Friday, February 17, 2017

तू ....अबोल्यातही एक अर्थ असतो, निशब्दतेतही एक हुंकार असतो,
नसलो जवळ तरी, स्पंदनात तुझ्या मी असतो....
प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते, अनुत्तरीत होण्यातही एक उत्तर असते,
नच उतरलो शब्दात तरी, काव्यात तुझ्या मी असतो .... 
दिसण्यातही एक आनंद असतो, दृष्टीचाही एक अथांग शोध असतो,
नसलो भोवताली तरी, डोळ्यांत तुझ्या मी असतो.
कपाळीच्या बटेतही एक माधुर्य असतं, ओठांतही एक आसक्ती असते,
नच स्पर्श केला तरी, देहगंधात तुझ्या मी असतो !
जवळीकीचाही एक कैफ असतो, कैफाचंही एक आत्ममग्न जिणं असतं,
नच सहवास लाभला तरी, परिघात तुझ्या मी असतो.
आकांक्षांचेही एक अनोखे टुमणे असते, हव्यासाचीही एक यादी असते,
नसलो भावविश्वात तरी, स्वप्नात तुझ्या मी असतो.
भुवयांच्या धनुष्यात एक प्रश्न असतो, हृदयातही एक चलबिचल असते,
नच बोललीस कधी तरी, निशब्दतेत तुझ्या मी असतो ! 

दुराव्यातही एक निकटता असते, निकटतेतही एक दुरावा असतो,
नसलो मिठीत तरी, हृदयाच्या कुपीत तुझ्या मीच असतो !...
वचनांनाही एक नैतिकता असते, नैतिकतेतही एक तडजोड असते,
निभावले नाहीस वचन कुठलेही तरी, अश्रूंत माझ्या तूच असतेस !

 - समीर गायकवाड.