Wednesday, March 15, 2017

'काशी'ची होळी....
तो दिवस होळीचाच होता.
"अरे आज नही पिऊंगी तो कब पिऊ ? सालभर पडून असते कधी काही बोलते का ?"
जळता प्रश्न विचारणारया काशीच्या हातात होळीची 'विशेष' सिगारेट असते. नशेने भरलेल्या डोळ्यांनी आणि किंचित कंप भरलेल्या आवाजात तिचे लेक्चर सुरु झालेलं..
"हे बघ, मी कधी अशी नशा करते का ? नसीमा अम्माने पिने दी तोच मै पिती ना ... अम्मा नाही बोलली की माझं नरडं बंद.
आणि बाकी टाईमला कस्टंबरने दारू आणली तर एखादा घोट प्यावा लागतो. नाही पिली तर तो परत जातो."
"आज त्याच्या दारूचा मान राखावा लागतो. वैसे तो उसकी दी हुयी बिडीसिगारेटभी पीनी पडती है. तसं तर माझ्या चमडीने माझ्याहून जास्ती सिगारेट पिलेली आहे."

हलकेच ती पोटावरचा पदर बाजूला सारून सिगारेटच्या चटक्यांचे जुने लाल चॉकलेटी व्रण दाखवते.
"ऐसे बहोत है रे ! पर तू 'देखेगा' नही !!" तिच्या या विनोदावर मी कसंनुसं तोंड करत खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करतो.
ती विकट हास्य करते, बाजूच्या प्लेटमध्ये ठेवलेले लालबुंद तिखटात तळलेले शेंगादाणे आणि फरसाण आता हाताशी घेते.
"तू पिणार का ?" असा छद्मी प्रश्न विचारून खळाळून हसते.

एरव्ही बारमाही तोंडाला कितीही रंगरंगोटी केलेली असली तरी चार माणसांच्या मयतीला जाऊन आल्यासारखा एरंडेली चेहरा करून बसणाऱ्या काशीला अशा दशेत हसताना पाहून आनंद होण्याऐवजी वाईट वाटत होते.
"आपला दिनूभाई आला होता. त्याने आज होळीची 'बोनी' केली. ही सिगारेट त्याचीच तर आहे. होळी नसताना मी सालभर जळत असते की नई ?"

कवटीतला मेंदू शिलगावा असा तिचा हा प्रश्न !
"तुझी दुनिया मला जाळते आणि मी जळत राहते..आज मी दुनियाला सिगारमधी जाळते, दुनियाला कोलते !"
"मी कुठून आणणार हिला आणि ही मला कशी परवडणार ?" दोन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या सिगारेटकडे मोठ्या दर्दी नजरेने पाहत हा सवाल तिने माझ्यावर फेकला...तिचं खरंच होतं, त्या सिगारेटसची नशा तिला परवडणारी नव्हती. पण दिनूने दिल्यामुळे ओठांना चटके देत एकाआड झुरके देत धुरांची वलये सोडण्याचे काम सुरु होते...

पन्नाशीकडे झुकलेलं तिचं गिऱ्हाईक दिनू यादव. त्यानं लग्न केलेलं नाही आणि गेली वीसेक वर्षे काशीकडे त्याचे उठणे बसणे आहे.
आज सकाळीच तो येऊन गेला आहे, दोघांनी 'रंग' खेळलेला.
तो गेल्यावर रंग धुवून अंघोळ उरकून झाल्यावर दोन घास पोटात ढकलून होळीचा आपल्या पद्धतीने आनंद घेत ती बसलेली.
अख्खं पब्लिक त्याला दिनूभाई बोलतं म्हणून काशीही त्याला दिनूभाई म्हणते.
आपण त्याच्याजवळ झोपतो तरी त्याला भाई म्हणतो यात तिला काही गैर वाटत नाही.
दिनूच्या पर्सनल लाईफमध्ये काशीला काही इंटरेस्ट नाही. तिचं लॉजिक अगदी सिंपल आहे,
"साला माझ्या जिंदगीचा नरक झाला त्याचे कुणाला काही नाही अन मी कुणाची पर्वा कशाला करत बसू !
उसका लाईफ है, उसकोही जबाब ढुंढना पडेगा.... माझ्या टायमाला आलं होतं का कुणी ?"
या वाक्यासरशी तिचा आवाज कातर झालेला.
"तू तर आला होता का ?"
सर्रकन पुढे सरकत तिने गच्चीला हात घातला, "बोल ना,  तू तरी आला होतास का ?"
"सगळी मतलबी दुनिया आहे, तू सुद्धा काही तरी मतलब साधण्यासाठीच येतोस ना ?
माझ्या पोटात गोळा आलेला, आवंढा गिळत ती बोलते,
"क्या कुसूर था मेरा ? अरे फक्त चौदा वर्षाची होते रे... "
काशीच्या डोळ्यातील पारा ओलावत चाललेला आणि आवाजात कातर होत चाललेला....
"तुला मालूम आहे का, चाळीस उमर असावी त्याची. ज्याने पहिल्यांदा मला कुस्करले.
दोन दिवस बेशुद्ध होते. त्या नंतर किती तरी रात्री मी विष शोधत जगले... आखिरकार विष मिळालेसुद्धा पण तब तक मेरी जिंदगी जहर बन गयी,
लोहा लोहे को नही काट सकता ... मी विष पिले तरीपण मेले नाही.... उल्टा दवादारूला पैसे गेले.. "
इतकं बोलून झाल्यावर पदराने डोळे पुसत ती छताकडे नजर लावून निशब्द बसते.
बराच वेळ शांततेत गेल्यावर तिला तिच्या गावाकडची होळी आठवते....
पूर्वीच्या बिहार आणि आताच्या छत्तीसगडमधील बस्तरजवळील नारायणपाल हे तिचं गाव.
तिचं गाव इंद्रावती नदीच्या किनारी वसलेलं. देखण्या निसर्गाने समृद्ध असलेलं, नटलेलं. गावाकडची माहिती सांगताना जणू इंद्रावतीच तिच्या डोळ्यातून पाझरायची.
"बस्तरमधी आता होलीचा रंग जोर शोरवर असेल. पण घरमधी कुणी खेलतो की नाही इसका मालूमात नही..  क्योंकी दो साल पहले अपना मामू गया आणि साल पहले मां... "
विलक्षण कोरडेपणाने आणि थिजलेल्या डोळ्याने ती हे सांगते.

मामू म्हणजे तिचा मामा ज्याने तिला इथे विकले आणि मां म्हणजे तिची सावत्र आई....
काशी काही महिन्यांची असताना तिची आई गेली.  पुढे काशीच्या वडीलांनी पुढच्या वर्षी दुसरं लग्न केलेलं.
या नंतर काही वर्षांनी तिचे वडील अपघातात गेलेले.
काशीचे वडील गेल्यावर तिच्या सावत्र आईचे आणि सख्ख्या मामाचे अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले.
यात काशीचा मोठा अडथळा होत होता. म्हणून तिच्या मामूने तिचा कायमचा काटा काढताना चार पैसे येतील असा 'मार्ग' शोधला होता.
या गोष्टीला आता तीन दशके उलटून गेलेली.
तरीही काशीला तिचं गाव आठवतं, गल्ली आठवते आणि तिचं घरही आठवतं.
तिच्या सावत्र आईची मुले कदाचित तिथे असतील पण त्यांच्याकडे जावं असं तिला कधी वाटलं नाही.

पण तीन वर्षापूर्वी तिचा मामूच इथं परत आला होता, तिला परत चल म्हणत होता.
त्याला कॅन्सर झालेला. पार मरायला टेकलेला.
जाताना फार रडला तो. पण काशीने त्याला दुखावले नाही.
त्याला काही वाकडं बोलली नाही पण त्याच्या सोबतही गेली नाही..
मामू काशीला भेटून गेल्यानंतर वर्षात देवाघरी गेलेला.
यानंतर काही दिवसांनी तिच्या सावत्र आईने तिला फोन केला होता, 'घरी परत ये' म्हणून विनवलं होतं.
तेंव्हाही ती घरी परतली नाही.
तिला घरी जावंसंच वाटलं नाही आणि त्यासाठी तिचं काळीजही तुटलं नाही.

कामाठीपुरा हेच तिचं गाव होतं, तेच घर होतं आणि तिथल्या बायाबापड्या हेच तिचे सगेसोयरे.
ती सांगते, बाहेर कुठे कामाला गेलं तरी लोक विचारतात, "आधी कुठं होता आणि काय करत होता ?
खरं तर तेंव्हा बलात्कार झाल्यासारखंच वाटतं. लोक अंगावर डोळे चिटकावून बघत राहतात, काही बेशरम अंगावरही येतात.."   
"या कामाला जीव विटून काही दिवस आश्रममधी पण राहिली मी, पण तिथं माझं मन लागलं नाही.
इथली सांस रोकणारी घरं, जीवाला जीव लावणाऱ्या बायका, इथल्या सिसकीयां आणि इथली बेजान दुनिया यांना सोडून मी राहू शकत नाही...."
"एक बात बोलू क्यां ? मै जब आश्रमसे वापस आयी तो ये पुरानी दिवारे फुटफुटकर रो पडी थी, मानो किसी मां के दामनमें उसकी बेटी समा गई हो !"
मी पण तेंव्हा खूब रडले.. सर्वांच्या गळा पडले."

तिच्या आवाजातला कातरपणा आता कमी होऊन त्याऐवजी धारदारपणा वाढू लागतो.
"वो तेरी दुनिया बडी कमीनी हैं रे, वो सिर्फ इस्तमाल करना जानती हैं,
आमच्या कलेजामध्ये उतरून बघ, तुझ्या दुनियेचा असली चेहरा दिसेल..."

बोलता बोलता काशीने सिगारेटचे अर्धे पाकीट खल्लास केलेलं.
तिच्या खोलीत सगळा धूर भरून राहिलेला. मला गुदमरल्यासारखं होऊ लागलेलं.
माझी अडचण ओळखून तिनं पंखा चालू केलेला.
त्या पंख्याची हवा कमी आणि आवाजच जास्त. भरारा आवाज करणारा मागच्या बाजूने जाळ्याजळमटात वेढलेला तो पंखा फारच भेसूर वाटत होता.
न राहवून मी विचारलं, "मग तू कधीच परत जाणार नाहीस ? तुला इथून निघून जावं वाटत नाही का ?"
"तूच सांग, का परत जाऊ ?"
तिच्या प्रश्नावर माझ्याकडे समर्पक उत्तर नव्हते, थातूर मातुर उपदेश ऐकून घेणाऱ्यातली ती नव्हती. त्यामुळे मी गप्प बसणं पसंद केलं. 

काशीने सिगारेटचं थोटूक ओठांना चटका बसेल असं उस्मरून ओढलं आणि डाव्या हाताच्या तळव्यावर चांगलं खरडून खरडून विझवलं.
चोरटया नजरेनं मी तिच्या तळव्याकडं पाहिलं, तिचा तळवा पार काळा ठिक्कर झालेला.
माझी नजर ओळखून ती बोलली, "हाथों की लकीरे मिटाती हुं, उपरवाले को इतना तो हरा सकती हुं. त्याने लिहिलेली तकदीर मी मिटवू शकते, याचं थोडं का होईना समाधान मिळतं...." 
"मी इथेच बरी आहे....      
अरे मी आहे तरी कोण ? ज्याच्या इच्छा वासना मेल्या आहेत असं एक मढं आहे मी !"
बराच वेळ ती काहीबाही बडबडत होती. पुष्कळ वेळानं त्या सिगारेटचा तिच्यावर अंमल सुरु झालेला.
तिची जीभ जड होऊ लागलेली अन डोळे मिटू लागलेले, पापण्या जड झालेल्या, अन शब्द तुटक तुटक येऊ  लागलेले. मधूनच मान हिसका देऊ लागलेली. बघता बघता तिने बेडवर अंग टाकलं..

मी काय ते ओळखून घेतले आणि हळूच पायात चप्पल सरकावली. तिच्या खोलीचं कडी कोयंडा तुटायच्या बेतात आलेलं दार हलकेच उघडलं,
तिला कदाचित चाहूल लागली. मिटल्या डोळ्याने आणि जड जिभेने ती बोलली,
"बापू भैय्या, खाना तो खा के जाओ.... बहन रंडी हुयी तो क्या हुवा ?... इमानदारी और मेहनत की कमाई पे जिती हुं ! अपनी बहन से मिलने दोबारा आना..."
तशाही अवस्थेत तिनं माझी काळजी करणं मला फार चटका लावणारं होतं.  
तिच्या खोलीबाहेर कुंटणखाण्याची जाडजुड भरभक्कम देहाची, तुपकटलेल्या तोंडाची, गव्हाळ वर्णाची मालकीण नसीमा जेवत बसली होती.
तिनंही जेवायचा आग्रह केला. पण एव्हाना दुपार टळून गेलेली.
आणखी काही तासांनी ही बया सगळ्या बाया पोरींना जागं करून तोंडं रंगवून उभं करणार, तेंव्हा काशीला विश्रांती मिळेल तेव्हढी मिळेल या अर्थाने लवकर निघून जावे या हेतूने मी वेगाने पुढे जात होतो.

तेव्हढ्यात नसीमाचा आवाज आला, "इतना काशी को देके जाओ, तुम जब अंदर 'बैठे' थे तो उसका कोई पुराना यार आया था...उसने दिया हैं ये... कह रहा था, होली का तोहफा है... एव्हढं दे ना तिला... मला फार झोप लागलीय, तिच्या खोलीत जायचं जीवावर आलंय आणि कुणाला आवाज दिला तर बाकीच्या जाग्या होतील...तेंव्हा तूच तिला देऊन टाक..."
तिच्या हातात एका कॅरी बॅगमध्ये गुंडाळलेली कसली तरी एक वजनदार वस्तू होती.
फारसा चौकसपणा न दाखवता मी काशीच्या खोलीकडे वळलो.
नसीमाच्या हातातून ती वस्तू घेऊन काशीच्या खोलीत शिरलो. ती गाढ झोपी गेलेली. ती आता जागी होण्याच्या पलीकडे गेलेली. 'तिच्या पायाशी ती वस्तू ठेवली अन कुणा अनाहुताने त्यावर हात मारला तर ?' काय घ्यावे असा विचार करून तिच्या ट्रंकेकडे पाहत होतो.
पण माझ्या आवाजाने काशी काहीशी सावध झालेली.
हलकेच एक डोळा तिनं उघडला आणि माझ्या हातातील कॅरी बॅगकडे पाहून पलंगाखाली असलेल्या तिच्या पत्र्याच्या ट्रंकेकडे इशारा करून ती परत निद्राधीन झाली. आता तिची ट्रंक उघडून त्यात ती वस्तू ठेवण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता..

ओणवं होऊन मी तिची ट्रंक पुढे ओढली. पलंगाच्या आडोशामुळे तिचे अर्धेच झाकण उघडले,
ती कॅरी बॅग त्या ट्रंकेत ठेवली. ती ठेवताना माझा हात अनाहूतपणे आतल्या एका वस्तूला लागला आणि अंगावर शहारे आले.
मी चोरट्या नजरेने वर पलंगावर पडलेल्या काशीच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती शांत पहुडलेली होती.
हळूच ट्रंक आणखी थोडी पुढे ओढली, वरती असणाऱ्या तिच्या साड्या, इतर काही कपडे बाजूला केले. मघाशी हाताला लागलेली वस्तू चाचपत हात अगदी तळाशी नेला. सर्व कपडे सामान सुमान बाजूला केल्यावर ट्रंकेच्या तळाशी असणाऱ्या त्या वस्तू पाहून माझ्या पापण्या नकळत ओलावल्या.   
मी मटकन खालीच बसलो. ट्रंकेकडे बघत बराच वेळ तसाच बसून राहिलो.
नसीमाला काहीतरी वेगळाच संशय येईल याची जाणीव झाल्यावर डोळे पुसून सर्व कपडे जैसे थे करून, ट्रंकचे झाकण बंद करून तिला आधीच्या जागेवर खाली सरकवले. 
काशीच्या खोलीचे दार पुढे ओढून, नसीमाला निरोप देऊन मी टॅक्सीने रवाना झालो.

त्या दिवसानंतर अनेकदा ती ट्रंक डोळ्यापुढे तरळली, त्यातल्या वस्तू अनेकदा माझ्याभोवती फेर धरून नाचतात.
काशीच्या ट्रंकमध्ये तळाशी मऊ तलम केस चरबटून गेलेली विस्कटलेली, अंगावर पेनाने काही अक्षरं लिहिलेली जी आता धूसर झाली होती, फिकट निळ्या रंगाचा पार मळकटून गेलेला फ्रॉक अंगावर असणारी, निळ्या डोळ्यांची एक जुनी बाहुली होती, स्पंजचे तुकडे उडालेल्या चमकीचा कागद ढिल्या झालेल्या काही राख्या होत्या, तांब्याच्या तारेवरील दारू निसटत चाललेल्या फुलबाजीचा कव्हर फाटण्याच्या बेतात आलेला अर्धवट भरलेला जुनाट बॉक्स होता, पिचकारी, भोवरा, गलोल, काही चकत्या, लहान मुलीच्या बांगड्या,  अत्यंत गुळगुळीत असा चपटा दगड, फाटून गेलेला जीर्ण वस्त्रातला फ्रॉकचा जोड आणि एक अत्यंत जीर्ण झालेला जागोजागी ओरखडे पडलेला फोटो होता, ज्यात एका स्टूलवर एक सुंदरशी चिमुरडी होती आणि तिच्या मागे शर्ट विजारच्या वेशातला, डोक्याला भरपूर तेल चोपडलेला पंचवीस तीस वयाचा पुरुष उभा होता. बहुधा तो काशीचा आणि तिच्या वडीलांचा फोटो असावा. त्या सारया वस्तूत तिच्या आठवणींचं बालपण कैद असावं....

होळीच्या दिवशी तिची ती ट्रंक आणि त्यातल्या चीजवस्तू आठवल्या तरी मनात विचारांचं नुसतं काहूर उठतं. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावून जातात. 'वर्षभर आपल्या देहाची होळी पेटवून त्यात जगाची वासना शमवणारी काशी, होळीच्या दिवशी ट्रंकेतल्या चीजवस्तूंच्या दुनियेत रममाण होत असेल का ?' हा प्रश्न मनाची सालपटे काढत राहतो... 

- समीर गायकवाड.