Sunday, July 14, 2019

भिजलेलं पितांबरगावाच्या मधोमध असणारं सुतार आळीतलं विठ्ठल मंदिर नेमकं कधी आणि कुणी बांधलंय याची अचूक माहिती गावातल्या पिकल्या पानांनाही नव्हती. वेशीपासून ते गावाच्या कोपऱ्यांनी चौदिशांना असणाऱ्या छोटेखानी गल्ल्यांतून मंदिर समान अंतरावर होतं. मंदिर बरंच जुनं असल्याने जीर्ण झालेलं. कधी काळी ते भव्य असावं, त्याची बांधणी आता ढासळण्याच्या बेतात आलेली. माळवदावर कुणी पाय जरी ठेवले तरी खाली माती पडू लागली होती. सभामंडपाची शान गेली होती. त्याला आधार देणाऱ्या लाकडी खांबांनाच सहारा देण्याची गरज वाटावी अशी स्थिती होती. त्या खांबांच्या बारीक ढलप्या उडाल्या होत्या, त्यांना चिरा पडल्या होत्या. कधी काळी त्यावर असलेला लालभडक रंग पुरता मिटून गेलेला, त्याचे अवशेष खांबांच्या एकदम टोकाला छतापाशी नजरंस येत. भिंतींचे दगड बऱ्यापैकी निसटले होते. त्या आडून माती, चुना, मुरूम बाहेर डोकावत होता. पायऱ्यांचे दगड निम्मे अर्धे गायब झालेले तर बाकीचे ढासळलेले. पायऱ्या म्हणून दोन दोन आडमाप दगडांच्या रांगा उरल्या होत्या. त्यावर पाय ठेवून मंदिरात जाणं हे दिव्य असे, पोरा ठोरांना थोडं फार जमायचं पण म्हाताऱ्या कोताऱ्यांची अब्दा व्हायची. गाभाऱ्यात एका विशिष्ठ कुबट दर्पाचा घमघमाट भरलेला असे. तिथं साठ वॅटच्या जुन्या टंगस्टनच्या काचेरी बल्बचा तांबूस पिवळा उजेड थिजल्या अवस्थेत असे.शेजारी शेजारीच असलेल्या विठ्ठल रुखमाईच्या मुर्त्या बऱ्यापैकी ठिसूळ झालेल्या. त्यांची काया पुरती तेलकट झालेली, अंगावरची वस्त्रे जुनाट झालेली. रोज नित्यनेमाने अर्पण केल्या जात असलेल्या हार फुलांचा, तुलसी मंजुळांचा वेगळा गंध तिथं जाणवे, ही फुलं सुकून त्याचं निर्माल्य झालं की त्यावर माशा घोंघावू लागत. त्यातले बारीक सारीक किडे सगळ्या गाभाऱ्यात पसरत. गाभाऱ्याच्या भिंतींना दिलेला रंग नेमका कोणता असावा असा प्रश्न पडे, दर साली दिलेले रंग एकात एक मिसळून तपकिरी निळसर रंग भितींवरून ओघळायचा, होय ओघळायचाच !

पावसाळ्यात गाभारा गळू लागला की भिंती फुगून येत, रंगांचे ओघळ वाहत. विठूरुखमाईंची मूर्ती ताशीव दगडी कट्ट्यावर असल्याने तिथे पाणी साचत नसे पण अन्यत्र फरशीवर सतत ओल जाणवे. विझलेल्या उदबत्त्यांच्या काड्या, नारळाच्या करवंटयांचे तुकडे पायात घुटमळत. भिंतींवर असलेलं पाकोळयांचं साम्राज्य अनिर्बंध होतं. सभामंडपात लावलेल्या संतांच्या तसबिरी इतक्या जुन्या झाल्या होत्या की आतल्या फोटोंचे रंग फ्रेमच्या काचांशी एकजीव झाले होते, सगळे फोटो मातकट होऊन विटून गेलेले होते. संतांच्या डोक्यांवरच्या पगड्यांवरून ओळखता यायचे की कोणती तसबीर कुणाची आहे. कधी काळी कुणा दानशूराने दिलेले चंदनी झुरमळयांचे निस्तेज हार त्या तसबिरींवर लटकत असायचे. तसबिरीआड पालींचा मुक्त वावर होता. माळवदाला असलेल्या आडव्या खांबांच्या मधोमध झुंबर अडकावण्यासाठी भलं मोठं हुक होतं, त्यात कुणी तरी कधी तरी बांधलेले नवसाचे नारळ तगून होते जे जागच्या जागी आक्रसून गेले होते. मंदिरातली फरसबंदी जागोजागी उखडली गेली होती. त्याच्या फटीत काही ठिकाणी गवताची चिवट पाती उगवली होती जी कितीही उपसली तरी पुन्हा पुन्हा उगवत होती. संपूर्ण मंदिरातली वायरिंग अनेक ठिकाणी मोकळी होऊन लोंबत होती, गेलेल्या बल्बसना लागलेलं कोळ्यांचं जाळं बरंच जिद्दी होतं, कितीही साफ केलं तरी आठवड्यात पुन्हा यायचं, त्यामुळे तिथली जळमटं कधी पुरी हटलीच नाहीत. मंदिरात पूजा अर्चना करणाऱ्या रामा गुरवाचा मृत्यू वृद्धत्वाने झाला तेंव्हा त्याला मुलबाळ झालेलं नव्हतं. त्याच्याही आधी गावात विविध वदंता होत्या त्यामुळे मंदिराला कळस नव्हताच. नुसतंच शिखर होतं, ज्याचे टवके उडाले होते, नक्षी बोथट झाली होती. त्याचा रंग उडून इतिहासजमा झाला होता. तरीही या मंदिरावर आणि विठूरुखमाईवर गावाची विलक्षण श्रद्धा होती. मंदिर सुतारआळीत असल्यानं सुताराच्या घराचा विशेष जीव होता. घरातलं म्हातारं माणूस असो वा रांगतं बाळ असो रोज मंदिरात गेल्याशिवाय त्यांचा दिवस कलत नसे. याच घराचा कर्तापुरुष होता ज्ञानू सुतार.

काळासावळा वर्ण, सडपातळ बांधा, स्वच्छ साधे कपडे, भाळी गोपीचंदन आणि बुक्का, मुखी विठ्ठलनाम असं ज्ञानूचं रूपडं. सत्तरीला पोहोचलेल्या ज्ञानूचं शिक्षण जेमेतेम आकडेमोडीचं होतं. जुजबी अक्षरओळख होती. तरीही सगळे अभंग त्याला मुखोदगत होते. काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत सगळं त्यानं साकारलेलं. कीर्तन प्रवचन असलं की त्याची पखवाजावर त्याच्या बोटांची जादू चाले. त्याचे बापजादेही कित्येक पिढ्यापासून याच मंदिरात विठूचरणी भक्तीसेवा अर्पित. ज्ञानू सुताराला त्या मंदिराचं इतकं वेड होतं की त्यापायी संसाराकडे दुर्लक्ष झालेलं. भागवत कथा सप्ताह, नामस्मरण सोहळा, पुण्यतिथी सोहळा, काहीही निमित्त असला की घरदार वाऱ्यावर टाकून गडी सगळ्याच्या पुढे असे. त्याच्या बायकोनं सावित्रीनं कसा संसार केला हे त्यालादेखील कधी उमजले नव्हते. मुलं कधी मोठी झाली हे ही कळले नाही. त्याचं सगळं चित्त त्या टाळ कुटण्यात आणि पखवाजात असे. गावात त्याला मोठा मान होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. त्याचा सालस, सच्चा भक्तीभाव म्हणजे गावाची शानच जणू ! त्याच्या चढ्या आवाजात वेगळीच जादू होती. तो गाऊ लागला की पांडुरंगाचेही देहभान हरपून जात असावे.

ज्ञानूच्या घरी भौतिक साधनांची वानवा असूनही सुख नांदत होतं ते नियतीला बघवलं नसावं. गावात येणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या जमिनी हमरस्त्यासाठी संपादित होऊ लागल्या आणि गावात बक्कळ पैसा खेळू लागला. अनेकांना लाखो रुपये मिळाले. त्यातच एक घर होतं भोला पाटलाचं. ज्ञानूचा मानसन्मान अल्पबुद्धी भोलाच्या मनात खुपायचा. त्यानं शक्कल लढवली. त्यानं वेशीवरच्या मारुतीरायाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विडा उचलला. सोबत विठू रुखमाईच्या नव्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठाही घोषित केली. मंदिराचा कायापालट केला. उंच गोपूर, भव्य कळस, विशाल सभामंडप, नक्षीदार भक्कम मजबूत खांब, ऐसपैस गाभारे, चकचकीत लख्ख फरशा, लक्षवेधी रंगकाम, भपकेबाज लाईट्स, जोरदार स्पीकर व्यवस्था, टाळ पखवाजाचे संच, हार्मोनियम सगळं काही त्यानं केलं. नव्या रुपाची गावाला चांगलीच ओढ लागली. जुन्या मंदिरातली लगबग कमी झाली. रोजच्या पूजाविधीस होणारी गर्दी पूर्णतः घटली. प्रसादाचे चिरमुरे बत्तासे तसेच शिल्लक पडू लागले. मंदिर जणू ओस पडले. ही गोष्ट ज्ञानूच्या काळजाला लागली. त्याला दुःख झालं. त्यानं स्वतःला मंदिर आणि घरापूरतं सीमित केलं. त्याचं एकाकीपण सुरु झालं. ज्ञानू बाहेर पडायचा बंद झाला पण गावाला त्याचे सोयरसुतक नव्हते. गावानं आपली इतकीही दखल घेतली नाही याचं वैषम्य त्याच्या मनात दाटलं. त्याचं कुटुंब त्याच्या मदतीला धावलं. घरातली सगळी माणसं सारखी मंदिरात दिसू लागली. त्याची थकलेली बायको, तिन्ही पोरं सूना, आठदहा नातवंडे- नाती सगळे त्याच्यासोबत मंदिराच्या नित्यकर्मात सहभागी होऊ लागले. टाळकरी, वीणेकरी, पेटीवादक, पखवाजवादक सगळी घरातली मंडळी. पाव्हणे रावळे देखील त्यांनी वर्ज्य केले. सणवार, मानपान, संसार सगळं सोडून त्या कुटुंबानं ज्ञानूचं मन सावरलं. अवघं घर विठठ्लमय होऊन गेलं. इकडं नव्या मंदिरात आजुबाजूच्या पंचक्रोशीतली माणसं येऊ लागली. मोठमोठाले नामांकित कीर्तनकार पायधूळ झाडू लागले. सगळीकडं भोला पाटलाच्या दानशूरतेची चर्चा होऊ लागली. गावाला जणू नशा चढली पण त्यात तो जुना अस्सल भक्तीभाव नव्हता !

भोला पाटलानं आणखी एक पाऊल पुढे टाकत आषाढीसाठी गावातली दिंडी न्यायची मनीषा व्यक्तवली. लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. लोकांनी जय्यत तयारी सुरु केली. मावळत्या सूर्यास कुणीच वंदन करत नसतं. ज्ञानूकडे कुणी फिरकलंच नाही. गावातून दिंडी जाऊ लागल्याचा ज्ञानूला खूप आनंद झाला. आपल्या कुंकवाच्या धन्याला, बापाला, आज्ज्याला गावानं साधं विचारलंदेखील नाही याची खंत त्याच्या कुटुंबियांना वाटली पण कुणीच कुणापाशी बोललं नाही. नवमीच्या दिवशी गावातून वाजतगाजत दिंडी निघाली. त्या दिवशी ज्ञानूच्या एका डोळ्यात सुख होतं तर एका डोळ्यात दुःख ! त्या दिवसापासून त्याचं कशातच लक्ष लागेनासं झालं. त्यानं घरी झोपणं बंद केलं, मंदिरातच पथारी अंथरली. त्याचं खाणंपिणं घटलं. दशमीच्या दिवशी तो पुरता कासावीस झाला होता. खरं तर त्यालाही पंढरीला जायला आवडलं असतं पण रामा गुरवाच्या मागं गावातल्या विठूरायाची जबाबदारी त्याच्या अंगावर होती आणि कुणी त्याला आवतनही दिलं नव्हतं. गावातली सगळी टाळकरी वारकरी मंडळी आता पंढरीच्या वेशीवर पोहोचली असतील, आपण मात्र इथेच आहोत याचं त्याला शल्य झालं. त्या रात्री तो गाभाऱ्यात झोपला. तिकडं पंढरीत आलेल्या गावकऱ्यांपैकी अनेकांना वारीत ज्ञानू दिसल्याचा भास झाला, काहींना वाटलं की ज्ञानू खरंच वारीला आला असावा. इकडे गाभाऱ्यात झोपलेला ज्ञानू उठलाच नाही. पहाटे त्याच्या मुलांनी बराच वेळ दार ठोठावलं. अखेर दरवाजा फोडून त्याला बाहेर काढावं लागलं. त्या रात्री ज्ञानू विठ्ठलाच्या खऱ्या वारीला गेला. सुताराच्या घराला सुतक लागलं असं उरलं सुरलं गाव म्हणू लागलं. बापाच्या मयतीचा निरोप मिळताच शेजारच्याच गावी राहणारी त्याची मुलगी सत्यभामा साश्रूनयनांनी धावत पळत दिवस उजडायाच्या आधी गावात आली. पण तिनं आधी विठ्ठलाची पूजा केली. तिच्या अश्रूंच्या अभिषेकात न्हाऊन निघालेला तो सावळा श्रीरंग त्यादिवशी नक्की धाय मोकलून रडला असणार कारण त्याच्या अश्रूंच्या संततधारेने त्याला नेसवलेलं पितांबर आपसूक ओलं होत होतं.

- समीर गायकवाड

दैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक


No comments:

Post a Comment