Monday, May 15, 2017

'बाहुबली'च्या यशाचा मतितार्थ .....

'बाहुबली'च्या यशाचा नेमका मतितार्थ शोधताना १९७५च्या 'जय संतोषी मां' पर्यंत गेले की त्यातला नेमका मतितार्थ लक्षात येतो. त्याचाच हा रंजक आलेख...

१० जुलै २०१५ ला 'बाहुबली द बिगिनिंग' रिलीज झाला आणि देशभरातील १२५ कोटी जनतेसह तमाम मिडियाकर्मींचे कान टवकारले गेले. बाहुबलीने भारतीय जनतेला चर्चेला एक नवा विषय दिला आणि चित्रपटविषयक तमाम परिमाणे मोडीत काढली. याधीही अनेक चित्रपटांनी तुफान गल्ला गोळा केला होता. आमीरच्या 'पीके'ने पाचशे कोटीचा पल्ला जेमतेम गाठला होता. पण 'बाहुबली'ने त्याला मात देत हजार कोटींचा टप्पा लीलया पार केला. त्यानंतर आलेल्या 'दंगल'ला दोन वर्षे अथक मेहनत घेऊन, अत्यंत नियोजनबद्ध प्रमोशन केल्यावर आठशे कोटींचा टप्पा गाठता आला. आता २७ एप्रिलला रिलीज झालेल्या 'बाहुबली - द कन्क्लुजन' या दुसरया भागाने अकरा दिवसात अकराशे कोटी कमावले आहेत. याची घौडदौड पाहू जाता हा दोन हजार कोटीच्या उंबरठयावर जाऊन पोहोचेल असे अंदाज चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांनी वर्तवले आहेत. भारतीय चित्रपट रसिकांनी 'बाहुबली'च्या दोन्हीही भागांना इतके का उचलून धरले असावे याचा अभ्यास करता काही रंजक तथ्ये समोर येतात..


जगभरात चित्रपटांची निर्मिती करतानापासून ते त्याची समीक्षा करण्याच्या टप्प्यापर्यंत चित्रपटांचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. सायन्स, फॅन्टसी, फिक्शन, अँक्शन, रोमान्स, थ्रिलर, हॉरर, मेलोड्रामा, ऐतिहासिक अशा मुख्य वर्गांसोबतच पूर्वी एक वर्ग होता 'मायथॉलॉजिकल' (पौराणिक) चित्रपटांचा. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या वर्गातील चित्रपटांची संख्या मोठी आहे. देशातील ज्या ज्या प्रादेशिक भाषांत चित्रपट तयार झाले आहेत त्या सर्व भाषात या गटातील चित्रपटनिर्मिती झाली आहे. मराठीपासून ते मल्याळमपर्यंत अन पंजाबीपासून ते बंगालीपर्यंतचे सर्वभाषिक चित्रपट यात येतात. यांच्या जोडीनेच ऐतिहासिक चित्रपटांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. अलिकडे आलेला 'मोहेंजोदाडो' असो वा १९१२ सालचा दादासाहेब तोरणे यांचा 'श्री पुंडलीक' असो ही एक मोठी चित्रशृंखला आहे.

देश स्वतन्त्र होण्याआधी 'मायथॉलॉजिकल' चित्रपटच जास्त संख्येने निर्मिले गेले. स्वातंत्र्यानंतर या वर्गातील चित्रपटसंख्या नाट्यमय रीतीने हळूहळू रोडावत गेली. त्याजागी मेलोड्रामा आणि रोमान्स यांनी भारलेले, तरल प्रेमकथांनी सजलेले चित्रपट १९७०च्या दशकापर्यंत पडदा गाजवत राहिले. त्यापुढची दोन दशके देमार अँक्शनपटांनी आपले वर्चस्व राखले. या दरम्यान समांतर सिनेमाच्या नावाखाली कलात्मक वा आर्ट फिल्म्सनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं. रिचर्ड अटेनबरो यांच्या 'गांधी'ने भारतीय ऐतिहासिक चित्रपटांना भव्यतेची चाहूल दिली. या नंतर अनेक ऐतिहासिक विषयावरचे चित्रपट मागील तीन दशकात येऊन गेले. पण देशभरातील एकूणच हिट चित्रपटांचा ट्रेंड पाहिला तर तो पारंपारिक प्रेमकथांना भरभरून दाद देणारा असाच होता. सायन्सफिक्शन मधील आपली चित्रपटनिर्मिती अगदी नगण्य म्हटली जावी अशीच राहिली. तर थ्रिलर, हॉररचा हिंदी आणि प्रादेशिक भाषातील प्रेक्षक वर्ग अगदीच मोजका राहिला शिवाय त्याची निर्मिती देखील इतकी मर्यादित राहिली की हॉरर म्हणजे 'रामसे' मुव्हीज असे समीकरण रूढ झाले. मागच्या दशकात हॉलीवूडपासून प्रेरित होऊन अतिशक्तिमान (सुपरपॉवर) अशा व्यक्तीरेखाचा मागोवा घेताना हिंदीतही तसे फॅन्टसीवर आधारित चित्रपट निर्मितीचे प्रयत्न करून झाले. ऋतिक रोशनच्या 'क्रिश'चे सिक्वेन्स असोत की शाहरुखचा 'रा-वन' असो यांची झेप हॉलीवूडच्या तुलनेत काहीच वाटली नाही.

फॅन्टसीवर आधारित चित्रपट बनवताना त्याचे बजेट हाच सर्वात मोठा अडथळा ठरत होता आणि त्यांची स्पर्धा किंवा तुलना ज्या हॉलीवूड मुव्हीजशी केली जात होती त्या चित्रपटांची परिभाषा कमालीची आधुनिक झाली होती, हॉलीवूड डिजिटलाईज्ड होऊन सायफाय मुव्हीजच्या लाटेवर तरंगत होते आणि आपण त्यांच्या तुलनेत कुठेच नव्हतो. स्टीव्हन स्पीलबर्गचे एकापाठोपाठ एक चित्रपट नवा इतिहास रचत होते आणि हिंदी सिनेमा केवळ अवाक मूकदर्शक होऊन पाहत होता. त्याच्याकडे यावरचा उतारा नव्हता. 'टायटॅनिक' किंवा 'ज्युरासिक पार्क'ची संपूर्ण शृंखला असो भारतीय उपखंडात त्याने अफाट गल्ला गोळा केला आणि बॉलीवूडच्या पोटात गोळा आला. यासोबत 'एलियन'च्या सिरीजपासून ते 'प्रोमिथिअस' पर्यंतचा हॉलीवूडचा साय फाय प्रवास असो किंवा 'इंटरस्टेलर', 'ग्रॅव्हिटी' पासून ते आताच्या 'गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी'चे डिजिटलाईज्ड स्वरूप असो, ज्याचा आत्मा व्हीएफएक्समध्ये दडला होता. अशा चित्रपटांना कसे तोंड द्यायचे याचे बॉलीवूडकडे उत्तर नव्हते. पण याच काळात छोट्या पडद्यावर एक ठळक घटना घडली होती त्याची नोंद काही चाणाक्ष चित्रपट निर्मात्यांनी घेतली होती. ही घटना म्हणजे 'छोटा भीम'ची अफाट लोकप्रियता.

२००८मध्ये पोगो या कार्टून्सला समर्पित असलेल्या वाहिनीवर 'छोटा भीम'हे कार्टून सिक्वेल दिवसभर दाखवले जाऊ लागले. त्याने सर्व इंग्रजी, जपानी, चीनी व अमेरिकन कार्टून्सना धोबीपछाड दिली. डोरेमॉनपासून पोराठोरांनी फारकत घेतली आणि आपला देशी सुपरस्टार जो आपल्या पुराणकथातून, आपल्या महाकाव्यातून आपल्या परिचयाचा झाला होता त्याला अबालवृद्धांनी डोक्यावर घेतले होते, तसे पाहिले तर ही अत्यंत छोटीच बाब होती जी फक्त बालविश्वाशी निगडीत होती. पण आपण आपल्याकडील पौराणिक पात्रांच्या आधारे समोरील अचाट शक्तीच्या कलाकृतींना टक्कर देऊ शकतो ही मानसिकता रुजवण्याचे महत्वाचे काम केले. एस.एस.राजामौली यांच्या सारख्या दूरदृष्टीच्या माणसांनी यातील मतितार्थ अचूक हेरला.याआधी २००५ मध्ये राजामौली यांनी प्रभासला घेऊन 'छत्रपती' हा अँक्शनपट निर्मिला होता. विशेष बाब म्हणजे यातील नायकाचे नाव शिवाजी होते. राजामौलींवर इतिहासाचा प्रभाव कसा आणि किती होता याचे हे बोलके उदाहरण होय. याच विचारधारेतून त्यांनी आपली पुढची पावले टाकली. २००९ मध्ये त्यांचा 'मगधिरा' हा चित्रपट आला. यात त्यांनी इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली होती. तर २०१२ मध्ये डिजिटल तंत्राचा भडीमार असलेला आणि व्हीएफएक्सचा पुरेपूर वापर केला गेलेला त्यांचा 'इगा'' (हिंदी आवृत्ती - मख्खी) आला होता. या दोन्ही चित्रपटांनी त्यांना प्रचंड यश दिले, नाव लौकिक वाढवला. नवे कीर्तिमान स्थापित झाले. यापुढे जाऊन त्यांनी आधीच्या दोन्ही चित्रपटातील दोन मुख्य बाबी एकत्र केल्या. 'मगधिरा' प्रमाणे पौराणिक स्टोरीबेस आणि 'इगा'सारखे डिजिटल तंत्रज्ञान यांचा संगम असलेला अत्यंत उच्च दर्जाची निर्मितीमुल्ये असलेला 'बाहुबली' त्यांनी पडद्यावर आणला अन हॉलीवूडसह जगभरात त्याची दखल घेतली गेली.

या आधी असे 'अकस्मात' यश १९७५च्या 'जय संतोषी मां'ला मिळाले होते. आर्थिक दृष्ट्या त्याची आकडेवारी मोठी नसेल पण त्याचे यशोमूल्य मोठेच होते. त्या साली 'शोले', 'दिवार', 'आंधी', 'चुपके चुपके', 'ज्युली', 'छोटी सी बात', 'अमानुष', मिली' सारखे विविध विषयावरील एकाहून एक सरस चित्रपट प्रदर्शित होऊनही 'जय संतोषी मां'ने तिकीटबारीवर मोठा हात मारला होता. याच्या यशाची समीक्षा करताना चित्रपटक्षेत्रातील जाणकारांनी 'मायथॉलॉजिकल' क्लासचा मोठा गॅप आणि त्या काळातील राजकीय सामाजिक अस्थिरतेमुळे लोकांना भासलेली धार्मिक, पौराणिक आधाराची गरज याकडे लक्ष वेधले होते. आता 'बाहुबली'चे विश्लेषण करताना हेच मुद्दे पुन्हा समोर येताना दिसतात. मागील दोन दशकात साईबाबांवरील चित्रपट व अर्जुन, कृष्ण, हनुमान यांच्यावरील कार्टूनमुव्हीज हीच काय ती या वर्गातील दखलपात्र निर्मिती होती. शिवाय या दशकात जगभरात एक अस्थिरता आहे. दहशतवादापासून ते राजकीय सामाजिक उलथापालथी होताना दिसत आहेत. मानवी जीवनमुल्ये विस्कळीत झाली आहेत, भौतिक सुखांच्या सातत्याने बदलत चाललेल्या व्याख्या आणि कृत्रिमतेकडे झेपावत चाललेली जीवनदशा यांचा एकत्रित परिणाम असा होऊ लागला की जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होताना दिसू लागली. लोकांना आपला गौरवशाली इतिहास आणि चेतनादायी धार्मिक संदर्भाची प्रचंड ओढ निर्माण होताना दिसू लागली. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होण्याच्या नेमक्या कालावधीतच 'बाहुबली'चं प्रदर्शित होणं त्याच्या यशाच्या पथ्यावर पडलं.

'बाहुबली'च्या कथेचे पौराणिक संदर्भ, त्याची आधुनिक पद्धतीने केलेली मांडणी, निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेट्स, निर्मितीमुल्यांवर मुक्तहस्ते केला गेलेला खर्च आणि त्याला दिलेले भव्य, उत्तुंग व विकट स्वरूप हे त्याचे 'स्ट्रॉंगपॉईंट' ठरले. भविष्यात 'बाहुबली'ची गणना 'मायथॉलॉजिकल फॅन्टसी'च्या वर्गात केली जाईल. मूळ कथानक बेतलेले आहे. ज्या महिष्मती साम्राज्याचा उल्लेख चित्रपटात आहे त्या नावाचे साम्राज्य आताच्या मध्यभारतातील प्रदेशात अस्तितवात होते. बौद्ध इतिहास साधनात माहिष्मती हे दक्षिण अवंती जनपदाचे मुख्य शहर होते. त्यातील ऐतिहासिक स्थल व कालसापेक्ष संदर्भ राजामौलींनी 'बाहुबली'त अचूक वापरले आहेत. त्याचबरोबर 'बाहुबली'च्या पहिल्या भागात जशी धार्मिक प्रतिके होती तशीच ती दुसरया भागातही आहेत. या खेपेस नायकाची कृष्णभक्ती दाखवुन राजामौलींनी संतुलन साधले आहे. कारण पहिल्या भागात 'शिवा'ची साधना दाखवली होती. विजयनगरचा संगीतस्तंभ वा कुंभकोणम मंदिराची प्रतिकृती असो वा कंबोडीयातील मंदिराची प्रतिकृती राजामौलींनी अभ्यासपूर्वक वापर केला आहे. राजाचा राजधर्म कसा असावा, राजाची दंडनीती, सैन्यनीती व युद्धनीती कशी असावी यावरही भाष्य आहे. क्षत्रियत्वाला विशाल स्वरूप देताना जनतेच्या मनातील राष्ट्रीयत्वाची भावना आणि प्रत्यक्ष युद्धात उतरणं हे ही दाखवलं आहे. क्लायमॅक्सच्या सीनमधला रुद्रावतार विलक्षण आकर्षक आहे. शिवलिंगास रक्ताभिषेक, भस्मलेपन, शिवतांडव स्तोत्र आणि अखेरचा खणखणाट हे सगळं अप्रतिम झालंय. हे सर्व बघताना प्रेक्षकाला एकाच वेळी पौराणिक संदर्भ जाणवत असल्याने कथानक खरे वाटू लागते, त्यातील धार्मिकता परिचयाची आणि आस्थेची असल्याने चित्रपट 'आपला' वाटू लागतो अन अखेरीस नायकाचे सर्वशक्तिमान सिद्ध होणं मनाला कुठेतरी आधारदायी भासतं. या सर्व बाबींना एकत्रित स्वरुपात बघण्यास भारतीय प्रेक्षक गेल्या कित्येक दशकांपासून मुकला होता त्यामुळे 'बाहुबली' प्रदर्शित होताच त्यावर प्रेक्षकांच्या उडया पडल्या. 

राजामौली येणारया काळात महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट वा महाभारतावर त्रिखंडीय चित्रपट शृंखला बनवतील असं बोललं जातंय पण अधिकृत घोषणा काहीच झालेली नाही. बाहुबलीच्या यशाचा आणखी एक मापदंड लावताना एतद्देशिय विदेशी चित्रपटांच्या तोडीस तोड चित्रपट बनवून त्यांच्या स्पर्धेत आपणही उभं राहू शकतो ही अस्मिता जागृत होणं हा मुद्दाही सामील आहे. हॉलीवूडला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायचे आणि आपल्या रसिकांना आपल्याच पारंपारिक कथामूल्यांशी कसे बांधून ठेवायचे याचे अचूक उत्तर 'बाहुबली'ने दिले आहे असे म्हणायला हरकत नाही. किंबहुना हाच याच्या यशाचा मतितार्थ आहे...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment