Wednesday, February 8, 2017

एक अबोल मृत्यू ....ती एक बंगाली अभिनेत्री...बितास्ता सालिनी साहा हे तिचं पूर्ण नाव...सकाळी तिची बातमी वाचली आणि काही वेळापूर्वी तिचे फेसबुक प्रोफाईल चेक केले.... तिच्या अपार्टमेंटमधील राहत्या घरातील सिलिंगला तिचा मृतदेह दोन दिवसापासून लटकत होता...तिचे एक मनगट जखमांनी भरून गेले होते तर शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या...ती एकटीच राहत होती तिथे... भाऊ, बहिण आणि आईसोबतचे फोटो तिच्या प्रोफाईलवर आहेत... माझ्या सोनागाछीतल्या परिचितांशी बोललो तर त्यांनी तिच्याबद्दल वाईट साईट सांगितलं, जे कुठं छापून आलेलं नाही असलं सांगितलं... आता त्यावर सर्वत्र बोललं जातंय...
खूप कमी काळासाठी ती बांग्ला चित्रपटसृष्टीत चमकली, नंतर स्पर्धेच्या युगात मागे फेकली गेली... चकचकाट फार वाईट असतो, एकांतात अंधाराची धारदार सुरी चालवतो..तिच्यावरही ही सुरी चालली.... पण तिने त्याची पूर्वकल्पना देणाऱ्या पोस्ट जवळपास सहासात महिन्यांपासून बांग्लातून तिच्या प्रोफाईलवर दिलेल्या आहेत.... कुणालाच त्याचे काही कसे वाटले नाही ?... एक तरुणी आपलं आयुष्य संपवून टाकण्याच्या पोस्ट टाकते त्यावर तिला कुणाला आवरता येऊ नये हीदेखील एक शोकांतिकाच...

बितास्ता तिच्या वडिलांचे नाव लावत नव्हती, ती एक स्वाभिमानी मुलगी होती... तिला टॉपची हिरॉईन व्हायचे होते,पण त्यासाठीचे 'अन्य' कौशल्य तिच्याकडे नव्हते... तिला स्क्रीन टेस्टमध्ये वाईट अनुभव आले होते, ते तिने व्यक्त केले होते... कधी कधी खरे बोलणे अंगाशी येते, तसे तिचे झाले.... तिला त्यामुळे म्हणावे तसे चित्रपट भेटलेच नाहीत... घरादारापासून दूर फसव्या ग्लॅमरला भुलून संधीची वाट बघत ती एकटीच राहिली...संधी काही आली नाही पण डिप्रेशन येत गेले जे तिच्या पोस्टमधून ठिबकते आहे... बितास्ता देखणी होती, तरुण होती, शिक्षित होती पण महत्वाकांक्षी होती... आजच्या पोरी ठोरी काढतात तशा ढीगभर सेल्फ्या तीही काढायची अन एफबीवर लोड करायची....

आपलं फिलिंग सांगण्यासाठी तिला कुठलं कोंडाळं जिवलग वाटलं नाही की कुणा मित्राकडे शेअर करावे वाटले नाहीत.... ती लिहिते - রং আছে তবু রঙ্গিন নয়.... Nevertheless, it is not dyed colors .... জানি না ফুরাবে কবে এই পথ চাওয়া........ I do not know when to terminate In this way it ........ तिचं लेखन हळवं आहे, एखाद्या कवयित्रीसारखं तिनं अनेकदा लिहीलंय... कदाचित आपल्यातल्या हरलेल्या अभिनेत्रीच्या अगम्य शोधात तिने तिच्यातल्या कवयित्रीचा शोध कधी घेतलाच नसावा...

आता पोलीस तपास करताहेत... अनेक संशयाची भुते उभी राहतील... ज्यांना ती असून नसल्यासारखी होती ते नातेवाईक शोक व्यक्त करतील.... तिला मरून तीन दिवस होत आले तरी ज्यांना तिची साधी विचारपूस करावीशी वाटली नाही ते शेजारी पाजारी तिच्याबद्दल कोरडं दुःख व्यक्त करत वाहिन्यांना बाईट देतील.... ज्या बांग्ला इंडस्ट्रीने तिला कामं दिली नाहीत ती तिचे मेकअप चढवून,डोळ्यात ग्लिसरीन घालून कौतुक करेल.... हे सारं खोटं असतं.... कुणाएका जवळ तरी तिने मन मोकळं करायलाच हवं होतं... मन मोकळं केलं की जगण्याची उमेद वाढते....

आपल्या आसपास कुणी जीव देण्याची भाषा करत असेल वा किंवा डिप्रेशनमध्ये असल्याची भाषा करत असेल तर त्याच्या खांद्यावर हात टाकायला हवा, त्याला बोलतं करायला हवं... कसं का असेना पण जगण्यासाठी प्रवृत्त करायला हवं... ही लढाई एकतर्फीच असते, विधाता खेळवत असतो आणि आपण प्यादी बनून खेळत राहतो. म्हणून का आपण हा आयुष्याचा सारीपाट सोडून जायचं का ?... कदाचित आपल्या पाऊलखुणा दुसरयाच्या आयुष्यासाठी हमरस्त्याचे काम करू शकतील...

वाईटसाईट, फालतूची अनेक कामे आपण एफबीवर करतच असतो पण एव्हढेसे छोटे पण महत्वाचे काम करायला काय हरकत आहे ?....

बितास्ता तू चुकलीस, तुझ्या मनातलं तू एफबी वर सांगायच्या ऐवजी कुणाजवळ तरी तू बोलायला पाहिजे होतंस, कारण ही आभासी दुनिया आहे. इथली नाती बहुत करून आभासी अन इथलं प्रेमही तात्कालिकच ! माझ्यासारखे रिकामटेकडे लोक लेख लिहितील... रुपेरी पडद्याआडचा काळाकुट्ट चेहरा पुन्हा पुन्हा समोर आणतील.... लोक rip लिहून किंवा ohh so sad असलं काही तरी लिहून पुढे जातील... त्याऐवजी लोकांनी यातून थोडं जरी भान राखलं तरी किमान एफबीवर व्यक्त होणाऱ्या अन्य बितास्ताचा जीव जाण्याची वेळ येणार नाही.... बोलूनसुद्धा तू अबोल ठरलीस, तुझ्या निशब्द मृत्यूसाठी माफ कर ...

ईश्वर तुझ्या आत्म्यास सद्गती देवो ....

- समीर गायकवाड.