Saturday, May 6, 2017

नग्नतेच्या दृष्टी...

ऑनलाईन असताना कितीही बिनचूक सेटींग केलेलं असलं तरी एखादं 'तसलं' छायाचित्र वा व्हिडीओ हळूच आपल्या स्क्रीनवर झळकून डोळे मिचकावून निघून जातो, आपल्या स्क्रीनवर 'हे' आलंय वा येऊन गेलंय हे कुणी पाहिलं नाही याची खातरजमा होताच आपण सुस्कारा टाकतो...पण वस्तुस्थिती काय असते ?
एखादं नग्नचित्र दिसणं म्हणजे काय किंवा त्याकडे पाहणे म्हणजे काय याचे उत्तर एका पुस्तकातून मिळाले...
बीबीसीने जॉन बर्गरच्या सहयोगाने बनवलेल्या एका टेलिव्हिजन सिरीजवर आधारित (जॉन बर्गर लिखित) 'वेज ऑफ सीईंग'मध्ये पाहण्याच्या पद्धतीवर रंजक व विश्लेषणात्मक शैलीत प्रकाश टाकला आह.

यात नग्नचित्रांबद्दलचं विश्लेषण अत्यंत चपखल आहे - जॉन बर्गर लिहितो - "विवस्त्रता दाखवणारा किंवा चितारणारा कुठेही त्या कलाकृतीत दिसत नाही. आपण त्याच्या भूमिकेत जाऊन त्याला अनुभवू शकत नाही. तसेच त्या आरेखनामागील त्याचा हेतूही] लपून राहत नाही. विवस्त्रता ही स्थिती नसून ती एक प्रक्रिया आहे. एखादी व्यक्ती विवस्त्र पाहावी असे वाटणे वेगळे आणि काही क्षणमात्र त्या अनुभवात बंदिस्त राहून त्याकडे कलाकृतीच्या निर्मिकाप्रमाणे वा आस्वादकाप्रमाणे पाहणे निराळे. यामुळेच विवस्त्रतेची छायाचित्रे वा रेखाचित्रे बोलकी न वाटता उत्कट वाटतात. कारण त्यातून क्षणमात्र का होईना भावना उद्दीपित होतात. या क्षणमात्राची परिमाणे काहींसाठी तास/ दिवस वा वर्षाची असू शकतात, ते व्यक्तीसापेक्ष आहे..."

कलाकृतीत विवस्त्र झालेल्या स्त्रियांबद्दल तो म्हणतो की, "तिची विवस्त्रता जशी त्या कलाकृतीत आहे तशीच ती वास्तवात आहे की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही कारण पाहणाऱ्याच्या मनातील विवस्त्रतेच्या व्याख्या, त्याचे दृष्टीकोन, त्याच्या भावना आणि भावनांवर ताबा मिळवण्याची त्याची क्षमता यावर (कलाकृतीत जाणवणाऱ्या) विवस्त्रतेच्या जाणिवा ठरतात. एकाच वेळी ही विवस्त्रता प्रचंड उन्मादकही वाटू शकते किंवा कोणा एकाला ती आल्हाददायकही वाटू शकते.

आणखी एका परिच्छेदात त्याने लिहिलंय की - नग्नचित्र / फीत सामूहिकरित्या पाहत असताना सलज्जतेचे शिष्टाचार माणूस पाळत असतो. (खजुराहो येथील लेणी पाहताना हा अनुभव येतो) पण त्याच कलाकृती एकांतात पाहताना त्या विषयीच्या भावना वेगळ्या असू शकतात. कारण पाहताना कुठे ध्यान केंद्रित केलंय यावर खूप काही अवलंबून असते आणि हि स्थिती काळ/ वेळ/ स्थळ सापेक्ष बदलत जाते.

एखादे लहान मुल नग्न पाहिल्यावर त्याविषयीच्या भावना नैसर्गिक आस्वादक असतात आणि प्रौढ / परिपक्व व्यक्तीस नग्न पाहतानाच्या भावना नैसर्गिक आस्वादातल्या न राहता त्या व्यक्तिगत विषयआस्वादकाच्या भुमिकेतल्या असतात. त्यामुळे दोन्ही स्थितीतील अनुभवात दोन धृवांचे अंतर येते. विवस्त्रता मनावरचा ताण नियंत्रणात आणते याचे एक कारण तो असे देतो की, कोणा एका अपरिचित व्यक्तीस नग्न पाहिल्यानंतर पाहणारा त्याची / तिची तुलना पूर्वी पाहिलेल्या - अनुभवलेल्या व्यक्तीशी करतो आणि त्या दोघातले साम्य जोखून तो संतुष्ट होतो. मात्र खरी संतुष्टी त्या निर्मिकास मिळालेली असते ज्याने ती कलाकृती स्वतःच्या आनंदापायी निर्माण केलेली असते. पण त्याच्या आनंदाचा स्तर / हेतू आणि प्रेक्षक म्हणून पाहणाऱ्याच्या आनंदाचा स्तर / हेतू यात खूप फरक असतो....
हे विश्लेषण आपल्या बघण्याच्या दृष्टीकोनात मोलाची भर घालते. असो..

दुर्दैवाने आपल्याकडे सगळं झाकून नेण्याकडे कल असल्यामुळे यावर कधी न बोलले जाते वा लिहिले जाते. या विषयावर जे काही मांडले जाते त्याचे प्रमाण एकुणात अत्यंत नगण्य आहे. पाहण्याच्या दृष्टीकोनातील बदल देखील विकृती कमी करू शकतात हे जरी कळले तरी या लेखाचे फलित साध्य होईल... वखवखलेल्या नजरेने बघत राहायचे आणि चमकोगिरी करत स्त्री शोषणाविरुद्ध आवाज उठवायचा हा याचा दृश्य परिणाम होय. कलाकृती पाहतानाचे भाव आणि जिवंत व्यक्ती पाहतानाचे भाव यात बदल घडावासा वाटत असेल तर यावर अवश्य चिंतन केले जावे. आपल्या मनातला अंधार जाणून घ्यायचा नाही आणि मेणबत्ती घेऊन विकृतीविरोधातल्या प्रकाशवाटांच्या गप्पा करायच्या हे काही योग्य नव्हे.. .

- समीर गायकवाड.