Monday, July 4, 2016

श्रीमंत मनाचा 'कुबेर'योगी ....


एखाद्या निर्जीव प्रिझमवर पुसटसा सूर्यकिरण जरी पडला तरी त्यातून सप्तरंगी प्रकाशझोत बाहेर पडतो. एरव्ही त्याच प्रिझमला एखाद्या सामान्य काचेच्या लोलकाव्यतिरिक्त अन्य ओळख नसते. यासमच एखादा अद्वितीय पत्थर असाही असतो ज्याचा स्पर्श होताच कुठल्याही पोलादाचे, लोहतत्वाचे सोने होते. लोक अशा पत्थरास परीस म्हणतात पण पत्थर तर निर्जीव असतात. पण मी अशा एका व्यक्तीला ओळखतो जो जिता जागता परीस आहे. केवळ परीसच नाही तर तो इंद्रधनुष्यी रंगांचा उद्गाता असणारा प्रिझमदेखील आहे ! त्याचं नाव म्हणजे संतोष लहामगे उर्फ संतोष भाऊ ! संतोषभाऊ हे एखाद्या प्रिझमसारखे आहेत अन त्यातून सप्तरंगी सद्गुणांची क्रियाशीलता व वैविध्य असणारा अभूतपूर्व असा 'कुबेर' समूह उगम पावला आहे !

संतोष भाऊंच्या 'कुबेर'मध्ये आजघडीला दीड हजारहून अधिक लोकं आहेत जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातलेच नव्हे तर विविध राज्यातील अन देशाबाहेरचे रहिवासी आहेत ! विविध जाती धर्माचे, पंथाचे, गोत्रांचे लोक यात सामील आहेत. नानाविध विचारधारांचे, संस्कारांचे, धारणांचे अन आकलनशक्तीचे लोक ह्या समाविष्ट आहेत. वेगवेगळ्या वयोगटाचे, वर्णाचे, लिंगांचे लोक या समुहात आहेत. विविध प्रादेशिक अस्मिता जपणारी माणसं यात गुण्यागोविंदाने राहतात, आपसातील मतभेद विसरून एकमेकाच्या सुखदुःखात सहज सामील होतात. दुधात साखर विरघळावी इतक्या सहजतेने आपआपसात मिसळून जातात. आपल्या सांपत्तिक स्थितीचे, आपल्या ऐश्वर्याचे वा थोड्याशा निम्न आर्थिक स्तराचे कोणतेही दडपण इथे नसते, इथे असते निखळ मैत्री ! इथे असतात ऋणानुबंध जे अक्षय स्वरूपात दृढ होत राहतात. इथे प्रत्येक हृदयी आढळते 'मर्मबंधातली' रेखीव 'कुबेर ठेव' ! शेकडो किलोमीटर अंतर एका अनामिक ओढीने पार करून एकमेकाची प्रसन्नचित्ताने अन हसतमुखाने भेट घेणारी माणसं हा विषय जिथे व्यावाहारिक जगात पूर्णतः लोप पावत चालला आहे तिथेच फेस्बुकच्या आभासी जगात मात्र फक्त आणि फक्त कुबेरच्या पटलावर मात्र हे सहजशक्य होताना दिसते आहे ! लोक नुसते एकमेकांना भेटतात असे नव्हे तर एकत्र वेळ घालवतात, एकत्र प्रवास करतात, एकमेकाची सुखदुःखे शेअर करतात. खरे तर कुबेरवरच्या 'ग्रेट भेटी' हा समाजशास्त्रीय विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा विषय व्हावा कारण आजकालच्या खरया दुनियेत जिथं सख्खा भाऊ आपल्या भावास ओळख देत नाही, तिथल्या व्हर्च्युअल आभासी जगात जन्मभरात एकमेकाला कधीही न भेटलेले अनोळखी लोक इतके आत्मैक्य कसे काय पावत असतील ? हे सर्व कसे शक्य झाले ? कुणाची ही कल्पना आहे अन कोणी हिला वास्तवात उतरवले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच नावाच्या उत्तरात दडली आहेत. ते नाव अर्थातच संतोष भाऊंचे आहे !

संगमनेर हा महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या जिल्ह्यातील म्हणजे अहमदनगरमधील एक छोटासा तालुका. या तालुक्याच्या गावातील एका छोट्याशा कुटुंबात अपार संघर्ष करून आपली यशाची पताका फडकावणारया  कुटुंबातील अभूतपूर्व व्यक्तीमत्वाची गाथा म्हणजे संतोषभाऊंचे जीवन होय. प्रवासी वाहतुकीतील सीट भरणारया जीपवाल्यापासून ते केबलवाल्या पर्यंतची अनेक व्यवसायरूपे त्यांनी अनुभवली आहेत. आयुष्याच्या एका वळणावर मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायाला अग्नीदेवतेने स्वाहा केल्यावर पुनश्च हरिओम करताना ज्यांच्यातला फिनिक्स पुन्हा पुन्हा राखेतून गरुड भरारी घेत गेला तो माणूस म्हणजे संतोषभाऊ लहामगे ! ज्यांनी आश्रितासारखं संगमनेरात येऊन आपलं जिणं सुरु केलं त्यांच्या आयुष्यात कर्तुत्वाने अन नशिबाने एक असे वळण आणले की ते राजकारणात यशस्वी रित्या सक्रीय झाले. जणू काही हाती हारतुरे घेऊन काळ त्यांची वाट बघत होता अशी कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. त्यानंतर बांधकाम व्यवसायात स्वतःला आजमावताना त्यांनी जो विश्वास कमावला त्याला तोड नाही. जमिनीच्या प्लॉटींगच्या उद्योगात त्यांनी असे काही बस्तान बसवले की त्यांची प्रगती पाहून माणूस थक्क व्हावा ! इतकं सारं ज्यांच्याबाबतीत घडूनही ज्यांचे पाय मातीचेच राहिले तो माणूस म्हणजे संतोषभाऊ लहामगे ! स्वतःला ऐश्वर्य,समृद्धी अन कीर्ती यांची अद्वितीय प्राप्ती झाली म्हणून त्याचा कधी उदोउदो केला नाही अन आपल्या घासातला घास आपल्या भोवतालच्या समाजाला आपण देणे लागतो हा विचार ज्यांनी केवळ मनात न ठेवता अमलात आणला तो माणूस म्हणजे संतोष भाऊ ! अशा संतोषभाऊंच्या संकल्पनेतून दिनांक १८ जुलै २०१४ रोजी या कुबेर समुहाचे रोपटे लावण्यात आले. 'इवलेसे रोप लाविलीये द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी..' आज या समूहाची अशी उत्तुंग उत्कट अवस्था आहे. 

'कमले कमलोद्भव' म्हणजे एका कमलदलातून दुसरे कमल फुलते या न्यायाने संतोष भाऊंनी लावलेल्या एका रोपाची आता राज्यभर अनेक कुबेरवेल तयार झाल्याचे दिसते आहे. हे काही तरी अनाकलनीय आहे, हा काही तरी मनोरम्य प्रवास आहे. कारण या लोकांच्या मांदियाळीत माणसे आपल्या भेदाभेदाची पादत्राणे समुहाबाहेर सोडतात अन दिलखुलासपणे आपलं वय, आपला जातधर्म, आपली अस्मिता, आपला अहंकार, आपले ईगो सगळं काही बाजूला ठेवतात अन हसत नाचत गात त्यात सामील होतात. कुबेरचे वर्धापनदिन असोत वा स्नेहमेळावा असो त्याला होणारी खचाखच गर्दी, लोकांचा तुफान प्रतिसाद अन लोकांनी दिलेल्या चिमुटभर योगदानात मुक्तहस्ते पसाभरून टाकलेलं संतोष भाऊंचे गुप्तदान. हे सारेच अगम्य ! अतर्क्य ! अविश्वसनिय ! तरीही दरसाली वाढत्या उर्मीने साजरे होणारे हे सोहळे हे एक सुखद वास्तव आहे. दूरस्थ अंतरावरून येणारे शेकडो लोक अन त्यांची आखीव रेखीव सोय, जोडीला देखणं उच्च प्रतीचं नेटकं नियोजन. यावर शिरपेच खोवणारे या कार्यक्रमात सामील होणारया विविध क्षेत्रातील नामवंत, प्रज्ञावंत, गुणवंत असामी. या सर्व नियोजनात बारकाईने लक्ष ठेवून असणारे संतोषभाऊ इव्हेंट मॅनेजमेंटचे गुरु असावेत की काय असे वाटू लागते. आधी तारीख निश्चिती करणे, संमेलनाचे शहर निवडणे, मग संमेलनस्थळ पक्के करणे. त्या नंतर राहण्याची उत्तम प्रतीची सोय पाहताना महिलावर्गाची विशेष काळजी घेणे, चवदार भोजनव्यवस्थेची आखणी करणे, प्रवासासाठी संख्येनुसार लागल्यास वाहनव्यवस्था करणे, सत्कार, बक्षिसे- प्रशस्तीपत्रक वाटप, अध्यक्षीय भाषण, अतिथींचे मनोगत, आभार प्रदर्शन अशा एक ना अनेक लहानमोठ्या बाबी यात अंतर्भूत होतात. यावर सांगोपांग विचार करून निर्णय घेणे म्हणजे किती दिव्य असेल याची कल्पना न केलेली बरी. मात्र हे सर्व काम लीलया पार पाडणारे संतोषभाऊ पाहिले की वरुणदेवाचा प्रलय झाल्यावर आपल्या करांगुळीवर गोवर्धन पर्वत उचलून सकळ गोकुळवासीयांना आधार - आसरा देणारे बाळकृष्ण डोळ्यापुढे येतात !

मला तर कधीकधी संतोष लहामगे हे एकल व्यक्तीस्वरूप आहेत हे खोटे वाटते. कारण सभासदांच्या वाढदिवसाला मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा देण्यापासून कुबेराचा दिवस सुरु होतो तो मावळतच नाही ! चारोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चित्रावरून गीतलेखन स्पर्धा, कथास्पर्धा, प्रतिसादस्पर्धा, कवितास्पर्धा अशा अनेक स्पर्धा इथे घेतल्या जातात. या सर्वांना संतोषभाऊ दाद तर देतातच पण त्यातले कमीअधिक जे काही असते ते खुल्या मनाने सांगतात. कमालीची पारदर्शकता यात असते. कला साहित्य, इतिहास, चित्रकला आदी विविध विषयांचा खजिना येथे उपलब्ध असतो त्यावर देखील भाऊ आपलं बहुमोल मत व्यक्त करताना आढळतात. संतोषभाऊ स्वतःसमूहातील सदस्यांचा परिचय आपल्या सहजसुंदर शैलीत करून देतात तेंव्हा त्या सदस्याला स्वर्ग चार बोटे राहतो ! केवळ सदस्यांच्या पोस्टवर वा क्रियाशील निर्मितीवर त्यांचा भार आहे असेही नाही. आपल्या व्यवसायाचा विशालकाय व्याप सांभाळून जगातील कुठल्या राजकारण्याला नसेल असा छंद त्यांनी आवडीने जोपासला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील विविध पुरातन मंदीरांचा, त्यातील मुर्त्यांचा, भग्न अवशेषांचा शोध घेत त्यावर सातत्यपूर्व लिखाण करणे ! कुठल्या राजकारणी व्यक्तीस असे उत्तमोत्तम छंद असल्याचे आजवर माझ्या पाहण्यात आले नाही. शिवाय त्यांचा इतिहासाचा व्यासंग दांडगा आहे, त्याची आवड आहे. एकेकाळी कधीही नवी वही पुस्तके हाताळायला न मिळालेला माणूस आता एखाद्या विशाल ग्रंथालयाइतका पुस्तकांचा संग्रह घरी बाळगून आहे, वेळ मिळताच आपली वाचनाची भूक त्यात भागवणे हे अनोखे वेड त्यातूनच जोपासले गेले असावे. आपल्या वाचनामुळे त्यांच्या पोस्टस व कॉमेंटस निष्णात लोकांना तोंडात बोटे घालायला लावतात हे वेगळे सांगायला नको !.... 

सोशल मिडीयाच्या आभासी जगाला प्रचंड वेळ देणारा हा भला माणूस व्यवहारिक जगात अनेक लहानथोर माणसांशी जन्मजन्मांतराचे नाते राखून आहे. राजकारणात देखील त्यांच्या धारणा स्पष्ट आहेत. "आपला पक्ष एकच तो म्हणजे बाळासाहेब थोरात !"असं छातीठोकपणे सांगून आपल्यावर ज्यांचा वरदहस्त आहेत त्यांच्याप्रती आपण कटीबद्ध आहोत हे निसंकोचपणे सांगणारे संतोष भाऊ एक वेगळेच रसायन आहे. आपल्या पुढच्या पिढीला शक्य तितका वेळ देताना आपले वाचनसंस्कार त्यांनी पुढच्या पिढीत रुजवले आहेत. दुष्काळाची झळ राज्याला जेंव्हा जेंव्हा बसली तेंव्हा या कुबेराच्या घशाला कोरड पडली. मग काय या वर्षीच्या बिकट परिस्थितीत तर त्याने आवाहन केले अन कुबेरांच्या त्यावर उड्या पडल्या. शेवटी तेही बोलून चालून कुबेरच ! पाहता पाहता अशक्य वाटणाऱ्या रकमेचे लक्ष्य गाठून त्याद्वारे राजुरी (जि.उस्मानाबाद) इथे केलेलं गाळउपसा करून कालवा खोदाईचे काम इतके यशस्वी झाले की कुबेर समूहाच्या या कार्याची दखल चक्क सरकार दरबारी घेतली गेली. याखेरीज समूहातील अडलेल्या, नडलेल्या लोकांना व मोठ्या शारीरिक व्याधी जसे की कॅन्सर - हृदयविकार वा कुणाच्या नशिबी आलेला एखादा दुर्दैवी अपघात अशा घटनांच्या चक्रात सापडलेल्या गरजू माताभगिनींना मदतीचा हात पुढे कारणारया संतोष लहामगेंना पक्के ठाऊक आहे की आपले ध्येय काय आहे. आपला उद्देश काय आहे याची त्यांना चांगली जाण आहे. 'रंजल्या गांजल्यासी जो म्हणे आपुला . तोची साधु ओळखावा यज्ञ तोची जानावा देव तेथेची मानावा' या तुकोबांच्या उक्तीचा खरा अर्थ त्यांना गवसला आहे. 

आजवर अनेक लोकांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिलेत. कुबेर समुहावर केवळ सदिच्छांची देवाणघेवाण चालत असती तर गोष्ट नवलाची नव्हती, पण एखाद्या सदस्याच्या घरी कुठली दुर्घटना घडली तर त्यात आपल्या सहवेदनेसह सामील होऊन त्याच्या दुःखाचा भार हलके करण्याचे काम ते कुबेरमार्फत करतात. 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीला सार्थ ठरवत त्यांनी 'कुबेर' नावाचे जे वैश्विक कुटुंब बनवले आहे त्याला जगभरात तोड नसेल. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याच्या सत्कारापासून ते सदस्यांच्या पुस्तक  प्रकाशनापर्यंत कुबेर प्रज्ञावंतांच्या पाठीवर आपला हात ठेवण्याचे काम संतोषभाऊ करतात. अनेक सामाजिक उपक्रम राबवताना त्यात अधिकाधिक लोकांना सामील करून घेतात जेणेकरून सर्वांना केलेल्या कामाचे समाधान आणि श्रेय मिळावे !......

ख्यातनाम लेखक साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी ऊर्मींच्या जगत्व्यापी अस्तित्वाबद्दल केलेले एक वाक्य प्रसिद्ध आहे - 'इतके सारे येते कुठून ?'.. मला हाच प्रश्न संतोषभाऊंच्या उर्मी आणि उर्जेबद्दल पडतो. संतोषभाऊंकडे इतके सारे प्रसंगावधान, इतकी प्रेरणा, इतकी उर्जा अन इतकी इच्छाशक्ती येते कुठून ? बारकाईने विचार करता असे दिसते की त्यांच्या विपन्नावस्थेत त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने जो संघर्ष केला आहे, जे प्रतिकूल दिवस काढले आहेत त्याला ते विसरलेले नाहीत. सदैव आपल्यासवे असणारया सर्व लोकांना त्यांनी शिरोधार्ह मानले आहे, मग ते त्यांचे जन्मदाते असतील, त्यांचे बंधू असतील वा राजकीय क्षेत्रात आपला सह्याद्रीसारखा हात पाठीशी ठेवणारे बाळासाहेब थोरात साहेब असतील ! याशिवाय ईश्वरानेही त्यांच्या पदरात काही गोष्टी अशा टाकल्या की त्यांच्या या कार्यात त्यांना अधिक बळ येत गेले. भाऊंच्या अर्धांगिनी आणि त्यांची मुले ही त्यांच्या स्वभावगुणांस साजेशी अशी आहेत. राज्यभरातून त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे दिलदार मित्र ही त्यांना ईश्वराने दिलेली व त्यांच्या स्वभावाने वृद्धिंगत केलेली देण आहे. या सर्वांच्या पाठबळामुळे अन भोळ्या शंकरावरील निस्सीम सच्च्या श्रद्धेतून हे सर्व प्रसवत असावे असे वाटते. इतके सारे लोक आणि इतकं बळ पाठीशी असलं की भल्याभल्यांचे पाय हवेत तरंगतात, पण संतोष लहामगे त्यातील नाहीत. त्यांची नाळ मातीशी घट्ट जुळली आहे, त्यांच्या संस्कारांची वीण पक्की आहे, त्यांची विचारधारा ठाम आहे अन त्यांचा निश्चय हा वज्रनिश्चय आहे. त्यामुळेच एकीकडे ते शेकडो कुबेरकरांसाठी जिथे हेल्पलाईन चालवतात तिथेच शिस्तप्रियता अन वकूब यावर देखील भर दिला आहे. गैरवर्तन वा नियमभंग केल्यास कारवाई करताना ते कुठल्याच गोष्टीची भीडभाड बाळगत नाहीत, इरादा सच्चा - निर्णय पक्का असा त्यांचा बाणा असतो.   

राजकारण असो वा बांधकाम क्षेत्र असो काही क्षेत्र अशी असतात की लोकांचा त्या क्षेत्रातील व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन झापडबंद झालेला असतो. पैशाच्या मागे लागलेले, स्वार्थी मतलबी अशी शेलकी विशेषणे लोक त्यांच्यासाठी वापरत असतात. यात लोकांचा दोष नाहीये, कारण सभोवताली जास्त करून या क्षेत्रात अशाच लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा दुर्बोध बदनामीच्या चिखलातून उगवणारे 'कुबेरकमळ' हे एक अप्रूप बनल्यास त्यात नवल असणारच ! संतोष लहामगेंना माणसांचे व्यसन आहे, माणसे जोडून त्यांची साखळी करून 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या पंक्ती प्रमाणे त्यांची वाटचाल घडवून आणायची आहे. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पसायदानात म्हणतात की, 'जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात !' ; त्या धर्तीवर संतोष लहामगे सगळया कुबेरकरांसाठी पसायदान मागतात, मग तो विश्वनिहंता त्याच्या तेजस्वी चेहऱ्यावार ते चिरस्मित आणतो अन आपले दान मुक्तहस्ते संतोष लहामगेंच्या झोळीत टाकतो. मग हा माणूस त्यात अजून भर घालून 'देत' सुटतो ! 

मध्यंतरी संतोष भाऊंचे वडील आदरणीय जगन्नाथजी अण्णा आजारी पडले होते. त्यांची प्रकृती जलदगतीने खालावत गेली, त्यांना इस्पितळांत आयसीयूत दाखल केले गेले, सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. एखाद्या दुर्दैवी घटनेचे तिमिरमेघ दाटून येतात की काय अशा कुशंकेची पाल मनाला चाटून जाऊ लागली. पण सर्वांच्या प्रार्थना फळास आल्या, अवघ्या काही दिवसात अण्णा बरे झाले. त्यांची प्रकृती पूर्ववत ठणठणीत झाली. 
या सर्व काळात संतोष लहामगे मला दृढनिश्चयी वाटले, संयमी अन निढळ वाटले. या 'सह्याद्रीच्या कड्या'कडून 'छातीसाठी ढाल' घ्यावी असे त्या क्षणी वाटले ! 
समुहात कुणी अकस्मात संकटात सापडतो तेंव्हा संतोष लहामगेंच्या जीवाची जी उलघाल होते तेंव्हा आपल्यालाही वाटते की 'माणसासाठी वेड्यापिशा झालेल्या स्नेहमेघाकडून वेडेपिसे आकार' घ्यावेत ;
माणसा माणसातल्या रक्तामधल्या प्रश्नांसाठी संतोष लहामगेंनी पृथ्वीकडून होकार मिळवले आहेतच, 
निरभ्र आसमंतात उसळलेल्या अथांग 'माणसांच्या दर्या'कडून त्यांनी स्वकर्तुत्वावर 'पिसाळलेली आयाळ' घेतली आहे. 
मायबापाच्या कृपेने अन परमेश्वराच्या आशीर्वादाने 'भरलेल्याश्या भीमे'कडून - 'प्रवरे'कडून 'संतांची सेवाव्रता'ची 'माला'देखील त्यांनी जपली आहे. 
त्यांनी हे सर्व अल्पवयात साध्य केले आहे. आता तर माझ्यासह सर्व कुबेरकरांची एकच इच्छा प्रत्येकाच्या मनोमनी ठाण मांडून आहे ती म्हणजे - "संतोषजींना देव देत गेला अन त्यांना मिळालेलं देवाचे देणं त्यांनी जगाला वाटून टाकलं ! आता वेळ आलीय की, आपण संतोषजींचे दात्याचे हात घ्यावेत !"

हे 'हात' ज्यांच्या हाती येतील तो केवळ 'याचक' असणार नाही तर निस्संशय तो देखील 'दाता'च होणार कारण हे हात काही साध्यासुध्या माणसाचे नाहीत, हे हात आहेत एका 'श्रीमंत मनाच्या कुबेर योगी' दात्याचे! 

असा माणूस मला मित्र म्हणून हे माझे परमभाग्य समजतो. संतोषभाऊंना आणि त्यांच्या समर्पित वृत्तीच्या कुटुंबियांना अभिष्टचिंतन व्यक्त करून भावी जीवनासाठी यशोकामनेच्या व दिपावलीच्या मंगलमय सणाच्या समृद्धीच्या शुभेच्छा देऊन लेखनसीमांचे भान राखतो ....

- समीर गायकवाड.