Friday, April 21, 2017

वेश्या साकारणं इतकं वाईट असतं का ? - गाथा रेहाना सुल्तानची....

वेश्या शक्यतो कमाईच्या वयात गरोदर राहणं पसंद करत नाहीत. त्याचबरोबर प्रेमाच्या खोट्यानाट्या लफड्या कुलंगडयातून अनेकजणी इथं आल्याचे त्या राजरोसपणे पाहत असतात, अनुभवतही असतात आणि प्रेमाचे चटके अनेकींनी सोसलेले असल्याने या फंद्यातही त्या पडत नाहीत. बहुतांशी त्या फार तर एखादा यार वा दल्ला ठेवतात. लग्नाची भानगड त्यांच्या गावीही नसते. तरीही काहीजणी लग्न करतात आणि तिथंच राहतात, तर काहीजणी लग्न करून या नरकातून बाहेर पडतात मात्र पुन्हा कायमचे खोल रुतत जाण्यासाठी इथंच येतात. हजारात एखाददुसरी लग्न करून स्थिरस्थावर होऊन नॉर्मल लाईफ जगते. पण असे आयुष्य जगताना चुकून जर तिच्या लक्षात आले की, आपल्या पोटात मूल वाढते आहे.
पण त्याचा बाप नक्की कोण आहे हे तिला नेमके माहिती नसेल तर यक्षप्रश्न उद्भवतो. 'आपण आता ज्याच्या सोबत राहतो आहोत तोच या अपत्याचा बाप आहे की आणखी कुणी अन्य पुरुष हा प्रश्न तिला सतावू लागतो. तिचा लाईफ पार्टनर
समजूतदार असला तरी बहुतांशी याबाबतीत तो ऍडजस्टमेंट करायला तयार नसतो. आजकाल गर्भनिरोधकाची अत्यंत प्रगत साधने वापरून वेश्यांपैकी अनेक जणी गर्भारपण टाळतात त्यामागे आरोग्य जपणे हा एक हेतू असतो आणि दुसरा हेतू म्हणजे 'या अर्भकाचे करायचे काय' हा खूप मोठा अनुत्तरीत प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पण असा बाका प्रसंग एखादीच्या आयुष्यात आला तर एक तर तिला पुन्हा रस्त्यावर यावे लागते किंवा त्या नरकात ती साभार परत येते. एखादी दुसरी हा धक्का सहन करू शकत नाही. मग विषाची बाटली ती घशात रिती करते. असे अनेक किस्से रेडलाईट एरियात घडत असतात. मात्र ह्या विश्वाशी पांढरपेशा समाजाचे वरवर काही घेणेदेणे नसल्याने यावर मर्यादित लेखन, चित्रण व आरेखन होत राहिले. तरीही काही लोकांनी रिस्क घेत त्यावर  कलाकृती घडवल्या. याच स्टोरीपॉइंटवर आधारित एक चित्रपट आला होता, 'चेतना’ त्याचे नाव.

बी. आर. इशारांचा 'चेतना'१९७० मध्ये आला होत त्यातल्या रेहाना सुल्तानने साकारलेल्या सीमाच्या तोंडी एक संवाद होता. 'मैंने इतने नंगे मर्द देखे हैं कि मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है'...'चेतना'ने त्या काळात तब्बल
पाच दशकापूर्वी जे कंटेंट दिले होते ते 'बेगमजान'मध्ये सेन्सॉरने अडवले. असो. 'चेतना' बॉक्स ऑफिसवर अचेतन ठरला कारण तेंव्हाचे पब्लिक माइंडसेट या आशयविषयासाठी प्रिपेअर्ड नव्हते. 'चेतना' व्यवसाय करू शकला नाही पण त्याच्या ओव्हरनाईट पब्लिसिटीमुळे रेहानाला वाटू लागले की, आपण मायापुरी पासून ते रसरंगपर्यंत आणि स्क्रीनपासून ते फिल्मफेअरपर्यंतची गॉसीपक्वीन झालो. सगळीकडे तिचे बोल्ड अवतारातील तोकड्या, तंग व पारदर्शक कपड्यातील फोटो छापून येऊ लागले. 'चेतना'च्या पोस्टरवरचे रेहानाचे फोटो तर अगदी 'फाडू' होते. लाल साडी परिधान केलेली आणि एका हातात व्हिस्कीची बॉटल घेऊन बेडवर पडलेली, कस्टमरना खुणावणारी अशी तिची विविध रूपे प्रसिद्ध झाली...        

आताचा बिनीचा निर्माता डेव्हिड धवनचा मोठा भाऊ असलेला अनिल धवन हा 'चेतना'चा नायक होता. फिल्मप्लॉटमध्ये   अनिलचा मित्र रमेश (शत्रुघ्न सिन्हा) त्याची ओळख सीमाशी करून देतो. सीमा आणि अनिल एकमेकावर खूप प्रेम करू लागतात. ते लग्नाच्या निर्णयापर्यंत येतात. अकस्मात
उद्भवलेल्या कामामुळे अनिलला तिला एकाकी सोडून जावे लागते. तो जेंव्हा परततो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की, सीमाचे वागणे खूप बदलले आहे. ती अट्टल बेवडी झाली आहे आणि तिचे चरित्र पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इकडे सीमा गरोदर असते आणि तिला नेमके ठाऊक नसते की त्या बाळाचा बाप कोण आहे, अनिल की अन्य कुणी ? आपल्यामुळे अनिलला लांच्छन लागू नये म्हणून ती अखेर विष पिते आणि स्वतःची सुटका करतानाच अनिललाही आझाद करते. 'चेतना'चा हा विषय प्रेक्षकांच्या पचनी पडला नाही. याला कारण बी.आर. इशारांनी केलेली घाण ! त्यांनी चित्रपटाच्या कथाआशयापेक्षा रेहानाच्या बोल्डनेसला जास्त प्रोजेक्ट केले. परिणामी रेहानाचं देहप्रदर्शन इतकाच आकसलेला परीघ 'चेतना'च्या वाट्याला आला.

या दरम्यान रेहाना सुल्तान 'चेतना'मध्ये काय साकारते आहे याचा अंदाज निर्माता दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांना आला असावा. बेदी भला माणूस होता, त्याने ऋषिदांना संकलनाचे काम दिले होते आणि मदनमोहन यांच्यावर संगीताची जबाबदारी सोपवली होती. मजरूह सुल्तानपुरींकडे गीत लेखनाची जबाबदारी देण्यात आली होती. तर लता, रफीवर प्लेबॅकसिंगिंग सोपवलं होतं, संजीवकुमार सारखा कसलेला
अभिनेता लीडरोलमधे घेतला होता. तरीही बेदींच्या मनाने कच खाल्ली, कारण चित्रपटाचा विषय ! हा विषय पब्लिकला आवडला नाही आणि त्याने त्याकडे पाठ फिरवली तर काय घ्यावे या चिंतेने ग्रासलेल्या राजिंदरसिंह बेदींनी घोर चूक केली. त्यांनी 'दस्तक'च्या पोस्टरवर रेहानाचे न्यूड फोटो छापले. त्यामुळे जे 'चेतना'चे झाले तेच 'दस्तक'चे झाले. कल्पना करा १९७० मध्ये एका अभिनेत्रीने बोल्ड आशयाचे दोन चित्रपट केले आणि त्याची प्रसिद्धी अत्यंत उथळ, भडक आणि बटबटीत केली गेली. तर त्या अभिनेत्रीचे आणि त्या चित्रपटांची परिणती काय झाली असेल ? या सर्वांच्या अतिरेकामुळे लोकांचा समज झाला की 'दस्तक' हा एक सेक्सबेस्ड मुव्ही असावा, त्याकाळी मिडियाला पाय फुटलेले नव्हते. जे काही प्रसिद्धी भांडवल असे त्यात मोठा वाटा माऊथ पब्लिसिटीचा होता. दुर्दैवाने या दोन्ही चित्रपटांच्या बाबतीत ही पब्लिसिटी नकारात्मक होती. रेहानाच्या पोस्टर्सनी 'चेतना' आणि 'दस्तक'चा घात केला. त्याहून अधिक तिच्या करिअरचे वाट्टोळे झाले. 

'दस्तक'च्या स्टोरीप्लॉटमध्ये घर बदलून रहायाला आलेल्या जोडप्यास कळते की, ते जिथे राहताहेत तिथे पूर्वी एक
कोठेवाली राहत होती आणि यातून त्यांच्या आयुष्यात वादळे येऊन जातात. गंमत म्हणजे 'दस्तक'ला बॉक्स ऑफिसवर जरी साधी दस्तक न देता टिकटिकही करता आली नाही, तरी त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात चार पुरस्कार याने पटकावले. सर्वोत्कृष्ट अभिनेता संजीव कुमार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेहाना सुल्तान, सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शन - मदनमोहन आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - कमल बोस. एकाच वेळी छप्परफाड प्रसिद्धी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार असा दुहेरी लाभ रेहानाला झाला. पण सवंग, भडक प्रसिद्धी तिच्या अंगाशी आली.      

आता थोडं रेहानाच्या पार्श्वभूमीविषयी. बॉलीवूडमध्ये बहाई समाजाचे अगदी मोजके कलावंत आहेत, त्यातली एक रेहाना. १९ नोव्हेंबर १९५० चा तिचा जन्म. अलाहाबादमध्ये एका सुखवस्तू कुटुंबात ती जन्मलेली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर डोक्यातल्या फिल्मी किड्याने उचल खाल्ली आणि तिने तडक पुण्यातले एफटीआय गाठले. तिथे शिकत असतानाच तिला ब्रेक मिळाला पण हा तिचा पायरीचा दगड न ठरता पायावर
पडलेला धोंडा ठरला. १९६७ मधल्या विश्वनाथ अयंगारच्या 'शादी की पहली सालगिरह' मध्ये तिने बिनधास्त कपडे उतरवले. यावेळी तिचे वय फक्त सतरा वर्षाचे होते. १९७०च्या पूर्वार्धात राजिंदरसिंह बेदींना त्यांच्या बोल्ड कथेवर सिनेमा बनवायचा होता आणि त्यांची सहनायिका रेहानाच्या रुपात सापडली. याच सुमारास बी.आर.इशारांनी तिला 'चेतना'त घेतले होते. इशारांनी फक्त अठ्ठावीस दिवसात याचे शुटींग पूर्ण केले. यातलं मुकेशचं 'मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा...' हे गाणं आजही लोकप्रिय आहे हीच काय ती जमेची बाजू. बाकी सगळा आनंद होता. या दोन्ही चित्रपटांचे काय झाले हे आपण वर पाहिलेच आहे. 'चेतना'मधलं वेश्यापुनर्वसन रेहानालाच विस्थापित करून गेलं. या दोन चित्रपटांमुळे तिला तसेच रोल ऑफर होऊ लागले. 

१९७२ मध्ये आलेल्या 'हारजीत' मध्ये तिच्या वाट्याला पुन्हा अनिल धवन आला. हा अक्षरशः दगड होता. तोंडावरची रेषही हलू न देणारा मख्ख माणूस ! सोबत होती राधा सलुजा. (पुढे जाऊन तिचीही रेहानाच झाली होती) बॉलीवूडमध्ये अनेक हिट दिलेल्या एन.एन.सिप्पी यांचा हा चित्रपट होता. तरीही

सणकून आपटला. १९७३ मध्ये ती वेद राहीच्या 'प्रेमपर्वत'मध्ये झळकली. 'ये दिल और उनकी निगाहोंके साये' हे अप्रतिम गोड गाणं यात होतं. जोडीला हेमामालिनी होती. हा ही फ्लॉप ठरला. पुढे रेहानाला काम मिळणं बंद होत गेलं. पंजाबी चित्रपटातही तिनं काम करून पाहिलं ; पण तिथेही तिच मागणी होती, तिनं कपडे उतरवण्याची ! 

या दरम्यान१९८४ मधे आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, आपल्याला ब्रेक देणाऱ्या बी.आर.इशारांशी रेहना

विवाहबद्ध झाली. तिचा संसार टिकला. मात्र इंडस्ट्रीत तिला टिकता आलं नाही. नाही म्हणायला याच वर्षी विजय आनंदच्या शबाना आझमी अभिनित 'हम रहे ना रहे'ने तिला पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली पण त्यालाही अपयशाचे तोंड पाहावे लागले. बघता बघता रेहानाचे करिअर संपुष्टात आले. तर बी.आर.इशारांनी जवळपास पस्तीस चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही ब्लॉकबस्टर हिट त्यांच्या वाट्याला आली नाही. १९७२ मधला त्यांचा 'जरुरत' त्यातील नायिका असणाऱ्या रीनारॉयला रेहानाच्या वाटेवर नेणारा होता पण रीना नशीबवान ठरली तिची रेहाना झाली नाही. १९७३ मध्ये त्यांनी 'चरित्र'मधून परवीन बाबीला डेब्यू मिळवून दिला. पुढे जाऊन परवीनची अवस्था रेहानापेक्षा वाईट झाली होती. 'एक
नजर' (अमिताभ-  जया), 'मिलाप' (कई सदियोंसे कई जन्मोसे...  हे मुकेशचे सुपरहिट गाणं यात होतं), 'वो फिर आयेगी' (राजेश खन्ना - फराह ), 'लोग क्या कहेंगे'(शबाना - शत्रुघ्न - संजीवकुमार), 'औरत' (झीनत अमन - शशीकपूर) 'हम दो हमारे दो' (राज बब्बर - स्मिता पाटील) हे त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट होत. सर्व व्यवहार आतबट्ट्याचे ठरत गेल्याने आणि नेहमी आगळे वेगळे विषय हाताळत इशारा आयुष्यभरात पैसा कमवू शकले नाहीत. २०१२ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले आणि रेहानाच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. 

पतीच्या निधनानंतर मात्र ती कोलमडून गेली. गाठीला जवळ

पैसाअडका नाही, उपजीविकेचे साधन नाही आणि वय सत्तरीच्या उंबरठयावर येऊन ठेपलेले ! काही दिवस तिने बॉलीवूडमधल्या सहानुभूतीवर गुजारले. पण हाती काम येईना. अपवाद सुधीर मिश्राचा, त्याने २०१३ मध्ये त्याच्या 'इन्कार'मध्ये (अर्जुन रामपाल -चित्रांगदा) रेहानाला घेतलं. गंमत म्हणजे हाही चित्रपट सेक्सुअल हरासमेंटवर आधारित होता पण हाही चित्रपट फ्लॉप ठरला. रेहानाकडे काही खास उरलेही नव्हते, तिचे शरीर दशकांपूर्वीच दाखवून झाले होते, तिच्यातले नाविन्य संपले होते, शिवाय ती आता गलितगात्र झाली होती. आता तिला कोण काम देणार ? तरीही तिचे प्रयत्न चालूच आहेत. सध्या रेहानाला सिने एंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) तर्फे प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जातेय. 

रेहानाने मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'त्यावेळी ती केवळ टाईप्ड अॅक्ट्रेस बनली होती. दर्शकांना ती केवळ सेक्स

सिम्बॉल म्हणूनच पसंत होती. निर्मात्यांना फक्त बाथटब आणि पावसात भिजण्याच्या भूमिका ऑफर केल्याने तिला संताप होत असे'. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या एका चांगल्या अभिनेत्रीचे हे हाल कशामुळे झाले ? पडद्यावर सतत वेश्या साकारल्यामुळे ! लोकांची तिच्याविषयी नेहमीच इच्छा राहिली की तिने नेहमीच चद्दरबदली चित्रपटात कपडे उतरवत राहावेत. इतर नायिका साकारतात तशा सामान्य भूमिका तिने साकारून पहिल्या पण लोकांना त्या रुचल्या नाहीत. भरीस भर तिचा नवराही अशाच विस्कटलेल्या नात्यांवर चित्रपट करत राहिला. त्यामुळे दोन्ही अंगाने या अभिनेत्रीचे नुकसान होत गेले. आता तिचे वय झालेले आहे, या वयात तिला न्यूड पाहावं अशी कोणाची इच्छा असणार नाही. आता कमबॅकच्या प्रतिक्षेत
असलेल्या रेहानाला वाटते की, या भूमिका तिने साकारल्या नसत्या तर तिचे करिअर नीट उभे राहिले असते आणि कदाचित तिनेही नाव कमावले असते. रेहाना असेही सांगते की, 'तिचे नाव रेहाना सुल्ताना होते पण तिच्या Sultana मधील अखेरचा 'A' तिने सेन्सॉरला दान करून टाकला जो तिच्या जीवावर उठला. त्यामुळे ती सुल्ताना न राहता रेहाना सुल्तान होऊन राहिली.' वरवर हा विनोद वाटतो पण यात कारुण्याची झाक आहे जी एका व्यक्तीच्या कारकिर्दीची माती करून गेली....                                  

एका मनस्वी अभिनेत्रीला पडद्यावर वेश्या साकारल्याची ही किंमत मोजावी लागत असेल तर प्रत्यक्षात ज्या वेश्या व्यवसाय

करतात त्यांना उतारवयात कोणती किंमत मोजावी लागत असेल ? एखाद्या वेश्येने 'धंदा' बंद करून सामान्य स्त्रीप्रमाणे संसार थाटला तरी पुरुषी समाजश्वापद तिच्या इतिहासाला हुंगत राहते आणि तिचा पूर्वेतिहास कळल्यावर तिने आपल्याकडून पैसे न घेता कुठेही कधीही झोपावे अशी अपेक्षा बाळगू लागते. हाच अधाशी वासनाडोंब रेहानाच्या करिअरला जाळून गेला आणि वेश्या साकारण्याची किंमत तिच्याकडून वसूल करून गेला....

- समीर गायकवाड. 

No comments:

Post a Comment