Sunday, April 16, 2017

मराठी चित्रपटसृष्टी - आता प्रतीक्षा 'प्रेक्षकांच्या' पुरस्काराची

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि मराठी चित्रपटजगतात कौतुकाचे, अभिनंदनाचे उधाण भरते आले. प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद वाटणे साहजिक आहे कारण ही घटना साधी नाही. मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी 'श्यामची आई' चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार १९५३ मध्ये मिळाला होता. त्यानंतरचा पुरस्कार मिळण्यासाठी तब्बल ५० वर्षे जावी लागली. ही बाब प्रत्येक मराठी चित्रपट रसिकास खटकणारी होती पण चित्रपटजगताकडून आणि रसिकांकडूनही या विषयावर मनमोकळे बोलले गेले नाही. ‘श्वास’ ला २००३ मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर २०११ मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या ‘देऊळ’ला, तर २०१४ मध्ये 'कोर्ट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यंदा २०१७ मध्ये ‘कासव’ने बाजी मारली आहे. मराठी चित्रपट देशपातळीवर आपला ठसा उमटवत आहेत असे चित्र एकीकडे दिसत असताना या पुरस्कारप्राप्त चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत असे दुर्दैवी चित्र नजरेस पडत आहे. असे का घडत असावे याची अनेक कारणे आहेत, त्याचा थोडक्यात घेतलेला हा परामर्श..


२०१४ सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या, चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कोर्ट'चित्रपटास थियेटर्स मिळाली नव्हती, जिथे थियेटर्स उपलब्ध झाली तिथे प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. निगेटिव्ह माऊथ पब्लिसिटीचा जबर फटका बसला. तर २०१४ च्या पुरस्कार विजेत्या'देऊळ'वर एका समुदायाकडून व काही संघटनांकडून बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्यामुळे एक चांगला चित्रपट वादात ओढला गेला, याचा परिणाम त्याच्या व्यवसायावर झाला. कदाचित हे चित्र ध्यानात घेऊन आणि याआधीच्या विविध राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची बॉक्सऑफिसवर झालेली दुर्गती पाहून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी प्रेक्षकपसंतीपेक्षा अनुभवाच्या सच्च्या प्रकटनास प्राधान्य देऊन, उत्कृष्ट निर्मितीमुल्ये वापरून, सिनेमाच्या सर्व बाजू बळकट करून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रस्सीखेचीत उतरवण्यात त्यांनी झुकते माप दिले असावे. या आधीच्या पुरस्कार विजेत्या काही निर्मात्या दिग्दर्शकांनीही स्वतःच्या भावनाविष्कारासाठी चित्रपट निर्माण केले असल्याचे सांगत प्रेक्षकांच्या प्रतिसादाला महत्व दिले नव्हते. खरे तर हे सर्व चित्रपट वेगवेगळ्या आशय विषयांचे आणि विविध भावनाविष्कारांचे दार्शनिक होते पण चित्रपटनिर्मात्यांनीही त्याच्याकडे प्रेक्षकांचा प्रतिसादाच्या दृष्टीकोनातून उदासीनता बाळगल्याचे दिसते.

२०१४ चा विशेष ज्युरी पुरस्कार मिळालेला 'यलो', सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट 'तुझा धर्म कोणता', उत्कृष्ट संवादाचा पुरस्कार जिंकलेला 'अस्तु' आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार विजेता 'आजचा दिवस माझा' या चित्रपटांची नावेदेखील प्रेक्षकांच्या लक्षात नसतील. मात्र याच वर्षी'फॅण्ड्री'साठी सोमनाथ अवघडेला बालकलाकाराचा आणि नागनाथ मंजुळेंना नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. 'फॅण्ड्री'ने तिकीटबारीवर चांगले यश मिळवले होते. हे यश पुरस्कार विजेत्या अन्य चित्रपटांना मिळवता आले नव्हते.

असाच काहीसा प्रकार ६३व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील चित्रपटांचा झाला होता. २०१६ सालच्या या चित्रपटात 'सैराट' आणि 'कट्यार काळजात घुसली' या दोन यशस्वी चित्रपटांना मागे टाकून 'रिंगण'ने बाजी मारली होती. तर प्रेक्षकांनी 'रिंगण'वर फुली मारली. रिंकू राजगुरू आणि महेश काळे यांना त्यावर्षी अनुक्रमे विशेष दखलपात्र अभिनयाचा आणि पार्श्वगायनासाठीचा पुरस्कार मिळाला होता. उत्कृष्ट शैक्षणिक लघुपटासाठी मिथुनचंद्र चौधरी यांच्या 'पायवाट'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता पण किती रसिक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. या चित्रपटांकडे रसिकांनी पाठ फिरवली की चित्रपटाची टीम प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे.. 


२००३ सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या 'श्वास'ला तिकीटबारीवर अफाट यश मिळाले होते.'श्वास'ला मिडीयाने डोक्यावर घेतले होते, महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात तुफान गल्ला गोळा केला होता. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अन्य चित्रपटांकडे पहिले तर लक्षात येते की 'टिंग्या'लाही असेच यश मिळाले होते. 'किल्ला', 'शाळा', 'एलिझाबेथ एकादशी'लाही चांगले यश मिळाले होते. सैराट तर मराठी चित्रपटसृष्टीला नवे आयाम देऊन गेला. शंभर कोटींचा उंबरठा मराठी चित्रपट गाठू शकतो हे'सैराट'ने सिद्ध केले. तर 'ख्वाडा'मध्ये सर्व काही असूनही चित्रपट अपेक्षित व्यवसाय करू शकला नाही. तर 'कट्यार'नेही भव्य यश संपादित केले. काही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली असे का झाले याचे उत्तर मजेदार आहे. मराठी रसिक कलात्मक नाटके सिनेमांना उदंड प्रतिसाद देतो हा आजवरचा इतिहास आहे पण त्यासाठी या माध्यमांनी रसिकांपर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.

ज्या चित्रपटांनी कलात्मकतेला व्यवसायिक जोड दिली, चित्रपटांचे प्रमोशन केले गेले,योजनाबद्ध लाँचिंग केले गेले, रिलीजचे टायमिंग साधले गेले, थियेटर्स मिळवताना सिंगल स्क्रीनसोबत मल्टीप्लेक्सकडेही विशेष ध्यान पुरवले गेले, सोशल मिडियाचा अचूक वापर केला गेला त्यांनी हे यश संपादित केले. तर जे विजेते चित्रपट केवळ पुरस्कारात धन्यता मानून आणि सोहळ्यातील शाबासकी पुरेशी मानून अल्पसंतुष्ट राहिले त्यांचा सिनेमा सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही ही वस्तूस्थिती आहे. आजकाल चित्रपट निर्मिती इतकेच वितरणाला महत्व आहे, हे ओळखून काही निर्माते प्रमोशनसाठी काही निधी राखून ठेवतात. हा निधी मोठा नसला तरी त्याचा फायदा मात्र मोठा होतो हे 'सैराट'ने दाखवून दिले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत या आघाडीवर सगळाच 'आनंद' आहे.

आजच्या नव्या पिढीची माध्यमे नवीन आहेत. त्यांना हाताळले तरी खूप काही साध्य होऊ शकते. अनेक चित्रपट निर्माते युट्यूब आणि वेबपोर्टलद्वारे चित्रपटाची बेफाम प्रसिद्धी करून घेतात. हे तंत्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खूप कमी खर्चात प्रसिद्धी मिळवून देते. हॉलीवूडचे सिनेमे यासाठी आदर्श ठरावेत. मराठीत इतक्या सुंदर आशयाचे देखणे आणि विचारप्रवण चित्रपट निर्मिले जातात, त्यांना पुरस्काररूपी राजाश्रय मिळतो आहे पण लोकाश्रय मिळत नाही हे चित्र बदलले जावे यासाठी मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी, वितरकांनी व्यावसायिक धोरण अंगीकारणे गरजेचे आहे. 'जो बोलतो त्याची माती विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे सोनेदेखील पडून राहते' ही आपल्याच मायबोलीतली म्हण आहे त्याचा बोध आपल्या चित्रपटसृष्टीने नक्की घ्यावा अन्यथा १९६५ ते १९८५ च्या दशकात हिंदी चित्रपटात समांतर चित्रपटांची जशी लाट आली होती तशी ही पुरस्कारविजेत्यांची लाट बनून निमित्तमात्र अस्तित्वाची तिची व्याप्ती राहील. इतक्या मेहनतीने तयार केलेले विविध विषयांवरील नितांतसुंदर चित्रपट प्रत्येक मराठी रसिकापर्यंत पोहोचवणे हा मराठी चित्रपटसृष्टीचा ज्या दिवसापासून अग्रक्रम राहील त्या दिवसापासून मराठी चित्रपटांचे दिवस पालटलेले असतील कारण या चित्रपटांवर मराठी प्रेक्षकाचे अफाट प्रेम आहे...

- समीर गायकवाड.
मो. ८३८०९७३९७७