायावर उभं केलं आहे. जी सीतव्वा किशोरअवस्थेत लुटली गेली तीच आता अनेकांना आधार देऊन भावी पिढीत कुणी सीतव्वा बनू नये म्हणून प्रयत्न करते आहे. जोगती आणि जोगत्यांना या बंधनातून मुक्त करणे, जातीअंताची लढाई होईल तेंव्हा होईल पण मागास जातीतील गरीब जनतेच्या डोक्यातून अंधश्रद्धेचा नायनाट करणे हे सीतव्वाचं पुढचं टार्गेट आहे. तिची जिद्द आणि सच्चेपणा पाहू जाता ती यात यशस्वी होईल यात शंका नाही. रामायण काळातल्या सीतेहून अधिक कठोर अग्नीपरीक्षा दिलेल्या या सीतेचे सामाजिक भान अत्यंत प्रेरणादायी आणि कठोर तपश्चर्येचे ठरले आहे. 

खरे तर देवीला मुलं-मुली सोडण्याची कसलीही कारणं पुरेशी असत. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरीबीमुळे या लोकांना दवाखाना करणं परवडत नसे वा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असे. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा ही पूर्वापार चालत आलेला खुळचटपणा अनेक सुशिक्षितांमध्ये आजही आढळून येतो. सर्वार्थाने मागासलेल्या घटकांत तर अशा अंधश्रद्धांचा कहर असे. अनेक मुली जन्मास घातल्यावरही आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा असे. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जायचे. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नसे. एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं. केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मूल झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेई व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करे. असेही प्रकार घडत ! आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं ‘दर्शन’ दुस-या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधले नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते. वरवर ही अंधश्रद्धा असली तरी तिची खरी कारणे आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी आपल्याला बघेल, याची ती सोय असे.

वयात आलेल्या अशा तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असत, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची नजर असे. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होई. झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो. त्याच्यापासून तिला मुलं झाली तर तो त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवा फार दिवस टिकतोच असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ‘‘हे मूल माझं कशावरून?,’’ असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ‘‘मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,’’ असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं. या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात. या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं. 

परिसरातल्या लग्नप्रसंगात खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. एकीच्या हातात तुणतुणं, दुसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी असते. ती लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो. यल्लम्माला मुलेही सोडली जातात. मुले सोडण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग होतो. कधीकधी मुलींनाही शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं. काही जणी शहरात पळून जातात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात. मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात. या सर्व प्रथा पूर्णतः बंद होतील तो दिवस सुदिन म्हणावा लागेल. त्या साठी सीतव्वा सारख्या धाडसी लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच मदतीचा हातही पुढे करणे गरजेचे आहे कारण समाजाला अंधारातून उजेडाकडे नेताना स्वतः जळणाऱ्या त्या खऱ्या स्त्रीज्योती आहेत... 

नवरात्रीचे हे नवरंग मनोरंजनासाठी वा निव्वळ प्रबोधनासाठी वा लाईक शेअर कमेंटसाठी मांडलेले नाहीत. समाजातील एका दबलेल्या, वंचित शोषित घटकाकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलावा. त्यांच्याप्रती असलेली घृणा नष्ट व्हावी, तिरस्कार नष्ट व्हावा आणि शक्य झालं तर त्यांना आदर सन्मान ही दयावा इतकी माफक अपेक्षा आहे. सगळेच जण या घटकांसाठी काम करू शकत नाहीत याला काही मर्यादा आहेत, काही अडचणी आहेत त्यामुळे जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवण्याचं काम तरी करता येईल. ह्या अडल्या नडल्या बायका प्रेमाच्या भुकेल्या आहेत त्यांना आपण प्रेम सन्मान देऊ शकत नसलो तर किमान त्यांची हेटाळणी तरी करू नये इतकी अपेक्षा सर्व वाचकांकडून ठेवतो. 

अखिल नारीशक्तीला सलाम ! 

- समीर गायकवाड.

३ टिप्पण्या:

  1. खूप छान विचार मांडलेत सर...नक्कीच या प्रेरणादायी विचाराने जगभर स्त्री या वर्गाकडे पाहण्यात सकारात्मकता येण्याची आशा आहे.आपल्या लेखणीतून आपण आपला वाटा उचलला आहे.👌✍️🙏

    उत्तर द्याहटवा