Monday, September 11, 2017

पवित्र..."तू कशी काय पवित्र आहेस ?" - शेलका सवाल. 
"का नाही, पवित्रता शरीर संबंधावरून ठरते का ?" - बिअर बॉटल उघडत.
 
"एकाच पुरुषाशी तुझा संबंध येतो का ?" - तिच्या हालचाली बारकाईने निरखत पुढचा सवाल.
 
"अरे घरात बायको असताना जो पुरुष बाहेरख्याली होतो त्यात माझी काय चूक ? " प्रश्नाच्या शेवटच्या चूक या शब्दावर जोर देत ती डोळा मारत !
 
"तुझं चुकतंय असं कुठं म्हटलंय ?" - हल्ला परतावून लावताना सावध भूमिकेत जात.
 
"अरे मी कुठल्या पुरुषाच्या दारी जाते का ? तेच माझ्या दारी येतात. तुझं धर्मज्ञान - तत्वज्ञान सांगतं की दारी आलेल्या अभ्यंगतास, पाहुण्यास परत पाठवू नये. " - प्रश्नाच्या मधल्या पॉजमध्ये खालची लालचुटूक जीवणी दातांनी हळूच चावते. दुसरा कोणी असता तर त्याच्या काळजाचा बर्फ कधीच वितळला असता.

 
"पण तू त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतेस त्याचं काय ?" - पुन्हा शहाजोगपणा.
"शेकडो पुरुषांशी संबंध ठेवल्याने मी अपवित्र होत असेल तर जगातलं प्रत्येक फुल अपवित्र आहे कारण एका फुलावर शेकडो भुंगे बसतात, एका फुलावर एक ठराविक भुंगा असं काही नसतंच मुळी" - विजयी मुद्रेत बघत, बिअर तोंडाला लावत, तुलाही हवीय का असे इशाऱ्याने विचारत फुलटॉसवर सिक्सर मारते.
 
"अगं ती अबोल, अचल आणि अज्ञान फुले आहेत तू मनुष्य आहेस" - अजून टुमणे लावलेलेच.
 
"म्हणून काय झालं ?" - फाटक्या गादीच्या कोपऱ्यात अडखळत असलेलं झुरळ फेकून द्यावं इतक्या सहजतेनं.
 
"ठीक आहे तरीही -" वाक्य पूर्णही होऊ देत नाही.
 
"मी कुठल्या परपुरुषाला मनातून वरत नाही, मी स्थिर आणि ठाम असते." - मान ताठ करत घोट रिचवत.
 
"अगं आपण नंतर बोलू, तुझं उरकून घे. " - ट्रॅक बदलण्याचा अयशस्वी प्रयत्न.
 
"पवित्रता आणि अपवित्रता याचे निकष ठरवले कुणी ?" - नजरेतली आग तेज करत तिकडून बाउन्सर.
 
"अगं ते पूर्वापार चालत आले आहेत" - आवाज आता केविलवाणा होत चाललेला.
 
"जाळून टाक असल्या निकषांना !" - मदिरा आणि मदिराक्षीच्या संगमाला शब्दांचे ताटवे फुटलेले.
 
"का संतापतेस इतकं ?" - वेळ मारून नेण्याचा प्रयत्न.
 
"नवरयात कमजोरी असली तरी बाईने देहाचा कपूर करून मन जाळत राहायचं, नवरा मेला तरी विधवेने तसंच बसून रहायचं, नवरा सोडून गेला तरी तिनं नवा जोडीदार करायचा नाही यावर तुझं धर्मशास्त्र अगदी साळसूदासारखं गप्प बसते रे" - केवळ मर्मावरच नव्हे तर दुखत्या रगेवर अचूक दाब दिलेला, चेहऱ्यावर छद्मी हास्य तृप्तीचा आनंद.
 
"तुला शाबित काय करायचे आहे ?" - अखेरची हाराकिरी.
"अरे तुझा हा समाज फक्त पुरुषांचा देहधर्म जाणतो, बाईच्या देहधर्माबद्दल कुठेच लिहित नाही. बाईलाही वासना असतात, इच्छा असतात, मन असतं. त्याचा तिने कोंडमारा केला की तुम्ही तिला महानतेच्या चौकटीत चिणून टाकणार वाह रे बहाद्दर !" - पुरुषी प्राबल्याच्या विळ्याचा एका फटक्यात खिळा केलेला.
 
"हां तू बोलत रहा, थांबू नको." - माघार कशी घ्यायची या विचारात.
 
"बाईने मन मारायचे अन पुरुषाने शंभर ठिकाणी तोंड घालायचे, अन तो जिथे तोंड घालतो त्या बायका अपवित्र ! हा कसला न्याय रे ? हा निव्वळ पाखंड आहे, अन असले पाखंडी धर्मज्ञानी मी गादीखाली ठेवून त्यावर उताणं झोपते ! कळलं का ?" - विजयी मुद्रेत बिअर बॉटल डस्टबिनमध्ये भिरकावून देत.
 
"बरं बाई तुझंच खरं" - हार कबूल.
 
"हे बघ असलं भिक दिल्यासारखं कबूल करू नको, प्रश्न कसा ठणकावून विचारत होतास तसंच कबूलीदेखील मनापासून दे ना !" - हक्काचंच खाणार अन हक्काने बोलणार याला जागत दुसरी बॉटल ओपन करत.
 
" किती हट्टी आहेस गं तू ?" - आता माघार पक्की.
"ते सगळं सोड, तू काय घेणार बोल ? आज काय नवीन खबरबात ? स्साला तुझ्याकडे जबर माहिती असते रे " - मुंडी मुरगळलेल्या सावजाला जीवदान देत, दाणापाण्याची चौकशी सुरु.
 
"पण तुझ्याकडं माहितीचा बारूद भरलेला असतो तो यापेक्षा भारी असतो." - स्तुतीने रंगा खुश तरीही तिची असलियत आपल्याहून कैक पटीने भारी हे मनापासून कबूल करत.
 
"ये हुई ना बात !"- दिलजमाईचे जीवघेणे देखणे संकेत देत !
काशीचं शिक्षण कमी झालेलं आहे पण वाद घालण्यात एकदम एक्सपर्ट आहे ती. मागेही तिच्यावर दोनेक पोस्ट लिहिलेल्या. जीवनाचं तत्वज्ञान समजायला पुस्तकं वाचायला लागत नाहीत ते जगण्यातूनही कळते. फक्त आपल्या वाटेला आलेलं जगणं आपण सच्चेपणाने जगायचे असते. लई भारी लॉजिक आहेत तिच्याकडे....

- समीर गायकवाड.