Saturday, December 23, 2017

पोलीस, प्रशासन आणि कुंटणखाने....


देशाची राजधानी दिल्ली असो वा मुख्य आर्थिक नाडी असणारं महानगर मुंबई वा सिटी ऑफ जॉय म्हणून लौकिक असणारं महानगर कोलकता असो तिथे ज्या गोष्टी सामाईक आहेत त्यातली एक बाब म्हणजे कुंटणखाने. भिंतींची चळत एकावर एक चढलेली, वेडेवाकडे अस्वच्छ जिने, लोखंडी ग्रील्सनी बंदिस्त केलेले अरुंद सज्जे, काचेची तावदाने फुटलेल्या जाळ्या ठोकलेल्या खिडक्या, कळकटून गेलेले दरवाजे आणि या सर्वाआडून डोकावणारे चेहरे. भडक लिपस्टिक लावून ओठांची मादक हालचाल करत येणाऱ्या जाणाऱ्यास नेत्रपल्लवी करणाऱ्या, हातवारे करून नजर वेधून घेणाऱ्या चौदा ते चाळीस वयोगटाचे हे चेहरे बाकी कोणतीच भाषा बोलत नाहीत. हे इथला कॉमन नजारा.


साधारणपणे एका कुंटणखान्यात किमान सहा ते कमाल तीस बायका पोरी असतात. तीन किंवा चार खोल्यांच्या घरांच्या आत शिरतानाच्या मुख्य हॉलवजा खोलीस आकाराने सर्वात लहान ठेवेलेले असते. उर्वरित खोल्यात लाकडी किंवा एल्युमिनिअमचे पार्टिशन मारलेले असते. मुख्य खोलीच्या आतल्या दारातून डोकावून बघितलं तर हे सर्व कंपार्टमेंट दृष्टीस पडतात. अन्यथा बाहेरून फक्त एक खोली आणि काही पडदे इतकंच दिसतं. काही ठिकाणी या कंपार्टमेंटची रचना काटकोनी आकारात असते जेणेकरून कुंटणखान्याच्या मालकिणीला नजरेच्या एका कटाक्षात सगळं दिसावं.  आजकालच्या काँक्रीटच्या अपार्टमेंट टाईपच्या कुंटणखान्यात या रचनेच्या जोडीस पोटमाळ्यांचा आसरा घेतलेला आढळतो. काही ठिकाणी हे कंपार्टमेंट एकावर एक असेही दुहेरी फिक्स केलेले असतात. तर नव्याने होत असलेल्या बहुमजली चाळवजा इमारतीत लॉजमधील रूम लाउंजप्रमाणे एकासमोर एक कंपार्टमेंट उभे केलेले असतात, आत जाण्यासाठी अत्यंत चिंचोळी जागा सोडलेली असते. हे प्रत्येक कंपार्टमेंट साधारण तीन ते चार फुट रुंद आणि सहा ते सात फुट लांब असते. म्हणजे एका खणात जास्तीत जास्त अठ्ठावीस चौरस फुट जागा. यात बहुत करून मुद्दामहून लोखंडी पलंगच ठेवलेले असतात, त्याच्या आवाजाने तरी लाजेकाजेने गिऱ्हाईकाने लवकर आटोपते घ्यावे हा यामागचा अंतस्थ हेतू ! लाकडी कॉट जिथे वापरले जातात तिथे प्लायवूड बॉक्सेस वापरले जातात ज्यातल्या पोकळीमुळे आतला 'तो' आवाज बाहेर येतोच. अचानक कुणी पळून जायचे जरी ठरवले तरी या कंपार्टमेंटच्या रचना आणि बाहेरील मुख्य खोलीची रचना अशी केलेली असते की पलायन अशक्य व्हावे. संपूर्ण सज्जे खिडक्या ग्रिल्सनी बंद केलेल्या असतात.

प्रत्येक कुंटणखान्यात त्या त्या मालकिणीच्या कुवतीनुसार पाच ते वीस पार्टीशनचे खण असतात. त्यातले प्रत्येक कंपार्टमेंट दोन ते तीन मुलीत वाटून दिले जाते. हाय सिझनमध्ये जसे की पुण्यातल्या बुधवार पेठेत गणेशोत्सव, कोलकात्यात दुर्गापूजा, दिल्लीत दसरा दिवाळीत गर्दी जास्त होते तेंव्हा कुणीही कुठेही 'वापर' करू शकते. एरव्ही या जागा फिक्सड असतात. कधी कधी यावरून मुलींत वादही होतात कारण या मुलींच्या ट्रंका, कपडे आणि इतर जिनसा त्याच कंपार्टमेंटमध्ये पलंगाखाली ठेवलेल्या असतात. कपाट नावाच्या गोष्टीत इथं जागा दवडली जात नाही. कारण प्रत्येक मुलीला कपाट द्यायचे ठरवले तर खण कमी होतात आणि त्यामुळे मुली कमी होतात. मुली कमी झाल्या की गिऱ्हाईक कमी होते अन पर्यायाने धंदा खालावतो. ज्यांच्या जागा मोठ्या असतात तिथे फारतर एखाद दुसरे कपाट आढळते पण त्यातही अड्डेवाल्या आंटीचा बोऱ्याबिस्तरा आधी ठाण मांडतो मग बाकीच्यांच्या चिंधी चिरगुटास जागा मिळते. प्रत्येक कुंटणखान्यात एकच कॉमन बाथरूम संडास असते. असे करण्यामागे जागेच्या कारणाशिवाय अन्य कारणेही असतात, जसे की आलेल्या गिऱ्हाईकानेही बाथरूमसंडासचा वापर सुरु केला तर पाण्यापासून ते त्याला नेमून दिलेल्या वेळेपर्यंतचे अनेक प्रश्न उद्भवतात. टाईल्स उचकटून गेलेल्या, काळपटून गेलेल्या, फ्लोरिंगवर नानाविध थर जमा झालेल्या, कडी कोयंडा तुटायच्या बेतात आलेल्या, हुक निसटलेल्या बकेट-मग मध्ये नळाची बारीक धार पडत असलेल्या भंगार अवस्थेत इथली बाथरूम्स असतात. त्याची डागडूजी मुद्दाम केली जात नाही कारण बायकापोरींनीही बाथरूममध्ये तासंतास अंघोळ करत बसू नये !!

इथे वेळेला फार मोल असते किंबहुना शरीरविक्रय करताना त्याची वेळ ठरलेली असते. तासाला दोनशे ते हजारपर्यंत आणि रात्रीस पाचशे ते पाच हजारपर्यंत रेट असतात. हे रेट कसे ठरतात यावर स्वतन्त्र लिहावे लागेल इतका हा विषय किचकट आहे. तासभरासाठी आलेल्या गिऱ्हाईकाच्या पाकिटात आणखी वजन असेल तर त्याला झुलवत ठेऊन आणखी एखाद्या तासाची बेगमी केली जाते तर भणंग माणूस असेल तर त्याला तीस पस्तीस मिनिटात बरोब्बर कटवले जाते. यामुळे इथे वेळेची खूप किंमत केली जाते. असो. अलीकडे प्रत्येक कुंटणखान्यात एक बेसिन देखील आढळते पण मोस्टली त्यात पाणी नसते. त्यामुळे थुंकून तुंबायचा प्रश्न येत नाही. अल्मोस्ट प्रत्येक कस्टमरसाठी एक बिस्लेरी मागवलेली असते, इच्छा असेल तर चूळ भरण्यासाठी तिचा वापर त्या बेसिनमध्ये होतो. एक टीव्ही, एक फ्रीज, एक शोकेस आणि डझनवारी देवांच्या तसबिरी हा पुढच्या खोलीतील कॉमन नजारा असतो. त्याला लगत पडदे आणि पलंगावर वा दिवाणवर अड्डेवाली मालकिण ठाण मांडून असते. तिच्या शेजारी एखादे टेबल. एकदोन खुर्च्या इतकेच फर्निचर या खोलीत असते.

संपूर्ण कुंटणखान्यात ही एकच खोली स्वच्छ असते, बाकीच्या ठिकाणी दुर्गंधी, अस्वच्छता, अजागळपणा यांचे साम्राज्य असते. गिऱ्हाईक आत आल्यावर जास्ती वेळ रेंगाळत बसू नये, फुकटचे नेत्रसुख घेत त्याने टाईमपास करू नये म्हणून प्रत्येक कुंटणखान्यात एकतर मालकिणीला वा दल्ल्यांना अशा लोकांना कधी गोडीगुलाबीत तर कधी पांचट, वेडे वाकडे बोल सुनावून पिटाळून द्यावे लागते. अनेक हौशेनवशे नुस्ते 'नजर मारण्यासाठी' आलेले असतात प्रसंगी त्यांची खेटराने पूजा करावी  लागते. मालकिणीच्या अंगी कडवटपणा नसला की दुनियादारी तिची पोथी ओळखून फुकटात कंड शमवून जाऊ लागते. यामुळे कुंटणखान्याच्या मालकिणी नुसत्या कजागच नव्हे तर वेळप्रसंगी चार हात करण्यास देखील खमक्या असतातच. याकरिता मुलींवर त्या बारीक लक्ष ठेवून राहतात. कोणाकडे गिऱ्हाईक आलेले आहे, कोण रिकामे बसून आहे यावर त्यांची नजर असते. जास्त माल कमवून देणाऱ्या मुलींवर त्या थोडा लळाही लावतात पण त्या पोरीलाही ठाऊक असते की हे प्रेम आपल्यावर नसून आपल्या कमाईवर आहे. यामुळे या बायकापोरी कमालीच्या व्यावहारिक असतात. कोणाचाही रुपया सोडत नाहीत अन बुडवतही नाहीत. या बायका आपआपल्या कंपार्टमेंटमध्ये 'कार्यभाग' उरकला की पुन्हा सज्जात, खिडकीत, दारात किंवा थेट रस्त्यावर येऊन नव्या कस्टमरच्या शोधात राहतात. त्यांचे वेव्हींग अखंड सुरू राहते.

वाटून दिलेल्या खणाव्यतिरिक्त दुसरीने परस्पर खण वापरले अन काही चीजवस्तू गहाळ झाली तर ती तिला भरून द्यावी लागते. यातून कधी कधी वाद होतात पण ते टोकाला जात नाहीत. या सगळ्या बायकात आपसात मदत करण्याची भावना मात्र खूप खोलवर रुजलेली आढळते. कारण आपल्याला कुणीच वाली नाही आणि आपली जोडीदारीण हीच आपली आई, आपली बहिण आणि आपली मुलगी हे त्यांना पक्के ठाऊक असते. जगातल्या सगळ्या नात्यांनी फसवल्यावर या बायका इथे आलेल्या असतात, त्यामुळे एकमेकींच्या आधारात त्या या हरवलेल्या नात्यांना शोधतात. दुखणी दवाखाने असो वा काही दिवसासाठी घराकडे परत जाणं असो त्या एकमेकीत आधी शेअर करतात. इथल्या पैशाची वाटणीही आधीच ठरलेली असते. गिऱ्हाईकाने दिलेल्या पैशातील जवळपास पन्नास ते ऐंशी टक्के रक्कम कुंटणखान्याची मालकीण घेते. उरलेले पैसे त्या मुलीला दिवसाचा वा आठवड्याचा हिशोब करून दिले जातात. हा व्यवहार कुठेही लिखित नसतो. सगळा मुंहबोला मामला. हे व्यवहार ती मुलगी तिथे आल्यापासून फिक्स्ड रेशोत असतात. वय झालेल्या, उमर ढळलेल्यांचे हाल यामुळेच वाईट होतात कारण त्यांची कमाई कमी असते अन त्यात मालकिणीचा वाटा जास्त असतो कारण ती राहायला छप्पर देते !!

मुलगी जितकी कमावते तितका मालकिणीचा हिस्सा कमी जास्त होत जातो कारण तिच्यामुळे पैसे भरपूर मिळतात. रोजची एव्हरेज कमाई करणाऱ्या आणि इथे रूळलेल्या बायका मात्र गिऱ्हाईकाकडून सोंगंढोंगं करून तर कधी त्याच्या 'कसल्याही इच्छा' पुरवून आणखी पैसे काढतात जे मालकिणीच्या हवाली केले जात नाहीत. ही ट्रिक इथे रुळल्यावरच जमू लागते. सुरुवातीला ज्या मुलीला काहीच खाचाखोचा माहित नसतात तिच्या हाती काहीच उरत नाही, काही वर्षे धंद्यात गेल्यावर तिचा चार्म ओसरलेला असतो, तिचे कस्टमरही फिक्स्ड असतात. एका ठरविक आलेखात तिचे आयुष्य बंदिस्त होते. या दिवसात तिचे व्यसनाधीन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिचे सेक्स पार्टनर फिक्स होण्याचा धोकाही उद्भवू शकतो. एखादा पुरुष तिला याच काळात प्रेमाचं जाळं टाकतो, तिला इम्प्रेस करतो, खोट्या आणाभाका घेतो. तिलाही हे दिवस स्थिर आणि काहीसे सुखाचे वाटत असल्याने ती काहीशी बेफिकीर होते आणि आपली मान नकळत कसायाच्या हाती देऊन बसते. ती त्या पुरुषाला फुकट शरीर देता देता पैसेही देऊ लागते. आपल्याला एखाद्या पुरुषाचा आधार हवा असं या अवस्थेतील कोणत्याही स्त्रीला वाटणे अत्यंत साहजिक आणि भावनासुलभ असते. याचा नेमका अंदाज आलेली पुरुषी गिधाडे या बायकांना अक्षरशः लचके तोडत राहतात. एक काळ जाऊन उमर ढळू लागल्यावर तिला उमगते की आपण फसलो गेलो. या दरम्यान काहींच्या पदरात पोरबाळही पडलेलं असतं. मग त्या औलादीच्या आयुष्यासाठी या बायका त्या लोढण्यांना आणखी ओढत राहतात. तर काही बायका त्यांनाच आपले दलाल बनवतात. त्यांना त्या गार्डसारखे 'ठेवतात'. बऱ्याचदा मग कुंटणखाने बदलले जातात, जागा बदलली की मग पुन्हा नवीन गिऱ्हाईक नजरेस पडते आणि गिऱ्हाईकालाही नवा 'माल' दृष्टीस पडतो. कुंटणखाने बदलताना दलाल लोक पैसे हात धुवून घेतात. कुणाची रवानगी कुठल्या स्पॉटवर करायची याचीही गणिते असतात. त्यासाठी या बायका आधीच जेरीस येऊनही जास्ती पैसे मोजतात. कारण काहीही असो एकदा का इथे आल्या की ह्या बायका या खुराडेवजा कंपार्टमेंटमध्ये स्वतःच्या विवस्त्र देहाला गिऱ्हाईकाच्या हवाली करतात. नव्या जागी आल्यावर त्या मालकिणीशी आधी देण्याघेण्याचा व्यवहार पक्का करावा लागतो. इथे बाई मुरलेली नसेल तर तिची अजूनच फसवणूक होते

आजच्या घडीला किमान ८० टक्के बायका स्वतःच्या मर्जीने इथे राहत असल्याचे विविध पाहणी अहवालातून सिद्ध झालेय. मात्र धंद्यात येतानाची हीच टक्केवारी उलटी होते. म्हणजे फक्त २० टक्के बायका आपखुशीने मर्जीने धंदा स्वीकारून त्यात आयुष्य घालवण्यासाठी येतात तर उर्वरित ८० टक्के महिलांवर धंदा लादला जातो. पण धंद्यात पडल्यावर मात्र परत जाण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रमाण फक्त २० टक्के इतकेच भरते. म्हणजे मर्जीविरुद्ध धंद्यात आलेल्या बायकाही नंतर घरी परतण्यास नकार देतात. असे वाटण्यास अनेक सामाजिक, जातीय, कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक बाबी कारणीभूत आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा इतके कंगोरे त्यात आढळतात.  निम्म्याहून अधिक कुंटणखान्यात एकाच घरातून वीजेचा सप्लाय पुढे कंटीन्यू केलेला असतो. मीटर मोजक्याच ठिकाणी असतात, पाण्याचेही कनेक्शन असते पण त्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज पाईपलाईन यांची अवस्था अत्यंत दयनीय असते. मोस्टली वरच्या मजल्यावरील कुंटणखान्यात पाण्याचे एक्स्ट्रा स्टोरेज असते. दिवसातून चार वेळा तोंड धुवायचे आणि दोनवेळा अंघोळी करायच्या यामुळे पाण्याची इथे सदोदित ओरड असते. या इमारतींचे मालक या जागांचे कर भरतात. बहुत करून जागामालक. इमारत मालक, भाडेकरी, पोटभाडेकरी, लीज होल्डर आणि ठेकेवाला दलाल या साखळीनंतर कुंटणखान्याच्या मालकिणीचे नाव येते. कारण विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणांच्या कचाटयातून सुटण्यासाठी आणि नेमके उत्तरदायित्व टाळण्यासाठी या क्लृप्त्या कामी येतात. खरं म्हणायचं झालं तर हा भुलभुलैय्या असतो वरकरणी तो यंत्रणांचा, प्रशासनाचा आणि सरकारचा वाटू लागतो. पण वास्तवात हा एक नियोजनबद्ध आराखडा असतो ज्यात बायकांचे केवळ आणि केवळ शोषण होत असते आणि वेगवेगळ्या नावाखाली पुरुष दडलेले असतात ! अठ्ठावीस चौरस फुटात स्वतःला विकणाऱ्या बायकांच्या वाट्याला आकाश तरी कितीसे येणार ?

(पूर्वार्ध)                                                                    

- समीर गायकवाड.