Monday, June 19, 2017

आईची माया ...ही हृदयद्रावक कथा आहे शार्लोट जेक्सची जी आपल्या मृत मुलीचे कलेवर घेऊन सोळा दिवस तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण जिवंत करत राहिली.. शार्लोट जेक्सच्या (Charlotte Szakacs) फेबु वॉलवर ११ जूनला तिच्या टाईमलाईनवर तिची हसरी छबी आली आणि अनेकांनी तिच्या उमदेपणाचीदाद दिली. कारण तिच्या भूतकाळात एक घटनाच अशी घडून गेली होती की तिचं भावविश्व उध्वस्त झालं होतं. इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शार्लोट जेक्स प्रेग्नंसीमुळे खूप आनंदी होती. २० व्या आठवड्यात तिलासमजले की तिच्या गर्भात असलेल्या बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. हे ऐकताच केर्लोटसह तिचा पती अटिलाही या सर्वामुळे फार दुःखी झाला होता. शार्लोटने इव्हलिनला जन्म दिला पण तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. इव्हलिनचा मेंदू पूर्णपणे विकसित होऊ शकला नव्हता. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवणे गरजेचे होते. जन्माच्या तिसऱ्या दिवशी इव्हलिनला डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांच्या हातात दिले. इव्हलिनचे जगणे कठीण आहे हे डॉक्टरांनीर समजावल्यानंतर त्यांनी तब्बल ४ आठवड्यांनी तिचे व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला.डॉक्टरांचा हा निर्णय केर्लोट मान्य करायला तयार नव्हती. शेवटी तिने मनाचा हिय्या केला. पण मनाची तयारी करण्यासाठी पतीची मदत घेतली. आपल्या चिमुरडीसाठी आणलेला पाळणा, तिच्यासाठी सजवलेली खोली, तिची खेळणी, तिच्यासाठी आणलेले कपडे, तिच्यासाठी पाहिलेली स्वप्ने सारं काही तिच्यासमोर फेर धरून नाचू लागलं. आपलं बाळ गेलं हेच तिला सहन होत नव्हतं. आपल्या बाळासोबत किमान काही दिवस तरी आपल्या घरी घालवता यावेत यासाठी तिने डॉक्टर आणि आपल्या पतीकडे धोशा लावला.तिच्या पतीने डॉक्टरांशी चर्चा केली आणि मुलीच्या मृत्यूनंतरही पुढचे १६ दिवस तिचा मृतदेह त्यांच्यासोबत ठेवायला अनुमती दिली. तिला थोडासा का होईना आनंद झाला. डॉक्टर्सने इव्हलिनची बॉडी कडल कोटद्वारे कव्हर केली होती. ज्यायोगे बॉडी लवकर सडत नाही. त्यांनी इव्हलिनला ४ दिवस घरीच ठेवले. त्याठिकाणी ते तिला तिच्यासाठी आणलेल्या खास बेडवर झोपवले. नंतर ते तिला सोबत घेऊन पार्कमध्ये फिरायला जायचे. दोघांनी त्यादरम्यान इव्हलिनच्या बॉडीबरोबर फोटो क्लिक केले. मुलीबरोबर वेळ घालवण्यासाठी असे केल्याचे केर्लोट आपल्या पोस्टमध्ये सांगते. मृत्यूच्या १६ दिवसांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दांपत्याला कोणी मानसिक दुर्बल म्हणतील वा कुणी एक त्यांना मनोविकृतही ठरवतील पण मला त्यात आईवडीलांची वेडी माया दिसते. अपार प्रेमाने ओथंबलेलं आईचं काळीज दिसतं. आपलं आवडतं माणूस गेलं हे मान्य पण त्याच्यासाठी पाहिलेली स्वप्ने अंशतः का होईना त्यांनी पूर्ण केली. यातून त्यांना क्षणभंगुर का होईना पण समाधान मिळाले असेल. या घटनेतून सावरण्यासाठी त्यांना या फोटोमेमरीजची खूप मदत होईल हे नक्की. काहींना हा सगळा खुळचटपणाही वाटू शकतो. अखेर ज्याच्या त्याच्या मानसिक जडणघडणीचा हा मुद्दा आहे...शार्लोट जेक्सने जे केलं त्याचे उदात्तीकरण व्हावे वा तिच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून तिचे फोटो शेअर केलेले नाहीत तर आईवडीलांची आपल्या अपत्यासाठीची वेडी माया काय काय करू शकते, आईंचे काळीज आपल्या बाळासाठी किती व्याकुळ होते हे कळावे यासाठी शार्लोटची पोस्ट मी ब्लॉगवर शेअर केलेली आहे...- समीर गायकवाड.