Sunday, July 21, 2019

अखेरचा स्पर्श.."आमच्या अन्याबाला कुटं बगितलंस का रे बाबा ?" डोक्यावरून घेतलेल्या इरकली साडीचा पदर ओठात मुडपून डोळ्यात पाणी आणून कापऱ्या आवाजात अक्काबाई विचारत असे. समोरचा हसत विचारे, "कोण पावल्या का ?" यावरचा तिचा होकार असहायतेचा असे. मग त्या माणसाने दावलेल्या जागी अक्काबाई घाईनं जायची. हे दृश्य महिन्यातून एकदा तरी गावात दिसे. चालतानाची तिची लगबग लक्षणीय असे. म्हाताऱ्या अक्काबाईच्या वयाची चर्चा गावात नेहमीच व्हायची. म्हातारी अजून वाळल्या खारकेसारखी टिकून आहे असं हमखास बोललं जायचं. माथ्यावरची चांदी विरळ झाली असली तरी मस्तकावरचा पांडुरंगाचा हात अक्काबाई टिकवून होती. अक्काबाईच्या समवयीन बायकांनी आपला जीवनप्रवास केंव्हाच संपवला होता. तिच्या वयाची पुरुष मंडळीदेखील एकदोनच होती ती देखील गलितगात्र होऊन गेलेली. नव्वदीत गेलेली अक्काबाई मात्र लिंबाच्या काटकीसारखी टकटकीत होती. असं असलं तरी तिच्या तळव्यातली साय आणि डोळ्यातली गाय शाबित होती. बोटांची लांबसडक पेरं चिंचेच्या आकड्यासारखी वाकडी तिकडी झाली होती, तळहातावरच्या रेषांनी हात पोखरायचा बाकी ठेवला होता. मनगट पिचून गेलेलं असलं तरी त्यातली ताकद टिकून होती, मनगटापाशी असलेलं कातडं लोंबायचं, त्याचा स्पर्श झाला की गायीच्या गळ्याच्या रेशमी कांबळीस शिवल्यागत वाटायचं. वर आलेला पाठीचा कडक कणा स्पष्ट दिसत होता, ढोपराची हाडे टोकदार होऊन बाहेर डोकावत होती. तरातरा चालताना तिने काष्ट्याचा सोगा वर ओढलेला असला की लकालका हलणाऱ्या गुडघ्याच्या वाट्या लक्ष वेधून घेत. नडगीचं हाड पायातून बाहेर आल्यागत वाटे, पिंडरीचं मांस पुरं गळून गेलेलं. पोट खपाटीला जाऊन पाठीला टेकलेलं. अक्काबाईचा चेहरा मात्र विलक्षण कनवाळू ! तिच्याकडे पाहता क्षणी काळीज डोळ्यात येई. तिच्या हरणडोळ्यात सदैव पाणी तरळायचं. थरथरत्या ओठातून शब्द बाहेर पडण्याआधी धाप बाहेर पडायची. पुढच्या दोनेक दातांनी राजीनामा दिलेला असला तरी दातवण लावून बाकीची मंडळी जागेवर शाबूत होती. अक्काबाई बोलू लागली की तिच्या कानाच्या ओघळलेल्या पातळ पाळ्या टकाटका हलायच्या, हनुवटी डगमगायची. बोलताना समोरच्याच्या नजरेत डोळे घालून बोलणारी अक्काबाई मृदू आवाजाची आणि मितभाषी होती. खोल गेलेल्या डोळ्याखालच्या काळया वर्तुळातून तिची चिंता उमटायची. अक्काबाईचं बोडखं कपाळ डोळ्यात खुपायचं, त्यावरची आठयांची मखमली जाळी रुखमाईसमोरच्या स्वस्तिक रांगोळीसारखी भासे.

अक्काबाईचा दादला मरून आता तीन दशकं उलटून गेली होती. दादाराव हा तिचा नवरा. त्याच्या वंशाला पाच पोरे आणि दोन पोरी असा भलामोठा वारसा लाभलेला. बाकी दादारावचं या पलीकडे काहीच कर्तृत्व नव्हतं. वडीलोपार्जित शेतीत त्यानं कुठली वाढ केली नाही की त्यात कुठली घटही केली नाही. त्याच्या पोरींची लग्ने होऊन त्या यथावकाश सासरी गेल्या. धाकटा अन्याबा वगळता एकेक करून चारही पोरांची लग्ने झाली, त्यांचे संसार भरभरून वाढले. घरात नातवंडांची रांग लागली. घराचं गोकुळ झालं. पाऊसपाणी होईल तसं पीकपाणी पिकत गेलं, बोरी बरोबर बाभळी वाढत गेल्या, ढेकळातल्या मातीनं अंकुर फुलवण्यात भेदभाव केला नाही, समान हातानं सगळी रोपं वाढवली पण एखादं रोप रोगट असतं. त्यावरची कीड सगळ्या पिकाच्या मुळावर उठते तसंच काहीसं दादारावच्या घराचं झालं. मधल्या सुनेने घरात काडी लावली. घर तुटलं. दादारावच्या डोळ्यादेखता सगळं तुटत गेलं. अक्काबाई मुकाट बघत राहिली, पोटातल्या आतड्यांचा पीळ काळजात साठवत राहिली. खुरपायला गेली की ओठात खुरप्याचं पातं धरून मूक रडायची, तिच्या भेगाळलेल्या पायातून तिचे कढ मातीला जाणवत तेंव्हा तीही उस्मरून जाई ! दादाराव निंबाळकराचं घर तुटलं आणि चौसोपी वाड्याचे पाच भाग झाले. पण दादाराव आणि अक्काबाईनं तिथं राहण्यास नकार दिला. पाचवा हिस्सा ज्या अन्याबाच्या वाटयाला आला होता त्याला संगट घेऊन ते मोठ्या दुःखी कष्टी मनाने शेतातल्या वस्तीत राहायला गेले. गावानं खूप समजावून पाहिलं पण त्या वृद्ध जोडप्यानं ऐकलं नाही. गावानं त्यांच्या पोरांना शिव्यांची लाखोली वाहिली पण पोरं बधली नाहीत की सुनांच्या मनातलं जहर सरलं नाही. अखेर काही दिवसांनी हा विषयदेखील मागे पडला पण दादाराव निंबाळकरांच्या पोरांना गावाने त्या दिवसानंतर मानाचं पान कधीच दिलं नाही, त्यांना एक प्रकारे वाळीतच टाकलं होतं. गावात असं पहिल्यांदाच झालं होतं असं काही नव्हतं, या आधी किती तरी उंबरठे एकाचे चार झाले पण गावानं तिथं इतका आक्रोश केला नव्हता. 'वायलं' काढून द्यायची ही पहिली बारी नसली तरी दादारावच्या पोरांना सगळ्यांनी दातात धरलं त्याचं कारण अन्याबा होता ! पण गाव त्याला पावल्या म्हणायचं. त्यालाही एक कारण होतं !

चाळीशीत आलेला अन्याबा हा दादाराव आणि अक्काबाईचा सगळ्यात धाकटा पोरगा. जन्मतःच गतिमंद असलेला पोर होता. तळहाताच्या फोडासारखा त्यांनी जपला होता. बालवयात त्याला सांभाळणं फारसं अवघड गेलं नाही कारण अनेक माणसांच्या खटल्यात त्याच्याकडं लक्ष देणारी पुष्कळ माणसं घरात होती. बालवयातल्या अन्याबाचं लाडाचं नाव गट्टू होतं पण गाव त्याला पावल्या म्हणायचं कारण चालताना तो पावलाला जोडून पाऊल टाकायचा. रखडत पाऊल टाकणारा, एका लयीत पावलं टाकणारा अन्याबा बालपणी टवाळ मुलांच्या कुचेष्टेचा विषय होता पण अक्काबाईच्या पुढ्यात त्याच्याबद्दल अवाक्षर काढायची कुणाचीही हिंमत होत नसे कारण अन्याबा हीच तिची कमजोरी होती. त्याला कुणी नावं ठेवलेली खपत नसत. गुडघ्याच्या खालीपर्यंत लोंबणारी ढगळ खाकी अर्धी चड्डी आणि अर्ध्या बाह्यांचा शुभ्र सदरा हा त्याचा ठरलेला वेष असे. नजर अस्थिर असणारा, बह्यांनी नाक पुसणारा, बोलताना अडखळणारा, सलग बोललं की लाळेची तार लागणारा, कुणी काही टोचून बोललं वा टिंगल केली तरी त्याचा मतितार्थ न कळता निरागस हसणारा, बालपणी कधी कुणाशीही वाद न घालणारा पण अक्काबाईपाशी फुग्यापासून ते लिमलेटच्या गोळीपर्यंत कशाचाही हट्ट धरणारा अन्याबा म्हणजे मूर्तिमंत भोळेपणा, निरागसता आणि सच्चेपणा यांचे प्रतिक होता. अन्याबा जसजसा मोठा होऊ लागला त्याला दाढी मिशा आल्या तसं अक्काबाईवरचं दडपण वाढत गेलं. नेमक्या त्याच काळात घराचे तुकडे पडले. दादाराव आणि अक्काबाई अन्याबाला घेऊन वस्तीवर राहायला आले. खरं तर त्यांना गावापासून आणि गावातल्या लोकांपासून दूरच जायचं होतं, त्यांच्या नजरेतल्या विविध भावनांपासून अन्याबाची सुटका करायची होती. शेतात राहायला आल्यानंतर काही वर्षांनी आक्रीत घडलं साप चावून दादाराव मरण पावला. अक्काबाईच्या पोरांना जनाचीही लाज वाटली नाही की मनाची लाज वाटली नाही, वरकरणी त्यांनी अक्काबाईला गावात परतण्याचा कोरडा आग्रह केंला पण स्वाभिमानी अक्काबाई गावात परतली नाही.

नवरा गेला तसा अक्काबाईचं विश्व आणखी आक्रसलं. कासवानं पाय दुमडून पोटात घ्यावं तशी ती आपल्या पोराला बिलगून असे. जग त्याचं नवल करायचं. वय वाढत गेलं तसा तिचा दमा अधून मधून जोर दाखवू लागला पण काळ्यामातीत राबणारी नियतीशी दोन हात करणारी पोराला वाढवताना काळजाचा पहाड करणारी अक्काबाई सहजासहजी हार मानणारी नव्हती. एका हातात खुरपं आणि एका हातात दावं घेऊन ती रानात काम करे. दाव्याचं एक टोक अन्याबाच्या हाताला बांधलेलं असे. तिला काम नसलं की अन्याबा मोकळा असे. बंधनात नसलेला अन्याबा फुलपाखरासारखा होता. त्याला पानाफुलांचे, मुक्या जनावरांचे विलक्षण वेड असे. वस्तीच्या आसपास कुणाची गाय, म्हैस व्यायला झाली असली की तो तिथं जाऊन बसायचा. तिचं अवघडलेपण पाहून याच्याच डोळ्यात पाणी यायचं. मग तो तिच्या तटतटलेल्या पोटावरून अलगद हात फिरवत राही. त्यानं हात फिरवला की काही तासात तो जीव मोकळा होई. वेत होऊन वार पडेपर्यंत तो तिथंच राही. त्याला घरी नेण्यासाठी अक्काबाई आली की लोक म्हणत, "राहूदे अक्काबाई, आणून सोडतो त्याला. किती काळजी करशीला ?" यावर अक्काबाई निरुत्तर होई. अन्याबाच्या स्पर्शातल्या जादूची माहिती कर्णोपकर्णी होत राहिली. गावातली वा आसपासची माणसं त्याला न्यायला येऊ लागली. तो अनोळखी ठिकाणी गेला की परत येईपर्यंत अक्काबाईचा जीव टांगणीला लागायचा. पण लोक त्याला सुखरूप आणून सोडत. तरीही कधीकधी कुणाची तरी नजर चुकवून वा कुणाच्या तरी बैलगाडीत बसून तो हरवून जायचाच. मग अक्काबाईच्या काळजाची चिमणी फडफड करे, त्याचा माग काढत ती फिरत राही. तो दिसला की संतापाच्या लाव्ह्याचे रुपांतर साखरपाकात कसे होई ते तिला कधीच उमगले नाही.

दादाराव गेल्याला तीन दशके उलटून गेली. अन्याबा आता साठीत आला होता. केसाची चांदी दिसू लागली होती. अक्काबाईला आता त्याच्या मागं फिरणं जमत नव्हतं. तो देखील आता जरासा शांत झाला होता. गावातलं कुणी मरण पावलं की त्याच्या सरणापाशी बसून राहायला त्याला आवडायचं. गावात रामायण सुरु होऊन लक्ष्मणशक्तीचं पर्व सुरु झालं की त्याला चेव यायचा. तालमीजवळून जाताना सदऱ्याची बटने ठीकठाक करताना त्याला कोण आनंद व्हायचा. पावसाळ्यात तळे गच्च भरले की काठावर बसून वडाच्या पारंब्यांशी पुटपुटताना त्याच्या चेहऱ्यावर तेज झळके. आमराईत गेला की पानाफुलांची नक्षी काढताना तो तल्लीन होई. अन्याबा वाटेने चालला आहे आणि त्याच्या मागून पुढून येणारी गुरं उधळली आहेत असं गावानं कधीही अनुभवलं नव्हतं. पण कुणाचं मरण जवळ आलेलं आहे पण त्याची सुटका होत नाही असं कुणी असलं की तिथं त्याला बोलवलं जाऊ लागलं. त्यानं कपाळावरून हात फिरवताच काही वेळाने तो देह निमालेला असे. अन्याबाने कुणाच्या देहात प्राण फुंकला नाही पण काहींचे अडकलेले श्वास मोकळे केले. लोकांच्या मनात त्याच्याबद्दलचे कुतूहल ओतप्रोत भरले होते. त्याच्या पोटापाण्याची ददात मिटली नसली तरी त्याच्यावर जीव लावणारी माणसं आता वाढत चालली होती. पण अक्काबाई जाणून होती की ही माणसं त्याच्यावरच्या प्रेमापोटी त्याला जवळ करत नसून त्याच्या हातगुणापायी त्याला जवळ घेताहेत. आपण तर थकत चाललो आहोत पण आपल्या पाठीमागे आपल्या पोराचा निभाव कसा लागणार या एकाच विचाराने ती जगण्यास मजबूर होती. रोज सांज होताच तुळशीपाशी दिवा लावताना ती एकच प्रार्थना करायची की, "अन्याबाच्या आधी मरण येऊ देऊ नको !"

अक्काबाईचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं देखील. साथीच्या तापात अन्याबा दगावला. त्याचं अचेतन कलेवर घरी आणलं तेंव्हा अक्काबाईच्या डोळ्याच्या बाहुल्या गोठून गेल्या होत्या. तिच्या मनात द्वंद्व सुरु होतं, आपणच तर पोराचं मरण मागितलं नाही ना असं तिला राहून राहून वाटू लागलं. अन्याबाच्या मृत्यूनंतरही तिने वस्ती सोडली नाही. तो ज्या ज्या झाडाखाली जाऊन बसायचा तिथं ती बसून राहू लागली. त्याचा जीव जिथं म्हणून रमायचा तिथं तिथं ती जाऊ लागली. लोक म्हणू लागले की म्हातारीला लागिर झालं. अक्काबाईनं अंथरून धरल्यावर म्हातारी झालेली तिची पोरं शेतात येऊन राहिली पण काही केल्या तिचा जीव मोकळा होत नव्हता. अक्काबाईची कशातच इच्छा उरली नव्हती तरीही तिची सुटका होत नव्हती. वैशाखातल्या पुनवरात्री मात्र तिची सुटका झाली. तिला बाजेवर आणून अंगणात टाकलेलं होतं.

गावापासून साठेक कोस अंतरावरील गोरखच्या वस्तीवरल्या एका अडलेल्या गायीचं वेत अन्याबाच्या स्पर्शाने पार पडलं होतं. ते त्याच्या स्पर्शाचं अखेरचं वेत होतं. तेंव्हा जन्मलेली कालवड आता जख्ख म्हातारी गाय झाली होती. आपल्या दावणीचं दावं तोडून ती आठवड्यापासून कसल्या तरी धुंदीत भिरभिर फिरत होती, अनेक वस्त्या, वाड्या, वेशी, गावं ओलांडून आडवाटेने ती नेमकी अक्काबाईच्या वस्तीवर त्या मध्यरात्रीच्या सुमारास आली. अखंड चालल्यामुळं ती पुरती थकून गेली होती. लख्ख चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या अंगणामधील बाजेवर पडलेल्या अक्काबाईपाशी ती कशीबशी पोहोचली. खोपटात शिरून अक्काबाईच्या बाजेजवळ गेली. आपल्या खरमरीत काटेरी जिभेने तिने अक्काबाईला हळुवार चाटलं. निमिषार्धात अक्काबाईने तो परिचित स्पर्श निमिषार्धात ओळखला, तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, "अन्याबा.. गट्टू.. माझ्या बाळा..." इतकंच पुटपुटून तिचा देह शांत झाला. तिची तगमग थांबली. रोज तिच्या मरणाची वाट बघणारे तिचे आप्तेष्ट गाढ झोपी गेले होते, बाजेवर पडलेली अक्काबाई चिरनिद्रेत गेली होती आणि बाजेला खेटून बसलेल्या जख्ख म्हाताऱ्या गायीच्या डोळ्यातून अमृत पाझरू लागले. त्याचे थेंब मातीत ज्या पडले त्या मातीचेही पांग फिटले. अक्काबाईच्या मरणानंतर बऱ्याच वर्षांनी गावकऱ्यांच्या लक्षात आलं की तटतटलेला जीव अक्काबाईच्या अंगणात आला की त्याची सुटका सुलभ होते. तिथला झाडपाला जरी खाऊ घातला तरी वेत सहज होऊन जातं. अंगात वारं भरलेलं अवखळ वासरू देखील तिथं येताच शांत होई. त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक येई, जणू डोळ्यात चांदणंच झिरपलं असं वाटे. तिथल्या मातीत असं काय होतं हे कुणालाच उमगलं नाही. दर साली वैशाखपुनवेच्या रात्री आभाळातून खाली उतरणाऱ्या लागिर झालेल्या चांदण्यांना मात्र सारं ठाऊक आहे. तिथं आल्या की त्या तृप्त होऊन जातात !

- समीर गायकवाड.

दैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक


No comments:

Post a Comment