Friday, October 26, 2018

मुस्तफा...


मुस्तफा...  लेखक - समीर गायकवाड  

माझ्या एका मित्राचे देशी दारूचे दुकान आहे. आमचे जुने घर जिथे होते तिथे वाटेवरच हे दुकान आहे. दुकान कसले गुत्ताच तो. मित्राचं अख्खं कुटुंब त्या दारू गुत्त्यावरच अवलंबून होतं. त्याचं घर ही शेजारी म्हणावं इतकं जवळ होतं. किशोर वयात त्यांच्या घरात अनेक वेळा आमचा राबता असे. कधी कधी त्याच्या बरोबर दुकानात ही जाणं व्हायचं. तेंव्हा त्यातलं काहीच कळत नव्हतं. अत्यंत उग्र आंबट गोड वासाने आतला सगळा परिसर ग्रासलेला असे. चिलबटलेल्या मळकट कपड्यातली खंगून गेलेली माणसंच बहुत करून तिथं पिण्यासाठी आलेली असायची. स्त्रिया आपलं दुःख रडून वा इतरांपाशी बोलून सहज व्यक्त करतात पण सर्वच पुरुषांना हे जमते असं म्हणता येणार नाही, जे संसाराच्या शर्यतीत मागे पडतात, जे आयुष्याचा डाव हरतात, ज्यांची स्वप्ने चक्काचूर होतात, ज्यांच्या घरी हाताची पोटाची गाठ पडत नाही, जे आपल्या घरी रिकाम्या हाताने जातात, ज्यांना समाजाने धुत्कारलेलं असतं, ज्यांचं बहकलेलं पाऊल कधीच सावरू शकलेलं नसतं, ज्यांचा आयुष्याचा शोध कधीच संपलेला नसतो अशा किती एक गाऱ्हाण्यांनी त्रासलेल्या पुरुषांना दारूत आपलं दुःख रिचवावं वाटतं, आपल्या व्यथा वेदना दारूच्या नशेत विसराव्याशा वाटतात, आपली हार आपली कमजोरी आपला कमकुवतपणा दारूच्या कैफात बुडवावा असं वाटू लागतं आणि या अशा हरलेल्या, झिजलेल्या, दुभंगलेल्या, कोलमडून पडलेल्या माणसांचा जत्था तिथं दिवसभर पाझरत राहायचा.


 या सगळ्या माणसांची पाठ पोट एक झालेलं असायचं, चुरगळलेले कपडे जागोजागी विरलेले असत, त्यांच्या झिरमिळयातून ठिगळं डोकावत. धुळकट केसांच्या झिपऱ्या डोक्यावर वागवताना त्यांच्या अंगावर देखील धुळीची पुटे चढलेली असत. तारवटून गेलेले लालबुंद डोळे, ओठाच्या कोपऱ्यातून नकळत ओघळणारी लाळेची तार, जड झालेली जीभ, बसल्या बसल्या तोल जाणारा देह, शून्यात असणारी नजर असा त्या सर्वांचा अवतार असे. मध्येच मान हलवून नजर रोखण्याचा प्रयत्न होई, कधी कधी बारीक आवाजात सुरु असलेली पुटपुट कोलाहालात कधी बदलून जाई कळत नसे. चुकून कधी ग्लास फोडण्याचा कार्यक्रम ही होई. त्याची भरपाई वसूल केली जाई. एखाद्याला खूपच तणाव असला की दारू पोटात जाताच त्याचं रडणं सुरु होई, मग त्याला शांत करणारा ही रडू लागे. बऱ्याच वेळा आपसात हमरीतुमरीचे प्रसंग घडत. मित्राचे वडील वा काका जे कुणी गल्ल्यावर असत ते एका जाळीदार चौकटीच्या आड बसून पैसे घेत आणि मग 'माल' देत. विदेशी दारूचे अनेक ब्रँड येऊन गेलेत पण देशी दारूचे तेंव्हाचे जे ब्रँड होते तेच अजूनही टिकून आहेत. तेंव्हा जीएम, ऑरेंज ही नावं कशीशीच वाटत त्यात टॅंगो पंच, भिंगरी संत्रा यांची भर पडली आणि दारू गुत्ते आबादी आबाद झाले. 

तर या मित्राच्या गुत्त्यात प्यायला येणाऱ्या लोकांसाठी काही सूचना लिहिल्या होत्या. शाळेत वर्गातल्या फळ्यावर सुविचार काढून बाजूला जशी फुले आणि वेल चितारलेली असे त्याच   या सगळ्या सूचना भारी होत्या. सर्वात मोठ्या अक्षरातली सूचना होती - 'ग्राहकांनी राजकारणावर चर्चा करू नये !' अन्यही काही सूचना होत्या - 'पिताना इतरांना सल्ले देऊ नयेत', 'दारू पिण्याआधी पैसे द्यावेत', 'इतरांना पाजण्याआधी त्यांची जबाबदारी घ्यावी', 'दारू पिऊन थेट आपल्या घरी सुखरूप जावे' सगळ्यात कहर करणारी एक सूचनाही होती. 'दारू पिऊन शहाणपणा शिकवू नये !' या सूचना लिहिण्याचे कारण म्हणजे हर तऱ्हेचे नग तिथे येत आणि रोज काही न काही मामला ठरलेला असे....

जुन्या घराकडे जाताना मित्राचे ते दुकान वाटेतच लागते. त्याची मुले आता मोठी झालीत, त्याच्या भावंडातलाच एक जण हा व्यवसाय अजूनही सांभाळून आहे. लहर आली तर अजूनही मी आत जातो त्याला भेटतो. तिथला माहौल अजूनही तसाच आहे, दारूची ही दुनिया न जाणो किती वर्षापासून तशीच आहे ! त्यात काहीच बदल झालेला नाही. पिणारी माणसं बदललीत, पाजणारी ही बदललीत पण कारणं तीच आहेत आणि त्या नंतरची परिणतीही तीच शोकात्मक आहे. मात्र आता त्या सूचना नाहीत. फक्त रोखीची सूचना मात्र तशीच शाबूत आहे. मित्राच्या घरात माणसांचा मोठा गोतावळा होता. सगळी माणसं चांगली होती. आई, आज्जी, काकू, काका, बहिणी भावंडे, पुतणे, भाचे, नातवंडे असं सगळं गोकुळ होतं तेंव्हा. आता एकेक करून निम्म्याहून अधिक कुटुंब लोप पावलंय. 

त्याच्या घरातली जुनी जाणती माणसं गेलीत. त्यानं घर बांधायला काढलंय. अनेक अडचणींचा भवसागर त्याच्यापुढे आहे, त्याला पार करणं जमेल की नाही सांगता येत नाही. त्याची जिद्द टिकून आहे. त्याच्या घरातली काही कर्ती मंडळी दारूच्या व्यसनानेच गेलीत याचा त्याला सल आहे पण त्याचा निर्वाह त्यावरच असल्याने तो तळमळण्या पलीकडे काहीच करत नाही. पुढच्या पिढीला मात्र यापासून दूर ठेवेन असं म्हणतो तो. त्याच्या थकलेल्या डोळ्यात कधी कधी पाणी दिसतं तर कधी कधी अपराधाची झाक दिसते तर कधी त्याच्या चेहऱ्यावर गोळा होऊ लागलेल्या सुरकुत्यात संपत आलेल्या उमेदीचे तारे निखळताना दिसतात. त्याच्या स्वर्गस्थ जीवाभावांच्या माणसांच्या आठवणीने तो कधी व्याकुळ होतो तर कधी उतरणीला लागलेल्या आयुष्याची वजाबाकी मांडतो. जगभरातील अनेकांच्या दुःखात गुंतून पडणारा मी त्याच्या दुःखाच्या मखमली यात्रेत सामील होतो. मग त्याचे मन रितं होतं. माणसाला मनमोकळं रडू द्यावं त्याचं मन नक्कीच हलकं होतं. त्याच्या काळजावरचं ओझं कमी होतं. तो थोडासा सावरतो, संतापापेक्षा कणव कधीही चांगली. अश्रूंची ताकदच ही अशी अस्मानाला गवसणी घालणारी,मेघांनाही पाझर फोडणारी अशी आहे. 

अश्रूंवरून आठवलं. मित्राच्या गुत्त्यात किशोरवयात एक माणूस यायचा तो काही ग्लास पोटात गेल्यावर जीव लावून गायचा. बहुधा तो हिंदी भाषिक असावा. त्याचं संभाषण आता आठवत नाही पण तो माणूस अजूनही डोळ्यात गोठलेला आहे. चांगल्या घरचा असावा. त्याच्या घराची धूळधान उडाली होती. कुणीतरी जवळच्या माणसाने त्याला फसवलेलं. त्यात त्याची बायकोही सामील होती. तो त्या सर्वांना सोडून परागंदा होऊन इकडं आलेला. त्याच्या डोळ्यात एक अजबशी कशिश होती. त्याचं तारुण्य अजून सरलेलं नव्हतं. पण त्याला बसलेला धक्का जबरदस्त होता. दारू पोटात गेली की त्याचं सर्वांग थरथरू लागे. ओठांचा थरकाप सुरु होई, डोळ्यांना धारा लागत. मुस्तफा त्याचं नाव असावं. जमा केलेले सर्व पैसे संपेपर्यंत तिथंच पीत राही. त्याच्या नजरेला नजर देण्याचं माझं धाडस कधीच झालं नाही. त्याच्याबद्दल तेंव्हा अनामिक भीती वाटे. 

त्याची कहाणी ऐकल्यावर त्याच्याबद्दल एक ओढ सुद्धा असे. घरदाराची राखरांगोळी झालेला मी अनुभवलेला हा पहिला माणूस. त्याच्या हाताचे पंजे भले मोठे होते, त्याने एकदा माझा गालगुच्चा घेतल्याचे आठवते. त्याच्या तोंडाच्या वासाने भोवळ यायची राहिली होती. नंतर कळले की माझ्या वयाचा त्याचा मुलगा होता. मुस्तफाचा आवाज खर्जातला होता. तो बोलू लागला की बाकीचे सगळे कान देऊन त्याला ऐकत. त्याच्या दुःखाचे उमाळे तीव्र असले की एका कोनाड्यात बसून हळुवार आवाजात गायचा. तो गाऊ लागला की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी येई. अकारण त्याच्या चेहऱ्यावर गूढ स्मित दिसे. मग बिडीचे झुरके घेत तो समाधिस्त होई.   

त्याच्या तोंडून ऐकलेलं कोणतंच गाणं मी कधी रेडीओ टीव्हीवर ऐकलेलं नव्हतं. तो गझला गायचा. एक गझल खूप वेळा ऐकलेली. 'मैं नज़र से पी रहा हूँ ये समाँ बदल न जाए, न झुकाओ तुम निगाहें कहीं रात ढल न जाए... ' तेंव्हा यातलं काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. इतकं ठाऊक होतं की त्याला अपार दुःख आहे आणि त्याच्या आठवणींचं आभाळ भरून आलेलं असलं की त्याच्या ओठातून गाणं उमटे !

घर बदलल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मित्राचा सहवास तुटला. गुत्त्यावर जाणंही कमी झालं. कारण तिथं आत जाताना दाराच्या चौकटीपाशी एक पडदा होता. आतला माणूस बाहेरच्यांना दिसत नसे आणि आतल्यांना बाहेर कोण उभं आहे हे कळत नसे. हा पडदा हटवून आत जाताना बाहेरच्या कुणी पाहिलं की त्याचा ग्रह काय होत असेल हे वेगळं सांगायला नको. तसेच आतून बाहेर येतानाही कुणी ओळखीच्याने पाहिले की घरी निरोप पोहोचता होई पण ते आमचे शेजारीच असल्याने अंगावचं कातडं सोलून निघत नसे पण बोलणी खावी लागत, तसेच काही पुण्यवान सुतावरून स्वर्ग गाठण्याच्या सवयीला जागत त्याचा त्रास वेगळाच असे. या सर्व लचांडापायी तिथं जाणंच खुंटत गेलं. 

काही काळापूर्वी एकदा आत चक्कर मारल्यावर सहज मुस्तफाची आठवण आली आणि त्या ठराविक कोनाड्यातून एक करुण, गूढ आर्त आवाजाचा भास झाला. कोपऱ्यात बिडीच्या त्या टिपिकल वासाच्या धुम्रवलयांचा गंध जाणवला.  मनात उगाच अपराधीपणा दाटून आला. काळजात कालवलं. डोळ्यांच्या कडा पाणावल्या, नकळत गालाकडे हात गेला. मी थिजल्यागत ऐकत होतो. पाठीत वाकलेला आताशा अकाली जरठ थोराड वाटू लागलेला माझा मित्र सांगत होता की काही वर्षापूर्वीच नशेत धुंद झालेल्या मुस्तफाचं शव रेल्वे रुळावर सापडलं होतं. त्याच्या खिशातील दारूच्या चिटोऱ्यांच्या आधारे पोलीस मित्राच्या वडीलांपर्यंत पोहोचले होते. मग त्यांनीच कागदपत्रे पूर्ण करत त्याचा दफनविधी केला. अंगावरून रेल्वे गेल्याने त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले होते पण त्याच्या चेहऱ्यावर तेच गूढ स्मित होते आणि  गाताना जी झळाळी त्याच्या मुखकमलावर दिसे तशीच झळाळी त्याच्या चेहऱ्यावर होती. मुस्तफाचा मृत्यू अपघाती होता की त्याने आत्महत्या केली होती काहीच कळलं नाही. त्याचे आप्तेष्टही कधी आले नाहीत. 

जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या डाव्या हाताला असलेल्या कबरस्तानात त्याने चिरनिद्रा घेतली आणि त्याचं दुःख कायमचं हलकं झालं. त्याला दफन करताना न्हाऊ माखू घातलं होतं, पांढऱ्या शुभ्र वस्त्रात त्याचं विदीर्ण झालेलं कलेवर लपेटलं होतं. त्याचा देह मातीत सुपूर्त करताना त्याच्या जनाजाच्या मागे इमाम होते की नाही हे ही आता सांगता येत नाही. त्याच्या आखरी नमाजच्या प्रसंगी सजदा करायला, हात बांधून उभं राहायला तुरळक माणसंच होती आणि कब्रस्तानातील विशाल झाडांच्या पानांची सळसळ होती. संथ वाहणारा वारा होता आणि अस्ताला जाणारा सूर्य त्याचे अखेरचे दर्शन घेत होता, त्याची म्लान किरणे त्याच्याशी लगट करत होती. वाऱ्यावर उडणारे धुलीकण त्याच्या अनावृत्त देहावरून हात फिरवत अलविदा करत होते. त्याची रूह तेंव्हा काय करत असेल माहित नाही. पण ती थोडी का होईना पण कित्येक वर्षांनी सुखावली असेल ! अल्लाहच्या दरबारात त्याची दर्ख्वास्त ऐकून घेतली गेली की नाही हे कळायला मार्ग नाही. या रस्त्याने जाताना कधी त्याची आठवण आली की उगाच जीव कासावीस होतो...

त्याच्या तोंडून अनेकदा ऐकलेल्या त्या गझलेला काही वर्षापूर्वी यु ट्यूबवर मुन्नी बेगमच्या आवाजात ऐकलं तेंव्हा धाय मोकलून रडलो. मग कुठे माझ्याही मनावर आलेलं एक जुनाट मळभ हलकेच दूर झाले. यातलीच एक ओळ अशी जीवघेणी होती -
मेरे अश्क भी हैं इस में, ये शराब उबल न जाए
मेरा जाम छूने वाले, तेरा हाथ जल न जाए...
खरंच त्याचं दुःख इतकं टोकदार होतं की त्याचे अश्रू त्या मदिरेच्या ग्लासात पडल्यावर त्याचं तेजाब होत असणार आणि ती दारू उकळून निघत असणार. म्हणूनच कदाचित तो आपल्या ग्लासाला कुणालाही हात लावू देत नव्हता. न जाणो त्याला स्पर्श करताच हात लावणारा पोळून निघायचा. 

काहींची दुःखे अशी धगधगती असतात की त्यांच्या जवळ जाणारयास देखील त्याच्या झळा लागतात. त्याचं दुःख आभाळाएव्हढं होतं पण त्याचा आक्रोश पानगळीच्या मंद  जीर्ण पानासारखाही नव्हता. अगदीच मूक आणि कमालीचा संयत होता तो ! या माणसाकडून खूप काही शिकलो. हळव्या माणसाच्या वाट्याला दुःखे येऊ नयेत अशी प्रार्थना तेंव्हापासूनच 
मनात रुजली. त्याला धोका दिलेला असूनही, फसवलेलं असूनही त्याच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमच होतं. त्यांच्यासाठीच तो झुरायचा. त्यांची बदनामी त्याने कधी केली नाही की कधी त्यांचा नावपत्ता सांगितला नाही. ते सगळे दुःखाचे कड त्याने एकट्याने पचवले आणि आपल्या वाट्याचं दुःख त्याने बिलोरी करून जगापुढेही मांडलं नाही.

जगात वाईट खूप काही आहे पण त्यातही काही खूप काही चांगलं आहे चांगुलपणाचा आव आणणाऱ्या साळसूद जगाच्या चांगुलपणापेक्षा हा वाईटपणा कधी कधी खूप भावतो...

- समीर गायकवाड


No comments:

Post a Comment