Friday, April 7, 2017

ए लेटर टू विनोदखन्ना...

प्रिय विनोद, सोशल मीडियात आणि वृत्तवाहिन्यांवर तुझे व्हायरल झालेले फोटो पाहिले आणि काही क्षणासाठी विचलित झालो. तू फाईटर आहेस, तुला जे काही झालं असेल त्यातून तू
बाहेर पडशील याची अनेकांना खात्री आहे. तुझ्या लाखो चाहत्यापैकीच एक मी. बॉलीवूडी चित्रपटात तू एकमेव तगडा अभिनेता असावास जो मिशीतदेखील हँडसम वाटायचा आणि सफाचट ओठांच्या लुक्समध्येही देखणा दिसायचास. तुला तुझी दणकट आणि पिळदार शरीरयष्टी दाखवण्यासाठी कधी शर्ट काढून उघडबंब वावर करावा लागला नाही की कधी आवळ शर्ट घालून त्याच्या बाह्या मुडपून वरती घ्याव्या लागल्या नाहीत. तुझा मर्दानी बांधा फुलस्लीव्जच्या शर्टमध्येही खुलून दिसला आणि
शॉर्टशर्टमधेही उठून दिसला. तुझा विलक्षण आकर्षक चेहरा जितका भुरळ पाडणारा आहे तितकाच
करारीदेखील आहे. याचा अनुभव मी तुझ्या 'मेरा गांव मेरा देश'मधील जब्बरसिंगच्या भूमिकेतून घेतला आहे. त्यातला तुझा रासवटपणा आणि खुनशी उर्मटपणा खूप भाव खाणारा होता. तालवार कटच्या मिशा, लांबलचक मोठे कल्ले, गळ्यात काळ्या गोफातली सोनेरी पेटी आणि चपचपून तेल लावून पडलेला डावखुरा भांग, काळा नेहरूशर्ट, धोतर आणि कंबरेला काडतुसांचा पट्टा. तुझा हा  निगेटिव्ह रोल होता पण त्यातल्या नायकाच्या भूमिकेतील धरमपाजीला तू भारी पडला होतास. हा रोल लोकांच्या डोक्यात इतका फिट बसला की सिप्पींनी 'शोले' काढला तेंव्हा त्यातल्या खलनायकाचे नाव गब्बरसिंग ठेवले होते. तुझ्या हनुवटीवरच्या खळीसह तू जाम काहूर माजवून गेलास यार ...

तुझा जन्म स्वातंत्र्यपूर्व पाकिस्तानातील पेशावरचा पण फाळणीनंतर तुझं कुटुंब भारतात आलं. तू लेका खात्या पित्या घरचा, स्थावर मालमत्ता बाळगून असणाऱ्या होजिअरी
व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेला पण अगदीच काही सोन्याचा चमचा घेऊन तू जन्मला होतास असेही नाही. सेंट मेरी'ज, सेंट झेवियर्स स्कूल्स आणि सिडनहेम कॉलेजसारख्या हायफाय संस्थातून तू शिकलास पण तू कधी ओव्हररिएक्ट वाटला नाहीस, तुझे पाय जमिनीशीच होते. कारण तू दिल्लीच्या मथुरा रोडच्या पब्लिक स्कूलमध्येही शिकला आहेस. त्यामुळेच तू कधी एकदम गर्भश्रीमंत कॉर्पोरेट घराण्यातलाही वाटायचास तर कधी एकदम छपरी बंबईया ! तू पोलिसी खाकी वर्दीत एकदम ढासू वाटायचास. 'जाने अंजाने'त तू इन्स्पेक्टरच्या भूमिकेतून शम्मीशी पंगा घेतला होतास, तेंव्हा तू इंडस्ट्रीत चिरकुट देखील नव्हतास हे विशेष. मला तर याचे विशेष वाटते की केवळ पौगंडावस्थेत तू 'मुघले आझम' पाहून तुझ्या डोक्यात मधुबालेची अनारकली आणि तो रुपेरी पडदा घुसून बसला ते कधी बाहेर निघालेच नाहीत. त्या वेडातूनच तू मायानगरीचे उंबरठे झिजवत बसलास होय ना ?

तुझ्या स्ट्रगलटाईममध्ये तुला कोणी काम देत नव्हते, तुला तर काहीही करून एन्ट्री हवी होती आणि तुझ्या मदतीला आपला
भोलाभाला सुनीलदत्त धावून आला. तुझी एन्ट्री 'मन का मीत'मधून झाली. त्यात तू अपऱ्या नाकाच्या लीना चंदावरकरला जे खेचलंस ना ते खूप भाव खाणारं ठरलं. तुझं काम व्हिलनचं होतं, तरीही तू भाव खाऊ लागलास तेंव्हा इंडस्ट्रीने तुझी दखल घेतलीच. तोपर्यंत 'पूरब और पश्चिम', 'सच्चा झूठा', 'आन मिलो सजना','मस्ताना' आणि 'ऐलान' असे अर्धा डझन खलनायकी रोल तू चांगले वठवले होतेस. 'हम तुम और वोह' सारख्या टुकार सिनेमातून नायक म्हणून पुढे आलास पण याच वर्षी (१९७१)
तुला गुलजारसारख्या परीसस्पर्शी जादुगाराचा सिनेमा मिळाला, 'मेरे अपने' त्याचे नाव. यातला तुझा लुक एकदम खंग्री होता. आधी आर्मी ऑफिसर आणि नंतरचा एकदम टिपिकल सेव्हन्टीजवाला लुक. तुझा तो रेडब्राऊन शेडचा गॉगल आणि वारंवार कपाळावर येणारी झुल्फे ! यात तुझा मुकाबला बिहारीबाबू झेनोशी होता, आपल्या शत्रूभाईला तू यात जेरीस आणले होतेस. विशेष म्हणजे या काळात अमिताभ आणि राजेश यांच्यात शीतयुद्धच सुरु होतं, तर तू आणि शत्रू स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवून
होतात. मी याचे क्रेडीट तुझ्यातल्या स्टाईलभाईला देतो. तू एकदम मॅचो दिसायचास, तुझ्यात एक पुरुषी सेक्स अपील होते जे बॉलीवूडला त्या आधीही आणि तुझ्यानंतरही 'ऍज ईट ईज सेम ऍज यु' च्या रेशोत कधी मिळाले नाही. तुझं नशीब कसलं भारी होतं नाही का ? तुला सलग दुसऱ्या वर्षी गुलजारजींनी रोल दिला. १९७३ मध्ये तू त्यांच्या 'अचानक'च्या लीड रोलमध्ये होतास. नानावटी मर्डर केसवर बेतलेल्या कथेवरचा हा चित्रपट चालला नाही, पण तुझं नाव झालं. याच कथेवरचा अक्षयचा 'रुस्तम'त्याला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेलाय जो तुला कधी मिळाला नाही. कारण क्रिटीक्स तुझ्या नावाने कायम बोंबलत असायचे नाही का ?

तू खरे तर सोलो हिट सिनेमे दिलेलेस. पण काकाच्या ऋणाखातर तू 'राजपूत','कुदरत', 'प्रेम कहानी'त अगदी चिल्लर
भूमिका केल्यास आणि तिथं तू व्यवहारिक बॉलीवूडवाल्यांच्या तराजुतून चुकलास. ते तुला कॉम्बीपॅकचा पार्ट म्हणून वापरत गेले अगदी फिरोजखानसारख्या देखण्या धोंडयाने देखील तुला सहनायक म्हणून वापरले. पण तू त्याला कच्चे खाल्लेस. मला खरं सांग बरं, 'कुर्बानी'च्या वेळेस झीनत बेगम आधी तुझ्यावर लट्टू झाली होती आणि तू भिक न घातल्याने तिने फिरोजशी रूम शेअर केली हे खरं का रे ? की नुसती फिल्मी रूमर ? कुर्बानीत झीनतने जाळ काढला होता आणि तू सॉलिड गेम केलीस यार. "क्या देखते हो, सुरत तुम्हारी.." या गाण्याला तुझ्या मनात काय विचार आले होते खरे खरे सांग बरं. जाऊदेत ते जुने पुराण, पण यामुळेच की काय तुझ्यावर फिल्मी अफेअर्सची गॉसिप खूप कमी झाली.

तुझ्या सोलो मुव्हीज मधल्या हिरॉईन्स म्हणजे सगळा बी आणि सेकंड ग्रेड माल असं लेबल लावलं गेलं.'फरेबी'मध्ये तू मौसमी चटर्जीला खूप शोभून दिसलास. ती एकदम दुध की धुली हुयी आणि तू एकदम रंगीला. फार भारी कॉम्बो होतं ते. 'कैद' आणि 'जालीम' मध्ये तू आणि सुबक ठेंगणी लीना चंदावरकर एक सेक्सी कपल वाटलात. विद्या सिन्हा सारख्या आधी गांव की और आधी शहरकी अशा विचित्र इमेजमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीसोबत तू 'इन्कार' साकारलास तेंव्हा बॉलीवूडने खऱ्या अर्थाने तुला मानलं. त्यातलं हेलनचं 'मुंगळा मुंगळा' हे गाणं तुलाही आवडतं म्हणे. 'मैं तुलसी तेरे आंगन की' मध्ये
तुझ्यासोबत नीता मेहता होती, तिचा हाच सिनेमा उठून दिसला होता नाही का !  'खून की पुकार'मधली तुझी शबानाची जोडी शोभली नाही कारण ती म्हणजे कलर उडालेला जुना रंगमहाल आणि तू गिर्रेबाज कबुतर ! आणि तिच्याबरोबरच्या 'लहू के दो रंग' मधलं तुझं 'चाहिये थोडा प्यार चाहिये' मात्र हिट झालेलं होतं. अजून लक्षात आहे ते माझ्या. 'ताकत'मध्ये चक्क राखी तुझी नायिका होती तर 'जेलयात्रा'त रीना रॉय तर 'इम्तिहान'मध्ये बिंदू ! तुझी कुठल्या अमुक एका अभिनेत्रीसोबत जीवघेणी केमिस्ट्री जमली नाही कारण तुझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल असे रोल आणि तशाच धाटणीच्या हिरॉईन्सचा आपल्याकडे तुडवडा होता आणि अजूनही आहेच. असो.. तुझे कोस्टार्स आणि तू नेहमी कुतूहलाचा विषय बनून राहिला होतात हे तरी खरं ना !

शशीकपूरसोबतचे 'शंकर शंभू', 'चोर सिपाही', 'एक और एक ग्यारह' हे सिनेमे तू केले नसतेस तरी फरक पडला नसता. 'हाथ की सफाई', 'आखरी डाकू' हे तू रणधीरकपूरबरोबर केलेस पण त्याचा त्यालाच फायदा झाला आणि तो बॉलीवूडमध्ये काही
काळ तरला. पण तुझे काय ? भरीस भर म्हणून तू अमिताभसोबत 'हेराफेरी', 'परवरीश', 'खून पसीना', 'अमर अकबर अँथनी' आणि 'मुकद्दर का सिकंदर' केलास. या सिनेमांमुळे बॉलीवूडने तुला सोलो रोलसाठी गृहीत धरणं बंद केलं. अपवाद 'मुकद्दर का सिकंदर'चाच. कारण यातील तुझा रोल बऱ्यापैकी चांगला आणि मोठा होता, शिवाय तू अमिताभसमोर आत्मविश्वासाने उभा राहिलास. पण या सिनेमांच्या यशात तुला किती कमी माप दिलं जातं याचं तुला कधी दुःख वाटलं नाही का ? फिरसे जाने दे भाई..१९७४ ते ८२ च्या काळात तुला मल्टीस्टार्स
मुव्हीजमध्ये जितु आणि अमिताभहून जास्ती पे आउट केले जायचे हे आता लोकांना खोटे वाटेल. याहून आश्चर्याची बाब म्हणजे ८७ - ९५ दरम्यानच्या काळात ऋषी, गोविंदा, रजनी आणि सल्लूमियांहून अधिक पैसे तुला मोजले जात होते. असं असूनही तुझ्यावर ओशो रजनीश यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता आणि तू चक्क त्यांचा शिष्य बनला होतास. पण दोस्त, यामुळे तुझे फिल्मी गणित चुकले. त्या नंतर तू डिम्पलच्या कमबॅक मुव्हीजमध्ये लीड रोल केलेस आणि तुझा जिगरी दोस्त राजेश दुखावला गेला. पुढच्या काळात बॉलीवूड तुला देमार ऍक्शनचे फडतूस चित्रपट देत
गेलेस आणि पडद्यावरील अस्तित्व टिकवण्यासाठी तू ते करत गेलास. खरं सांगू का, या टुकार सिनेमांपेक्षा तुझी सिंथॉलची जाहिरात अधिक देखणी अन भाव खाणारी होती. तुझी फॅन फॉलोविंग तुझ्या अशा चमत्कारिक सिनेमांमुळे कधी वाढली नाही की कमी झाली नाही. तुझे फॅन तुझ्यासारखेच कल्ले वाढवून, हिप्पी कटिंग आणि बेलबॉटमची ड्रेसिंग करून शर्टची दोन बटने खुली ठेवून फिरणारे ! त्यांनी कधीही तुला सोडले नाही, त्यामुळेच तुझ्या नावावर मार्केट कधी डाऊन झाले नाही हे खरे. तुझ्या कमबॅकमध्ये तुझ्या कमबॅकमध्ये तू माधुरीबरोबरचा 'दयावान' सिंगल हँडेड पेललास तर 'इन्साफ' आणि 'सत्यमेवजयते' सारखे वेस्टेड सिनेमे तू हिट करून दाखवले होते हे कुणी विसरेल काय ? असो...

१९८७ मध्ये तू राजकारणात गेलास तेंव्हा तुझ्यावर अमिताभचीच कॉपी करतो असा आरोप  पुन्हा झाला. पण तू मैदान छोड के भागा नही भाई. तू चार टर्म निवडून आलास. एकदा पराभवाची चवही चाख्लीस. तुला केंद्रात मंत्रीपदं
मिळाली तेंव्हा तू खूप खुश दिसत होतास. तुझ्या गुरुदासपूर मतदारसंघातल्या लोकांनी तुझ्यावर जीव लावला, अगदी तुझ्या चाहत्यांसारखा ! पण तुझं पर्सनल लाईफ या काळात प्रचंड डिस्टर्ब झालं पण तू त्याची कुठे वाच्यता केली नाहीस. तू ओशोंच्या नादी लागून अमेरिकेस गेला आणि तुझं कुटुंब दुभंगलं. तू परतलास तेंव्हा उशीर झाला होता. गीतांजलीने १९८५मध्ये तुला घटस्फोट दिला. तुझं करिअर ढासळत होतं आणि तुझी प्रिय पत्नी तुला सोडून गेली होती. याला कारण तुझं विक्षिप्त वागणं होतं,
त्यामुळेच तू तिला कधीही दोष दिला नाहीस की तिच्याविरुद्ध बोलला नाहीस. पण तू एक केलंस, तिच्यापासून झालेल्या राहुल आणि अक्षयला स्टँड करण्याचा तू खूप प्रयत्न केलास अगदी होम प्रोडक्शनमधून पैसा ओतलास, त्यात तू आणखी आत आलास पण तुझी मुले वरची पायरी गाठू शकली नाहीत. तुलाही याची खंत वाटत असेल नाही का ? १९९० मध्ये तू कविताशी दुसरं लग्न केलंस. तिच्यापासून तुला साक्षी आणि श्रद्धा ही अपत्यं झाली. हळूहळू तुझी गाडी रुळावर येऊ लागली असे वाटू लागले, तू सल्लूच्या 'वॉंटेड','दबंग'मध्ये दिसलास आणि हायसे वाटले. 'रमैय्या
वस्तावैया'तला तुझा स्टेशन मास्तर खूप आपलासा वाटला होता. मागच्यावर्षी शाहरुखच्या 'दिलवाले'त तू अजूनही भारदस्तच वाटत होतास. तुझ्यावर देवाची विशेष कृपा आहे असेच वाटायचे. ऍवार्ड मिळावे हा तुझा कधीच अचिव्हमेंट पॉइंट नव्हता, तुला पाचवेळा फिल्मफेअर मिळाले तरी तू कधी डोक्याला शिंगं फुटू दिली नाहीस. तू अजून खूप काम करणार असं डोक्यात पक्कं होतं पण ...

कालपरवा तुझ्याबद्दलच्या बातम्या पाहिल्या, तुझे फोटोज पाहिले आणि ते दाखवणाऱ्यांची लाज वाटली, रागही आला. तू
गंभीर आजारी आहेस असं सांगितलं असतं तर चाललं नसतं का रे ? तुझे अशा अवस्थेतील फोटो दाखवून त्यांनी काय साधलं ? म्हातारपण कुणाला चुकलंय का ? तुला जर काही आजार झाला असेल तर तू त्याला फाईट करशीलच, अरे तुझं करिअर सांगतं की तू स्वतःच्या बळावर इथवर आलास. तुझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक
आयुष्यात तू अनेक चढउतार पाहिले आहेत. हा त्याचाच एक भाग समजून तू त्यावर मात करशील. या घटनेमुळे तुझे दुभंगलेले कुटुंब एक झाले तर तो तुझ्या आयुष्याचा सोने पे सुहागा असेल नाही का ? तुझी आत्ताशी कुठे सत्तरी झालीय, पब्लिकला तुझी दबंगगिरी अजून खूप पाहायची आहे. तेंव्हा गेट वेल सून यार.. बक अप मॅन, कॅच द यंगवन्स अगेन.. 

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment