Sunday, June 18, 2017

बाप...


हव्यास माणसाला अधम बनवतो. सगळी नाती, भावना त्यात चिणून माणूस स्वतःची कबर खांदतो. मरून त्या कबरीत दफन झालं तर किमान सुटका होते पण आपल्या हातून झालेली चूक ध्यानी आली तर राहिलेलं आयुष्य हा जगण्याचा शाप होऊन जातो. प्रत्येक क्षण मृत्यूची आणि पश्चात्तापाची भाकणूक कारत बसावे लागते. एका सत्यघटनेवर आधारलेली ही कथा तुम्हाला नक्कीच झिंझोडून काढेल....

रातकिडं सगळ्या हाळातनं किरकिर करत होते. हवेतला गारवा अंगाला चांगलाच झोंबत होता. नाही म्हटलं तरी मध्यरात्र उलटून गेलेली असावी. काळ्या आभाळातल्या चान्न्या लुकलुक करत मागंपुढं झाल्यासारखं करत होत्या. मध्येच पानातनं येणारा आवाज कानावर अंगावर काटा आणण्यास पुरेसा होता. चौदिशांना स्मशानशांतता होती. मधीच एखादी बारुळी टिटवी टिट्वीटिव आवाज करत घुमत होती, दूरून कुठून तरी पिंगळयांचा आवाज कानी येत होता. लांब लांब ढांगा टाकत सादळलेल्या रानातनं विष्णू सपासप पुढं जात होता. केकताडातनं वाहणारं वारं सुं सुं आवाज करत त्याच्या पायात घुटमळून पुढं जात होतं. बोराटीचा पाला पडावा तसं त्याच्या डोक्यात एकामागोमाग एक विचार येत होते. पावलागणिक उडणारा फुफुटा पिंडरया लालपिवळ्या करत होता. तांबारलेल्या डोळ्याचा विष्णू शुद्धीतच होता पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्याची कानशिलं तापली होती, कपाळावरची नस तटातटा उडत होती, मानेवरच्या शीरा दांडरल्या होत्या. आडमाप मनगटे ताठवत, मुठी वळवून तो वाऱ्याच्या वेगाने पुढे जात होता. त्याला कसली तर अनामिक घाई झाली होती....

झपाझप चालत एकदाचा विष्णू वस्तीवर आला. त्याला बघून लाल्या आणि मोत्या दुरुनच पळत आले. आपला मालक इतक्या रात्री वस्तीवर आल्याने कदाचित ते खुश झाले असावेत. त्याचे पाय चाटत, पायात गोंडा धरत त्याच्या मागंपुढं होत ते त्याच्या बरोबर चालत आले. तो कोठ्यापाशी जाऊ लागला तसे ते दोघे पुन्हा बांधावर जाऊन बसले. विष्णूला मात्र घाम फुटला होता कारण, त्याचा अंदाज चुकला होता. त्याची शिकार पडवीत बाहेर बाजंवर नव्हती. बाज रिकामी होती. हवेतल्या गारव्याने शिकार कदाचित आत झोपली असावी, कारण आतल्या खोलीतून बारीक पिवळा उजेड दारातल्या फटीतून बाहेर झिरपत होता. उजेडाची ती तिरीप सांगत होती की आत कोणीतरी असावं, शिवाय दार आतून बंद होतं. विष्णूने मुंडासं सोडलं आणि कमरंला करकचून गुंडाळलं. दुपारी लिंबाच्या फांद्यात लपवून ठेवलेली कुऱ्हाड त्याने आवाज न करता सावधपणे बाहेर काढली. एकडाव त्याने तिच्या पात्यावरून हात फिरवला. इकडं तिकडं दूरवर नजर फिरवली. दूरपर्यंत चीटपाखरू देखील नव्हते. कानामागून आलेला घाम सदरयाच्या टोकाने पुसत पुसत त्याने कुऱ्हाड खांद्यावर टाकली. आता चित्त्यागत बारीक चोरपावले टाकत तो खोलीच्या दारापाशी पोहोचला. त्याचे श्वास फुललेले होते, छातीचा भाला जोरात हलत होता. ऊर धपापल्यामुळे कपाळावर घामाचं जाळं तयार झालं होतं.

ठाक ठाक आवाज करत त्याने दारावरची कडी वाजवली आणि त्याने हलकासा आवाज दिला- "आबा, आवो आबा ! उठा ! मी हाय विष्णू... पलीकडल्या वस्तीवर चोरं आल्यात जणू, समद्या गावात कालवा उटलाय ... आबा उटताय नव्हं ?...आबा...वो आबा .."
शेवटची हाक त्याने जरा जोरातच दिली. त्यासरशी आतून एक थकलेला, कातर, आर्त स्वर आला - "आलो आलो... कोण ? इष्णू का ?.. "
"व्हय, व्हय मीच हाय आबा.. "
"आलो बाबा.... लई रात करून आलासा.... पांडूरंगा रे बाबा माज्या.."
आतला आवाज दाराजवळ येऊ लागला तसा विष्णू पूर्ण तयारीनिशी कुऱ्हाड सावरून एकदम सावध उभा राहिला.

त्याच्या डोक्यातला खोडकिडा आता त्याच्या रक्तातून अंगभर वेगानं वाहत होता, काळीज प्रचंड वेगानं धपापत होतं. कुऱ्हाडीवरची उजव्या हाताची मुठ प्रचंड ताकदीनिशी आवळून तो मातीत पाय रोवून उभा होता. कोणत्याही क्षणी दार उघडले की घाव घालायचे हेच त्याच्या डोक्यात होतं.
आतली थकलेली, सालटं निघालेली, रापलेली पावलं दाराजवळ आली. जांभई दिल्याचा आवाज आला. दाराची कडी उघडताना आतली बारीक आवाजातली पुटपुट कानावर येत होती. कांडकांड आवाज करत कडी निघाल्याचा आवाज आला. दाराची फळकुटे मागे सरली. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता डोक्यात सैतानी थैमान संचारलेल्या विष्णूने निमिषार्धात हातातल्या कुऱ्हाडीचा पूर्ण ताकदीनिशी सपकन घाव घातला.

काळ्याकभिन्न रात्रीची अंधारसमाधी भंग पावली, "इष्णू SSSS SS इष्णू रे !" अशी आर्त किंकाळी अंधाराला चिरत पानाफांद्यातून दूरवर हवेत विरत गेली. झाडावर बसलेली झोपेच्या पेंगंत असलेली सगळी पाखरं एका दमात जागी झाली. सगळ्या आभाळात पक्षांचा एकच गलका उडाला. बांधावर बसलेले लाल्या आणि मोत्या आपल्या थोरल्या धन्याच्या त्या आवाजाने एक क्षण बिथरले. बारीक आवाजात विव्हळले अन पुढच्याच क्षणाला ते वाऱ्याच्या वेगाने गावाच्या दिशेने धावत सुटले. इकडे आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने विष्णू सपासप घाव घालतच होता. त्याच्यातल्या माणसाचा लोप पावला होता. तो अधम झाला होता. शेणाने सारवलेल्या जमिनीवर सगळा रक्तमांसाचा चिखल झाला होता. बाहेर सगळे वातावरण थिजून गेले होते. बऱ्याच वेळाने विष्णू भानावर आला.....

~~~~~~

तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळवंत माने विष्णूकडे चक्रावून गेलेल्या नजरेने पाहत होते. गुडघे दुमडून मान खाली घालून विष्णू मुकाट बसून होता. विष्णूची आई काविरा त्याला भेटायला बाहेर उभी होती. लुगडं अस्ताव्यस्त झालेली, डोईचे केस पिंजून गेलेली, रडून रडून गालावर ओघळाचे डाग उमटलेली, काविरा पन्नाशीतली असावी. मान पुढे आलेली, संसाराचा गाडा हाकून कंबरेत वाकलेली, गरिबीने गांजून गेलेली, दारिद्र्याच्या खुणा अंगाखांद्यावर वागवणारी, चेहऱ्यावर रेषांचे जाळे घेऊन फिरणारी लंकेची पार्वती होती ती. तिच्या पायात वहाणा सुद्धा नव्हत्या. खरं तर नवरा असा हकनाक गेल्यामुळे तिला जबर धक्का बसलेला होता पण डोक्यात कसला तरी विचार पक्का करून घरातल्या, भावकीतल्या सगळ्या लोकांच्या विरोधास न जुमानता ती इथे आली होती. मानेंनी हवालदाराला खुणावले तशी ती माऊली आत आली. आत आल्याबरोबर तिने आधी इकडे तिकडे नजर टाकली आणि पुढच्याच क्षणी वाघिणीने झडप घालावी तशी टेबलावर पडलेली वेताची छडी घेऊन पोटच्या पोराला सपासप हाणायला सुरुवात केली. हात बांधलेला विष्णू मोठमोठ्याने ओरडत होता. आतल्या किंकाळयांच्या आवाजाने चौकीबाहेरच्या माणसात चूळबुळ वाढत होती. काविराच्या शेतात मयतीसाठी आलेली सगळे गावकरी आता पोलीस चौकीभोवती गोळा झाले होते. कितीतरी वेळ काविरा आपल्या पोराला हाणत होती. त्याला मारताना स्वतः रडत होती, ओरडत होती, आक्रोशत होती.तिच्या हुंदकयांनी आणि त्याच्या आरोळ्यांनी पोलीसचौकीच्या भिंतीवर शहारे उमटत होते. बळवंत माने निस्तव्ध होऊन आईच्या करुण उद्रेकाचा लाव्हा अनुभवताना थिजून गेले होते.

विष्णूची गर्भार पत्नी शारदा कानात प्राण आणून चौकीच्या दारापाशी बाहेर भिंतीला खेटून उभी होती. तिच्या गर्भातलं मुलदेखील इतक्याच शांत चित्ताने तिच्या गर्भाचा कानोसा घेत असावं. बाहेर उभ्या असलेल्या माणसात अस्वस्थता वाढू लागली. एकाएकी आतला आवाज बंद झाला. आता काविराबाईचा आर्त बोलण्याचा स्वर आता बाहेर स्पष्ट ऐकू येत होता. मध्येच तिचे हुंदके कानी येत होते. काही सेकंद जीवघेण्या शांततेत गेले आणि काही क्षणांनी मोठमोठ्याने हंबरून रडणाऱ्या विष्णूच्या आवाजाने सगळा आसमंत गदगदून गेला. काही वेळाने चौकीचे दरवाजे उघडले गेले. उध्वस्त झालेली घामेघूम काविरा बाहेर आली आणि आपल्या पोटुशा सुनेच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली. तिच्या खांद्यावर तिने माथा काय टेकला आणि तिचं बंद्या रुपयाच्या आकाराचं लालबुंद कुंकू कपाळभर पसरलं गेलं. आतमध्ये उभे असलेले बळवंत माने आता पुरते दिग्मूढ होऊन गेले होते, तर दाराबाहेर पाठमोऱ्या उभ्या असलेल्या आई आणि बायकोकडे बघत विष्णू लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडत होता. पकडून आणल्यापासून दगडासारखा कठोर बसलेला उलट्या काळजाचा विष्णू आपल्या आईशी बोलणं होताच एकाएकी कळवळून का रडू लागला याचं कुतूहल गर्दीच्या चेहऱ्यावर साफ झळकत होतं. शारदाला तर काय करावं काहीच सुचत नव्हते. अखेर आपल्या सासूला सावरणं तिला जास्त योग्य वाटलं आणि तिने काविराला जोराने कवेत घेतले.

~~~~~~

त्या दिवशी संध्याकाळी केंजळयांच्या वस्तीत दौलत केंजळयांना अग्नी दिला गेला. काविराच्या इच्छेनुसार पोलिसांनी विष्णूची इच्छा असून देखील अंत्यविधीत सामील होऊ दिले नाही. काविराच्या नातवाने शारदेच्या थोरल्या पोराने म्हाताऱ्याच्या चितेला अग्नी दिला. आभाळात लालतांबडे रंग दाटून आले आणि चिता धडाडून पेटली. धुराचे लोट हवेत पसरत गेले. तिथून परतताना सगळा गाव हळहळ करत होता. दारू आणि जुगाराच्या आहारी गेलेला विष्णू मागच्या दोन वर्षापासून शेतातली वाटणी मागत होता. आपला एकुलता एक पोरगा असा वाया गेलेला बघून दौलतचे काळीज तुटत असे. पोरगा पार घायकुतीला आल्यावर त्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेऊ नये अशी भीती त्यांच्या मनात दाटून येऊ लागली. मागच्या आठवडयात पोराला न सांगता त्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खातेफोड करून त्याच्या नावाचा कागद करून आणला होता. दुसऱ्या दिवशी त्याला सगळं समजून सांगून, चार शब्द सुनावून, शारदाकडं लक्ष द्यायचा शब्द घेऊन तो कागद त्याच्या हवाली करावा असं त्यानं पक्कं केलं होते पण नेमक्या त्याच रात्री नियतीने घात केला होता. विष्णूने लालसेपायी अविचारातून सगळे संपवून टाकलं .....

~~~~~~

दौलत आबाचा खून झाल्याच्या रात्री लाल्या आणि मोत्या वस्तीतल्या बांधावरून थेट गावात गेले. गावातल्या घरापुढं ते सलग भुंकत राहिले. दोन्ही कुत्री इतक्या रात्री घरी येऊन भुंकताना पाहून काविराच्या काळजाचं पाणीपाणी झालं होतं. तिच्या मनात अनेक वाईट विचारांची पाल चुकचुकली. गावात, वस्त्यांवर अलीकडे चोऱ्या फार वाढल्या होत्या, त्याची भीती तिच्या मनात तरळून गेली. विष्णूला आवाज द्यावा म्हणून तिनं आत जाऊन बघितलं तर विष्णू घरात नव्हता. शारदाच्या तोंडाला कापड बांधून हातपाय दोरखंडाने आवळून विष्णू निघून गेला होता. काविरानं तिचं हात मोकळं केलं, तोंडातला बोळा काढला. त्या पोटुशा पोरीनं जे सांगितलं ते ऐकून काविराच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं मध्यानरातीला बोंब ठोकत अख्खा गाव जागा केला. ती तडक शेताकडं अक्षरशः धावत निघाली, ती अर्ध्या वाटंत येऊपर्यंत कुणी एक बैलगाडी घेऊन आला, कुणी मोटरसायकल तर कुणी छकडा तर कुणी जीपडं घेऊन तिथं आला. काविराबरोबर सगळं गाव केंजळयाच्या शेतातल्या वस्तीत आलं होतं. बांध ओलांडून वस्तीतल्या कोठ्यापाशी येताच समोरचं दृश्य बघून अनेकांची दातखिळी बसली. काविरा तर एका झटक्यात बेशुद्ध होऊन खाली पडली. तोवर गर्दीतल्यापैकी कुणी तरी पोलीसात वर्दी दिल्यावर तांबडफुटीला पोलीस शिवारात आले आणि त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून विष्णूला गाडीत घालून चौकीकडे रवाना केले....

~~~~~~

आता त्या घटनेला पाचेक वर्षे उलटून गेलीत. त्या दिवसापासून लाल्या आणि मोत्या चिल्लारीच्या बांधावर निमूट बसून असतात, त्यांची पोटं आत गेलीत, आता ती अजिबात भुंकत नाहीत. त्यांना वाटतं की आपला थकला भागला धनी कधी तरी परत येईल, अंगावरून हात फिरवंल, भाकर तुकडं खाऊ घालंल ! रानातली मोठी लठ जुनाट झाडं वाळून त्यांची चिपाडं झालीत. यंदाच्या पेरणीसाठी काविरा आणि शारदा बैलांच्या जागी उभ्या राहणार आहेत. काविराचा गरिबीचा शाप अजून हटलेला नाही. शारदेचा थोरला पोरगा मदन कधीच पाभर चालवायला शिकलाय. विष्णू जेलमध्ये गेल्यानंतर शारदा बाळंत होऊन तिला जुळी मुलं झाली, ती मुलं सांभाळायला कधी कधी तिचे वडील शेजारच्या गावाहून तिच्या घरी येतात ; लेकीचं पांढरं कपाळ आणि अंगणाची रया गेलेली बघून काळीज डोळ्यात आणून, आभाळाकडं बघत हताश बसून राहतात. ती आवळीजावळी पोरं मात्र पार केविलवाणी होऊन आज्ज्यासंगं फिरत राहतात...   

गाव आता विष्णूला विसरून गेलंय पण केंजळयांच्या वस्तीला अजूनसुद्धा दौलत आणि विष्णूचे भास होत असतात. विष्णूला तहहयात सक्तमजुरीची शिक्षा झालीय. रोज रात्रीला त्याच्या स्वप्नांत त्याचे आबा येतात. त्याला रानात घेऊन फिरायला जातात, त्यांना बघून शेतशिवार फुलून जातं, बोरीबाभळीला उधाण येतं, पानंफुलं नाचू लागतात, गोठ्यातल्या गायी हंबरू लागतात, खिल्लारी बैलजोडी फुरफुरू लागते, शेरडांना कोंबड्याना जणू हर्षवायू होतो, शेताकडून गावाकडं जायच्या रस्त्यातल्या खाणाखुणा खुणवू लागतात. मातीला उधाण येतं आणि आबा त्याला जवळ घेऊन मिठी मारतात. काविराआई येऊन डोक्यावरून हात फिरवते. शारदा जवळ येते गालावरून अलगद बोटे फिरवते. कंबरेला लागणारा पोऱ्या करकचून आवळतो. चॉकलेट आणायला पैसं द्या असं टूमणं नवी लवकुशाची जोडी लावून धरते. विष्णू आनंदाने वेडा व्हायचा राहतो. हे स्वप्न त्याला अहोरात्र पडते. पण स्वप्न पडले नाही आणि आबा दिसले नाही तर मात्र त्याचा जीव कासावीस होतो आणि जेलच्या बराकीत तो गुरासारखा ओरडत राहतो, "आबा, आबा !! मला सोडून जाऊ नगासा... आबा !! आबा मला एक डाव माफ करा...'
त्याच्या आर्त किंकाळ्यांनी जेल दणाणून जाते आणि त्याच अंधारवेळी दौलत केंजळयाच्या शेतातल्या खोल गेलेल्या विहिरीच्या तळाशी असणाऱ्या पाण्यातले चंद्रबिम्ब गाळाच्या खांद्यावार मान टाकून अश्रू ढाळते.

- समीर गायकवाड.       

No comments:

Post a Comment