Monday, March 6, 2017

शब्दसमंध ...ते गांव नव्हतेच माझे जिथे मी थांबलो होतो,

उंबरठयांनीच त्या चकवा पायात बांधले होता.

ते लोक नव्हते माझे ज्यांच्यासाठी झुरलो होतो,

मिठीत घेऊन त्यांनीच नकळत दगा दिला होता.

तो प्रकाश नव्हता माझा ज्याच्यासाठी जळलो होतो,

देव्हारयानेच त्या करार अंधाराशी केला होता. 

ती वचनेही राहिली न माझी ज्यांसाठी जगलो होतो,

फितुरी शब्दांनीच केली ज्यांवर भरवसा केला होता.

ती नाती नव्हती माझी ज्यांच्यासाठी श्रमलो होतो

खंजीर त्यांनीच खुपसले ज्यांना आपलं समजत होतो.

ते दैवही नव्हते माझे ज्याची प्रतिक्षा करत होतो,

प्रारब्धाचा उल्कापात त्यानेच तर केला होता.हे भावार्थही नाहीत माझे, अन हे शब्द ही नाहीत माझे

निर्गुण निराकाराने फसवलेल्या शब्दसमंधाचे हे ओझे !!

- समीर गायकवाड.