Monday, May 22, 2017

यशवंतराव चव्हाण - मराठी जनमनाचे लोकनायक


७ मार्च १९६६ . माझ्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. इथे येण्याआधीच्या आदल्या दिवशी यशवंतराव कमालीचे अस्वस्थ होते. तेंव्हा ते केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे !",तेंव्हा तिथे उपस्थित असणारे बाळासाहेब भारदे म्हणाले, 'जनी जनार्दनी... तो विठ्ठल कटेवर हात ठेवून सामान्य माणसासाठी उभा आहे आणि त्याच सामान्य माणसासाठी आपण उजनीचा खटाटोप केला आहे. अस्वस्थ कशाला होता ?' यशवंतराव खुलले आणि भूमिपूजन संपन्न झाले. भाषणाच्या सुरुवातीला हाच धागा पकडून आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. आपल्या मातीवर, संस्कृतीवर उदात्त प्रेम करणारे ते सच्चे भूमिपुत्र होते ज्यांना शेतकऱ्याची चाड होती आणि जनतेविषयी तळमळ होती. देशाच्या राजकारणातील एक सालस, सुसंस्कृत, सभ्य आणि निरपेक्ष व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल. त्यांच्याविषयीची ही पोस्ट..

"गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका मोठया वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या.

अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकांत माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषणशैलीतील मनमिळाऊपणा, अंगी असणारी सुसंस्कृतता, तत्त्वनिष्ठता आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची !"

यशवंतराव चव्हाण यांच्या 'कृष्णाकाठ' मधला हा बोलका उतारा खूप काही सांगून जातो. त्या काळातील राजकीय वैचारिक स्तराबद्दल त्यांनी व्यक्त केलेली खंत आणि स्वमुल्यांकन दोन्हीही बोलके आहेत. आपले चांगले गुण लिहिताना त्यांनी आत्मप्रौढी टाळून राजकारणासाठी कोणते गुण आवश्यक आहेत याचा हा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी इथे दिला आहे. चार दशकापुर्वीच्या राजकारणाबद्दल ते इतके उद्विग्न होते आणि जर आज ते हयात असते तर त्यांनी सर्व राजकीय संधीसाधू लोकांना आपल्यापासून कटाक्षाने दूर ठेवले असते. आजच्या राजकारणात आहे अशी बजबजपुरी तेंव्हा नव्हती तरीही ते त्याविषयी जाहीर आणि स्वगत बोलत असत. वैचारिक स्पष्टता, निष्ठा आणि सचोटीचे व बेरजेचे राजकारण ही त्यांच्या राजकारणाची चतुःसूत्री होती.

१९२७ साल किंवा त्यापूर्वीचे साल असेल. मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून भास्करराव जाधव हे सातारा जिल्ह्यातून उभे राहिले होते. बहुजन समाजाचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी त्या काळी मतदारांमध्ये जी लगबग होती ती या काळात यशवंतराव चव्हाणांना पाहायला मिळाली. सत्यशोधक विचारसरणीचा आग्रहाने पुरस्कार करणा-या केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांची एक सभा याच वेळी कराडमध्ये झाली. या सभेमुळे यशवंतरावांच्या मनात ब्राह्मण व ब्राह्मणेतर वादासंदर्भात काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले. त्याचे निराकरण त्यांनी आपले वडीलबंधू गणपतराव यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. खूप विचार करून ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडले पाहिजे, हे त्यानंतरच त्यांच्या मनाने घेतले. यशवंतराव चव्हाण हे कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये असताना त्यांची वाचनाची गोडी अधिक वाढली, तसेच सामाजिक कार्याबद्दल असलेली समज आणखी वाढली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्येही अनेक घडामोडी घडत होत्या. यशवंतराव चव्हाण ज्या वेळी शालेय व नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी होते तो काळ हा लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधी यांच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. १९२९ च्या अखेरीस यशवंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होऊ लागलेले होते. दरम्यानच्या काळात ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसह काही रॉयवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आले व प्रभावितही झाले. मात्र यशवंतरावांचा मुख्यत: ओढा हा महात्मा गांधी व पं. नेहरू यांच्या विचारसरणीकडेच होता. पुढच्या काही वर्षांत मानवेंद्रनाथ रॉय यांचे काँग्रेसशी असलेले वैचारिक मतभेद टोकाला गेले. त्या वळणावर आपण काँग्रेसबरोबरच राहायचे हा निर्णय यशवंतराव चव्हाण यांनी मनाशी ठामपणे घेतला.

काहीही लपवाछपवी न करता सत्यकथन करण्याची त्यांची हातोटी त्यांच्या सभांतून दिसून यायची तशीच या आत्मचरित्रात देखील पानोपानी आढळते. स्वतःच्या जन्मतारखेबद्दल निश्चित माहिती नाही मात्र जी काही माहिती आहे, ती माहिती प्रांजळपणे ते समोर ठेवतात. या विषयावर ते लिहितात - "देवराष्ट्र या गावी माझा जन्म १९१३ च्या १२ मार्च रोजी झाला. शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे किंवा सहावे अपत्य असल्यामुळे माझ्या जन्मतारखेची नोंद कोणी ठेवण्याची काळजी घेतली नाही. त्या काळी त्यांना अशा गोष्टीची जरुरीही वाटत नसावी. माझा जन्म म्हणजे काही महत्त्वाचा सुवर्णक्षण आहे अशी काही परिस्थिती नव्हती. आज मला अनेक मंडळी तुमची निश्चित जन्मतारीख सांगाअसे म्हणतात, तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो व हीच तारीख माझा जन्मदिवस म्हणून पाळतो आहे..."

कराड व सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी व सभांच्या बातम्या पाठवण्याचे काम यशवंतराव १९३०च्या दशकात काळात स्वयंप्रेरणेने करत असत. पुण्याच्या ज्ञानप्रकाशया वृत्तपत्रात एक बातमीदार या नावाने त्यांनी पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध होत असत. पुढे कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी व्यतीत केलेली चार वर्षे ही यशवंतराव चव्हाणांचे वाचन, राजकीय आकलन वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख याच काळात पक्की झाली. निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणे यशस्वीपणे हाताळावी लागतात याचे उत्तम भानही त्यांना याच काळात आले. १९३३ मध्ये कारावास भोगून बाहेर पडताना यशवंतराव चव्हाण हे फक्त काँग्रेस कार्यकर्ते राहिले नव्हते, तर त्यांच्या विचारांना समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती. त्या दिशेने पुढे काही काळ त्यांचे राजकारण गेले. १९४६ मधील मार्च महिन्यामध्ये मुंबई विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून गेले. त्या वेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून केली. हा इथवरचा राजकीय प्रवास यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठमध्ये मांडलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द जशी बहरली, तशी त्यामध्ये अनेक वादळेही आली.

यशवंतराव चव्हाण गेले तो दिवस होता २५ नोव्हेंबर १९८४. खरे तर त्यावेळी निवडणुकांचं वारं होतं. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते २५ तारखेला पुण्याला येणार होते अन २६ ला साताऱ्यात अर्ज भरायला जाणार होते .पण अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली.... खरं तर जीवन सहचारिणी वेणूताईंच्या निधनानं ते पुरते खचले होते. ते किती तरल संवेदनशील होते याचा हा पुरावाच होय. त्यातून ते सावरू शकले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेला हा माणूस. एवढी सत्तास्थानं भूषवलेल्या या माणसानं आपल्यामागं केवळ विचारधनच ठेवलं. महाराष्ट्रात कुठंही त्यांचं घर, फ्लॅट, जमीनजुमला असं काही नाही. सहकारी कारखानदारीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मात्र, कुठल्याही कारखान्यात त्यांची भागीदारी नाही, की कुठं, कशात म्हणून मालकी नाही. त्यांना मिळणारी पेन्शन, भत्ते, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारयातल्या खात्यात जमा होत. निधनानंतर त्या खात्यात केवळ ३६ हजाराची शिल्लक होती. बंगल्यातील कपाटात काहीही संपत्ती मिळाली नाही...

एखाद्या व्रतस्थ कर्मयोग्याचे आयुष्य जगणाऱ्या यशवंतरावांचे जीवन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्वच्छ - आदर्श छबीच्या राजकारण्यापैकी एक होते. यशवंतरावांचा कार्यखंड पाहू जाताआजचे तत्वहीन राजकारण्यांची आजची कर्मकहाणी पाहता मन खिन्न होते

"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।"
सेनापती बापट यांच्या काव्यपंक्ती यशवंतरावांच्या जीवनानुभावास सार्थ लागू पडतात. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. महाराष्ट्राच्या गैरवशाली इतिहासात त्यानं मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर हा नेता होता, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता.

१९६४ मध्ये 'इंटरनॅशनल अफेअर्स' या अमेरिकन राजकीय मासिकानं जगातल्या जाणत्या नेतृत्वाचे वारस कोण?' असा विषय घेऊन अभ्यासपूर्ण अंदाज वर्तवले होते. त्यात भारताच्या राजकारणाचाही अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले होते. भारतासंबंधी लिहिताना, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांच्या नावांची चिकित्सा करून झाल्यावर लेखक म्हणतो, ''हे सर्व लिहून चौथ्या क्रमांकाचा विचार करताना भारताच्या संभाव्य पंतप्रधानाच्या यादीतून यशवंतराव चव्हाण यांचं नाव वगळणं चुकीचं ठरेल. त्यांच्या धोरणातला समतोल, त्यांच्या साधेपणात भरलेलं आकर्षण, सदैव कार्यक्षम असलेलं मन आणि मराठी मातीचं आकर्षण हे त्यांचे गुण महत्त्वपूर्ण आहेत.आपल्या उत्तुंगतेचे कोणतेही अवडंबर न माजवणारे यशवंतरावांसारखे राजकारणी आज दुर्मिळच म्हणावे लागतील.
ध्येयवादावर आधारलेले राजकीय जीवन जगणारा हा लोकनेता वैयक्तिक जीवनात अत्यंत हळवा माणूस होता, सामान्य जनांप्रमाणेच त्यांचेही आपल्या कुटुंबियांशी त्यांचे भाववत्सल नाते होते. आपल्या 'कृष्णाकाठ' या चरित्रग्रंथाची अर्पणपत्रिका आपल्या प्रिय पत्नी वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत -
''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी...''

मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी नाटक, पोवाडा, लोककला, तमाशा अशा सर्व साहित्य अंगांना यशवंतरावांनी इतके मोठे बळ दिले की, त्यांच्यातला उपजत साहित्यिक किती मोठा होता, हे त्यांनी कृतीने दाखवले. आज याचे महत्त्व आणि ममत्त्व वाटणार नाही. कारण मराठीच्या अभिमानाचे’, ‘मराठीच्या बाण्याचेसगळेचजण तेवढय़ाच जोरात बोलतात, पण पन्नास वर्षापूर्वी मुंबई राज्यात मराठी नाटकावर असलेला १०० रुपये तिकीट विक्रीवरचा ३३ रुपये शासकीय कर यशवंतरावांनी एका फटक्यात रद्द केला. उत्तम नाटकाचे पुरस्कार, उत्तम चित्रपटाचे पुरस्कार त्यांनीच सुरू केले. आज साठ वर्षे झाली. १९६२ साली चीनचे आक्रमण झाल्यानंतर बाळ कोल्हटकर यांच्या लेखणीतून सीमेवरून परत जाहे युद्धनाट्य मराठी रंगभूमीवर अवतरले. त्या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात झाला. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीतील सगळी कामे बाजूला टाकून यशवंतराव चव्हाण पहिल्या प्रयोगाला सौ. वेणूताईंसह उपस्थित राहिले आणि या नाट्यसंहितेवर त्यांनी जे भाष्य केले, ते त्यांच्या सखोल इतिहासाच्या अभ्यासकाचे निदर्शक होते. त्या नाट्यसंहितेत पराक्रमी राजा पौरस सिकंदराला आव्हान देतो, पण या पौरसाला याच देशातील एका विभागाचा आणखी एक राजा अंभी (भूमिका बाबूराव पेंढारकर) पौरसाला पकडून देतो. मध्यंतरात भाषण करताना यशवंतराव म्हणाले, ‘या देशात पौरस एकच आहे, राणाप्रताप एकच आहे, शिवछत्रपती एकच आहेत, पण अंभी पुष्कळ आहेत..

वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येतेमराठी रंगभूमीवर आले आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेने ते नाटक कमालीचे गाजले. त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाही यशवंतराव उपस्थित राहिले. यशवंतरावांचे हे नाट्यप्रेम, त्यांचे साहित्यप्रेम विलक्षण होते. या देशातला हा एकच राजकारणी असा आहे की, ज्याने किमान वीस पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे. आणि वेळेमुळे ज्या पुस्तकांना ते प्रस्तावना देऊ शकले नाहीत, ती पुस्तके त्यांनी वाचली आणि विनम्र शब्दांत प्रस्तावना का लिहीत नाही, याची मीमांसा करणारी पत्रेही पाठवली.

१९७५ला कराडला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या दुर्गाबाई भागवत अध्यक्ष होत्या. त्यांनी यशवंतरावांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर चढू दिले नाही. यशवंतरावांनी तक्रार केली नाही. कराडचा नागरिक आणि एक वाचक म्हणून भाषण करताना ते म्हणाले, ‘मला आपण व्यासपीठावर येऊ दिले नाही. याबद्दल माझी तक्रार नाही. मी कराडचा नागरिक आणि मराठी साहित्याचा एक वाचक म्हणून इथे आलो आहे. साहित्यिकांशी मला वाद घालायचा नाही. कृष्णा वाहत असते. ती कृष्णापण घेऊन वाहते. कोयना वाहते, ती कोयनापण घेऊन वाहते. पण दोन्ही नद्यांचा संगम जिथे होतो, त्या संगमाच्या प्रवाहात कृष्णा कृष्णापण विसरते. कोयना कोयनेपण विसरते. मराठी साहित्याने आणि साहित्यिकाने हे आपले मी पणविसरणे फार गरजेचे आहे..यशवंतरावांच्या वाक्यावर कराडच्या मंडपात अडतीस वर्षापूर्वी पडलेल्या टाळ्या आजही कानात घुमत आहेत. मराठी साहित्यामध्ये त्या काळातल्या सर्व थोर साहित्यिकांशी यशवंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात पु. ल. देशपांडे अध्यक्ष होते, रणजीत देसाई स्वागताध्यक्ष होते. पु. ल. देशपांडे यांनी यशवंतरावांना व्यासपीठावर येऊ दिले नाही. यशवंतराव गेले नाहीत. ते इचलकरंजीला होते. नंतर सायंकाळी कलप्पा आवाडे यांच्या सूतगिरणीच्या आवारात एक व्यासपीठ उभारून यशवंतरावांनी सर्व साहित्यिकांना चहासाठी आमंत्रित केले. पु. ल. आले, रणजीत आले, गो. नि. दांडेकर आले. यशवंतरावांनी सगळ्यांचा सत्कार केला आणि ते म्हणाले, ‘साहित्यिकांच्या व्यासपीठावर मी तुम्हाला चालत नसलो तरी माझ्या व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे, तुमचा सत्कार आहे. माझ्याजवळ तुमच्याएवढे प्रभावी शब्द नसतील. पण माझे मन तुमच्याच शब्दाएवढे मराठीसाठी भावनाप्रधान आहे..सगळे साहित्यिक ओशाळून गेले..

भालचंद्र नेमाडे त्यांच्याबद्दल लिहितात की, "यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' सारखं नितांत सुंदर आत्मचरित्र लिहिलं. ते राजकारणात नसते तर मोठे साहित्यिक झाले असते !"
या अनुषंगाने लिहावे वाटते की नावापुरते शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्नांचे राजकारण करून सत्तेत येणे हा अलीकडील काळात राजधर्म होऊ पाहतोय. अशा प्रसंगी यशवंतरावांसारख्या बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या आणि लोककल्याणाची खरी तळमळ असणाऱ्या माणसाची आठवण होते. यामुळेच आजच्या सर्वच पक्षीय राजकारण्यांचे आत्मपरीक्षण गरजेचे वाटते.

- समीर गायकवाड.


संदर्भ - साहित्यिक यशवंतराव : ले. मधुकर भावे.