Tuesday, April 11, 2017

'अमीना' - अंत नसलेलं स्त्रीत्व...१९८०चा सुमार असावा. कामाठीपुरयातील तेराव्या गल्लीतल्या अमीनाकडे जाकीर रोज नित्य नेमाने यायचा. जाकीर एक भुरटा पाकीटमार. भायखळयातल्या एक खोलीच्या खुराडयात तो राहायचा. यतिम होता तो. चाळीशीतला जाकीर कायम उदासवाणा अन खरवडल्यागत वाटायचा तर पस्तीशीच्या आसपासची अमीना कमनीय नसली तरी काजूकतलीसारखी मुलायम होती. ती 'लाईन'मध्ये आल्यापासून जाकीर तिच्याकडे यायचा. तिच्याशी असणारा त्याचा याराना एकदम पक्का होता. हरामकमाईने त्याला अनेक हरामी सवयी लावल्या होत्या. दारू, सिगारेट आणि 'बाई'ची व्यसनं त्याला जडली होती. त्याची कामाठीपुऱ्याशी पहचान अमीनाच्या आधीपासूनची होती...

काही वर्षापूर्वीची घटना असावी ती. त्या वर्षाच्या अखेरच्या सेलिब्रेशन नाईटच्या अंधा-या रात्री गच्च भरलेलं मोठं पाकीट हाती लागलं. खिसा जड होताच त्याने सवयीप्रमाणे तडक कामाठीपुरा गाठला आणि त्या रात्री त्याची भेट झाली तिथं आलेल्या नव्यानवेल्या अमीनाशी. 
खरं तर अमीना अजून तिथं रुळली नव्हती, तिच्याहून लहान असणारी बहिणीभावंडं कायम तिच्या नजरेपुढे तरळायची कारण अमीनाच्या सख्ख्या मामूजानने तिला इथं आणलेलं. ती कुमारवयाची असताना तिच्या घरी खाणारी डझनभर तोंडे होती. एका संध्याकाळी तिचा बेवडा बाप दारू ढोसून ढोसून मरून गेला आणि तिचे उलटफेरे जोमाने सुरु झाले. घरी दुसऱ्या कुणाची पोटापाण्याची सोय नव्हती. गरिबी आणि बापाची व्यसनं यामुळं त्या कुटुंबाची सगळीकडून नाकेबंदी होऊन गेलेली. भरीस भर म्हणजे अमीना एकदम उफाडया अंगाची होती. तिला स्वतःला कसं जपावं हे देखील काळत नव्हतं. त्या दरम्यान गावगल्लीतल्या अधाशी गिधाडांची तिच्यावर नजर पडली. केवळ राशन, कपडालत्त्याच्या बदल्यात तिचं शील विकलं गेलं. त्यातून अमीना पोटुशी राहिली. हे लक्षात येताच तिच्या आईने आधी तर जीव दयायचाच प्रयत्न केला. मात्र त्यात अमीनाची आई काही मेली नाही पण तिच्या दवाखान्यासाठी आधीच फाटकं, तुटकं असलेलं घर गहाण पडलं....

तोंडावर देवीचे व्रण असलेला, घारूळया डोळ्यांचा, राठ काळ्या ओठांचा, आडमाप अंगाचा आणि सूडबुद्धीचा अमीनाचा मामा या घटनेनंतर तिच्यावर धाऊन गेला. खरं तर तेंव्हा त्याने अमीनाला जीवे मारले असते पण आपल्या बहिणीच्या हट्टापायी तिला जित्तं सोडलं. अमीना सोडून सगळ्यांना त्याने आपल्या घरी नेलं. तसा तो ही नियतीपुढे हरलेलाच होता. एकतर त्याचा संसार आधीच पांगुळलेला आणि आता बहिणीच्या संसाराचा जास्तीचा बोझा त्याच्यावर पडला होता. तोही त्याने सहन केला, मात्र बदल्यात त्याने एक सौदा केला. त्याने पन्नाभाईकडं अमीनाला विकलं. पन्नाभाईनं तिला धंद्याला लावलं. त्या आधी 'हरेक महीन्यातल्या आमदनीचा अर्धा हिस्सा विनातक्रार आपल्याला देण्याची' कबूली मामूने तिच्याकडून घेतली. अमीनाचे पैसे थांबले की घरातल्या लोकांची उपासमार होणं ठरलेलं होतं, तिनं असं केलं नाहीतर त्यांचं छप्पर जाईल अशी भीतीही त्याने घातली. भेदरलेल्या हरणासारखी अवस्था झालेली अमीनाला या सौद्याला चुपचाप राजी होण्यावाचून कोणताही पर्याय नव्हता...

खरं तर अमीनाला तिच्या आयुष्यात एका सोनुल्या मुलाची आई व्हायचं होतं पण तिचं हे स्वप्न कधीच पुरं होऊ शकलं नाही.ती पुन्हा कधी गर्भार राहिली नाही. ईथं आल्याबरोबर आधी तिचं पोट 'खाली' केलं गेलं. तेंव्हा ती खूप कळवळली. 'लाईन'मध्ये नवी असताना अमीना सुरुवातीला चूपचाप बसून राही, चापून चोपून कपडे घाली, साधीसुधी गंध पावडर लावी. दाराआड उभी राहून भीत भीत बाहेर निरखत राही. ती कुणाला बोलवायची नाही की कुणाला खुणवायची नाही, पण तिच्यापेक्षा चकण्या बिंदऱ्या पोरी भरपूर हात साफ करत. तिला आधी त्यांची घृणा वाटायची पण त्यातला 'अर्थ' तिला तिथली जिंदगानी शिकवत गेला. हळूहळू तिला 'सारं' सवयीचं होत गेलं. जेंव्हा ती नवाडी होती तेंव्हा तिच्या अम्मीच्या आठवणीनी ती खूप रडायची, आजूबाजूंच्या बायकांची लहान पोरं दिसली की तिला भावंडं आठवायची. गाव आठवायचा, गल्ली आठवायची झाडातल्या सावलीखाली जिबली खेळणाऱ्या तिच्या बालमैत्रिणी आठवायच्या, बोरेचिंचा आठवायच्या, बालपणीचे खेळ आठवायचे, अर्ध्यात सुटलेली शाळा आठवायची. तिला धोका दिलेले पुरुषही तिच्या स्वप्नात येऊन तिला छळायचे. दिवसा तिचे डोळे रडून सुजून लाल होत अन रात्री अंगावर वासनांचे वळ उठत. रोजची सकाळ कधी होई ते तिला कळत नसे, दुपार मात्र सरता सरत नसे, सांज झाली की तिच्या देहाचा पालापाचोळा होई मग अंधाराला ओहोटी लागताना जीवाची उलघाल सुरु होई. हे चक्र अव्याहतपणे सुरु राहीलं..

तर कामाठीपुऱ्यात आल्यावर पहिल्याच महिन्यात अशा रीतीने तिची जाकीरशी गाठ पडली. तिच्याकडे येताना तो नेहमी दारू पिऊन यायचा पण जसजसं त्याचं तिच्याकडे येणं जाणं वाढलं तसं तिच्या प्रेमळ सांगण्यावरून त्याने दारू सोडली. त्याने पाकीटमारीही सोडून द्यावी यासाठी तिने अनेकदा टोमणे मारले. त्यावर ओशाळलेल्या जाकीरनं काही दिवस नेकीची कामंही करून पाहिली. त्यात त्याचे काहीच भागत नव्हते, पण अमीनाच्या मनाला सुख वाटावे म्हणून त्याने यातली 'झळ' सोसली. पण यामुळे दुसरीच समस्या उभी राहिली. पैशाच्या तंगीमुळे त्याला अमीनाकडे जाता येईना. जिच्यासाठी आपण हे बदल करतोय तिच्याकडेच जाता येणार नसेल तर त्यात काय फायदा असे त्याला वाटू लागले. त्याला अमीनाची चांगलीच लत लागली होती. अमीनाला 'धंदा' सोडून चालत नव्हतं आणि याला तिच्याकडे जाता येत नव्हतं. त्यामुळे तो कासावीस होऊ लागला. तिच्याकडे जायचे म्हणजे पैसा पाहिजे. इमानदारीतला पैसा पुरेनासा झाला. शेवटी तो पुन्हा त्याच्या पालूपदावर परतला. अमीनाला थोडे वाईट वाटले, पण पुढेपुढे तिने यावरून जाकीरला कोसणे बंद केले..

वर्षामागून वर्षे गेली. तो न चुकता येत राहिला. तिला आपलं सर्वस्व समजून तिच्यावर जीव लावत राहिला. ती देखील त्याच्यासाठी आसुसलेली राहायची. त्याला बघताच तिचा थकवा कुठल्या कुठे निघून जायचा. मात्र इच्छा असूनही त्याने तिच्याशी निकाह केला नाही. अमीनाशी संसार करावा असे त्याला वाटायचे पण त्यावरचे तोटके त्याच्याकडे नव्हते. तिच्या फळकुटाच्या खोलीत त्याला जन्नतचा आनंद होई. तिच्यावर खूप प्रेम होते त्याचे. अमीनाही त्याला जीव लावायची. त्याचा हात खाली असला की आपली पर्स हलकी करायची.
त्याला सांगायची, "देख जाकीर कोई लडकी देख के निकाह कर ले ! मेरे नसीब में तो जहन्नूमही है..  अजून किती वर्षे इथे राहायचे हे मला माहित नाही आणि इथून परत गेल्यावर पुढे काय करायचे हे ही माहिती नाही... तू कशाला जिंदगी बर्बाद करतोस ? ... अजूनही वक्त आहे, अपनी गलती सुधार ले ... "
ती असं बोलायला लागली की तो तिच्या तलम केसांतून हात फिरवत ओठांवर करंगुळी ठेवी. कानात हलकी फुंकर मारे. तिच्या बांगडयांशी चाळा करता करता पायातल्या पैंजणांवर ओठ टेकवी. त्यानं असं केलं की अमीना भूल दिल्यागत निपचित पडून राही. त्या दोघांत असं खूप वेळा झालं होतं....

अलीकडच्या काळात जाकीर एकदम परेशान झाला होता. त्याचं वय वाढलं होतं, हातातलं कसब तसंच होतं पण त्याची गात्रं शिथिल झाली होती. अलीकडे पब्लिकही हुशार झालं होतं, शिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याचं नाव सराईत पाकीटमारांच्या लिस्टला लागलं होतं. त्याच्या लक्षात आलं होतं की येणाऱ्या काळात आपलं काही खरं नाही. काही तरी वनटाईम गेम केली पाहिजे असं त्याला त्याला राहून राहून वाटू लागलं. एके दिवशी त्याने स्वतःला कोंडून घेतलं. दिवसभर काही खाल्लं नाही की पीलं नाही. दिवसभर त्याने मेंदूचा भुगा केला. 

थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो बाहेर पडला. त्या रात्री खूप दारू पिऊन तो अमीनाकडे गेला. अमीनाने त्याला खूप रागे भरले. पण तो पुरता शुद्धीत होता. तिच्या कानात त्याने काही शब्द पुटपुटले. ते ऐकून अमीनाचे डोळे विस्फारले. तिचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला. तो मात्र शांत बसून होता. मध्यरात्र उलटल्यावर तो निघून गेला. त्या नंतर महिनाभर तो आलाच नाही.

पुढच्या मोसमातील पावसाळी दिवस सुरु झाले होते त्या रात्री तो अगदी घाईघाईत तिच्याकडे आला. चेहरा निर्विकार ठेवत तो तिच्या कमऱ्यात घुसला. तिने दार लावताच त्याने तिला मिठीत घेतले. काही क्षणांनी तिला डोळे मिटायला लावले. तिने डोळे मिटताच शर्टमध्ये लपवलेलं कपड्यात लपेटलेलं एक पुडकं बाहेर काढलं. त्यात नोटांची बंडले आणि सोन्याचे दागिने होते. ती आ वासून बघत राहिली. तिने लाख प्रश्न विचारले पण त्याने उत्तरे दिली नाहीत. बराच वेळ तो तिच्या बाहूपाशात बसून राहिला. आणि अचानक काहीतरी आठवल्यागत पटकन उठून उभा राहिला. जाताना तिच्याकडून वचन घेऊन गेला, 'तो येवो न येवो तिने महिनाभर तिथेच राहायचे. मग मात्र तिने आपल्या म्हाताऱ्या मामूला बोलावून घेऊन इथले तिच्या अंगावरचे कुणाचे काही देणं असेल तर ते देऊन टाकून मामूसोबत निघून जायचं. मामू आपल्याला न्यायलाच आला आहे असेच दुनियेला सांगायचे. गावाकडे गेल्यावर आपलं कर्ज गहाणवट काही असल्यास ते देऊन टाकून एखादं घरदार घेऊन राहायचं'.. अमीनाकडून त्याने वचन घेतलंदेखील.

तो महीना अमीनाला फार जड गेला. जाकीरने दिलेला तो किमती ऐवज सांभाळताना तिची दमछाक झाली होती. 'हे पैसे जाकीरने कुठून आणि कसे आणले असावेत' हा प्रश्न तिला खूप छळे. एक सोडून दोन महीने उलटले तरी जाकीर आला नाही तेंव्हा तिने जाकीरने सांगितल्याप्रमाणे मामूला बोलावले, तो आपल्याला न्यायला आलाय अशी बतावणी केली. कामाठीपुऱ्याने तिला झिजवले जरी असले तरी पोसले होते त्यामुळे ती वस्ती सोडताना तिचे डोळे पाणवले होते. सांगासांगी करून ती युपीला कानपूरजवळील संदलपूर या तिच्या गावाकडे निघून गेली. ती मामाच्या घरी येताच तिच्या बहिणीबाळी तिला भेटायला आल्या, डोक्याची चांदी झालेली, थकून गेलेली, डोळे विझत चाललेली हतबल आई तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. 'अमीना मेरी बच्ची, मुझे माफ कर दे' असं म्हणत तिनं तिला गच्च आवळून धरलं. तिची भावंडेही आता मोठी झाली होती. लहान मोठी कामे करून त्यांनी पोटापाण्याची सोय बघितली होती. खरे तर गावाकडे कुणालाही तिची खास अशी गरज नव्हती, तिला मात्र गावाकडे येऊनही जाकीरची ओढ लागून होती. अमीनाची आई आणि मामू वगळता तिच्या भावंडांना, नातलगांना वा गावातल्या लोकांना तिचं सत्य माहिती नव्हतं. अमीनाच्या मामूने गावात सांगितलेलं होतं की, 'त्याची भाची अमीना बेवा झाल्याने दुबईहून आलीय.' अमीनाला मुंबईत नेऊन सोडलं तेंव्हा तिची भावंडं लहान होती आणि तिच्या मामूने गावात येऊन लबाडपणे सांगितलं होतं की, 'दुबईतल्या एका अरबाशी तिचा निकाह लावून दिलाय. लग्नानंतर आजवर ती सुखाने तिथे राहत होती, तिच्या पैशावरच हे घर स्थिरस्थावर झालंय.' अशी पुस्तीही जोडली,  छक्केपंजे माहिती नसलेल्या गावातल्या भोळ्याभाबडया लोकांना ते खरे वाटले होते. तिथे आल्यावर अमीनाने मामूच्या मुलांनाही जीव लावला. काही महिन्यांनी त्यांची नव्या घराची, शेत शिवाराची जुळणी पूर्ण झाली. काही काळाने ते नव्या घरात राहायला गेले...

सुरुवातीला काही दिवस अमीनाचं तिथे मन लागलं पण आपल्याला हे सुख देणारया जाकीरचे काय झाले याचा प्रश्न तिचं काळीज सोलून काढत होता. नाग डसावा तसा जाकीरच्या आठवणींचा डंख तिला शांत बसू देत नव्हता. रात्र तिला खायला उठायची, अंग ठणकून निघायचं. बाजेवर अंग टाकलं की अंधारल्या आकाशातील मलूल चांदण्यात तिला थकलेला जाकीर दिसायचा, त्याचे डबडबलेले डोळे, उष्म श्वास, धडधड वाढवणारा अधीर स्पर्श, त्याची प्रेमळ मिठी आणि त्याचं उस्मरत जाणं सर्व आठवायचे. तिला भास होत राहायचे. 
त्याच्या तोंडाला येणारा सिगारेटच्या उग्र दर्पाचे आभास तिला नशा दयायचा , दारूच्या अति सेवनामुळे थरथरणारे आभासी हात तिला आधार द्यायचे, सदानकदा वाढलेलं असणारं त्याच्या दाढीचं आभासी खुंट तिच्या गालावर घासलं की तिला लटका राग यायचा. एखाद्या देखण्या आभासात साफसुपडा चेहरा घेऊन आलेला जाकीर मात्र तिच्यावर मोहाचे जाळे टाकत असे तेंव्हा ती एकटीच हसत असे. अशा अवस्थेत तिला कुणी पाहिलं की तो हैराण होऊन जाई...

त्या नंतर काही दिवसांनी तिच्या जिवलग मैत्रिणीचे तिला पत्र आले. त्यात लिहिलं होतं की, 'जाकीरचा इंतकाल झाला होता.' पत्र वाचून अमीनाच्या पायाखालची जमीन सरकली. अमीनाचा जाकीर तिला कायमचे सोडून गेला होता. जाकीरने आपल्याच हाताने डोक्यात गोळी घालून घेतली होती. त्या घटनेआधी काही महिने पाकीटमारी सोडून एक नव्या टोळीत तो सामील झाला होता. एका मोठ्या दरोडयातला ऐवज त्याने परस्पर लांबवला होता, त्यातलाच बहुतांश ऐवज त्याने अमीनाला आणून दिला होता. अमीनाला पैसे दिल्यानंतर तो जागा बदलून लपून छपून राहत होता. आपण पकडले गेलो तर अमीनादेखील पकडली जाईल या जाणीवेने तो कासावीस होऊन गेला होता. आपण वाचू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याने आत्महत्त्या केली होती. आपण आपली जिंदगी रोशन करू शकत नाही तर निदान अमीनाला तरी तिच्या जन्नतमध्ये पाठवू शकतो हे त्याने मनाशी पक्के केले होते. एकीकडे अमीना त्या नरकातून  बाहेर पडू शकत नाही, दुसरीकडे तिला त्यातून बाहेर काढण्याइतकं कसलंही बळ आपल्याकडे नाही. त्याचवेळी ती आपल्याला मदत करू शकत नसली तरी आपण मात्र तिला मदत करू शकतो तरीही आपण त्यासाठी धाडस दाखवत नाही एचे त्याला शल्य होते. त्याने दोन दिवस घरात बसून यावर विचार केला होता. त्यानंतरच त्याने आपला निर्णय पक्का केला होता. या दरोड्यानंतर पोलिसांनी त्याच्या टोळीतील बाकीची माणसे पकडली होती. पण जाकीरने मृत्यूला कवटाळून स्वतःची सुटका करून घेतली होती. जाकीरचे पोस्टमार्टेम झाल्यावर पोलिसांनी त्याला लावारिस घोषित केलं. त्याची बॉडी न्यायला कुणी आलेलं नव्हतं हे ही एक सत्य होतं. भायखळयातल्या एका एनजीओने त्याचे दफन केलं. त्याला जिथं पुरलं होतं त्या जागेवर काही दिवस पाळत ठेवली होती. तिथं कुणी गेलं असतं तर पोलिसांच्या खब-यांनी त्यांना बातमी दिली असती म्हणून त्याचे कुणी मित्र त्याच्या दफनस्थळी जात नव्हते.
नंतरच्या काळात जाकीरच्या घराशेजारील माणसांची, मित्रांची कसून चौकशी झाली पण जाकीरबद्दल पोलिसांना काही खबरबात हाती लागली नाही. जाकीरचा एक मित्र जाकीरबरोबर कामाठीपुऱ्यात यायचा त्याने ही माहिती तिथल्या त्याच्या बाईला दिली होती. योगायोगाने ती अमीनाची मैत्रीण होती. त्यामुळे वातावरण निवळल्यानंतर तिने पत्र पाठवून अमीनाला ही सगळी माहिती कळवली होती...

पत्र वाचता क्षणी अमीना कोसळली. तिच्या सगळ्या आकांक्षा चूर झाल्या. आता ती खऱ्या अर्थाने बेवा झाली होती. दैवाने तिला पुन्हा धोका दिला होता. तिचा सगळा गोतावळा तिला परत मिळाला पण तिचं काळीज छिन्नविच्छिन्न झाले होते. मुंबईला जाऊन जाकीरच्या कबरीचे दर्शन घ्यावे तिथे फातेहा पढावी असं तिला खूप वाटू लागलं. पण आपण तिथे गेलो आणि पोलिसांनी पाळत ठेवून आपल्याला पकडले तर आपल्याला जेलमध्ये जावे लागेल हे तिला उमजले होते. त्या दिवसापासून तिचे चित्त सैरभैर झाले. तिला कशाचीही शुद्ध राहीनाशी झाली. लोक म्हणू लागले 'अमीनाला नवरा मेल्याचे दुःख आता तिला सहन होत नाहीये, अमीना पागल झालीय."............

अमीना तिच्या अखेरच्या काळात गावातल्या कबरस्तानात बसून असायची. धुळीने माखलेले तोंड, सताड उघडा असलेला जबडा, शून्यात असलेली नजर, कपाळावर आठ्यांचे गच्च जाळे विणलेले, अंगावरचे कपडे मातीने माखलेले, हातापायाची नखे वाढलेली, केसांच्या जटा होत आलेल्या, गालफाडे आत गेलेली, पाठपोट एक झालेले, सैल झालेली लोंबणारी कातडी असा तिचा दशावतार झालेला. कब्रस्तानात विमनस्क अवस्थेत मातीत बोटं फिरवत, काही बाही पुटपुटत बसलेल्या अमीनाला कुणी पाहिलं की तिच्या घरी जाऊन खबर देत. मग घरात असणारं कुणीही येऊन तिला घरी घेऊन जात. बघता बघता सगळ्या संदलपूरात अमीनाच्या वेडाची चर्चा कर्णोपकर्णी होऊ लागली. अमीनाला वेड लागल्यानंतर काही महिन्यांनी तिची म्हातारी आई वारली. त्यांनतर तिचा मामूही वारला. मग तिच्याकडे लक्ष देणारं विशेष असं कुणी उरलं नाही. तिच्या बहिणींनी तिला दवादारू करून पाहिलं. आपल्या सासरच्या गावाकडे नेऊन पाहिलं पण काही फरक पडला नाही. तिच्या भावंडांनी तिच्यासाठी अंगारे धुपारे करून पाहिले पण ती सुधारली नाही. इकडून तिकडून दोनचार फुले गोळा करून ती कुठल्याही कबरीजवळ जाऊन बसे, हातातली फुले वाहून झाली की तिचे डोळे वाहू लागत. लोक सुरुवातीला वाईट वाटून घेत, पुढे पुढे लोकांनी तिच्याकडे लक्ष देणं बंद केलं....

बघता बघता बराच काळ लोटून गेला. एका पावसाळी दुपारी अमीना कबरस्तानातच बसल्या जागी मरण पावली. तेंव्हा तिच्या हाताच्या मुठी उघड्या होत्या, हात पाय न घासता निपचित पडल्या पडल्या तिचे प्राणपाखरू निघून गेले होते, मन किंचित कलली होती, डोळे सताड उघडे होते पण तिच्या चेहर-यावर हलकेसे स्मित होते. कदाचित त्या दुपारी जाकीर तिला न्यायला आला असावा. कारण बरीच वर्षे झाली अमीनाला असं प्रसन्न हसताना कुणी पाहिलेलं नव्हतं. ती ज्या वडाच्या झाडाखाली मरून पडली होती त्याच्या ओलेत्या पारंब्यांनी त्या दिवशी एकमेकांना कडकडून मिठी मारली होती...  

- समीर गायकवाड.