Monday, March 27, 2017

कोरं पत्र..तू कुठे आहेस मला नेमकं ठाऊक नाही,
तुझ्याकडे पोस्टमन येतो का याचीही माहिती नाही.
पत्र आलंच तुझ्या नावाचे तरी ते तुला पोहोच होते का तेही ज्ञात नाही.
मागच्या दोन दशकात खरंच तुला कुणाचं पत्र आलं का हे तरी कसं विचारू ?
तुझं नाव तेच आहे की, शहर बदलल्यावर नावही बदलते ?
तू आता कोणती भाषा बोलतेस, पैशाची तर नक्कीच नाही !
तुला पत्र पाठवलं तर ते तुझ्याच जीवावर तर बेतणार नाही ना ?
तसं मी तुला खूप खूप शोधलंय पण तू पुन्हा एकदाही दिसली नाहीस...

पण तू ज्या ज्या शहरातून गेलीस तिथले नरक पाहून आलोय मी....
तू कशी राहिलीस तिथं ?
तुझ्या वस्त्या बदनाम गल्लीतल्या चिंचोळ्या अंधाऱ्या गल्ल्यात गांज्याच्या चिलीमेगत, आतल्या ऐवजाला जाळणाऱ्या.
काहींनी सांगितलं सुरुवातीला तू अहोरात्र रडायचीस,
नंतर नंतर तू शांत बसायचीस, बर्फाच्या लादीसारखी.
बाहेरख्याली जगाला तुझं मादीपण हवं होतं आणि तुला काय हवं होतं गं ?

तुझ्या मुठीतलं चांदणं मी अजूनही डोळ्यात सांभाळून ठेवलंय, पण कधी कधी ते अश्रूतून ओघळते.
तुझं गुलाबाचं फुल अजूनही वहीच्या पानात दफन आहे तर
तुझे अखेरचे सागरगोटे पोलादी अलमारीत आक्रसून गेले आहेत.
तुझी जिबली, एकाच पायातलं काळं पडलेलं पैंजण आणि तीन हिरव्या बांगड्या लॉकरमध्ये आहेत.
तुझ्याकडे मात्र विश्वासघात्क्यांनी दिलेले सुरे असतील आणि मीच दिलेल्या भळभळत्या जखमा असतील.
दुःखाच्या डागण्या असतील आणि शरीर शेकायला आलेल्या लोकांनी दिलेले सिगारेटचे चटके असतील.
सापाच्या जीभेसारख्या लिपस्टिक असतील, विषारी काजळ असेल.
तुझी मेलेली वासना असेल अन संवेदनांच्या पलीकडे गेलेला गलितगात्र देह असेल...

"तू कधीच उफाणली नाहीस" म्हणून मला अस्लमने सांगितलं होतं,
तू विवस्त्र पडलेली असायचीस आणि हिंस्त्र श्वापदं येजा करायची म्हणे.
'तू कधी कशाची तक्रार केली नाहीस की कोणाचा शोधही घेतला नाहीस' असं जमुनाबाईने सांगितलं.
'वो भौत इज्जतसे रहती थी' परवीन आपा तुझ्याबद्दल बोलत होती.
इज्जत हा शब्द तिच्या तोंडून ऐकताच माझ्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या.
"तबियत बहुत खराब हो गयेली है उसकी, लिव्हर भी ...." ताजेश्वरीने पुढं काय सांगितलं ते ऐकवलं नाही.
दिल्लीच्या जीबी रोडला तुला अखेरचं पाहिलं गेलंय त्या नंतरचा तुझा नरकपत्ता सापडलाच नाही.
तू जिथून जिथून गेलीस तिथल्या बायका पोरी तुझी याद काढतात,
तशी याद तर मी पण काढली पण गंधं अंडं कोंबडीने उबवावे तशी...

मी इकडे आता व्हाईट कॉलर्ड आहे, लोक थोडं फार मानतात.
हप्ता झाला, माझ्या एका मित्राने पत्र लिहिण्याचा उपक्रम ठेवलाय, त्याची मुदत संपायला आता अवघा एक तास बाकी आहे.
तुझ्याकडे मोबाईल आहे का नाही हेही माहिती नाही नाहीतर तुझ्या मोबाईलवर हे पत्र पाठवलं असतं..असो..
शेवटी तुला पत्र लिहायला घेतलं आणि कोऱ्या कागदात गाईच्या डोळ्यातलं चांदणं उतरलं.
सुरुवात करावी म्हणेपर्यंत मायना विस्कटून गेला, पहाटेच्या तुझ्या सैरभैर केसांसारखा..
अक्षर एकही लिहून झालं नाही पण डोळ्यातलं खारं पाणी कागदावर विखुरलंय.. 

हे असंच होतं,
तुला पत्र लिहायचं म्हटलं की, चोळामोळा झालेलं काळीज हातात येतं.
समास सोडावा की नको म्हणेपर्यंत तुझ्या तलम आठवणी रेषांवर ओघळू लागतात.
रेषांमधले बिंदू सुखदुःखाचा झिम्मा खेळू लागतात,
धमन्यातलं रक्त गोठावं तसं शाई गोठते.
श्वास कंठाशी येतो.

आताही तसंच झालंय...
हे पत्र कोरंच ठेवतो आणि जीबीरोडच्या आंटीच्या पत्त्यावर पाठवतो,
माझं प्रेम थोडं जरी खरं असेल तर तुझ्यापर्यंत कधी ना कधी पाठलाग करत पोहोचेल..

कोऱ्या पत्रावरून ओळखून घे, तू गेलीस आणि माझं आयुष्य कोरंच राहिलं.
एकही पानफुल न उगवणाऱ्या रेगीस्तानसारखं,
गवताची काडीही जिथं तग धरू शकत नाही अशा काळ्या कभिन्न कातळासारखं
अमावस्येच्या अंधारासारखं,
एकटेपणाची कठोर शिक्षा भोगणाऱ्या तरीही उत्तुंग वाटणाऱ्या हिमशिखरासारखं
आठवणींच्या दलदलीत खोल खोल रुतलेल्या भंग पावलेल्या काळजासारखं...

चुकून हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलंच तर तुही एक कोरं पत्र पाठव,
त्याची फ्रेम करून ठेवीन आणि त्याकडे बघत सुखाने प्राण सोडीन...

- 'तुझाच' असं म्हणण्याचा हक्क गमावलेला एक निष्प्राण जीव...