Friday, October 13, 2017

इक्बाल कासकर ते डी. के. राव - अर्थपूर्ण वर्तुळ...


सेलिब्रिटी (!) पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांनी ठाणे क्राईम ब्रॅंचच्या लेबलाखाली मुंबईत येऊन इकबाल कासकरच्या कॉलरला हात घातल्याने जीव तळतळून गेलेल्या मुंबई पोलिसांनीही फिट्टफाट करताना लगे हात एक पुण्याचे काम कालपरवा केलेय. मुंबई क्राईम ब्रॅंचने एक्स डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार डी. के. राव याला अटक केलीय. डी.के. राव याने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. धारावी झोपडपट्टीत एसआरएअंतर्गत होत असलेल्या पुनर्वसन प्रकल्पात त्याने आपला हिस्सा मागितल्याने वाद उद्भवला आणि त्याला आत घातले असा रंग याला देण्यात आलाय. या प्रकल्पाचे काम घेतलेल्या बिल्डरला राव हा गेल्या वर्षभरापासून धमकावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटकेनंतर राव याला न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. राव विरोधात मुंबईत २० गुन्हे दाखल आहेत. एका खंडणी प्रकरणात गेल्या वर्षीच त्याची सुटका करण्यात आली होती.
  
मंडळी, इथे थोडा ट्विस्ट आहे ! ५ सप्टेबर २०१४ रोजी मोहम्मद माहीर सिद्दिकी आणि अख्तर खान यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. शकील बाबूमिया शेख उर्फ छोटा शकील याच्या टोळीतली ही माणसं होती. पॉइंट ३२ बोअरचं रीव्हॉल्व्हर आणि त्याची चार जिवंत काडतूसं या दोघांकडून हस्तगत केली होती. यातल्या मोहम्मद सिद्दिकीस २००९ मध्ये उत्तरप्रदेश एटीएसने बनावट पासपोर्टच्या केसमध्ये अटक केली होती. त्यात त्याला चार वर्षाची सजा लागली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये तो डी कंपनीच्या निमंत्रणवरून मुंबईत आला होता. शाहूनगरमध्ये राहणाऱ्या अख्तरखानकडे त्याची बेगमी केली गेली. त्यांना रसद दिली गेली आणि कामाची टीप ही दिली गेली. काम होतं डी.के.रावची गेम वाजवणे. स्पॉट होता मुंबई उच्च न्यायालयाचे आवार. मुहूर्त होता अठरा वर्षापासून सजा काटत असणाऱ्या रावच्या उर्वरित केसमधील सुनावणी दरम्यान न्यायालयात आणायच्या वेळेचा ! पण गवळी टोळीतील एक माशी शिंकली आणि गेम फेल झाला. या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.

जो माणूस वीस वर्षाच्या सक्त मजुरीसाठी जेलमध्ये होता त्याच्या जीवावर उठण्यासारखं त्याने काय केलं होतं ? त्याने छोटा राजनच्या भारतातील परतण्याच्या 'सरकारी कामासाठी' मोक्याच्या टिप्स देत असल्याचा परफेक्ट डाऊट डी कंपनीस आला होता. २००० साली छोटा राजन बँकॉकमध्ये असताना त्याला खलास करण्याचा कट छोटा शकीलने जवळपास तडीस नेला होता पण तेंव्हाही त्याची गेम उलटी पडली होती.

नुकत्याच काही दिवसापूर्वी ठाण्यातील खेतवानी बिल्डरला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून इक्बाल कासकरला अटक करून नुसता पोलिसांकडून कल्ला केला गेला. या केसमध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे मकोका लावण्यात आला आहे. खरे तर त्याला २००३ मध्येही हाच कायदा लावला गेला होता पण चार वर्षे आत निवांत काढून तो बाहेर आल्यावर त्याने पुन्हा आपली 'रोजीरोटी' सुरु केली होती. छोटा राजनच्या अटकेचा 'शो' उरकल्यावर इक्बाल कासकर अनसेफ झाल्यात जमा होता. प्रदीप शर्मा पुन्हा एकदा 'कामी' आले ! इक्बाल कासकर सेफ झाला.

इकडे मीडियात थेट दाऊदचा भाऊ पकडला गेला अशी आवई उठली आणि अंडरवर्ल्डमध्ये चर्चेला उधाण आले. सगळी सेटलमेंट असल्यात जमा असूनही 'अपनी साख कम नही होनी चाहिये' हे दाऊदसाठी जीव द्यायला तयार असणारया छोटा शकील टोळीतील लोकांनी पक्के केले होते. त्यांच्या निशाण्यावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी वीस वर्षाची सजा भोगून आलेल्या डी.के.राव पेक्षा योग्य सावज कोण असले असते ? इथे पोलीस पुन्हा 'कामी' आले. त्यांनी ठाणे पोलिसांच्या हिशोबाची फेड करत राव ला सेफ मोड दिला ! हे खूप भारी आहे !!

रावविरुद्ध केसेस पेंडींग होत्या, रावविरुद्ध गुन्हे नोंद होते तरीही राव बाहेर आल्यावर एक वर्ष निवांत होता पण इक्बालभाईला आत घातल्यावर रावची अवस्था पुढे काय झाली असती हे कोणीही सांगू शकते. आताच्या गुन्ह्यात पोलिसांनी रावला देखील मकोका लावल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण इक्बाल कासकरप्रमाणेच त्यालाही यापूर्वी मकोका लावला गेला होता. २८ फेब्रुवारी २००३ मध्ये भाजपचे नगरसेवक रवी मिसाळ यांची टिळक रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी डी.के.राव, विजू पोद्दार, अनिल नांदुस्कर आणि रघु उर्फ जगदीश शेट्टी यांच्या सह चौदा जणांना आरोपी केले होते. काहींना अटक करण्यात आली होत. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला होता. सबळ पुराव्याअभावी या चौघांची २००९ मध्ये सुटका करण्यात आली होती.

ही केस देखील जबरी होती. मिसाळ यांचा रॉयल सुपर लॉटरीचा मोठा पसारा असणारा व्यवसाय होता. या केसमधील एक आरोपी राजू सचदेव याला मिसाळ यांना ह्या धंद्यातून आऊट करून एकट्याला मालक व्हायचे होते. त्यासाठी त्याने मिसाळ यांची सुपारी देण्याचे ठरवले. सचदेवने डी.के.रावला त्याच्या सुनावणीसाठी बाहेर आणलेले असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात भेट घेतली असं सरकारपक्षाचं आणि तपास अधिकारयांचं म्हणणं होतं. कल्पना करा, वीस वर्षाची सजा लागलेला एक अट्टल गुन्हेगार त्याच्या अन्य गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी नायालयात आणला जातो आणि त्याला न्यायालयाच्या आवारात सुपारी दिली जाते असं सरकारी तपास यंत्रणा दुसऱ्या खटल्यात न्यायालयात सांगते. मग रावला जेंव्हा जेंव्हा सुनावणीसाठी बाहेर काढले गेले तेंव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर नकळत प्रश्नचिन्ह पोलीस आणि तपास यंत्रणांनीच लावले आहे याचा खुलासा कोण आणि कसा करणार ?

राजदेव याने एक लाख साठ हजारची सुपारी दिल्याचा आरोप लावला गेला होता. जेलमध्ये असलेल्या माणसाला पोलीसासमक्ष न्यायालयाच्या आवारात सुपारी दिली गेली असं यातून प्रतीत होतं. या केसमध्ये छोटा राजनसह एकूण १४ आरोपी होते. यातील दोघे जेलमध्ये आजारपणात (!) मेले (मंजुळा शेट्टये देखील कागदोपत्री अशीच मरणार आहे), प्रमोद साठे नावाचा आणखी आरोपी देखील मकोकामधून मुक्त केला गेला. तर काही जण एनकाउंटरमध्ये (!) मारले गेले तर एक आरोपी शकील टोळीकडून मारला गेला. राजनसह उर्वरित सगळे फरार दाखवले गेले आणि त्यांच्याविरुद्ध केस राखून ठेवली गेली. अतिरिक्त सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश एस. एस.फणसळकर जोशी यांनी या चौघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडताना पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. या खटल्यात तक्रारदार पोलीस निरीक्षक दत्तात्रय टेमघरे, माजी अतिरिक्त (गुन्हे) आयुक्त अशोक धिवरे, निवृत्त पोलीस आयुक्त डी.एन.जाधव आणि तत्कालीन पोलीस आयुक्त संजय जाधव अशा बड्या पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष होऊनही राव निर्दोष सुटला होता ! ...

जुन्या गोष्टी जाऊ द्यात... आता डी. के. रावला जेलमध्ये जाऊन कोणी सहजासहजी मारू शकणार नाही. सगळे कसे सुरक्षित ! त्यामुळे आता जरी राव वरती मकोका लावला तरी पुरावे सबळ असतील याची ग्वाही कोण देणार ? असो... या डी.के.रावचे खरे नाव रवी मल्लेश वोरा असे होते. मुंबई पोलीस दलातल्या डॅशिंग महिला पोलीस अधिकारी मृदुला महेश लाड यांनी एका पाठलागात त्याला जायबंदी केले होते तेंव्हा त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरील त्याचं नाव डी.के.राव असं असल्याने त्याच नावाने त्याचं बारसं झालं. मुंबईतील सुपरकॉप डी शिवानंदन यांनीही एका एन्काउंटरमध्येही रावचा खात्मा करण्‍याचा प्रयत्न केला होता. परंतु एका अज्ञाताच्या कृपेने राव त्यात थोडक्यात बचावला होता.

लेख वाचून ट्यूब पेटलेल्यांचे अभिनंदन !!

- समीर गायकवाड.

(टीप - मुंबई पोलीस दलातल्या तुकाराम ओंबाळें आणि अहमद जावेद यांच्या सारख्या अनेक निधड्या छातीच्या पोलीसांवर, अधिकाऱ्यांवर माझा असीम विश्वास आहे. पोलीस हे प्यादे असतात खरे सूत्रधार पांढऱ्या कपड्यात दिमाखात वावरत असतात)