Thursday, May 25, 2017

शुभेच्छांचे गणित ..


यश चोप्रांच्या १९९३ मधल्या 'डर'वरून सनी देओल व्हर्सेस शाहरुख खान - यश चोप्रा असं वैर वाढत गेले होते. या सिनेमाने शाहरुख चोप्रा कॅम्पमध्ये पक्का स्थिरावला तर त्या उलट सनीने पुन्हा कधीही त्यांचा उंबरा चढला नाही. 'डर'ने शाहरुखला लाईमलाईटमध्ये आणले. यातला त्याचा अँटीहिरो नियोजनबद्ध पद्धतीने डोक्यावर घेऊन त्याला ग्लोरीफाय केले गेले होते. सनीने 'डर'मध्ये नायकाची भूमिका केली होती. चित्रपटात तो जुहीचा पती होता तर शाहरुखने तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची भूमिका केली होती. चित्रपटातल्या शाहरुखच्या निगेटिव्ह भूमिकेचा फिल्मी मिडीयाने प्रचंड गाजावाजा केला. त्यामुळे प्रेक्षकांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. खरे तर यातली शाहरुखची ऍक्टिंग अगदी बाळबोध आहे. यात बोलताना तो हबके (कक्क क्कीरण) खातो आणि चालताना थरथरतो. तरीही 'फिल्मफेअर'पासून ते 'स्क्रीन'पर्यंत चोप्रांची दलाली करणारया लोकांनी शाहरुखला इतके डोक्यावर घेतले की चित्रपटातील नायक सनी देओलच्या भूमिकेकडे कोणी लक्षही दिले नाही अन त्यावर कुठे चकार शब्द छापून आला नाही. त्यामुळे सनी देओल कमालीचा दुखावला गेला.
यानंतर रोखठोक सनीने एका मुलाखतीत थेट यश चोप्रांवर तोफ डागली होती. या मुलाखतीत यश चोप्रा आणि शाहरुख खानने आपल्याला फसवले, असे त्याने म्हटले होते. सनीने चित्रपटातील आपला रोल कमी करुन शाहरुखचा रोल वाढविल्याचा आरोपही यश चोप्रांवर लावला होता.

खरे तर या मुलखतीने सनीचे प्रचंड नुकसान झाले त्याला ठराविक प्रॉडक्शन हाऊसची दारे कायमची बंद झाली तर शाहरुख हा चोप्रांच्या गळ्यातील ताईत बनला. शिवाय त्याच्यावर अनेक पुरस्कारांची बरसात झाली होती. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण हयातीत यश चोप्रांनी सनीच्या आरोपांना कधीही उत्तर दिले नाही.
विशेष बाब म्हणजे याच वर्षी रिलीज झालेल्या सनीच्याच 'दामिनी' या चित्रपटात अमरीश पुरींनी अत्यंत ताकदीने उभी केलेली वकील इंदरजीत चढ्ढाची भूमिका आणि त्यातील त्यांचा अभिनय वरचढ असूनही इंडस्ट्रीतल्या गटारी राजकारणामुळे या भूमिकेला उत्कृष्ट खलनायकाचे फिल्मफेअर मिळू शकले नाही. चोप्रांचे मित्र असणाऱ्या भट कॅम्पच्या 'सर' मधील गुळमुळीत खलनायकासाठी अनुपम खेरला हा पुरस्कार गेला. यामुळे आणखीन चिडलेल्या सनीने पुन्हा कधीही चोप्रांना गणले नाही आणि त्यांनीही कधी सनीला भाव दिला नाही.या सर्व घटनांवर शाहरुखने सोयीस्करपणे गप्प राहून यश चाखत बसणे पसंद केले.

हे सर्व जुने चंदन आता उगाळण्याचे कारण म्हणजे सनीचा मुलगा करण देओल हा बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याचे सुतोवाच नुकतेच झालेय. सनीने ट्वीट करून ही बातमी त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना कळवली. 'पल पल दिल के पास' असे करणच्या डेब्यू चित्रपटाचे नाव आहे.
आता यश चोप्रा नाहीत पण सनीच्या मुलावर त्यांची काय रिऍक्शन असली असती हा औत्सुक्याचा मुद्दा झाला असता. पण शाहरुखने आपले २४ वर्षाचे मौन तोडत सनीच्या ट्विटवर आपल्या शुभेच्छा देत 'सनीचा मुलगा सनीसारखाचा टफ आणि जेन्टल' असल्याचे मत नोंदवले आहे. शिवाय त्याच्या यशाचा मार्ग सुकर असो अशा शुभेच्छाही करणला दिल्या आहेत.

अमिताभच्या नातीवर नव्या नंदावर डोळा ठेवून असलेला शाहरुखचा पोरगा आर्यन खान आणि या जोडीला घेऊन फिल्म लॉन्च करायचे मांडे मनात रचणारा करण जोहरचा हा सल्ला असावा. कारण मागील सहा वर्षात इंडस्ट्रीत खान गॅंग विरुद्ध अक्षय, अजय, जॉन असे पोलराईजेशन झाले आहे. या वाढत्या अपोझिट यादीत सनी आणि त्याच्या पुत्राची भर पडू नये यासाठी घेतलेला हा सावध पवित्रा खूप काही सांगून जातो. मुलाच्या यशासाठी आपल्या चाहत्यांना कळवणारा एक बाप एकीकडे आहे तर आपल्याही पोराच्या वाटेत कुठले काटे येऊ नयेत यासाठी आताच दक्ष झालेला एक बाप दुसरीकडे आहे. एरव्ही घमेंडीत वावरणाऱ्या काहीशा मिजासखोर शाहरुखने यासाठी पुढाकार घेतला, विशेष म्हणजे हा आईसब्रेक होण्यासाठी चोवीस वर्षे लागली आणि तेही यश चोप्रांच्या पश्चातच !

चोप्रा कॅम्पचा मागील काही वर्षात आलेख उतरता होत असताना शाहरुखने या शुभेच्छा देऊ केल्यात हेही विशेष ! धूम - 3 नंतर यशराज फिल्म्सला २०१६ च्या सलमानच्या फक्त 'सुल्तान'नेच तारले आहे. बाकी सगळा आनंदच आहे हे बॉक्स ऑफिस गणितही खूप काही सांगून जाते.

राजकारणी लोकच राजकारण खेळतात असे नव्हे. बॉलीवूड तर राजकारणासोबतच घाणेरडे ब्लेमगेमही खेळत असते, त्यात कधी आरोप प्रत्यारोप असतात तर कधी शुभेच्छा !!


- समीर गायकवाड.