Sunday, July 9, 2017

सुभग

चांदण्या लुकलुकत्या लेवूनि अंधारावर नित्य झोपी जाते रात्र
तरंगतात खुणा जन्मदात्यांच्या भिंतीवरल्या आत माजघरात
अंगाईगीत ओसरीवरच्या पिंपळपानांचे रंगते आर्त स्वरात
कातळ अंधाराचे कुरतडते अलगद कातरवेळेची ओढाळ खार
भरकटलेलं हरिण मनीचे जंगलात मौनाच्या घुसमटते आरपार
साली आठवणींच्या सोलत तिष्टतो कोनाड्यात उद्याचा प्रहर
नभात दूर अंधारल्या ओढतो चिलीम दुःखाची वृद्ध एकाकी मेघ
स्फटिक धवल निर्झरात विरघळतात स्वप्नांचे घायाळ घननीळ
झोपी जातात सावल्या झाडांच्या अंगणात, लटकतात अन पारंब्यात
येताच किरणे पहाटेची कष्टतात झाडे किरमिजी दूर दूर गगनात
पाखरांचे जथ्थे मग उठतात अन झेपावतात उंच उंच आभाळात
होताच सकाळ निजतो मी मेघांच्या अभ्र्यात, जन्मजन्माच्या झुल्यात
पक्षी सुवर्णवर्खी आठवणींचे फडकवत पंख सांगावा सुभगाचा सांगतात...

- समीर गायकवाड.