Friday, February 10, 2017

रज्जू ...रेड लाईटएरिया मधला आशिकाना दर्द ...



मुंबईच्या कामाठीपुऱ्यापासून ते कोलकात्याच्या सोनागाछीपर्यंत आणि दिल्लीच्या जी.बी.रोडपासून ते तामिळनाडूच्या कुवागमपर्यंत रज्जूला जवळपास सगळे मुख्य दलाल ओळखत. रज्जूबरोबर चिठ्ठी (धंद्यासाठीची व्यक्ती) पाठवली की ती बिनबोभाट जागेवर पोहोचते, काचबांगडी (देखणी मुलगी) असेल तर ती अंगावर एक ओरखडाही न उठता कोठ्यावर पोहोचे. रज्जू त्याच्यासोबतच्या मुलीबरोबर कधी अंगचटीला जात नसे, तिच्या देहाशी कुठले चाळे करत नसे. छेडछाड देखील करत नसे. एखाद्या हिरोसारखा दिसणारा हा देखणा पोरगा पाहून कुणाला संशय देखील यायचा नाही की तो ह्या 'धंद्यात' असावा. त्याचे व्यक्तीमत्व भारदस्त होते. वारंवार कपाळावर रुळणारी केसांची काळीभोर झुल्फे, गोरापान रंग, घारे डोळे, धारदार नाक, ओठाची धनुष्याकृती ठेवण, त्याखालची बारीक मिशीची लव, निमुळती हनुवटी आणि करारी नजर जोडीला सहा फुट उंचीची पिळदार बांध्याची रसरशीत देहयष्टी.


खर्जातला आवाज. त्याला पाहून समोरचा बघतच राही. रज्जू ह्या 'लाईन'मधला कधीच वाटला नाही. इतका देखणा, तरणाताठा पोर पोरीबाळींच्या अंगाला हात न लावता त्यांना सहीसलामत घेऊन जातो, वाटेत कुणी राडा केला तर त्याचे दात घशात घालायचे बळ मनगटात राखतो याचे अनेकांना नवल वाटायचे. त्याच्या बरोबर जाणारया बायकादेखील अनेक वेळा त्याच्यावर फिदा होत. त्याच्या मागे लागत. पण तो कोणाची डाळ शिजू देत नसे. अगदी हलाखीच्या स्थितीतून धंद्यात ओढलेल्या पोरीला मात्र तो बरोबर ओळखायचा, तिला जागेवर पोहोचवले की पदरपैशाने तिची सौदेबाजी पूर्ण करून तिला सुखरूप घरी पाठवून द्यायचा. या धंद्यात त्याला मिळणारे पैसे निम्म्याहून अधिक याच कामात खर्च होत. बायका सोबत घेऊन फिरताना एखादी क्वार्टर लावून शांत बसलेला, अंगावर विटकरी शाल पांघरलेला, डोळ्यातला अंगार विझू न देणारा, सिगारेटीची वलये हवेत उडवणारा हा पोरगा बघून त्याच्या सोबतच्या बाईच्या वाटेला कुणी जात नसे. एखाद्या बाईला वाटे, हाच सोबती मिळावा. पण अख्ख्या प्रवासात "क्या खाओगी ?... और कुछ चाहिये क्या ?" इतकंच विचारणारा रज्जू कुणाला जास्त जवळ येऊ देत नसे. पहिल्यांदा त्याला बघणारी माणसे कोड्यात पडत की हा या धंद्यात कसा काय ? इतका निर्विकारपणा याच्यात आला कोठून ? ....

त्याचे कारणही तसेच होते. ऐंशीच्या दशकात कामाठीपुऱ्याच्या तेराव्या लेनमध्ये एक चहाचे टपरीवजा कँटीन होते. 'अनमोल चाय की दुकान' अशी धूसर अक्षरे असलेला विटून गेलेला पत्र्याचा बोर्ड त्यावर लटकत असायचा. त्या टपरीचा मालक होता मीरचंद. बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी. पोटापाण्यासाठी मुंबईत येऊन नाना कामधंदे करत थेट कामाठीपुरयात रूळलेला. त्याचे चहाचे कँटीन चांगलेच चालत असे. चहा व्यतिरिक्त नाष्टा पुरवणे हे त्याचे काम. रोज सकाळी आठ दहा वाजता कामाठीपुरा जागा व्हायचा. तिथल्या अनेक खोल्यात, चोरखणात चहा पोहोचवण्याचे काम झाले की पुढच्या फेरीत नाष्टा जाई. त्यानंतरच कँटीनवर येणारया गिऱ्हाईकांना तो सेवा द्यायचा. जागोजागी कोपचे उडालेली लाकडी टेबलं, बसून बसून वाकडी झालेली बाके आणि काचा फुटलेले एक जुनाट कपाट हे त्याच्या कँटीनमधलं फर्निचर. कोपऱ्यातल्या काळवंडून गेलेल्या बेसिनजवळचा पारा उडालेला आरसा आणि त्या खालचा मोडकळीस आलेल्या काळ्यापितळी तोटीचा नळ. बुडाला चॉकलेटी झाक आलेले ग्लास आणि टवके उडालेल्या प्लेट्स. बाकांना असणारे खिळे बाहेर डोकावत आणि बसणारयाच्या शर्टपँटीचा बळी घेत. मीरचंद यातली कुठलीच वस्तू दुरुस्त करत नसे कारण स्वच्छता असली, टापटीप राहिली तर गिऱ्हाईक जास्त वेळ बसेल आणि धंद्याची खोटी होईल हे त्याला ठाऊक होते. त्याच्या दुकानात दोन पोरे कामास होती, अमजद आणि जगन. रघुवीर नावाचा एक काळाकभिन्न घामेजलेल्या अंगाचा कुरळ्या केसाचा सदैव उघड्या अंगाने स्टोव्हपुढे उभा असणारा एकच वस्ताद त्याच्याकडे सुरुवातीपासून कामाला होता. या सर्वांना खायला, प्यायला आणि झोपायला जे काही लागते ते पुरवून मीरचंदने चांगलेच टिकवून ठेवलं होतं. आलेलं गिऱ्हाईक पोटापाण्यासाठी कमी आणि कबुतरबाजीसाठी जास्ती येते हे तो जाणून होता. त्यामुळे तिथे फालतूमधे रेंगाळत उभारणारयांचा तो खरपूस समाचार घेई. बिनाकामाची कुठली बाईल देखील त्याला तिथे खपत नसे. ती आली की आपला धंदा बसतो आणि तिचा सुरु होतो याचे गणित त्याला ज्ञात होते. त्यामुळे त्याच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थावर आलेल्या माशांना जितक्या सहजपणे तो हुसकावायचा तितक्या सहजतेने तो अशी माणसे हाकलून लावत असे. चाळीशीत पोहोचलेला मीरचंद वर्षाकाठी आपल्या गावी परत जाई. तेंव्हा इकडे परत यायला त्याचे मन होत नसे. असल्या वस्तीत कुणी जवळचं विश्वासू माणूसही कामाला येत नसे त्यामुळे त्याला एकट्यालाच त्याचे सर्व निस्तरावे लागे. त्याच्याकडे कामाला असणारे पोरही एका एनजीओच्या शाळेत शिकायला गेले आणि त्याची परवड सुरु झाली. त्याच्या कँटीनमध्ये तिथल्याच बायांची पोरे कामाला येत. ती अधूनमधून हात मारत पण त्याकडे त्याला नाईलाजाने दुर्लक्ष करावे लागे. पण जसजसे मीरचंदचे वय वाढत गेले तसे त्याला कामाला कुणी मिळेनासे झाले. मात्र एके दिवशी अनपेक्षित रित्या मीरचंदची समस्या सुटली....

मीरचंद त्याच्याकडे कामाला असणारया जगनला रेल्वे स्टेशनवर सोडायला आला होता. त्याला रेल्वेत बसवून दिल्यावर परत निघताना एका चारपाच वर्षाच्या देखण्या निरागस पोराने त्याच्या पायाला आवळून धरले. 'चाचू, चाचू' करून ते पोर त्याला बिलगले. मीरचंदने इकडे तिकडे बघितले, ही नसती ब्याद तर नाही ना याची खात्री करून घेतली. भोवताली नजर फिरवली, आपल्यावर कुणाचे लक्ष नाही याची पुरती खातरजमा करून त्याने ते पोरगं कुशीत घेतलं. एक नजर सगळ्या स्टेशनवर टाकत त्याने तिथून सू बाल्या केला. त्यानंतर दोनतीन दिवस तो स्टेशनवर सलग यायचा, पोराला शोधणारी कुणी माणसं आली होती का याचा कानोसा घ्यायचा. त्या पोराला त्याने नाना प्रश्न विचारले. ते बिथरलेले पोर कशाचं उत्तर देऊ शकलं नाही. फक्त 'रज्जू, रज्जू' इतकंच तो बोलायचा. आता रज्जू कोणाचे नाव होते हे कळायला मार्ग नव्हता. त्याच्या अंगावर सिगारेटने चटके दिलेले होते आणि डोक्यात दोनेक ठिकाणी खपल्या धरलेल्या जखमा होत्या. त्यावरून त्याचा छळ होत असावा आणि कुणीतरी जाणीवपूर्वक त्याला मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर सोडून दिले होते. ग्रँटरोडजवळच्या गुलालवाडी सर्कलपाशी मीरचंदची खोली होती. त्या चिमूरडयाला घेऊन तो तिथेच राहू लागला. या पोराला जीव लावला तर सात आठ वर्षाने आपला धंदा सांभाळायला विश्वासू माणूस हाताशी येईल याची मीरचंदने पक्की खुणगाठ आपल्या मनाशी बांधली होती. पण अमजदवरून मिळालेला धडा त्याने डोक्यात ठेवला होता. त्याने आपण होऊन रज्जूला सकाळच्या तीन तासाच्या शाळेत घातले. दहाच्या सुमारास तो शाळेच्या गणवेशातच कँटीनवर यायचा. पुढे जाऊन त्याच्या हातात किटली आणि कप कधी आले कुणाला कळले देखील नाही. या गोंडस पोरावरून तिथल्या बायका पोरी आपला जीव ओवाळून टाकायच्या, त्याचे गालगुच्चे घायच्या. त्याला मांडीवर घेऊन बसायच्या. त्यालाही भारी मज्जा वाटे. कुणी त्याला खाऊ पिऊ घालत तर कुणी जवळ घेऊन पडत. कुणी आगाऊ पोरी त्याचे सगळे कपडे काढून त्याला परत पाठवत तेंव्हा तो रडत कढत परत फिरे. तिथल्या बायकांच्या औरस अनौरस पोरांशी त्याची मैत्री होत गेली. मीरचंद चाणाक्ष होता. त्याचे रज्जूवर बारीक लक्ष असे. त्याच्या बोलण्याचालण्यात काही वेडे वाकडे आढळले की तो त्याला रागे भरी. मात्र त्याचे सर्व लाड तो पुरे करी. बघता बघता एक दशक लोटले....

मीरचंदचा मुलगा अशीच रज्जूची ओळख झाली होती. त्याच्या ओठावर मिसरूड फुटले होते पण कुठल्या पोरीच्या अंथरुणात तो शिरला नव्हता कारण लहानपणापासून तिथेच राहून त्याला हळूहळू तिथली दुनिया खूप कमी वयात कळली होती. त्याला त्या दुनियेची किळस यायची, तो कोरडेपणाने तिथून फिरायचा. त्याला अंगाखांद्यावर वाढवलेल्या बायांच्या खोल्यात घामेजल्या अंगाने इकडे तिकडे बघत बसून राहायचा. सिगारेटी फुकत तांबारलेल्या डोळ्यांची झुलत झुलत चालत येणारी माणसं. त्यांची राठ शरीरं, बेढब देहयष्टी, रासवट बोली आणि वखवखलेली नजर या सर्वांचे तो बारीक निरीक्षण करत राही. आपल्या मुलीसमान, नातीसमान पोरीबाळींसोबत हे लोक कसे काय झोपत असतील हा प्रश्न त्याच्या कोवळ्या मनाची कातडी सोलून काढे. येता जाता मिठाईच्या डब्यात आपला बरबटलेला हात घालून दोन चार घास खाऊन बघावेत तसं सहजतेने बायकापोरीच्या अंगचटीला जाणारी माणसे आणि त्यांना भूल पाडणाऱ्या, त्यांना आपल्याकडे आकृष्ठ करण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या बायका बघितल्या की त्याच्या टाळक्यात भणभणू लागे. डोक्यात तिडीक आल्यागत तो तिथून उठे आणि तडक आपल्या कँटीनचा रस्ता धरे. त्याला जाताना पाहून वाटेत एखादी इब्लीस पोरगी चेष्टेच्या मूडमध्ये येऊन त्याच्या देखण्या रूपडयावर भाळून त्याच्याशी दंगामस्ती करायचा प्रयत्न करी तेन्व्हा तो तिला हळूच ढकलून देई आणि पानाच्या पिचकारयांनी रंगलेले अजगरासारखे जिने उतरून वेगाने रवाना होई. तो कँटीनवर असला तरी शांत असे. फालतूपणा नाही की कुठला थिल्लरपणा नाही. तो जसजसा मोठा होत गेला तसतसा तो आपल्या मनातील शंका मीरचंदजवळ उघड करत गेला. मीरचंदनेही त्याच्यापासून काही लपवले नाही. 'त्याच्या आयुष्यात तो कसा आला इथेपासून ते त्याने आपल्या धंद्यासाठी वारस म्हणून कसा विचार केला' हे सर्व त्याने सांगितलं. 'त्याला घेऊन आपण पोलिसाकडे गेलो असतो तर योग्य झालं असतं की अयोग्य हे अजूनही उमगले नाही' हे ही त्याने मनमोकळेपणाने सांगितलं. जसजशा या गोष्टी त्याला कळत गेल्या आणि कामाठीपुऱ्यातील दुनिया उमजत गेली तसतसा तो अधिक विचार करू लागला. आपल्यात आणि इथल्या नाजायज पोरांत काही फरक असेल का हा प्रश्न त्याला अस्वस्थ करायचा तेंव्हा मीरचंद त्याच्या मनातील वादळ अचूक हेरून त्याच्या पाठपोटावरील जखमांचे व्रण दाखवी.

हळूहळू काळ आणखी पुढे गेला. पाठीत वाकलेल्या आणि गुडघे गमावलेल्या मीरचंदने आपले कँटीन मोठ्या विश्वासाने रज्जूच्या हवाली केले आणि तो समस्तीपूरला गावाकडे निघून गेला. मीरचंदने त्याला मुलाची माया दिली, प्रेम दिले, आपले नाव दिले, पोटापाण्याचे साधन दिले, ओळख दिली. दोनतीन वेळा त्याने रज्जूला आपल्या गावाकडेही नेले. रज्जू हिंदू होता का मुसलमान हे देखील त्याला माहित नव्हते, त्याचे घरदार, आईबाप, जातधर्म कशाचीच माहिती नव्हती पण प्रेम-विश्वासाच्या अन स्वार्थाच्या जोरावर त्याला मुलासारखे जपले होते. चार अक्षरे शिकवून दुनियादारीचे धडेही दिले होते. 'दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवण्याबरोबरच इथल्या कुठल्या पोरीत न अडकण्याचा' रज्जूकडून शब्द घेऊन मीरचंद निघून गेला. जाताना आपली खोली, कँटीन रज्जूच्या नावावर करून गेला. त्याला रज्जूची हमी होती याचे कारण रज्जूचे सोशिक आणि संयमी वर्तन. भांगेत उगवलेल्या तुळसेसारखे त्याचे जीवन होते. 


मीरचंदला जाऊन काही आठवडे उलटले आणि रज्जूने त्याला दिलेला एक शब्द अकस्मात मोडला गेला. गल्लीच्या मध्यावर असणाऱ्या बिस्मिल्लामंझीलमध्ये पावसाळ्यातील एका उत्तररात्री रिक्षात एक तेरा पंधरा वर्षाची कोवळी पोर बळजोरीने आणली होती. जीवाच्या आकांताने ती ओरडत होती. अख्खी रात्र तिला मारझोड झाली. सकाळ होईस्तोवर तर ती बेशुद्धही झाली. तिथल्या सरस्वतीच्या कुंटणखाण्यात तिला आणलेलं. सरस्वती कुठल्याही थराला जाऊन पैसे कमावणारी होती. त्यामुळे तिला ही बाब नवीन नव्हती. सरस्वतीच्या शेजारी लागून तिच्या सख्ख्या लहान बहिणीचा यमुनाचा कुंटणखाणा होता. या दोघी सख्ख्या बहिणी पण स्वभावात जमीन अस्मानचे अंतर होते. रज्जूचे बालपण ज्या बायकांच्या कुशीत गेले त्यापैकी यमुना एक होती. सरस्वतीचे वागणे तिला पटत नसे, पण ज्याच्या त्याच्या धंद्याचे उसूल म्हणून ती दुर्लक्ष करे. त्या दिवशी दुपारी सगळी कामे उरकल्यावर रज्जू नेहमीप्रमाणे यमुनेच्या खोलीत आला. तोवर बाजूच्या सरस्वतीच्या घरातील ती पोरगी हळूहळू शुद्धीवर येत होती. ती विव्हळत होती, कण्हत होती. तिचा आवाज वाढला आणि सरस्वतीने काल्दीपला हाक दिल्याचा आवाज रज्जूच्या कानावर आला. काल्दीप हा सरस्वतीचा दल्ला आणि रखवाला. सरस्वती मोठ्या आवाजात काही तरी विचारत होती आणि त्या मुलीचा रडवेला आवाज वाढत होता. यमुनेच्य घरासमोरील सज्जातून धावत काल्दीप सरस्वतीच्या घरात शिरला. आत जाताच त्याने कमरेचा पट्टा काढला आणि त्या पोरीला सपासप हाणायला सुरुवात केली. त्या पोरीचा आवाज आता टिपेला गेला. सरस्वतीच्या घरात एकच गलका उडाला. या कोलाहलाने रज्जू भांबावून गेला. यमुना त्याला तिथून निघून जाण्याविषयी खुणावू लागली, हात जोडू लागली. पण झाले उलटेच. ताडकन चार ढांगा टाकत वीजेच्या वेगाने रज्जू सरस्वतीच्या घरात शिरला. तिथे एकाआड एक अशा लाकडी प्लायवूडच्या बारा वेगवेगळ्या चिंचोळ्या कंपार्टमेंट होत्या. त्यापैकी पहिल्या खोलीत वऱ्हांडावजा खोलीत काही बाकडी, एकदोन स्टूल आणि कोनाड्यात ओल्ड मॉडेलचा टीव्ही होता, देवांच्या डझनभर तसबिरी लटकत होत्या. त्या लगत असणाऱ्या दुसऱ्या कप्प्यातल्या खोलीतून आवाज येत होता. तिथले दृश्य बघून त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तिथे खाली जमिनीवर गव्हाळ रंगाची एक कोवळी तरुणी विवस्त्रावस्थेत पडलेली होती. तिच्या सर्वांगावर काळे निळे चट्टे उमटलेले होते. नाकातोंडातून रक्त येत होते. तिचे पाय करकचून बांधलेले होते. हात पाठीमागे आवळलेले होते. तिच्या पाठीवर अनेक ठिकाणी ओरबाडलेले होते. काल्दीप हातात पट्टा घेऊन उभा होता आणि सरस्वती त्याला 'और मार' असं सांगत होती. देहभान हरपलेला रज्जू निमिषार्धात काल्दीपच्या अंगावर झेपावला. एका दमात त्याला आडवे करून त्याला असे काही ठोसे लगावले की काही मिनिटात त्याची विजार ओली झाली. एव्हाना सरस्वतीने गदारोळ माजवण्यास सुरुवात केली. यमुना तिथे आली आणि तिने रज्जूला आवरण्याचा प्रयत्न केला. इतका वेळ रडणारी ती पोरगी अंग घासत घासत रज्जूच्या पायापाशी येऊन पुन्हा बेशुद्ध झाली...

रज्जूच्या घुसखोरीने सरस्वतीच्या अंगाचा तीळपापड झाला होता. तिने जवळ जाऊन त्याला ढकलून दिले. घराबाहेर हाकलले. त्या सरशी तो चिडला. पोलिसात तक्रारीची धमकी देऊ लागला. पोलिसांचा उल्लेख होताच यमुना सावध झाली. तिने मध्यस्थी केली. रज्जूला शांत करून तिने खाली पाठवून दिले. त्या क्षणापासून रज्जूचे कशातच लक्ष लागेनासे झाले.......त्याला बेचैन वाटू लागले. काहीतरी हरवल्यासारखं तोंड करून तो बसू लागला. न सारखे काही केल्या त्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यापुढून जाईना. ती मुलगी बरी होईपर्यंत सरस्वतीहीही दोन दिवस शांत बसली. 'पोरगी पैसे देऊन आणलेली आहे, , तिची पूजा करू का ? तिला धंदा करावाच लागेल...', 'इतकाच जीव असेल तर तिची किंमत अदा करून ने म्हणावं त्याला', 'आपल्या औकातीत राहायला सांग त्याला', 'इथं सगळीकडे असेच चालते'', 'अशा किती पोरी सोडवणार आहे ?' ?', 'पोट भरायला आलाय, तेंव्हा गुमान राहा म्हणावं’, ‘पोलिसात जाऊन काय होणार आहे ? दुसऱ्या दिवशी दंड भरून मी बाहेर येईन’, ‘कुंटणखाना चालवते मी, खानावळ नाही चालवत’, ‘जास्ती चालबाजी केली तर मीरचंदची ओळख विसरून तुझा बंदोबस्त करायला मागे पुढे पाहणार नाही', 'मी म्हणजे काही यमुना नाही, ध्यानात असू देत' अशा अनेक कानपिचक्या रज्जूच्या कानी पडल्या. त्या पोरीच्या सोडवणुकीची किंमत विचारली आणि त्याचे डोळे पांढरे झाले. त्याने जवळ असलेले सर्व पैसे सरस्वतीकडे जमा केले. काही दिवसांची मोहलत मागून घेतली आणि तो विचारात गढून गेला. दरम्यानच्या दिवसात तो तिला अनेक वेळा भेटून आला. आरती तिचे नाव. तिच्या बापानेच तिला विकले होते. तिचे गाव उत्तरप्रदेशातले लखीमपूर. तिने पावलोपावली विरोध केल्याने तिला मारहाण होत होती. रज्जूने तिला साडीचोळी दिली. तिच्या खाण्यापिण्याच्या चीजवस्तू घेऊन तो चकरा मारू लागला. तसतसे यमुनाच्या डोक्यात धोक्याचा सायरन वाजू लागला. इतके दिवस कोणाच्या हाती न लागलेला हा देखणा पोरगा त्या मुलीच्या प्रेमात पडत चाललाय हे तिने ओळखले. जशी ही मुलगी आली तसे रज्जूचे कामधंद्यावरील लक्ष उडाले होते. मुलगी त्याच्या हाती आली नाही तर अनर्थ घडेल आणि हाती आली तरी अनर्थच घडेल हे तिने ताडले होते. काहीही करून रज्जूला या प्रकरणातून बाहेर काढायला हवे कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता, शिवाय मीरचंद काय म्हणाला असता हा ही एक मुद्दा होताच. बराच विचार करून यमुनेने एक पत्र लिहिले आणि मीरचंदच्या पत्त्यावर पाठवून दिले.....

आणखी दोनेक आठवडे गेले. एका अस्वस्थ दुपारी एक अलिशान कार तिथे आली. कारमधून उतरलेला चिकणाचोपडा मध्यमवयीन तरुण थेट सरस्वतीबाईच्या कुंटणखाण्याकडे गेला. त्याच्या मागोमाग रज्जूही चुंबकाने खेचावे तसा ओढला गेला. सरस्वतीच्या घरात शिरताच त्या तरुणाने नोटांचे दोन बंडल तिच्या हाती ठेवले. आरती तयार होऊनच बसली होती. बहुधा तिला याबद्दल काहीतरी सांगितले गेले असावे. तिला हाताशी धरून तो पुढे झाला, वाटेत रज्जू आडवा आला. अकस्मात घडलेल्या या नाट्याने त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आरतीचेही डोळेही पाणावले होते. पुढच्याच क्षणाला सावध होत ती त्या तरूणासोबत निघून गेली. रज्जू थिजल्यागत बघत राहिला. रज्जूच्या डोळ्यासमोर ती कार धूसर होत गेली आणि भानावर आल्यावर त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. मागून आलेल्या यमुनेने त्याच्या खांदयावर हात ठेवला. त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण एक हिसडा देऊन तो आपले डोळे पुसत पुसत जिने उतरून गेला..

त्या दिवसानंतर रज्जू कोणाच्याही घरात गेला नाही. दोनतीन वेळा यमुना येऊन त्याला भेटून गेली. इतरही काही बायका तिथे येऊन गेल्या. सर्वांनी आपआपल्या परीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयंत्न केला पण त्याने ना कुणाला बोलू दिले ना कुणाचे काही ऐकून घेतले. त्या नंतरची तीन चार वर्षे तो मुडद्याचे जगणे जगला. नावालाच जिवंत ! त्याची तब्येतही थोडी ढासळली. धंदा सांभाळायला त्याने आता दोन तीन पोरे ठेवली. दिवसभर गुलालवाडीतल्या चाळीतल्या घरात तो एकट्याने बसून राही. आभाळाकडे बघत राही. एके दिवशी त्याच्या घरी यमुनेच्या कुंटणखाण्यावरची एक पोरगी आली. लता तिचे नाव. 'यमुना बहोत बीमार है...टाटा मेमोरियलमध्ये आहे, घशाचा कॅन्सर झालाय तिला....डॉक्टरबाबू बोले की लास्ट टाईम है..उसकू तेरेसे कुछ बोलना है... आयेगा क्या ?... वक्त बहोत कम है..' तिचे तुटक बोलणं ऐकून त्याच्या अंगावार सर्रकन काटा आला. काही क्षण गोठल्यागत बसून राहिला आणि एकाएकी उठून लताच्या मागोमाग चालू लागला. काही वेळात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला बघून यमुनेच्या चेहऱ्यावर जरा बरी कळा आली. तिने खुणेनेच त्याला जवळ बोलावले. ओठापाशी कान आणायला लावले. प्राण कंठात आणून ती त्याच्या कानात पुटपुटत राहिली. ती बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झराझरा बदलत गेले. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिचा सलाईन लावलेला हात हळूवारपणे आपल्या हाती घेऊन तो हमसून हमसून रडू लागला. रज्जू कामाठीपुरयात आल्यापासून यमुनेने त्याला सर्वात जास्त जीव लावला होता. त्याच्यासाठी तिने गोडधोड बनवले होते. त्याला आपल्या पोरागत मानलं होतं. त्यानं लग्न करावं, संसार करावा अशी तिची इच्छा होती. पण सरस्वतीच्या घरात घडलेल्या किश्श्याने सर्व स्वप्न विस्कटून गेलं होतं. आरतीला रज्जूने विकत घ्यावे इतके पैसे त्याच्याकडे नव्हते आणि तिच्यावर तर त्याचा अपार जीव जडला होता. तिला सोडून तो राहू शकत नव्हता इतका तो तिच्यात गुंतत गेला होता. यमुनेने मीरचंदला पत्र पाठवून स्वतःसाठी म्हणून काही पैसे पाठवण्याची विनंती केली होती पण त्याने हात वर केले होते. सरस्वतीला याचा अंदाज आला होता. तिने पुढे काही रामायण होण्याआधी आरतीलाच दुसरीकडे विकायचे ठरवले होते. त्या सौद्यात कुणी मध्ये आले असते तर तिने त्याचा काटा काढायला कमी केले नसते कारण आरतीची अजून नथ उतरलेली नव्हती. त्या बोलीचा अंदाज काढून यमुनेने तिच्याजवळच्या एका ओळखीच्या दलालास जास्तीच्या बोलीने आरतीला विकत घ्यायला सांगितले. यमुनेची ओळख न सांगता त्याने तो सौदा पार पाडला. आरतीने त्याच्यासोबत जावं म्हणून तिच्या मोठ्या मिनतवारया केल्या. नेमक्या त्या काळात यमुनेकडे पैशाची चणचण होती नाहीतर तिने थेट रज्जूच्या हाती पैसे ठेवले असते. पण तसे होऊ शकले नाही. त्या दलालाने आरतीला थेट कानपूरला नेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या इथे पोलिसांची रेड पडली. त्याच्यासह सगळ्या मुली पकडण्यात आल्या. आरती अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तिचा पत्ता हुडकून काढून तिला घरी पाठवण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण तिला घरी जायचे नव्हते, रज्जूला भेटायचे होते. त्यासाठी ज्या दलालाने इथे आणले त्याचाच आधार घेण्याचे तिने ठरवले आणि इथेच ती फसली. त्याने भूलथापा मारून दिल्लीतल्या कुंटणखाण्यात विकले आणि तिचे भोग संपायच्या ऐवजी वाढत गेले. पोलिस आणि दलालांच्या रॅकेटमध्ये बरेच पैसे फेकून यमुनेने ही माहिती काढली होती. ती रज्जूला देऊन त्याच्या ओझ्यातून तिला हलके व्हायचे होते, त्यासाठीच त्याला बोलावले होते.....

काही दिवसांनी यमुनेचा मृत्यू झाला. अनाथ असलेला रज्जू खऱ्या अर्थाने पोरका झाला. त्या दिवसापासून त्याने दारूचा आसरा घेतला. पण तो अट्टल दारुडा झाला नाही. रोज थोडीशी प्यायल्याशिवाय त्याला काहीच सुचत नसे. आपण जगलो तरच आरतीला शोधून काढू हे त्याने पक्के केले होते. त्यामुळे तो एकाच वेळी जगतही होता आणि तीळ तीळ मरतही होता. यमुना गेली त्या दिवशी त्याने मीरचंदला कळवले की तो कँटीनचे काम काही दिवसापुरते सोडून देतोय आणि नवे काम हाती घेतोय. त्याचे नवे काम होते, एस्कॉर्टचे. ट्रॅफिकिंगचे. पण यात तो फक्त कॅरियर आणि हँडलर होता. त्याचा मुलींशी कुठलाही थेट संपर्क नव्हता. त्याच्या संपर्कात येणारया दलालांना, पोरीबाळींना तो तिचे स्केच दाखवून तिला कुणी पाहिलं का याची विचारणा करायचा....

सर्व मुख्य रेडलाईट एरियात त्याने चाळून पहिले. पण आरती गवसली नाही. राजस्थानमध्ये त्याला एका प्रकरणी अटक झाली. चारेक वर्षे तो आत राहिला. नंतर त्याची निर्दोष सुटका झाली. पण बाहेर येईपर्यंत धंद्यातली त्याची जागा दुसऱ्याने घेतली होती. त्याला कामाची चिंता नव्हती. आता जगायचे कसे आणि कुणासाठी हा प्रश्न त्याचा मेंदू टोकरत गेला. त्याचे वय चाळीशीपर्यंत पोहोचले होते. जेलमधे त्याच्या तब्येतीची रया गेली होती. त्याचे नशीब बरे की त्याची मुंबईतली खोली शाबूत होती. तो मुंबईत परतला. काही दिवस त्याने स्वतःला कोंडून घेतले. मागच्या वर्षीच्या दिवाळीत सगळीकडे रोषणाई होती. त्याच्या खोलीत मात्र भकास अंधार होता. वाढलेली दाढी, करपलेले ओठ, लालभडक झालेले डोळे, एकेकाळी कपाळावर रुळणाऱ्या झुल्फांऐवजी विस्कटलेल्या जटा, मळके कपडे, पायात फाटक्या चपला, देशी दारूचा उग्र दर्प अन चालताना जाणारा तोल अशा भिकाऱ्याच्या अवतारात भाईदूजच्या दिवशी तो कामाठीपूऱ्यात गेला तेंव्हा त्याला कोणी ओळखले नाही. कामाठीपुराही आता बदलला होता. त्याचे कँटीन कधीच मोडीत निघाले होते. तिथे कसले तरी स्टेशनरीचे दुकान होते. तिथे जाताच त्याने एकवार आकाशाकडे आणि एकदा भोवतालच्या इमारतींकडे पाहिले. त्याची नजर बिस्मिल्लामंझीलकडे गेली. डोळ्यातून दोन थेंब हलकेच ओघळले. गालावरून रस्त्यावर पडले. त्यांना तुडवून जिने चढून तो सरस्वतीच्या खोलीकडे वळला. आतलं विश्व सगळं तसंच होतं. तीच फळकूटे आणि तेच कंपार्टमेंट ! तिथले सगळे चेहरे मात्र अनोळखी होते. तासभर तो बाहेर रेंगाळला. काही वेळाने खिशातली चुरगाळलेली शंभरची नोट काढून तो आत शिरला. 'इतने सुबह सुबह कौन भिकारी आया है' असं म्हणत तिथली आंटी पुढे झाली. तिच्या हातावर नोट पडताच ती गप्प झाली. त्याने दोन नंबरच्या कंपार्टमेंटकडे इशारा केला. तिने आतल्या पोरीला आवाज दिला. आतून आधी जांभईचा आणि नंतर 'भेज दो'चा किनरा स्वर आला. रज्जू लडखडतच आत गेला. त्या खणाचे दार आतून उघडले गेले. त्याने आरतीला पहिल्यांदा इथेच पाहिले होते. आरतीभेलकांडत तो आत गेला. आतल्या फाटक्या गादीवर बसला आणि त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. त्या पोरीला काही वेळ काही कळलेच नाही. त्याने दार लोटले. त्या सरशी ती जवळ येऊ पाहताच त्याने हाताने इशारा केला. तिला काहीच सुचले नाही. मागे सरकत तो प्लायवूडला रेलून बसला. तिने ओळखले की हे गिऱ्हाईक 'तसले' नाही. ती उभी राहून त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्याकडे बघत तो आवाज न करता अश्रू ढाळत होता. बराच वेळ गेला तरी हा बाहेर येईना म्हणून आंटीने त्या मुलीला आवाज देताच त्याने आणखीन एक नोट काढून तिच्या हाती दिली. तिने दार अर्धवट उघडून फटीतूनच ती नोट आंटीच्या हाती सरकवली. ती आता त्याच्या बऱ्यापैकी जवळ बसली होती. तिला डोळे भरून पाहून झाल्यावर त्याने एक हात खिशात घातला आणि एका हातात तिचे नाजूक हात घेतले. खिशातून काढलेल्या सर्व चूरगळून गेलेल्या नोटा तिच्या हाती ठेवल्या. ती मुलगी पार दिग्मूढ होऊन गेली होती. हळूच पुढे सरकत त्याने तिच्या मांडीवर डोके टेकवले, हातातील पैशाकडे इशारा करत तिला इथून जाण्याविषयी खुणावले. हातातले पैसे बघत ती त्याच्या धुळीने माखलेल्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिली. त्याचे डोळे सताड उघडे होते. ती भानावर येऊपर्यंत तर त्याचे श्वास थांबले होते. त्या मुलीच्या किंकाळीने अख्खी गल्ली हादरली.

'जाने कौन भिकारी सुबह सुबह आकर दुसरोंकी मुसिबते बढाते है..', 'होता नही तो आते क्युं?', 'अपनी तबियत का भी लिहाज लोग रखते नही'असा अनेकप्रकारे त्याचा उद्धार झाला. त्याला बघायला सगळ्याजणी गोळा झाल्या. त्यात लताही होती. तिने मात्र त्याला बरोबर ओळखले. 'रज्जूभय्या, मेरे भय्या' असं म्हणत तिने त्याच्या पार्थिवाला जोरदार मिठी मारली. ज्या रज्जूला ओळखत होत्या त्या बायापोरी गोळा झाल्या आणि एका अनाथ पोरासाठी कामाठीपुरा धाय मोकलून रडू लागला. मीरचंदच्या मुलांना निरोप पाठवला गेला. पण ते येण्याआधीच तिथल्या बायकांनी त्याच्यावर अंतिम संस्कार केले. मीरचंदची मुले गुलालवाडीतल्या त्यांच्या खोलीत गेली तेंव्हा तिथे फार काही सामान शिल्लक नव्हते. सगळी खोली धुळीने भरली होती., फाटके कपडे आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून होत्या. कोपऱ्यात एक ट्रंक होती. त्या ट्रंकेत पिवळसर झालेला कागद होता. त्यावर रेखाटलेले मुलीचे स्केच बऱ्यापैकी फिकट झाले होते. एका लाल कापडाच्या घडीत खोट्या सोन्याचे मंगळसूत्र होते. पाकळ्या झडून गेलेल्या गुलाबाच्या वाळून गेलेल्या बऱ्याच काड्याही होत्या....

- समीर गायकवाड.