Wednesday, June 7, 2017

गावाकडची सांज ....एक रम्य आठवण ...गावाकडची सांज आकाशातून हळूहळू उतर येते अन दबक्या पावलाने सारवलेल्या अंगणात दाखल होते. शेतशिवारामध्ये गळयातल्या घंटांचा मंजुळ नाद करत सगळं गोधन परततं. त्यांच्या खुरांवरची माती गोठ्यात विसावते ; गोठ्यातली वासरे आईच्या दिशेने सुसाट पळत सुटतात. गोठ्यांना उधाण येते, दिवसभर उन्हात उभी असलेली पिकं सांजेशी गुजगोष्टी करतात.


पानापानावरील धूळ अलगद हवेत उतरत राहते, सूर्यकिरणातून अलवार बिलोरी खेळ खेळत ताल धरून फिरू लागते. ज्वारीची ताटे हळूच येणारया वाऱ्याच्या झुळुकेवर अंग झटकून घेतात, त्यांना पेंग चढते. तांबड्या रानातल्या तुरी उगाच हसत खिदळत राहतात, केळीच्या तटतटलेल्या पोटरया रात्रीतून येणारया विणेसाठी सांजेपासूनच तयारीला लागतात. शेवरीच्या झाडावर कापसाचा तरंगता संसार तांबूस झालेली सूर्यकिरणे आरपार अंगावर खेळवत राहतो. उसाच्या फडातून वाहणारा वारा जरा विश्रांतीच्या वाटेला जाऊन गुडघ्यात डोके खुपसून बसतो. विहिरीतले पारवे कपारीत जाऊन बसतात, सुग्रणीचे घरटे बांधायचे काम थांबते. बांधावरल्या बाभळीच्या घरट्यात नुकत्याच जन्मलेल्या होल्यांची पिले चोच उघडून व्याकुळतेने आईची वाट बघू लागतात. नारळाच्या झावळ्या सावल्यांचे नवे पोत जमिनीवर टाकू लागतात अन आमराईतली घेरदार झाडे उगाच मान वाकवून उदास होऊन जातात. चिंचेच्या पट्टीतली झाडे पानगळीच्या डौलदार नक्षीकडे आपल्याच तालात बघू लागतात. झाडा झाडातून पक्ष्यांची किलबिल टिपेस जाऊ लागते. अस्ताला जाणारा सूर्य नव्या चेतना देऊन जातो अन पश्चिमेची लाली दिगंतातून थेट मातीत उतरू लागते. खुरट्या झाडा झुडपांतून रातकिडे अंग झटकून जागे होतात अन निशेच्या गीतगायनासाठी घसे साफ करू लागतात. चंद्रमौळी छपरातून येणारया तिरक्या धूसर सावल्या कोनाड्यात आडोसा घेऊन अंग टेकतात. आचळाला तोंड लावून आपली तहानभूक भागवणारया वासरांना गाई चाटायला लागतात तेंव्हा पडवीतल्या केसाची चांदी झालेल्या डोईवर फाटका पदर चापून चोपून घेतलेल्या बायाबापड्यांच्या ओलेत्या डोळ्यात तृप्ततेचे मेघ तरळून जातात. दावणीला बांधलेल्या म्हशींच्या पुढ्यात कडबा कुट्टीचा घास अन आमुण्याच्या पाट्या येतात. त्यांचे जबडे हलवत एकसुरी चर्वण सुरु होते अन बळीराजा धारा काढायची पितळी चरवी थंडगार पाण्याने विसळू लागतो. वस्तीवरच्या कोठीत चुलीत विस्तव फुरफुरू लागतो अन भुकेचे गंधवेडे निरोप हवा आसमंतात घेऊन फिरू लागते.

ओढ्यावरच्या पाण्याचे आवाज उगाच मोठे वाटू लागतात, बांधाबांधावरचे दगड धोंडे देखील वेगळ्या रंगाचे दिसू लागतात. गावाकडंच्या वाटेवरचा फुफुटा जमिनीवर विसावतो, वाटेतल्या नागोबाच्या देवळाबाहेरील विस्तीर्ण झाडे उगाच मनात काहूर माजवून ओशाळवाण्या सावलीला कवटाळून बसतात, ओशट जीर्ण पडक्या धुळकट अशा त्या छोटेखानी गाभारयात सांजेचे किरण अभिषेक घालून रेंगाळत राहतात. वाटेने पुढे गेले की गावाजवळच्या पीरसाहेबाच्या दर्ग्याचे मिनार आकाशातील अल्लाहशी गळाभेट घेतात, जणू कलमा पढत असल्यागत त्याचे घुमट कंबरेतून वाकून नमाज अदा करतात. तिथल्या अलौकिक वासाच्या धूपऊदाचा वास दूरवर एक आगळी प्रसन्नता घेऊन जातो. वाटेतले खाच खळगे देखील आता पायाशी जास्तच मस्ती करू लागतात, शेतातून येणारे कष्टकरी जीव डोक्यावरच्या दूरडीत माळवं घेऊन वेशीजवळ येतात तेंव्हा तळ्यातल्या पाण्याची थंडगार झुळूक त्यांच्या पायाची मालिश करते अन त्यांचा थकवा कुठच्या कुठे निघून जातो. घराघराबाहेर लावलेल्या शेणकुटाच्या गोवरया एव्हाना वाळून गेलेल्या असतात, अन त्यांचा एक वेगळाच वास प्रत्येक घराच्या अंगणात तरळत असतो. या गोवऱ्या गोळा करत अंगण लख्ख झाडून घ्यायचे काम कुठे कुठे अजूनही चालू असते. तळ्याकाठची झाडे पाण्यात हरवत चालेलेले प्रतिबिंब पाहून उगाच हिरमुसली होतात, तिथल्या पानगळीची पाने मात्र आनंदाने स्वतःभोवती फेर धरून पाण्याच्या लाटांवर स्वार होतात. तळ्यातल्या पाण्याचा डोह देखील शांत होऊ लागतो त्याची हिरवाई काळसर होऊ लागते अन पाण्यातल्या पानकोंबड्या वेटोळे करून अंग चोरून सूर मारू लागतात. आसमंतातले बगळ्यांचे थवे त्रिकोणी आकार आता विखरु लागतात, अन सांज गडद होऊ लागते तशी पाणंद उगाच भीतीची चादर अंगावर ओढून बसते. पाणंदेतील झाडे खूपच कशीतरी वाटू लागतात, तिथल्या पारंब्या भेसूर हलू लागतात. पिंपळपानाच्या आड बसलेली घुबडे अन अशोकाच्या झाडात लटकलेली वटवाघळे जागी होऊ लागतात. हळूहळू तिथली वर्दळ पांगू लागते. वेगाने रिती होत जाणारी पाणंद एकीकडे असते अन वेशीजवळील मारुतीरायाच्या देवळात वाढत जाणारी लगबग एकीकडे असते...

देवळातल्या लामणदिव्यांना तेलवात होते अन सांज झाल्याचे जणू जाहीर होते. ज्यांच्या घरी वीज असते तिथले बल्ब उजळतात बाकी ठिकाणी लख्ख पुसून ठेवलेले कंदील जागे होतात, काही ठिकाणी बत्तीचे मेंटल भडकते तर घरोघरच्या दारावरील देवळ्यात बारीक वातीचे दिवे तेवू लागतात. पारावरील गप्पांना आता वेगळाच कैफ चढलेला असतो. सांजेची निळाई वडाच्या पारंब्यावरून लोंबकळत गावातल्या मातीत उतरते, पारावरती गप्पा मारत बसलेल्या पान- तंबाखूची चंची उघडून बसलेल्या लोकांच्या डोळ्यात तरळते. शेत शिवारापासून ते ऊन पावसापर्यंतच्या तिथल्या गप्पा शेवटी विठूचरणी आपल्या चिंता वाहून रित्या होतात. संध्याकाळ होताना चावडी मात्र भकास वाटते, गावातलाच कोणीतरी गांजलेला नाडलेला तिच्या कोनाड्यात अंधाराची वाट बघत दाखल झालेला असतो. मंदिराचा पिवळसर कळस उतरणीच्या आभाळाकडे उद्याच्या दिवसाचे दान मागत तांबूस होऊन जातो, देवळाच्या शिखराभोवती काही कबुतरे गुटरगुमचा आवाज काढत पंख फडफडवत बसतात. गावातल्या वेगवेगळ्या आळ्यातून डोईवर पाटी घेऊन भाजीपाल्याचे माळवे विकणारे आपापल्या शैलीत आवाज देत फिरू लागतात, घरोघरी चुली धडाडतात ; काही ठिकाणी आता स्टोव्ह आहेत तर काही घरी एलपीजीसुद्धा आहेत, चरचर आवाज करत पातेल्यांमध्ये आधण चढवले जाते. गल्लोगल्ली पोरांचे खेळ जोमात येतात. एकच गलका चोहीकडे उडालेला असतो.

बागातलं फिरणं, शॉपिंगची उनाडकी, बाजारपेठातली चहलपहल, मॉल्सचा चकचकाट, टीव्हीवरील मालिका हातात ताट घेऊन बघत बसणं,योगा क्लासला जाणं, इव्हनिंग वॉक एन्जॉय करणं असली कोणतीही सोंगं न करता अगदी अलगदपणे ही सांज गावातल्या मातीत उतरते ; तिला नशेची तलफ नसते,पैशाचा माज नसतो, ज्ञानाचा अहंकार नसतो, आपल्याच नादातला एकलकोंडा विखार नसतो, शिट्या वाजवणारे हॉर्न फुकणारे आवाज तिच्या कवेत नसतात. भरजरी वस्त्रात ती लपेटून येत नाही ; साध्या नेसूच्या कपड्यात ती येते. गावाकडची सांज भरल्या डोळ्याने येते, दिव्यात उतरते आणि घराघरात प्रकाशाची आभा पसरवते, पारावर विसावते, गल्लोगल्ली खेळणारया पोरांच्या पायात थिरकते अन मंदिरातल्या टाळ चिपळ्यात दंग होऊन जाते. शेतशिवारात मनसोक्त घुमून दमलेल्या पायांशी माथे टेकते. गायीच्या शेपटीवरून बैलाच्या वशिंडावर घसरगुंडी खेळते, गोठ्यातल्या वासराला झोपी लावून गावातल्या घरात येते अन झोळीत टाकलेल्या लहानग्या देवपावलांचे चुंबन घेते. देव्हारयात जाते, समईच्या धाग्यात स्वतःला गुंफून घेते, ढेलजेत येऊन ढांगा टाकते, सांज सगळीकडे प्रफुल्लता घेऊन जाते, विसावा देते, सुखाच्या गुजगोष्टी करते. मात्र उंबरठ्याजवळ येऊन थबकते, तिच्याही डोळ्याला पाणी येते. कारण दाराबाहेरच्या ओसरीत थकले भागले जीव उरले सुरले दिवस मोजत जुन्या आठवणीना उजाळा देत डोळ्याला पदर लावत बसलेले असतात अन उंबरयाशी उभी राहून दरवाजाच्या कडीशी चाळा करत नवी हळदओली सून माहेरच्या आठवणींनी कासावीस झालेली असते. तिच्या डोळ्यातला मायबापाचा विरह अन पडवीत झिरपत असलेल्या जीर्ण चांदण्याचा प्रकाश यामुळे सांज हिरमुसली होते अन तिथून निघून ती सरते शेवटी विठोबाच्या देवळातल्या पायरयावर जाऊन मस्तक टेकवते, आपला शीण घालवते. एव्हाना अंधार गडद होऊन गेलेला असतो अन सांजेला रात्रीच्या अंधाराने आपल्या कुशीत सामावून घेतलेले असते .....

- समीर गायकवाड