Monday, March 27, 2017

संवेदनशीलतेचा नेटका अविष्कार - 'जाणिवेच्या हिंदोळ्यावर'...


फेसबुकमुळे अनेक चांगल्या लोकांचा परिचय झाला. अनेक दिग्गज लोकांचे विचार जास्त बारकाईने कळले. अनेक मित्र मिळाले. कित्येकांसोबतचा स्नेह वाढत गेला. फेसबुकने लिहिण्याची जशी उमेद वाढवली तशी वाचनाचीही वाढवली. फेसबुकवर चांगलं लिहिणाऱ्या अनेकांचे लेखन भावत गेले आणि माझ्या जडणघडणीस त्याची मदत झाली. तरीही असा निष्कर्ष काढावासा वाटतो की, या माध्यमात चांगलं काव्य लेखन कमी आढळतं. कारण लिहायला आणि पोस्टायला फारसे श्रम पडत नसल्याने स्वतःचे काही आणि सीपी केलेलं असं काही रोज रतीब घातल्याप्रमाणे काव्य लेखन करणारे अनेक जण दृष्टीस पडतात. त्याच वेळी काही प्रतिभावंत असेही आहेत की ज्यांचं साहित्य वाचण्याजोगं आहे. अशा मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे माझ्या फेबुवरील  मित्रयादीतील एक समृद्ध व्यक्तिमत्व सौ. सुरेखा धनावडे. 


सुरेखाजी पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या. महाविद्यालयीन जीवनात असताना साहित्य संमेलनाशी संलग्न घटनांनी त्यांच्या मनातल्या काव्यनिर्मितीच्या कल्पनांना खतपाणी घातलं. त्यांच्या सुसंस्कृत मैत्रिणींच्या आग्रहाने त्याला पुष्टी मिळाली तर डॉक्टर विजया वाड यांनी त्यांच्या लेखनप्रतिभेस पैलू पाडले. त्यांच्या साहित्यास योग्य कोंदण मिळवून दिलं. नुकताच सुरेखाताईंचा 'जाणीवेच्या हिंदोळ्यावर' हा काव्यसंग्रह डिम्पल पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. त्याचा हा आलेख... 

सुरेखाजींनी कवितात तरल निसर्ग आहे, हळवं स्त्री मन आहे. त्यातला स्त्रीसुलभ भावनांचा अविष्कार रसरशीत आहे. त्यात दैववादही आहे आणि प्रगल्भ सामाजिक जाणीवाही आहेत. त्यात त्यांच्या सख्या आहेत, आप्त आहेत आणि त्यांचं प्रारब्धही आहे. या कवितांना कुठेही प्रबोधानांचा वा शिकवणुकीचा बाज नाही. त्यांना जे जे वाटत गेलं ते ते शब्दबद्ध होत गेलंय असं त्यांनी मनोगतात लिहिलंय. विख्यात लेखिका डॉ. विजया वाड यांची नेटक्या शब्दातली आखीव रेखीव प्रस्तावना या काव्यसंग्रहास लाभली आहे. धनावडे यांच्या कवितांचे सूर कधी अस्वस्थ करतात तर कधी आनंदी, त्यांच्या शब्दांत ताकद आहे तशीच तरलताही आहे असं डॉ. विजयाजींनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे ते अगदी रास्त आहे. प्रेम, विरह, अबोला, वात्सल्य, परोपकार आणि कृतज्ञता यांच्या जाणीवांनी या कविता भारलेल्या आहेत. सुरेखाजींनी आपला हा पहिला वाहिला काव्यसंग्रह आपल्या सासूबाईंना अर्पण केला आहे. एक उच्चशिक्षित, संवेदनशील स्त्रीमन असणारी सून आणि अनुभवाच्या शिदोरीवर आयुष्याचं ध्येय गाठणारी सासू यांच्या विचारांचा मिलाफ नक्कीच झाला असणार आहे कारण त्याची प्रचीती कवितांतून येत राहते. 

एक यशस्वी डॉक्टर असणारी महिला तिच्या अनुभवांना कशा दृष्टीकोनातून पाहत असेल याचे देखणे उत्तर या काव्यसंग्रहातून मिळते. वैद्यकीय पेशात काम करताना आलेले विविधांगी अनुभव आणि त्यानुसार होत काणारी मनाची जडणघडण याचा आरसा दाखवण्याचं काम या कवितांनी केलं आहे. कविता लिहिणं म्हणजे तरी काय ? आपल्या मनात दाटून येणारे भावनांचे आर्त कढ जे गतकाळात तसेच दाबून टाकलेत, मनात कोरली गेलेली एखादी घटना, एखादा मर्मभेदी प्रसंग वा कोणा व्यक्तीसापेक्ष झालेली भावभावनांची अतिव गर्दी. या सर्वांचे प्रकटन म्हणजे काविता. सुरेखाजींच्या कवितात हे काव्यप्रयोजन जाणवते. 

आपल्या भूतकाळाकडे पाहताना त्यांना जुन्या दिवसाचा आठव आहे. 
"दोन किलोमीटर पायी शाळेत जाताना
थकवा मुळीच येत नव्हता 
मैत्रिणीचा डबा खायला मिळेल म्हणून 
रात्रभर डोळा लागतच नव्हता ..."       
असं जेंव्हा त्या लिहितात तेंव्हा त्यांच्या कवितातील कारुण्य ठाशीव होत जातं... 

आपण सुखात असतो ततेंव्हा जगाची दुःख आपल्याला दिसत नसतात असा शिरस्ताच आहे. पण काही लोक याला अपवाद असतात. सुरेखा लिहितात - 
"मोजताच येत नाही 
दुःख दुसऱ्याचं 
जोवर वसत नाही 
गावहि आपल्या दुःखाचं !"  
ज्यांच्या ठायी परात्म भाव खोलवर रुजलेला असतो त्याच व्यक्ती अशा प्रकारचे काव्य करू शकतात... 

"भयानक असतं 
दुःख वियोगाचं 
वेगानं सरतं आयुष्य 
पण ते न हलणाऱ्या डोंगराचं ...." 
विरह भावना टोकदार असल्या तरी त्या देखण्याही आहेत याचा प्रत्यय देणाऱ्या या काव्यपंक्ती सुरेखाजींच्या 
तरल मनाचा कंगोरा अलगद उघडतात. 

स्त्रीसुलभ जाणिवांचा अविष्कार त्यांच्या कवितात अगदी सहजतेने डोकावतो. त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नाही. 
'भुकेल्या पोटाला घास आईचा होता 
चंचल मनाला लगाम बाबांचा होता .....'
'सासरी धाडताना मला आईच्या डोळ्यात पूर अश्रूंचा होता 
दिल्या घरी सुखी रहा आशीर्वाद बाबांचा होता ...
असा मनस्वी साधेपणा त्यांच्या कवितेत आहे. 
स्त्रीच्या अपेक्षा फार मोठ्या नसतात याचं मार्मिक वर्णन करताना त्या म्हणतात - "दखल घ्यायला हवी तिच्याही कामांची, पोचपावती म्हणून कधीतरी भेट गजऱ्याची !"
माहेरच्या लोकांनी कसं वागावं याचं भलं मोठं अपेक्षांचं ओझं त्या वागवत नाहीत. 
"नको आहेर अश्रूंचा हात पाठीवर ठेवा, हाक मारता तिने लगबगीने जावा...'  
आई आणि मुलाचं नातं चितारताना त्यांनी काळानुरूप या नात्यात होत गेलेले बदल सुरेख टिपले आहेत. पण शेवटी सच्ची माया जिंकते असं त्या प्रतित करतात- "बदललेला तू, आता किती मला जपतोस ; ओळखून माझ्या मनीची हाक हात मायेचा फिरावतोस !
आजकाल सर्वत्र स्त्री स्वातंत्र्याचे वारे वाहते आहे, धनावडेंच्या कवितेतही त्याचं प्रतिबिंब उमटले आहे. पण ते संतुलित आहे. त्यात संयमही आहे आणि उस्फुर्त विद्रोहही आहे. त्या लिहितात - 
"मिळेल जरी स्वातंत्र्य 
स्वैराचारी होऊ नको
हक्क समानतेचा 
वाया तू घालवू नको ..."
महिला दिनाच्या नेमक्या कक्षा काय आहेत हे त्यांच्या कवितेतून त्यांनी मार्मिकपणे मांडलंय. 

मिलनाच्या व्याख्या कालानुरूप बदलत जातात हे त्यांनी खूप उत्कट शब्दात सांगितलंय - 'व्याख्या आता मिलनाची थोडी बदलायला हवी, वेळप्रसंगी कधी नजरेने तर कधी स्पर्शाने, उणीव भरून काढायला हवी...'   त्यांच्या प्रेमभावना अत्यंत बोलक्या व्यक्त झाल्यात.
"प्रीतफुलावरील दवात एकदा भिजावं म्हणतेय 
मधुर तुझ्या शब्दात एकदा जगावं म्हणतेय..'       

विवाहानंतर नाती बदलतात आणि स्त्रियांचा एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन परिस्थितीनुसार बदलत जातो. त्यातही सासू सुनेच्या नात्याला नकारार्थी नात्याने सर्वत्र रंगवलं गेलंय. पण सुरेखाजींच्या कवितात या नात्याविषयी कृतज्ञतेची किनखापी झालर आहे. 
"सासू नव्हतीच ती माय माझी होती 
जपलं तळहाताच्या फोडासारखं 
जणू तीच जन्मदाती होती ...

मैत्रीची भलावण करणे किंवा मैत्रीचं महाकाव्य रचणे कोणालाही आवडेल पण त्याकडे तटस्थतेने पाहता येईल का ? मैत्री म्हणजे काय याचा नेमका अर्थ उमगल्यावर आपण त्याकडे कसे पाहतो याचे उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे..  
"सोप्पं नसतं खरंच 
व्याख्या मैत्रीची निभावणं 
म्हणून कित्येकजण पसंत करतात
आधीपासूनच त्याच्यात न पडणं..."   

आपलं रोजचं रुक्ष होत जाणारं दिनमान जगताना आपण कशात हरवून जावं हा ज्याचा त्याच्या आवडीनिवडीचा, विचाराच्या बैठकीचा आणि व्यक्तीसंस्कारांचा, सामाजिक जाणिवांचा भाग आहे. सुरेखाजी मात्र त्यांना कशात हरवून जायचेय यावर ठाम आहेत. 'हरवते मी माझ्यातया कवितेत त्यांनी लिहिलंय - 
'कधी नदीकाठी कधी बहरलेल्या शेतावर,
कधी डोंगरकपारी तर कधी मऊ मऊ गवतावर....'
'आवडतं मला माझ्यातच हरवणं
माझंच होऊन येतं मला जगणं
'अवतीभवतीच्या गर्दीत लागतो मोकळा एक श्वास 
हरवून जाणं खास ....'

काव्यविषय काय असावा याचे तथाकथित पांढरपेशी आराखडे बांधून विशिष्ट परिघाबाहेर जाऊन वेगळ्या वा उपेक्षित घटकांवर भाष्य करणं अनेकजण टाळत असतात. पण धनावडेंनी ते धाडस दाखवले आहे. समाजात ज्यांना हीन लेखलं जातं तो कचरा गोळा करणारा कचरावाला म्हणायचा की आपल्या घरातील कचरा कुठही टाकणाऱ्यास कचरावाला म्हणायचं हा त्यांचा प्रश्न खूपच अस्वस्थ करून जातो. बडबडगीत म्हणून एखाद्या नकोशा वाटणाऱ्या बेगडी विसंवादी प्रकटनाची त्या मार्मिक कोटी करतात तेंव्हा त्यांच्या शब्दकुंचल्याला दाद द्यावीशी वाटते. दैनंदिन जीवनातील वाहतुकीच्या अडथळयांवरही त्यांनी भाष्य केलंय. कवितेतून आपल्या जगण्याची प्रेरणा त्यांनी व्यक्त केलीय. पण तेव्हढ्यावर न थांबता असावी अशीच प्रेरणा जीवनात प्रत्येकाला असा आशावाद त्या व्यक्त करतात, तेंव्हा त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो. त्यांच्या राष्ट्रवादाची प्रचीतीही त्यांच्या 'प्रिय भारत हा देश' या कवितेतून येते. दुष्काळग्रस्त कष्टकरी शेतकरयाची व्यथाही त्यांनी 'राब राब राबतोस' या कवितेतून मांडली आहे. स्त्रीभ्रूण आणि लिंगभेद याच्या परिणामकारक अनुभवांना त्या कशा सामोऱ्या गेल्या असतील याचा अनुभव त्यांच्या काही कवितातून येतो.      

आपल्या कविता आपण कशासाठी लिहितो हे ठाऊक असणं अत्यंत महत्वाचे आहे. धनावडेंच्या कवितात हे प्रयोजन डोकावतेय. त्यांचा हेतू सत्वशील आहे, अगदी सच्चा आहे. 
"होऊनी शब्दफुले हळुवार बोलायचं आहे,
मधुर माझ्या वाणीने माणूसपण जोडायचं आहे...'   

'जगायचं आहे मला मोती होऊन शिंपल्यातील' असं ठाव घेणारं लेखन करणाऱ्या सुरेखाजींच्या कवितातली माणुसकीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. मनाच्या कोपऱ्याला ही कविता नकळत स्पर्श करून जाते आणि आपण नकळत आपलं मूल्यमापन करू लागतो. 
"दमून भागून मी 
माझे मला जाणलं 
जवळपास एकही माझ्या 
माणुसकीचं एकही गांव न उरलं ...."  

आपल्या जीवनातील ध्येयवाद जोपासणारी एक देखणी कविता केलीय. तिच्या अंतिम पंक्तींनी लेखाचा समारोप करतो. 
'वय' न मला शिकण्यासाठी 
रोजच नवीन शिकायचे आहे
'मी'पणाला पुसुनी 
नम्रतेला तनामनात रुजवायचे आहे....'  

या सिद्धहस्त कवयित्रीच्या या काव्यसंग्रहाने रसिक वाचकांच्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असतील. देखणं व्यक्तीमत्व, आदरणीय पेशा, संवेदनशील विचारसरणी यांचं प्रतिबिंब त्यांच्या वळणदार अक्षरात उमटलं आहे त्याची छबी सोबतच्या छायाचित्रात देण्याचा मोह मला आवरला नाही. 


- समीर गायकवाड.