Sunday, January 13, 2019

दवंडी ते ट्विट !एके काळी गावात तराळ असायचा. गत कालखंडात गावाबाहेर उपेक्षित दलितांची वस्ती असे. हे महारवाडे, मांगवाडे, रामोशीवाडे गावांनी व जातीपातीचा अभिनिवेश असलेल्या गावकऱ्यांनी मनस्वीरित्या जोपासले होते. त्याचा गावकीला असुरी आनंद होता, अमानवी दृष्टीकोनाचा पाशवी अभिमान होता. गावकुसाबाहेरच्या या बहिष्कृत अंधारल्या जगात खितपत पडलेल्या लोकांना गावात यायला मज्जाव असे. जरी यायचं झालंच तर त्याच्या अटी असत. या लोकांनी गावात येताना कसं यायचं, त्यांचं वर्तन कसं असावं, त्यांची देहबोली कशी असावी याचे दंडक असत. ते न पाळणाऱ्यांना त्याची सजा दिली जाई. आता काळ बदललाय. अस्पृश्यता बऱ्यापैकी नष्ट झालीय. बुरसटलेल्या विचारांचा पगडा असलेल्या वृत्तीचं वर्चस्व ज्या प्रांतात आहे तिथल्या सनातनी लोकवस्त्या वगळता सर्वत्र बदल झालाय. मानसिकता काही अंशी का होईना बदलते आहे. आता गावोगावचे महारवाडे गेलेत मात्र त्यांची जागा भीमनगरांनी घेतलीय. नावं बदललीत वृत्ती मात्र काहीशी तशीच आहे. छुपा भेद आहेच पण पूर्वी इतका जहालपणा आता उरला नाही. त्याच बरोबर ‘आरे ला कारे’ म्हणणारा वर्गही आता बाह्या सरसावून उभा असतो.तर अशा या वंचितांच्या दुनियेतील एका घटकास गावात नित्य प्रवेश असे पण त्यालाही काही नियम असत. हा घटक म्हणजे महारकी करणारा तराळ. एका खांद्यावर वाकळ. गळ्यात हलगीची वाकाची दोरी, लहानशी झोळीवजा पिशवी. गावात डोईवर टोपडंटापडं घालण्यास त्याला मनाई असल्याने बोडक्या डोक्याने फिरस्ती होई. त्याच्या एका हातात काठी असे. या काठीच्या तळाला चारपाच घुंगरांचा गुच्छ तारेने बांधलेला असे. गावाच्या वेशीतून प्रवेश करताना पासून ते गावाबाहेर पडेपर्यंत ठराविक अंतराने आणि टप्प्याटप्प्याने त्याला त्या काठीचा विशिष्ठ आवाज करावा लागे. गावात येऊन गल्लोगल्ली दवंडी देण्याचे काम तराळाकडे असे. तेंव्हा गाव म्हणजे काय असे ! तर सात आठ आळ्यांची शे-दोनशे उंबऱ्याची लोकवस्ती.

तेंव्हा ऋतू आताच्या सारखे लहरी नव्हते. चाकरमान्याने आपली दिनचर्या घड्याळाच्या काट्यावर हाकावी तसे ऋतूचक्र चाले. क्वचित त्यात बदल होत पण त्यात फारशी दाहकता नसे. अवकाळी ऊन, पाऊस, वादळवारं असे पण त्याचा बोलबाला नव्हता. लोक निसर्गाला पूजत, काळजी घेत. त्याला जीव लावत. तेंव्हा नुसतं ओरबाडण्याकडे कल नव्हता. गावाची ठेवण देखील ठाशीव असे. चौदिशेला शीव असे, वेस असे. वेशीवरचं देऊळ, चावडी, पार, गावतळं, जातींच्या प्रभावानुसारची गल्ल्यांची आखणी असा सगळा मामला असे. गुरं वळायला नेणाऱ्या गुराख्यांसाठी कुरणं होती, माळ होते, हाळ होते. डोळ्याला साफ दिसंल असं निकं आभाळ होतं, हिरवाई होती. पाऊलवाटा होत्या, त्यात दगडधोंडे होते अन काटेकुटेही होते. माणसांच्या डोक्यावर स्वार झालेली जातीपातीची अन खोट्या इभ्रतीची भूतंखेतं सोडली तर लोकांची नियत चांगली होती. तर हा तराळ गावात यायचा. यायचा म्हणजे कसा, तर त्याच्या घरी गावकीच्या कारभाऱ्याचा माणूस जायचा. बहुत करून घरगडीच यायचा. गावाबाहेरच्या कुडांच्या घरात गावातल्या इमल्यातून एखादाच इसम हप्त्याकाठी यायचा अन तोही फक्त तराळाच्या घरी. आलेला माणूस स्वतःच्या शरीराला इतकं पुसायचा-पसायचा की आजूबाजूची माणसं त्याला नुसती न्याहाळायची. त्याच्या जवळ यायची कुणाला अनुमती नसे. तो तराळाच्या दाराबाहेर येऊन त्याला नावाने पुकारे. तराळाच्या घरी गावातून माणूस आला म्हणजे काही तरी निरोप आहे याची खात्री व्हायची. तराळाला तो निरोप त्याच्या घरी क्वचित सांगितला जाई. जरी सांगितला गेला तरी गावात दवंडी दिल्याशिवाय त्याच्या वस्तीत वाच्यता करण्याची परवानगी नसे.

मग हा तराळ त्याचा जामानिमा पुरा करून बेगीनं गावात निघे. पूर्वी प्रत्येक गावात महार, मांग, रामोशी, चांभार, कुंभार, परीट, कोळी, सुतार, न्हावी, लोहार, गुरव, सोनार हे बारा बलुतेदार होते. बलुतेदारांना लोक जातींशी जोडतात पण खरंतर त्याही आधी त्यांना श्रमाशी जोडलं पाहिजे कारण अख्ख्या गावाची कामे त्यांना करावी लागत. गावकीची पडतील ती कामे करणारा हा वर्ग होता. खऱ्या अर्थाने ते सालदार होते. गावच्या सरपंच, पाटील, सावकार, देशमुख, देशपांडे, कोतवाल, कुळकर्णी, नाईक, खोत यांच्याकडे बलुतेदाराचे सगळे घर बांधलेलं असे. त्यांच्या घरातला कर्ता पुरुष, मुख्यत्वे बाप नसला तर मुलाने, आईने, बायकोने, सुनेने, लेकीने ती कामे केली पाहिजेत असा शिरस्ता होता. तराळाचं आयुष्य यांच्यात सर्वात बिकट असे. गावात येताच ज्यानं वर्दी दिलीय त्याच्या वाड्याबाहेर सावली दारावर पडणार नाही अशा बेताने त्याला उभं राहावं लागे. त्याला सांगितलेली वर्दीची दवंडी पिटत त्याला फिरावं लागे. त्याच्या काठीचा आवाज होताच गल्लीतल्या घरातली बायाबापडी दारात जात आणि त्याचा कानोसा घेत. तराळ गल्लीत आलाय म्हणजे काहीतरी ऐकायला मिळणार हे ठरलेलं. सगळ्या गल्ल्या, आळ्या पालथ्या घालून तो अखेरीस चावडीवर येई, हलगी वाजवत दवंडी देई. त्याला हेच काम होतं असं नव्हे. गावकीचं टपाल, कागदपत्रांची भेंडोळी, लखोटे पंचक्रोशीतील गावोगावच्या पाटील तलाठ्यास, महालकारी-मामलेदारास नेऊन द्यावी लागत. हवालदार कोतवालाचे निरोप पोहोचते करावे लागत. हजार तऱ्हेची कामे करावी लागत. गावात हाळी देत फिरताना जो कुणी जे काही काम सांगेल ते मुकाट करावं लागे. कुणी मेलं तर त्याचा नुसता सांगावा देऊन भागत नसे तर त्याच्या गोवऱ्या टाकायचं कामही लागे. तेंव्हा म्हणच होती, 'पाटलाचं लग्न अन महाराला भूषण !' तर या लग्नासाठी त्याला रक्त ओकेपर्यंत राबावं लागे. सगळं वऱ्हाड गाडी घोड्यावर छकडयात असे अन हा मैलोगणिक पायी जाई. बैलाच्या चारापाण्याची व्यवस्था केल्याशिवाय याच्या पोटात उष्टेखरकटे पडत नसे. दवंडीच्या कामाबद्दल त्याला जे मिळे ते अगदीच किरकोळ असे. पण आपल्याला गावात यायला मिळतं याचं जीवघेणं समाधान त्या मोबदल्यापेक्षा त्याला अधिक सुखकर वाटे. गावातल्या अन्य बलुतेदारांनाही त्यांच्या कामाच्या बदल्यात सामान-सुमान, धान्य, कापडचोपड दिलं जाई.

आता बलुती लोप पावलीत. कुणी कोणतंही काम केलं तरी चालतं. भेदभाव कमी झालाय पण काहींनी अंतःकरणात तो विखार अजूनही जपून ठेवलाय. सगळी कामं सर्वमान्य झालीत, कालौघात दवंडीही नष्ट झालीय. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून दवंडीचं डिजिटल स्वरूप अवतीर्ण झालंय. आजकाल संदेश वहन जितके सोपे, सुलभ झालेय ते त्याकाळी अत्यंत कठीण, दुर्लभ होतं. टपाल, टेलीग्राम कालबाह्य झालेत. फोनची सद्दी संपलीय. संगणक, स्मार्टफोनच्या गारुडात अवघं विश्व बुडून गेलंय. एक ट्विट करताच आपल्या भावना आपल्याशी जोडल्या गेलेल्या लोकांपुढे पोहोचतात, मग ते लोक त्यावर व्यक्त होतात, त्यांच्या व्यक्त होण्यावरही काहीजण प्रतिसाद देतात. हे सगळं दृश्य स्वरूपात दिसतं. तराळाने दिलेल्या दवंडीचं असंच होतं, त्यावर लोक व्यक्त होत पण त्या प्रतिसादांना दृश्य स्वरूप नव्हतं. दवंडीच्या रूपाने पूर्वीच्या गावजीवनात घोषणा होत. ज्यांनी ही दवंडी अनुभवली आहे त्यांच्या स्मृतींच्या कुपीत ती दडलेली असेल. आता सोशल मीडिया गावांच्याही उंबरठ्यांवर येऊन थडकलाय. गावाने वाईट वागणूक दिलेला तराळ आता नाहीये पण आपसात कलह माजवणाऱ्या या डिजिटल नवदवंड्यांचा सुकाळ झाल्यास उरलासुरला सलोखाही संपण्याची भीती गावकुसाच्या मातीला वाटत्येय.


No comments:

Post a Comment