Monday, April 30, 2018

बुद्धकथा आणि सोशल मिडिया ...

एकदा अंहलठ्ठिक येथील सार्वजनिक सभागृहात बुद्ध शिरले, तो तेथे त्यांचे शिष्य एका ब्राह्मणाविषयी बोलत होते. त्या ब्राह्मणाने बुद्धांवर अधार्मिकतेचा आरोप केला होता. त्यातील दोष दाखविले होते. शिष्यांचे बोलणे ऐकून बुद्ध म्हणाले, “बंधूंनो, दुसरे माझ्याविरुद्ध बोलतात, माझ्या धर्माविरुद्ध किंवा संघाविरुद्ध बोलतात, म्हणून तुम्हाला रागवण्याचे काहीच कारण नाही जर तुम्ही रुसाल, रागवाल तर आध्यात्मिकदृष्ट्या तुमची हानी होण्याचा संभव आहे; आणि तुम्ही जर संतापाल, चिडून जाल, तर ते लोक जे म्हणत आहेत ते कितपत यथार्थ वा अयथार्थ आहे, याचाही निर्णय करायली तुम्ही अक्षम ठराल.” आज २,५०० वर्षे झाली तरीही, अडीच हजार वर्षांच्या ज्ञानप्रकाशानंतरही बुद्धांचे हे शब्द, हे थोर विचार किती उन्नत व उदात्त वाटतात ! आपले पूर्वग्रह दुखावले गेले किंवा प्रशंसिले गेले एवढ्यावरुन धर्मतत्त्वांची, मतांची सत्यासत्यता ठरवायची नसते. अशा स्तुती-निंदांवरुन तत्त्वे सत्य की चुकीची ठरवायचे नसते. कितीही विचित्र व चमत्कारिक अशी असत्ये कोणी मांडली, स्वत:च्या मताविरुद्ध दुस-याचे मत कितीही पराकोटीस गेलेले असले, तरी त्या सर्वांचा विचार करायला बुद्ध सिद्ध असत. त्या सर्वांचा परामर्श घ्यायला ते भीत नसत. त्यांच्या काळात सर्वत्र गोंधळ माजलेला होता. मतमतांतरांचा गलबला होता. अशा काळात सर्व मतांची छाननी करण्यास सिद्ध असणे हाच एक उपाय होता. भ्रमनिरसनार्थ व सत्याची प्राप्ती व्हावी म्हणून हाच एक मार्ग होता. लोकांनी आपले जीवन बुद्धांच्या पायावर उभारावे म्हणून त्यांना साहाय्य देण्याचा हाच एक दृढ पंथ होता. इतर पंथांवर कोणी अयोग्य टीका केली, तर बुद्धांस खपत नसे. ते एकदा म्हणाले, “हे आकाशावर थुंकण्यासारखे आहे. तुमच्या थुंकीने आकाश तर नाहीच मळणार; ती थुंकी मात्र थुंकणा-याकडे परत येऊन त्याला घाणेरडे करील.”
एकदा गौतम बुद्धांना विचारले गेले की विष म्हणजे काय? गौतम बुद्धांनी अत्यंत सुंदर उत्तर दिले. 'जीवनात आवश्‍यकतेपेक्षा अधिक असलेली प्रत्येक गोष्ट विषासमानच आहे'.

बुद्ध संतापाने पेटले आहेत, त्यांच्या तोंडातून कठोर व निष्ठुर शब्द बाहेर पडले आहेत, असे कधीच झाले नाही. मानवजातींविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटे. बुद्धांना हे जग दुष्ट नसे वाटत. जग वाईट आहे असे म्हणण्याऐवजी जगाचे अज्ञान आहे असे ते म्हणत. जग उच्छृंखल आहे असे म्हणण्याऐवजी ते तितकेसे समाधानकारक नाही असे ते म्हणत. बुद्ध विरोधाला शांतपणे व आत्मविश्वासाने तोंड देत. त्यांच्यापाशी चिडखोरपणा नाही, भयंकर संताप नाही. बुद्धांची वागणूक म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतता; त्यांचे वर्तन म्हणजे सद्भावाचे आविष्करण. त्यांच्या वर्तनात थोडासा उपरोधिकपणा असे. परंतु त्यामुळे त्यांचे गोड वर्तन अधिकच रुचकर व स्वादिष्ट वाटे. 

एकदा त्यांचे परिभ्रमण चालले असता एका गृहस्थाने फारच कटु शब्द त्यांना उद्देशून उच्चारले. बुद्ध शांतपणे म्हणाले, “एखाद्याने याचकापुढे अन्न ठेवले, परंतु याचकाने जर ते नाकारले तर, ते अन्न कोणाचे?”
“त्या देणा-या गृहस्थाचे.” तो मनुष्य म्हणाला.
“त्याप्रमाणे जर तुमचे शिव्याशाप मी स्वीकारायचे नाकारले, तर ते तुमच्याकडे परत येतील. तुम्हालाच त्यांचा स्वीकार करावा लागेल, नाही? परंतु मला मात्र दरिद्री होऊन जावे लागत आहे. कारण मी एक मित्र गमावून बसलो.” बुद्ध म्हणाले.

आत्तदीप, आत्तसरण, अनन्नसरण; धम्मदीप, धम्मसरण.
-महापरिनिब्बाणसूत्त : ३३

~~~~~~~~~~~~~~~~~

एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले,
"आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"
सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले,
"रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."
यावर गौतम बुद्ध म्हणाले,
"पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो, ती समोरच असते. तरीसुध्दा आपण ओरडतो..., जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले; तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो."
यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.
शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले. ते म्हणाले,
"जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....
"कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो, की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात."

~~~~~~~~~~~

एकदा महात्मा गौतम बुद्धांनी आपल्या एका शिष्याला जवळच्या जलाशयातून पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. जेव्हा तो शिष्य पाणी आणण्यासाठी जलाशयाकडे गेला तेव्हा त्याला दिसले की एक हत्तींचा कळप जलाशयातून बाहेर पडत आहे. हत्तींच्या स्नानामुळे ते जलाशय मातकट व गढूळ झाले होते. असे गढूळ पाणी पिण्यासाठी नेणे योग्य ठरणार नाही असे मनाशी ठरवून तो शिष्य पाण्याचा दुसरा स्रोत शोधण्यासाठी तेथून दुसरीकडे जाऊ लागला. एवढ्यात महात्मा बुद्धांनी त्याला परत बोलाविले.शिष्याने आपण इतरत्र स्वच्छ पाणी मिळते का ते पाहण्यासाठी जात असल्याचा खुलासा गुरूंपाशी केला.

बुद्ध म्हणाले, “इतरत्र पाणी शोधण्याची गरज नाही. या जलाशयातील पाणीही चालेल.”गुरूंची आज्ञा प्रमाण मानून शिष्य पुन्हा त्या जलाशयाकडे गेला. त्याला आढळले की जलाशयाचा गढूळपणा नष्ट झाला आहे व पाणी पूर्ववत स्वच्छ झाले आहे. जेव्हा शिष्याने ताज्या व स्वच्छ पाण्याने भरलेले भांडे गौतम बुद्धांना दिले तेव्हा ते त्याला म्हणाले, “जेव्हा तुझ्या आयुष्यात एखाद्या पेचप्रंसगामुळे उलथापालथ निर्माण होईल तेव्हा गढूळ पाणी नितळ व्हायची आपण वाट पाहतो तशी थोडावेळ सबुरी ठेवायला शिक.” 

~~~~~~~~~~~~~~~

एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

~~~~~~~~~~~~

एके दिवशी बुद्ध एका छोट्याशा खेड्यातून चालले होते. तितक्यात एक निष्ठूर, रागीट स्वभावाचा इसम तेथे आला आणि त्याने जाणीवपूर्वक बुद्धांचा अपमान करण्यासाठी बुद्धांना सुनावलं की, "तुम्हाला कुणालाही उपदेश करण्याचे अधिकार नाहीत." इतकं बोलल्यानंतरही शांत राहणाऱ्या बुद्धांवर तो जवळजवळ खेकसलाच. "इतर सामान्य माणसे जशी वेडगळ आहेत त्यातलेच एक तुम्ही आहात,तुम्ही म्हणजे एक नुसता पोकळ देखावा आहे बाकी काहीच नाही !"
त्या व्यक्तीने केलेल्या अवमानामुळे बुद्ध यत्किंचितही ढळले नाहीत.
बुद्धांच्या या कमालीच्या शांततेने तो इसम पुरता बावरून गेला, काय करावे हेच त्याला सुचेनासे झाले. त्याची अवस्था बुद्धांनी अचूक ओळखली.

अत्यंत धीरोदात्तपणे शांत स्वरात त्यांनी त्या व्यक्तीस प्रश्न केला, "कृपा करून तू मला एका प्रश्नाचे उत्तर देशील का ?"
त्या इसमाने नकळत मान डोलावली.
बुद्धांनी विचारले - "जर कुणा व्यक्तीस भेट देण्यासाठी तू एखादी वस्तू घेतली असेल आणि त्या व्यक्तीने ती वस्तू भेट घ्यायची नाकारली तर त्या भेटीवर कुणाचा अधिकार राहील ?"
त्या अनाहूत प्रश्नाने तो इसम चकित झाला. काहीसे गोंधळून गेलेल्या अवस्थेत तो उत्तरला - "नक्कीच ती वस्तू माझ्यापाशीच राहिल कारण ती वस्तू मी आणली आहे !"

या उत्तराने बुद्धांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले, कदाचित त्यांना हेच उत्तर अपेक्षित असावे. बुद्ध म्हणाले, "होय अचूक उत्तर. हेच बरोबर आहे. आणि हेच सूत्र तुझ्या क्रोधासही लागू होते. जर तू माझ्यावर संतापला असशील, माझा अपमान करावा असा तुझा मानस असेल पण तुझ्या क्रोधाचा मी स्वीकारच केला नसेल, तु केलेल्या अपमानास जवळ फिरकूच दिले नसेल तर ते आपसूकच तुझ्यापाशी परत येतील. माझ्याऐवजी तूच आणखी क्रोधीत आणि दुःखी होशील. हे सर्व करून तू स्वतःलाच वेदना देतोयस. जर तू स्वतःला व्यथित कारणं थांबवलंस तरच तुझ्या मनाला शांती लाभेल. जेंव्हा तू इतरांचा तिरस्कार करतोस, इतरांचा अपमान करतोस तेंव्हा खरं पाहिलं तर तूच तिरस्काराच्या अधीन झालेला असतोस, दुःखी कष्टी झालेला असतोस, समोरचा व्यक्ती तुझ्या क्रोधावर व्यक्तच झाला नाही तर त्याचा परिणाम तुझ्यावरच अधिक होतो. सबब तुला जर जीवन आनंदात घालवायचे असेल तर तू आधी इतरांचा तिरस्कार बंद कर, इतरांचा अपमान बंद कर ! मग बघ तुझ्या आयुष्यात सुख नांदेल... "
तो इसम दिग्मूढ होऊन पाहतच राहिला आणि बुद्ध आपल्या वाटेवर मार्गस्थ झाले...

(सोशल मिडियावरील समग्र हेट मॉन्गर्स, विखारी अपमानकर्त्या आणि द्वेषमूलक प्रवृत्तीच्या लोकांना ही पोस्ट अर्पण !)
~~~~~~~~~~~~~

बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेशितात, ‘तुमच्यासमोर जे जे विचार मांडले जातील, जे निरनिराळे कार्यक्रम ठेवले जातील, त्यांना तर्काची कसोटी लावून पाहत जा. जीवनाची कसोटीही त्यांना लावून पाहा. केवळ एखाद्याविषयी आपणास आदर वाटतो, एवढ्यावरुन त्याचे म्हणणे स्वीकारु नये.’ बुद्धांनी या नियमाला स्वत:चाही अपवाद ठेवला नाही. ते म्हणतात केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वासून ती स्वीकारु नका; परंपरा प्राप्त म्हणूनही स्वीकारु नका; असे असलेच पाहिजे असे अधीर होऊन म्हणू नका; अमूक एखादे वचन आपल्या पुस्तकात आहे, एवढ्यावरुन ते स्वीकारु नका; हे स्वीकारण्यास हरकत नाही अशाही समजुतीने स्वीकारु नका; किंवा अमूक आपल्या गुरुचे म्हणणे आहे एवढ्यावरुनही तुम्ही ते स्वीकारु नये.’ आपल्या अनुयायांना सहृदपणे प्रार्थून ते म्हणतात, ‘माझ्या नावाच्या मोठेपणामुळे तुम्ही स्वत:च्या विचारांत व्यत्यय येऊ देऊ नका, माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे तुमच्या विचारसरणीत बाधा न येवो.’

सारिपुत्राने म्हटले, “भगवन् तुमच्याहून अधिक थोर असा ज्ञानवेत्ता महात्मा मागे कधी झाला नाही, पुढे कधी होणार नाही व आजही नाही.”
भगवन् बुद्धांनी विचारले, “का रे सारिपुत्रा, मागे होऊन गेलेले सारे बुद्ध तुला माहीत असतीलच ना?”
“नाही महाराज.”
“तर मग भविष्यकाळातील तरी तुला माहीत असताल?”
“नाही महाराज.”
“तर मग निदान तू तरी जाणत असशील? माझ्या मनात तरी तू खूप खोल डोकावून पाहीले असशील?”
“तसेही नाही महाराज.”
“तर मग हे सारिपुत्रा, अशी पुप्पित वाणी, असे अगडबंब शब्द का उच्चारलेस? असे धीट बोल तू कसा बोललास?”

~~~~~~~~~~~~~~~~

महापरिनिब्बाणसूत्तांत बुद्धांच्या मरणाची कथा अत्यंत साधेपणाने परंतु करुण रीतीने देण्यात आलेली आहे. त्यांचे आता ८० वर्षांचे वय होते. प्रवासाने व यातायाताने ते थकून गेले होते. त्यांच्या अंगात आता त्राण उरले नव्हते. ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये कुशिनगराजवळच्या एका गावी बुद्ध मरण पावले. काशीपासून हा गाव १२० मैल दूर होता. सॉक्रेटिस, ख्रिस्त हे हुतात्मे झाले. परंतु बुद्धांचे मरण अति शांत असे होते. या तिघा महात्म्यांनी आपापल्या काळातील अंधश्रद्धा, भोळकटपणा, दुष्ट रुढी यांचे निर्मूलन केले. सॉक्रेटिस अथेन्समधील तत्कालीन धर्माचा जितका विरोधी होता, त्यापेक्षाही गौतम बुद्ध यज्ञयागात्मक अशा वैदिक धर्माचे विरोधी होते. असे असूनही ते ८० वर्षांपर्यंत जगले. कितीतरी अनुयायी त्यांनी गोळा केले व स्वत:च्या आयुष्यातच एक धार्मिक संघ त्यांनी स्थापिला. बुद्धांना हुतात्मा व्हावे लागले नाही. कारण भारतीयांचा स्वभावच धर्मिक. रुढ धर्माविरुद्ध बंड करणा-यासही हिंदुस्थानात सहानुभूतीने वागविण्यात येई. पूर्वेकडचा व पश्चिमेकडचा हा फरक आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~

या सर्व बुद्धकथा आजच्या काळातही बोधप्रद आहेत.  लेखाच्या पहिल्या परिच्छेदातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजकाल सोशल मिडीयावर कोणाच्या धर्माबद्दल एक ब्र शब्द लिहिला / बोलला तरी लोक आभाळ कोसळल्यासारखा कांगावा करतात. तेंव्हा बुद्धांची शिकवण अनमोल ठरते. 
स्त्रीला दगड मारण्याच्या कथेचा बोध - सोशल मिडीयावर कुणालाही नावं ठेवण्याआधी आपण कधी ते कृत्य केलेलं आहे की नाही याची त्या त्या व्यक्तीने शहानिशा करायला पाहिजे.
क्रोधात ओरडून बोलण्याच्या बोधकथेतून लक्षात येते की सोशल मिडीयावरच्या काही जणांच्या वॉलवर सतत अर्वाच्च, अश्लाघ्य शब्दात आक्रोश सुरु असतो. मित्रांनो तिथं जी माणसं पोस्टवर येऊन गरळ ओकत असतात त्यांच्या मनात खूप अंतर पडलेलं असतं. त्याचंच ते प्रतिक असतं.
स्वच्छ पाणी आणायला गेलेल्या शिष्याची गोष्ट आपल्याला शिकवून जाते की कुठे काही घडले की लगेच व्यक्त होऊन गढूळता वाढत जाते. बाकी काही साध्य होत नाही पण त्या ऐवजी काही वेळ जाऊ दिला तर वातावरणातील तणाव निवळलेला असतो आणि आपलेही विचार शांत, संयत शब्दात व्यक्त होतात ज्याचे समोरच्या व्यक्तीवर अपेक्षित परिणाम होतात. 
लंगडया हत्तीची गोष्ट सांगते की सोशल मिडीयावर मने दुषित करणाऱ्या  पोस्ट टाकणाऱ्या मजकुराचे अनुकरण आपण करत गेलो तर आपल्याही विचारात मन अस्थिर करणारी दोलायमानता येते.
सारिपुत्राची कथा सांगून जाते की विचार करून शब्द बोलले जावेत उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे व्हायला नको ! 

आज बुद्धजयंती आहे तरीही बुद्धाच्या निर्वाणाचा उल्लेख अखेरच्या परिच्छेदात केलाय कारण यातील शेवटच्या चार पंक्तीत भारतीय संस्कृतीचे सार सामावले आहे. 

ब्लॉगसोबत दिलेल्या पेंटींगमध्ये एक क्रोधित इसम धारदार तलवार घेऊन त्वेषाने बुद्धांच्या अंगावर धावून येतोय आणि धीरगंभीर बुद्ध शांत मुद्रेत त्याला आशिष देताहेत. हे चित्र आजच्या समाजासाठी खूप गरजेचं आहे.       
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अखिल मानवजातीला अलौकिक ज्ञानप्रकाश आणि जीवनार्थ सांगणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी अनंतवंदना...

- समीर गायकवाड.