Monday, May 29, 2017

बॉलीवूडमधले 'भेसूर' वृद्धत्व ...


बॉलीवूडचा एक चेहरा नेहमीच इतका काळाकुट्ट, किळसवाणा, निर्दयी राहिलाय की अंगावर काटा यावा. आजवर कैकांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या बॉलीवूडने अनेकांना भुकेकंगाल करून त्यांचे हाल हाल होऊन मरणासन्न होऊ दिले आहे. त्याकडे डोळेझाक करताना अंगावर गेंड्याचे कातडे पांघरले आहे. अर्थात अशी दुरावस्था होण्यात त्या त्या संबंधित व्यक्तींचा वाटाही बराच मोठा राहिलेला आहे पण माणुसकी नावाची चीज बॉलीवूडमध्ये क्वचित आढळते. इंडस्ट्रीचा हा भयाण चेहरा काही काळाच्या अंतराने सातत्याने समोर येत असतो. जगही तितक्याच कोरडेपणाने या घटनांकडे बघत असते. 'फार रुबाब केला, खूप ऐश्वर्य भोगलंय आता जरा दुर्दशा झाली तर बिघडले कोठे ?' असा द्वेषमत्सरी भाव लोक त्यांच्याबद्दल मनात ठेवून असतात.

एक सुप्त असूयाच या तर्कामागे असते. इंडस्ट्रीत कामं मिळत असताना हाती आलेले पैसे आणि कामं नसताना आपल्याला काय कारायचे आहे याचे गणित ज्याला जमते व जो स्वतःला वाहवत नेत नाही तो मात्र कितीही पूर आले तरी वाचणाऱ्या लव्हाळयासारखा टिकून राहतो. हे जरी खरे असले तरी छोट्या छोट्या भूमिका
करणारया अनेक अभिनेत्यांना हे जमत नाही कारण त्यांना मिळणारे पैसेच मुळात इतके तुटपुंजे असतात की उतारवयातली तजवीज होत नाही. त्यातही कशीबशी वाचलेली रक्कम लोकसहभागाच्या एखाद्या आर्थिक उपक्रमात लावली की मग तर सगळेच संपते. उरते ते खिन्न उतार वय, थकलेली गात्रे, कर्जे आणि आ वासून उभा राहिलेला उर्वरित काळ ! नातलग निघून गेलेले असतात, मित्रांनी दरवाजे बंद केलेले असतात, हात रिकामे असतात आणि डोळ्यात पाणी असते. मागच्या वर्षी ज्येष्ठ मराठी अभिनेते जनार्दन परब यांच्या अखेरच्या काळातील कडवट आठवणी ताज्या करणाऱ्या दोन घटना नुकत्याच घडल्या आहेत. पहिली घटना आहे सतीश कौल यांची ! सतीश कौल म्हणजे दिलीप कुमार - नूतनच्या 'कर्मा' मधील राणा विश्वप्रतापसिंहाच्या मुलाच्या किरकोळ भूमिकेतील अभिनेते !

पंजाबी सिनेसृष्टीचे 'अमिताभ बच्चन' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते सतीश कौल आज अज्ञातवासात जीवन व्यतित करत आहेत. 'कर्मा' या गाजलेल्या सिनेमात झळकलेले सतीश आज शेवटच्या घटका मोजत असून त्यांची दखल घ्यायलाही कुणी नाही. ३०० हून अधिक सिनेमांत झळकलेले अभिनेते सतीश कौल यांनी आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र आता एकाकी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे.
२०१४ मध्ये बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल
करण्यात आले होते. त्यांना स्पाइनल फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे बराच काळ त्यांना रुग्णालयातच राहावे लागले होते. पण नंतर बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागले होते. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती. 'लुधियाना सिटीजन काऊन्सिल' या एका समाजसेवी संस्थेनं सतीश कौल यांना मदतीचा हात देऊ केला. या संस्थेच्या माध्यमातून सतीश कौल यांना रेडक्रॉस भवनच्या वृद्धाश्रमात भरती केले होते. येथे ते चार महिने होते. त्यानंतर त्यांना दोराहामध्ये हेवनली पॅलेसमध्ये जागा दिली गेली आहे.

काही वर्षांपूर्वी सतीश कौल यांनी मुंबई सोडली आणि ते लुधियानामध्ये स्थायिक झाले. सिनेसृष्टीतून कमावलेल्या पैशांतून
त्यांनी लुधियानामध्ये एका 'अभिनय शाळा' सुरू केली. परंतु, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातून त्यांना आर्थिक फटका बसला आणि एक असाही क्षण आला जेव्हा खाण्या-पिण्याचीही अडचण समोर दिसू लागली.  पत्नी आणि मुलाने साथ सोडल्यानंतर सतीश कौल डिप्रेशनमध्ये गेले. लोकांना भेटणे त्यांनी बंद केले. सिनेमे करणे बंद केले. फिल्मी दुनियेशी संपर्क तुटल्यानंतर त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांनीही त्यांची साथ सोडली.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, ''वाईट काळात माझ्या पत्नीने माझ्यापासून घटस्फोट घेतला आणि मुलाला घेऊन दक्षिण आफ्रिकेत निघून गेली. हैदराबादमध्ये माझी एक बहीण आहे, मात्र ती स्वतः एवढी दुःखात आहे, की माझी मदत करु शकत नाही. आता जवळ असलेले सर्व पैसे संपले आहेत.''

सतीश यांनी १९६९ साली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथून ग्रॅज्युएशन केले. बॉलिवूड स्टार जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जरीना वहाब, डॅनी डेंजोंग्पा आणि आशा सचदेव हे त्यांचे बॅचमेट होते.  ८ सप्टेंबर १९५४ रोजी कश्मीरमध्ये
जन्मलेल्या सतीश यांनी पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. बॉलिवूडमध्ये १९८६ च्या 'कर्मा' शिवाय 'भक्ति में शक्ति' (१९७८), 'डान्स डान्स' (१९८७), 'राम लखन' (१९८९), 'एलान' (१९९४), 'जंजीर' (१९९८) आणि 'प्यार तो होना ही था' (१९९८) या सिनेमांमध्ये ते झळकले. तर पंजाबीत त्यांनी 'जट पंजाबी' (१९७९), 'छम्मक छल्लो' (१९८२), 'ससी पन्नू' (१९८३), आणि 'पटोला' (१९८७) हे गाजलेले सिनेमे केले. बॉलिवूडपेक्षा ते पंजाबी सिनेसृष्टीत अधिक प्रसिद्ध होते. एकेकाळी त्यांची प्रसिद्ध बघता जटच्या नावाने बनणा-या प्रत्येक सिनेमात सतीश कौल यांना हीरो म्हणून साइन केले जात होते. सतीश कौल
यांनी नव्वदच्या दशकातील गाजलेल्या 'विक्रम और बेताल' या टीव्ही मालिकेत काम केले होते.  २०१३  मध्ये पंजाबी सिनेसृष्टीचे लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले होते. २०११ मध्ये पंजाबी चॅनल पीटीसीने सतीश कौल यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला होता. 
 
सतीश कौल शेवटचे १९९८ मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या सिनेमात झळकले होते. या सिनेमात अजय देवगण आणि काजोल
लीड रोलमध्ये होते. ओमपुरी आणि कश्मीरा शाह यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका होत्या.  सतीश यांना बॉलिवूडमधून कुणाचाही मदतीचा हात मिळाला नाही. याविषयी त्याच मुलाखतीत सतीश यांनी सांगितले होते की, ''अनेक लोकांनी माझी हलाखीची परिस्थिती बघून मला मदतीची आश्वासनं दिली. मात्र ती पूर्ण कुणीच केली नाहीत. आता मी सत्तर वर्षांचा आहे. आशा आहे, की माझी परिस्थिती बघून मला कुणीतरी थोडी मदत करेल.''


तर दुसरया घटनेतील गीताकपूर यांची कहानीही थोडयाफार फरकाने अशीच आहे. एकेकाळी गाजलेल्या 'पाकिजा'ची त्या पिढीतील अनेकांनी पारायणे केली होती. या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या गीता कपूर या छोट्या मोठ्या भूमिका करणारया
अभिनेत्रीला वृद्धापकाळात अतिशय वाईट परिस्थितीशी सामना करावा लागले. एकेकाळी मोठा पडदा गाजविलेली ही अभिनेत्री अशाप्रकारे एकटी पडली आहे. गीता कपूर यांना २१ एप्रिल रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा राजा याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला आणि पुन्हा आलाच नाही. गीता यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या उपचाराचा जवळपास दिड लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम मागण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने राजा कपूर आणि गीता यांची मुलगी पूजा यांना मागील एक महिन्यापासून अनेकदा संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेत्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला . मात्र दरम्यान ही माहिती कानी आल्यावर निर्माते रमेश तौरानी यांनी या अभिनेत्रीच्या उपचाराचा खर्च देण्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे.

गीता यांच्या सांगण्यानुसार, राजा त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. आपण वृद्धाश्रमात जाण्यास तयार नसल्याने त्याने आपल्याला ३ ते ४ दिवस काहीही खायला न देता दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला. आणि अशापद्धतीने इथे सोडून दिले. गीता कपूर यांचे इस्पितळातील उपचाराचे बील भरले गेल्याने त्यांना डिसचार्ज दिला गेल्याचेही रुग्णालयाकडून सांगण्यात येतेय. पण त्यांनी जायचे कोठे हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने गीता यांची केस पोलिसांकडे गेली असून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याबाबत पोलिस निर्णय घेतील असेही रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

आपल्याकडे एक वाईट पद्धत आहे की एखादा माणूस मेल्यावर हळहळ करणारे अनेकजण गोळा होतात पण हळहळ करणाऱ्या
व्यक्तींना त्या व्यक्तीच्या हयातीतच त्याची दुर्दशा ज्ञात असली तरी ते त्यावर काही करत नाहीत. पण ती व्यक्ती मेली की मग अनेकांना पान्हे फुटतात. अर्थात सगळेच असे असतात असे नाही काही जण खरेच सुहृद असतात. ते आपल्या परीने मदत करतात. बाकी दुनियेची रीतच आहे की, "जितेपणी नाही गोडी, अन मेल्यावर आतडी तोडी !". काहीजण आपल्या चुकांनी तर काही प्रारब्धाने अशा दुरवस्थेला येतात तेंव्हा खरोखरच चित्रपटसृष्टीची किळस येते. एकेका चित्रपटातून पाचशे कोटी गल्ला गोळा करणारे बॉलीवूडचे स्टार कलाकार छोट्या कलाकारांप्रती खूपवेळा अनभिज्ञ असल्यासारखे वागतात तेंव्हा त्याच्या कोटीच्या उड्डाणांना घेऊन काय करायचे असा प्रश्न उभारतो ? अशा कठीण प्रसंगी आर्टिस्ट युनियन आणि माणुसकीचा रिअल लाईफचेहरा बनून समोर येणाऱ्या रमेश तौरानीसारख्या लोकांच्या जोरावरच निभावून नेले जातेय हेही खरे आहे. 

अशा घटना पूर्वी वर्षाकाठी क्वचित घडायच्या मात्र आता अशा घटना नित्याच्या होऊन बसल्याने सिनेमाच्या पडद्यावर मानवतेचे रील लाईफ दाखवणारे बॉलीवूड प्रत्यक्षात किती निष्ठुर आणि व्यवहारवादी होत चालले आहे याचा प्रत्यय येतोय. यावर उपाय शोधण्यापूर्वी लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी सिनेमाव्यतिरिक्त अन्य उपजीविकेची सोय करून ठेवणे हा सर्वात चांगला पर्याय आहे असे म्हणावे वाटते. कारण सिनेमाच्या नादी लागून तारुण्य कसेही घालवता येते पण वृद्धत्वाचे काय ? सतीश कौल आणि गीता कपूर यांच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले की बॉलीवूडमधील वृद्धत्वाचे चित्र अधिकच भेसूर होत चालले आहे.     


- समीर गायकवाड.