Tuesday, February 7, 2017

सज्जा - एक आर्त प्रतिक्षा .....


कधी आलीस घरी परतुनी जरी, दारात मी उभा असेन नसेन....
प्रतिक्षेचे सुकलेले ताटवे झुलतील, अंगणात तुझ्या स्वागतासाठी.
दारावरचे तोरण सांगेल, झुरलो किती युगे मी तुझ्या दर्शनासाठी.
मंजुळांच्या देहातले गीत थिजलेले ऐक जरा, वृंदावनाच्या भल्यासाठी.
धुळकटलेल्या घराच्या खिडक्यातले उसासे, उदास हसतील तुझ्यासाठी.
मलूल रातराणीचा गंध फिका, देईल जबानी माझ्या बेचैन संथरात्रींची !
कोनाडयातली कालबाह्य सतार, वाजवेल धून माझ्या विरहायुष्याची.
नागमोडी जिन्यावरच्या पाऊलखुणा, वदतील गाथा तुझ्या शोधाची.
नक्षीदार हृदयाचा कशिदा दिसेल, भिंतीवर तिथेच माझ्या तसबिरीशेजारी !
हलकेच फिरव कोमल कर, अभ्र्यात उशीच्या दफन केलेल्या अश्रुंवरी.
बिछान्यात नकोस झोपू, येतील भयाण स्वप्ने प्रतिक्षार्त भग्न प्रासादांची.
छताकडे नकोस पाहू, न जाणो उमटले असेल बिंब सताड उघड्या डोळ्यांचे.
झुंबरातल्या दिव्यांना विचार, अंधारकळांचे अस्तित्व होते किती काळाचे.
अर्धमिटलेल्या पुस्तकांच्या पानात भेटतील, ठसे थरथरत्या बोटांचे.
थबकू नकोस कुठेही, सरळ आत ये.. घरात ह्या मी असेन नसेन....
देव्हारा देईल साक्ष, समईत अल्वार विझलेल्या स्वप्नांच्या वातींची.
भिंतीत चिणलेले अबोल श्वास सांगतील गाथा माझ्या प्रेमवेदनेची.

मात्र रेलू नकोस सज्जात, पडुनी इथूनच संपवली मी यात्रा आर्त प्रतिक्षेची .....

- समीर गायकवाड.