Friday, September 22, 2017

विजयाशांती आणि ईश्वर....

अनिल कपूर-विजयशांतीच्या १९८९ च्या 'ईश्वर' चित्रपटात एक सीन होता. ईश्वर हा गावातला बेरोजगार भोळा युवक असतो. एका निरागस मुलाची आई असणारया ललिता या तरुण विधवेशी एका विलक्षण कर्मधर्मसंयोगाने त्याचे लग्न होते. दरम्यान नोकरीसाठी अहोरात्र पिच्छा पुरवणारया ईश्वरला मास्टरजी नोकरी बघून देतात. ईश्वर वॉचमनच्या कामावर आनंदाने रुजू होतो. अनोळखी परिसरात राहताना तिथं धोब्याचं काम करणारी आशा त्याला दुनियादारीचे, प्रेमाचे नुस्खे सांगते. पहिला पगार मिळाल्यावर ईश्वर साडी,चोळी घेऊन घरी येतो. पण तो पांढरी साडी आणतो.
खरं तर यात वावगं काहीच नसतं कारण त्यानं ललिताला कायम फिकट शेडच्या साडीत पाहिलेलं असतं आणि त्याच्या भोळ्या स्वभावाला यातलं काही उमगतही नाही. त्या दिवशी आशा हळूच त्यांच्या घरात शिरते, त्या साडीवर कुंकवाचा शिडकावा करते, त्यावर कडक इस्त्री करून साडी घडी घालून, आत मोगऱ्याचा गजरा ठेवते. दोन खोलीच्या घरात राहणारे ईश्वर ललिता लग्नानंतर हमबिस्तर झालेले नसतात. त्या रात्री ईश्वर तिला साडी, बांगड्या, गजरा देतो. ती लालबुंद साडी नेसून अंधाराच्या नादब्रम्हात ती ही त्याच्या प्रेमात रंगून जाते आणि साडीतल्या कुंकवाने तो लाल होऊन जातो......

साडीचा रंग कुठला होता याला महत्व नाही पण मनात सच्चेपणा असला की ती हव्या त्या रंगात रंगल्यागत वाटते. विधवेनेच सफेद वस्त्रे का नेसावीत आणि लाल साडी नसली तर सुहागरात्र होऊ शकत नाही का हा प्रश्न आपल्या महिलावर्गाला का पडत नसावा हे मला न उमगलेले कोडे आहे. साड्यांचे रंग हे मनातील भावनांचे दार्शनिक असावेत असे मला वाटते अर्थात हाच निष्कर्ष अंतिम सत्य आहे असे नव्हे पण शास्त्रात न लिहिलेले नवरात्रीच्या साड्याच्या रंगांचे थोतांड प्रेमाने जोपासणारया एकाही स्त्रीला विधवेला रंगीत साड्या नेसण्यापासून रोखणे किंवा पांढऱ्या साडीची सक्ती करणे याचं वैषम्य वाटू नये हे खटकते. सुहागरात्रीचं वसन लाल नसले तर चालत नाही का ? हळदीची साडीपासून ते पूजेच्या साडीपर्यंत हळूहळू रंगनिश्चिती केली गेलीय. हे कुणी केल, का केलं, त्याचे अन्वयार्थ काय, हे सिद्धांत मोडले तर काय आभाळ कोसळणार आहे याचा विचार किती जणींच्या मनात आला असेल हा ही संशोधनाचा विषय आहे. साड्यांचा अभिनिवेश जरूर असावा पण त्याच वेळी साडीच्या आडून स्त्रियांवर लादल्या जाणारया भोंगळ रीती रिवाजावरही बोललं जावं ... असो...

एक चित्रपट म्हणून 'ईश्वर' आजही प्रेक्षणीय आहे. त्यातलं विजयशांतीचं नितळ सोज्वळ देखणेपण आजही भावते, या अभिनेत्रीचं सौंदर्य टिपिकल दाक्षिणात्य स्त्रियांसारखं आहे, एकदम आखीव रेखीव आणि लाघवी सौंदर्य, एकदम सही. अनिल कपूरचा भोळासांब अवतार बऱ्यापैकी चालून जातो. आशा सचदेवने रंगवलेली धोबन खूप भाव खाते, सईद जाफरी मास्टरजीच्या भूमिकेत चपखल बसलेत. के.विश्वनाथचं दिग्दर्शन अप्रतिम होतं. काळजाचा ठाव घेईल अशी एक संथ लय संपूर्ण चित्रपटाला होती. क्लायमॅक्स मात्र धक्कादायक होता. 'कौशल्या मै तेरी तू मेरा राम' हे गाणं खूप श्रवणीय होतं. 'स्वाती मुत्यम' या तेलुगु चित्रपटाचा हा रिमेक होता. त्यात कमल हसन आणि राधिकाने खूप छान भूमिका वठवल्या होत्या. माझ्या सोलापुरातील पद्मा थिएटरला या सिनेमाने शंभर दिवस पूर्ण केल्याचे अजूनही स्मरते. ...

'ईश्वर' मधला अनिलकपूरचा रोल त्या भुमिकेतल्या विलक्षण सच्चेपणामुळे ध्यानात राहतो. हा चित्रपट राज कपूर दिग्दर्शित करणार होते पण ते त्यांचे स्वप्नच राहिले. म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीस के. विश्वनाथ यांनी आरकेला ट्रिब्युट अर्पण केलंय. 'ईश्वर' मधलं गाव खूप निसर्गरम्य आहे. विस्तीर्ण स्वच्छ नदीकाठ, प्राचीन हेमाडपंती शैलीतलं अत्यंत भव्य मंदीर, गावातली बैठी घरं, मातीचे रस्ते, सांजवेळा, सूर्योदय सगळं मोहक कॅनव्हासवर चितारल्यागत वाटते. 'ईश्वर' आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक फ्रेम मनाला भिडणारी आहे. 'ईश्वर'साठी के.विश्वनाथ यांना फिल्मफेअर मिळालं होतं. व्हायोलीन चा वैशिष्ट्यपूर्ण वापर हेही एक वेगळेपण होतं. यातली ललिताच्या भूमिकेतली विजयशांती मनाच्या कप्प्यात रुतून बसणारी होती हे नक्की...

- समीर गायकवाड.