Monday, February 20, 2017

द सेल्समन ...एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा ...


२० फेब्रुवारीच्या ब्लॉगमधून इराणी भाषेतील 'द सेल्समन' हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार जिंकेल असा अंदाज मी व्यक्तवला होता. विशेष बाब म्हणजे लेखाच्या शेवटी लिहिल्याप्रमाणे 'द सेल्समन'चे दिग्दर्शक असगर फरादी यांनी 'ऑस्कर'वर बहिष्कार टाकला. एका विदेशी भाषेतील चित्रपटाबद्दल वर्तवलेले भाकीत खरे झाल्याचे समाधान वाटते.
रोज तेच बेचव जिणं जगलं की आयुष्य नीरस होतं. चाकोरीबद्ध होऊन जातं. आजपासून थोडा चेंज करतोय. येते काही दिवस मी तुम्हाला घेऊन जातोय इराणी सिनेमांच्या दुनियेत. या लेखनमालिकेतील पहिला सिनेमा मी निवडलाय 'द सेल्समन'! असगर फरादी यांचा हा चित्रपट यावर्षीच्या ऑस्करसाठी नामांकित झालाय. हा चित्रपट आधी निवडण्याचे कारण म्हणजे या कथेची वेश्याव्यवसायाशी असणारी संलग्नता. या पार्श्वभूमीमुळे एकाच वेळी तो विरोधाभासात घेऊन जातो.

आपण जिथं राहतो तिथं रोज बॉम्बचा वर्षाव होत असेल तर ? बॉम्बवर्षाव सुरु झाला की माणूस आधी स्वतःचा जीव वाचवतो. त्याचा मारा थांबला की नजरेपुढे काळोखच असतो. धुळीचे लोट सगळीकडे उठतात. मशिदी कोसळतात, इमारती जमीनदोस्त होतात. लाईट कट होते. किंकाळ्यांनी आसमंत भरून जातो. माणूस भानावर आल्यावर स्वतः जिवंत असल्याची खात्री पटताच आपलं माणूस जिवंत आहे का याची शहानिशा करून घेतो. ज्या शहरात विध्वंसाचा अतिरेक होतो लोक ते शहर सोडून इतरत्र जात राहतात. शहर निर्मनुष्य होत जातात. अशा लोकांपैकी एका जोडप्याची कथा 'द सेल्समन' मध्ये आहे. पण या कथेला अशा पार्श्वभूमीत गुंफले आहे की स्त्रीची अगतिकता, तिच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन आणि समाजातील वासनाविकार यांचे कंगोरे लयबद्ध तऱ्हेने उकलत जातात.

इमाद आणि रना हे दोघे जण नाट्यकर्मी आहेत. ते आर्थर मिलरच्या 'द डेथ ऑफ सेल्समन'मध्ये अभिनय करतात. पण एके दिवशी नाटकातील नाट्य त्यांच्या जीवनात सत्यात उतरतं. मग सुरु होते घुस्मट आणि ससेहोलपट. बॉम्बवर्षावात घर उद्धवस्त झाल्याने ते नव्या घराच्या शोधात बाहेर पडतात. एका दलालाच्या माध्यमातून ते एका नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होतात. या घरात त्यांचे सामानसुमान येतं आणि घरातील आधीची तशीच बेवारस पडून राहिलेली सामग्री बघून ते जरा गोंधळून जातात. तिथे चपलांचे, शूजचे अनेक जोड असतात. ढीगभर सौंदर्यप्रसाधने असतात. इमादला आधी तर वाटते की आपले नशीब फळफळले आहे. पण सत्य वेगळे असते.

बहुमजली इमारतीचा हा टेरेस फ्लॅट असतो. अत्यंत देखणी आणि नीटस अशी त्याची रचना त्या दोघांना पाहता क्षणी भावलेली असते. त्याचे चार्जेस काहीसे महाग वाटत असले तरी परिसराचे लोकेशन, टापटीप पाहून ते दोघे तयार होतात. तिथे आनंदात राहू लागतात. आणि हळूहळू त्यांच्या जीवनात नाट्यमय बदल घडू लागतात. तिचा पाठलाग होऊ लागतो. लोक तिला फॉलो करायला सुरुवात करतात. काही जण तिला बाहेर गाठून तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करू लागतात. तिला स्पर्श करण्यासाठी धडपडू लागतात. त्यातूनच तिच्यावर हल्ला होतो. नेमके काय घडते आहे ते इमादच्या लक्षात येत नाही. सुरुवातीस तो रनावर संशय घेतो. पण त्याला कळून चुकतं की रना तशी स्त्री नाहीये. मग ते दोघे मिळून तिच्या मागावर असणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करतात.

रना घरी नसताना भडक वेशभूषा केलेली आणि मेकअपने चोपडलेली एक स्त्री घरात घुसण्याचा प्रयत्न करते तेंव्हा इमाद सावध होतो. तो अपार्टमेंटचीच चौकशी सुरु करतो आणि त्यातून बाहेर येते विकारांनी बरबटलेले सत्य. इमाद आणि रना जिथे राहत असतात त्या घरात त्यांच्या आधी एक वेश्या राहत असते. तिचे ग्राहक तिच्या घरात येऊन तिच्याशी शय्यासोबत करत असतात. कालांतराने कमाई घटल्यावर ती नव्या जागेत गेलेली असते. मात्र आपलं पडून असलेले सामान नेण्यासाठी ती परत येतेच. सत्य उलगडल्यावर पुढे काय होते ते प्रत्यक्ष पडद्यावर बघणे इष्ट.

स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन किती दुषित असतो याचे बोलके उदाहरण म्हणून मी या चित्रपटाकडे पाहतो. वेश्येने सुधरावे म्हटले तरी लोक तिला सुधरू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तिच्या आयुष्यातील अंधार धुंडाळत तिथे येतात आणि तिला पुन्हा त्या देहाच्या बाजारात नेऊन तिचा कडेलोट करतात. मला अनेक जण नेहमी विचारतात, वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रिया धुणीभांडी करण्याचे काम करून पोट भरू शकत नाहीत का ? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. 'द सेल्समन' मध्ये एक वेश्या घर सोडून जाते, तिथे नवी स्त्री राहायला येते. लोक तिलाही वेश्याच समजतात. कुठली खातरजमाही करावी वाटत नाही. बिनधास्त तिच्या आयुष्यात घुसखोरी करतात आणि एका सुखी जोडप्याचे जीवन उद्धवस्त करतात. एका वेश्येच्या घराची ही कथा आहे तर साक्षात वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कुठेही गेली तरी पुरुषी श्वापदं तिला हुंगत हुंगत तिथे येऊन पोहोचतातच !

चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकावर पकड ठेवतो. पटकथा अत्यंत तगडी आहे. नजर खिळून राहते. पाठलागाचे सीन अप्रतिम झालेत. इराणी भाषा कळत नसली तरी त्याची कुठे अडचण जाणवत नाही. चित्रपट संपल्यावरही आपण बराच वेळ त्यातल्या आशयविषयात गुंतून राहतो हे याचे निर्भेळ यश म्हणावे लागेल. संगीत, ध्वनीमुद्रण, नेपथ्य, लाईटइफेक्टस सारं काही एकमेकास साजेसं असं आहे. याची इंग्लिश डब व्हर्जन आयएमडीबीवर उपलब्ध आहे.

असगर फरादी यांना यापूर्वी 'ए सेपरेशन'साठी ऑस्कर मिळालेले आहे. हा ही चित्रपट ऑस्करच्या रेसमध्ये आहे. 'द सेल्समन'चा आशय विषय पाहता त्याला ऑस्कर नक्की मिळेल असे वाटते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यंतरी एका आदेशाद्वारे काही मुस्लीम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली होती. ऑस्कर वितरण अमेरिकेत होत असल्याने अरब जगतातील व मुस्लीम देशांतील चित्रपटसृष्टीने ऑस्करवरच बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याकडे दुर्लक्ष करत 'द सेल्समन'चे दिग्दर्शक असगर फरादी यांनी ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांत त्यांनी भूमिका बदलली आणि लवकरच भाष्य करू असे सांगितलं. हा चित्रपट सर्वात्कृष्ट परकीय भाषांच्या गटात नामांकित झालाय पण त्यांनी ऑस्करला अनुपस्थित राहत असल्याचे अजून तरी कळवले नाही. पण ते अनुपस्थित राहतील असा अंदाज वाटतो. ट्रंप सरकारची त्यांनी कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. अर्थात ऑस्करला दरवर्षी कोणते ना कोणते वाद होत असतातच. यावर्षी हा नवा ट्रंपावतार म्हणायचा. जर असगर फरादींना ऑस्कर मिळाले तर ते काय करतील याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. यापूर्वी आणखी एक इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांना ऑस्कर मिळाले होते तेंव्हा ते ऑस्कर सोहळ्यास उपस्थित नव्हते.

जमल्यास चित्रपट पहा. पुरुषी संशयी स्वभाव आणि सोशिक स्त्रीवृत्ती याचा रोचक संघर्ष रंगवणारा हा चित्रपट बेचैन करतो. एका युद्धजन्य प्रदेशातील अस्थिरतेच्या जंजाळात जगणा-या देशातील लोकांनी एका आगळ्या वेगळ्या विषयावर काढलेल्या या सिनेमास ऑस्कर मिळावे ह्या मनःपूर्वक शुभेच्छा.

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment