Thursday, July 27, 2017

काहूर ....
दावणीचं दावं तोडून मोकाट उधळणाऱ्या खोंडासारखी वाऱ्याची गत झालीय. जेंव्हा बघावं तेंव्हा चौदिशेने बेफाम आणि सुसाट वावधान सुटलंय. त्याला ना आचपेच ना कसली समज. चौखूर सुटलेलं खोंड जेंव्हा अनिवार धावत सुटतं तेंव्हा कधी कधी ना कधी ते दमतंच. मग एखाद्या बांधाच्या कडेला असणाऱ्या चिचंच्या पट्टीला नाहीतर वाळून खडंग झालेल्या हाळातल्या हिरव्यापिवळ्या लिंबाखाली ते जाऊन बसतं. त्याला कडबा लागत नाही की चारा लागत नाही, नुसती ताजी हवा पिऊन डेरेदार सावलीतला बावनकशी विसावा घेऊन ते पुन्हा ताजेतवानं होतं. कान टवकारून उभं राहतं, अंगावरचं पांढरं रेशमी कातडं थरथरवतं. पुढच्या उजव्या पायाने माती खरडून काढतं आणि पुन्हा उधळत फिरतं.
त्याला दिशा ठाऊक नसतात की वेगाच्या मर्यादा नसतात, ते नुसतंच फिरत राहतं. आभाळात फिरणाऱ्या ससाण्यासारखं त्याचं काम चालतं. आता वाऱ्याचा तोच खेळ सुरु आहे, त्याला जणू कुणाचे काहीच घेणेदेणे नाही. झाडाच्या पानापानातून पावा वाजवत तो वाट्टेल तसा फिरतो आहे आणि वाट्टेल तिकडे वळतो आहे. कधी खंडीभर कचरा संगट उडवून नेतो तर कधी नुसतीच फुफुटयाची राळ हवेत भरतोय. बांधावरचा मुरूम या कडंवरून त्या कडंला नेतोय. काटया कुट्यातून जाताना मांजर फिस्करावी तसे आवाज काढतोय, झाडांच्या बुंध्यांचा भोज्जा करून वळसे घालत फिरतोय, कधी माळावरती झिम्मा खेळत वावटळ उडवून देतोय, मध्येच अवसान गळाल्यागत कुठल्या तर वळचणीत नाहीतर सांदाडीत दडून बसतोय. थकलेली गाय जसे आधी पुढचे पाय गुडघ्यात टेकवते मग हळूच अंग टेकवते, आणि अंग चोरून पाय पोटापाशी मुडपून मुटकुळं करून बसते तसं ह्या वाऱ्याचं होतंय. अशा वेळी तो अगदी गलितगात्र होतो आणि मान टाकून बसतो. त्याच्या अंगाखालची माती त्याला ताजंतवानं करते मग तो पुन्हा सज्ज होतो पण पुन्हा दिशाहीन भटकत राहतो. या अवखळ उनाड वाऱ्याचं काय करावं काहीच सुचत नाहीये. 

वारा इतक्या ताकदीने फिरतोय की अधून मधून गोळा होणारे काळेराखाडी ढग देखील तो आपल्या सोबत पुढे कुठे तरी डांबरी सडकेने सजलेल्या आणि किरकोळ पावसाने ड्रेनेज तुंबल्या जाणाऱ्या आटपाट नगराकडे घेऊन जातो. शिवाय पाभरीतून मातीच्या गर्भात लोटलं गेलेलं बियाणं एव्हाना इकडं वाट पाहून सुकून गेलंय. मुकी बिचारी झाडं आधीच वाऱ्याच्या अंगचटीने कावून जातात आणि त्यात हवेतला उष्मा आहे तसाच आहे. त्यामुळे 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' अशी ह्या झाडांची गत झालीय. केंव्हा धुंवाधार पाऊस पडतो आणि त्यात मनसोक्त न्हाऊन निघतो असं त्याला होऊन गेलंय. पण तशी कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. मायनं रागं भरल्यावर पोरानं इरेला पडून दारापाशीच वाढूळ ताटकळत उभं राहावं अन मायचा जीव पिंजाऱ्यानं कापूस पिंजल्यागत होत राहावा तसं हे पाऊसपाण्याचं हुलकावणं चालत राह्यलंय. गावाकडून शेताकडे जायच्या मातकट वाटेनं कावडीच्या दगडापाशी कायम लवथवते मृगजळ दिसते तसं या पावसाचं झालंय. नुसतंच आभाळ येतं आणि जातं. आभाळात वासरांची गाय हंबरते पण ढगांना पान्हा फुटत नाही खाली काळी माय तशीच तहानेली राहतेय. कुण्या जल्माची दुष्मनी काढून हे दोघं डाव टाकत राहतात हे गणित काही सुटत नाही. 

मातीचं डोळं पार तारवटून गेलंत आणि पहिलटकरणीच्या नखऱ्यावाणी या दोघांचं घुम्मडध्यान काही केल्या कळंनासं झालंय. आता सध्या शिवारात मस्तकात खिळं ठोकल्यागत मी उभा आहे पण सारं ध्यान आभाळात आहे तर चित्त गाईच्या आटत चाललेल्या कासेत आहे, मातीत खोल खोल घुसत चाललेल्या करड्या किरमिजी मूळांत आहे, माना टाकून पांढरं निशाण फडकावत उभ्या असलेल्या पिंढरीइतक्या उंचीच्या घासात आहे, कोरफडीच्या गुताडयात अडकलेल्या कबुतराच्या पिसात आहे, वाळत चाललेल्या मकवाणात आहे, दावणीतल्या मोकळ्या पाट्यात आहे, आतडी खोल गेलेल्या कणगीत आहे, धार हरवलेल्या खुरप्यात आहे, ढेकळाखालच्या तळाशी नष्ट होत चाललेल्या जुनाट ओलीकडे आहे ! सगळं चित्त देहातून वाहणाऱ्या घामाकडे आणि आटत चाललेल्या डोळ्यातल्या खाऱ्या पाण्याकडे आहे.

उन्हं तिरपी झाल्यावर उजाड माळावरून घराकडं परतताना भोरडया जणू चिडवत राहतात तर माझं मौसम उतरलेलं तोंड बघून सटवाया टिटव्यांना कोण दुःख होते देव जाणो ! त्यांचा नुसता कलकलाट चाललेला असतो. 'टिटवीटी टीव'चा आक्रोश कानातून काळजात उतरतो. उंच उडणाऱ्या घारी देखील नेमक्या डोक्यावरून उडून खोटा खोटा का होईना पण धीर देत असतात ; जणू कुठे तरी पडत असणाऱ्या आगंतुक पावसाची त्या बातमी देत असतात. पुरू राजाकडून हरल्यावर सिकंदरला जशी उदासीनता आली होती तशा उदासीनतेत चालणारे अन वाऱ्याच्या मस्तीपुढं हार न मानता आपापल्या वस्त्यांकडे गुरं माघारी घेऊन जाणारे, उतरलेल्या चेहऱ्याचे गुराखी संगटच्या गायीम्हशींनाच हार्रहुर्र करून ढूसण्या देत उद्याच्या हिरव्या चाऱ्याची हूल दाखवत नेटाने नेत असतात. अगदी त्याच वकूबाने मी परत फिरलेला असतो. चिवट जिद्दीपासून मला नमवायला घनगर्द मेघश्यामांची पुन्हा आभाळात दाटी होऊ लागते ; 'गाभ्रीचा पाऊस कधीच का साथ देत नाही' या एकाच विचाराने डोक्यात विचारांचे काहूर माजून जाते. वासरांच्या गळ्यातल्या घंटा डोक्यात वाजू लागतात...

- समीर गायकवाड.