Thursday, February 23, 2017

प्रिया राजवंश - बॉलीवूड'स मर्डर्ड मदर.....


जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांनी बांधावर खून पाडावा किंवा कनिष्ट- मध्यम वर्गीय उत्पन्न असणाऱ्या कुटुंबात आर्थिक चणचणीवरून हत्याकांडे घडलेली आपण पाहतो. तसेच सावत्र आई, सावत्र मुले यांच्यातील संबंध सुरळीत नसतात. हे फक्त सामान्य कुटुंबात घडते असे नव्हे तर बॉलीवूडदेखील हेच सांगते. बॉलीवूडच्या गर्भश्रीमंतीत जन्मलेल्या मुलांनी इस्टेटीपायी सावत्र नात्याचा खून करावा हे खोटे वाटेल ! पण असं घडलं होतं. केवळ आणि केवळ संपत्तीच्या वादातून एका अभिनेत्रीची सावत्र मुलांकडून हत्या झाली होती. त्या अभिनेत्रीची, तिच्या अनोख्या प्रेमाची ही पोस्ट....

काही स्त्रिया किंचित पुरुषी दिसतात तर क्वचित काही पुरुषही स्त्रियांच्या तोंडवळयाचे असतात. त्यांच्यात इतर काही कौशल्ये असो नसो पण या वैशिष्ट्यामुळे ते ध्यानात राहतात. प्रिया राजवंश ही एक अशा व्यक्तींपैकी होती. आपल्याहून बावीस वर्षे मोठे असणाऱ्या साथीदारासोबत त्या काळात तब्बल साडेतीन दशके लिव्हईनमध्ये राहण्याचे धाडस तिने केले होते. प्रियाचा सर्वांना परिचित असणारा सिनेमा म्हणजे राजकुमार अभिनित 'हिर रांझा' होय. त्यातले 'ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही ...' हे रफीच्या आवाजातलं दर्दभरं गाणं ठाऊक नाही असा रसिक विरळाच !      
              
प्रियाचा जन्म एकोणीसशे सदोतीसचा. शिमल्यातल्या निसर्गरम्य परिसरात उच्चभ्रू घरात ती जन्मली होती. तिचं बालपणीचं नाव वीरा सिंह ! तिचं शालेय शिक्षण सिमल्यातलंच. शाळेत असताना तिनं अनेक इंग्रजी नाटकांत अभिनय केला होता. त्याची गोडी कधी लागली हे देखील तिला लक्षात आले नाही. वनविभागात कंजरवेटर म्हणून काम करत असताना प्रियाच्या वडिलांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते. प्रियासुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला गेली होती. तेथे गेल्यानंतर तिने रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्स या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. प्रिया खूप सुंदर होती. नाटकात काम करताना एका फोटोग्राफरने तिची काही छायाचित्रे काढली.

याच काळात चेतन आनंद लंडनमधील त्याच्या एका मित्राच्या घरी गेला होता. तिथे ही छायाचित्रे त्याच्या बघण्यात आली. त्यावेळी चेतन आनंद त्यांच्या 'हकीकत' या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता. ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता. भारतीय फौजांना त्यात माघार घ्यावी लागली होती. या थीमवर आधारित सिनेमा चेतन बनवत होता. हिंदी चित्रपटसृष्टीत युद्धपट निर्माण करण्यात चेतनला स्वारस्य होते. त्यामुळे या कथेला सूट होईल अशी नायिका तो शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रियाचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्याने थेट तिच्याशी संपर्क साधून तिला आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून तो विभक्त झाला होता. जीवनातील एकाकीपणामुळे तो बेचैन होता.

चित्रपटसृष्टीतही त्याच्या हाती खास काही लागले नव्हते. 'हकीकत' हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. प्रियाने केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतनला मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही.  

उभ्या आकाराच्या, निमुळत्या चेहऱ्याच्या प्रियाचं दर्शन कॅमेऱ्याच्या विशिष्ट कोनातूनच जास्ती सुखद वाटे. समोरून किंवा डाव्या बाजूने चित्रित केलेल्या सीन्समध्ये ती फारशी खुलून दिसत नसे. लांबसडक नाक, उभट चेहरा, काळाभोर विशाल केश संभार आणि लक्षात येणारी उंची, शिडशिडीत बांधा, अस्पष्टसे उच्चारण आणि भेदक नजर ही तिची वैशिष्ट्ये. 'हकीकत' रिलीज झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला. प्रिया रातोरात बिग स्टार झाली. चेतनचेही अपयशाचे ग्रहण संपले. १९५० मध्ये चेतन आणि देवआनंदने मिळून 'नवकेतन' सुरु केली होती. पण ते यश देव आणि नवकेतनच्या नावावर नोंदवले गेले. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने 'हिमालया फिल्म्स' सुरु केली. चेतनची एक खास टीम होती, जाल मिस्त्री, कैफी आझमी आणि मदनमोहन ! या टीममध्ये आता प्रिया राजवंशचे नाव सामील झाले. चेतनने हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रियाला रोल दिले. 'हकीकत'नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते.

'हकीकत'नंतर प्रियाला अनेक ऑफर आल्या. मात्र तिने केवळ चेतन आनंद यांच्यासोबतच काम करणे पसंत केले. तिने इतर मोठमोठे बॅनरचे चित्रपटही नाकारले. यामुळे तिच्या सिनेमांची संख्या मोजकीच राहिली. 'हकीकत'नंतर १९७० मध्ये 'हीर रांझा', १९७३ मध्ये 'हिंदुस्थान की कसम' आणि 'हंसते जख्म', १९७७ मध्ये 'साहेब बहादुर', १९८१मध्ये 'कुदरत' आणि १९८५मध्ये 'हाथों की लकीरें' या सिनेमात प्रियाचे दर्शन झाले होते. हे सर्व चित्रपट चेतनच्या हिमालया फिल्म्सचे होते.‘हिंदुस्तान की कसम’मध्ये तर प्रियाची ताहिरा आणि मोहिनी अशी दुहेरी भूमिका होती. तिला एक गायिका म्हणून भारतीय वायुसेनेतर्फे पाकिस्तानात हेरगिरीसाठी पाठविले जाते त्यावेळी भारतातील आपल्या प्रियकरासाठी तिने गायलेलं....'है तेरे साथ मेरी वफामैं नही तो क्या जवां रहेगा...' हे गाणं खूप श्रवणीय आहे. प्रियाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या चेतनने प्रियालाच नायिका बनवण्याचा हट्ट केला आणि त्यापायी आपल्या भावांबरोबर त्याचे वादही झाले. घडलं असं की, नवकेतनच्या  'गाईड' सिनेमातील रोझीच्या पात्रासाठी देवआनंद माला सिन्हाला घेऊ इच्छित होते. तर प्रियानेच या सिनेमात काम करावे, अशी चेतनची इच्छा होती. तर चेतन आणि देवहून धाकटे असलेले विजय आनंद यांची पसंती वहिदा रहमानला होती. आपल्या प्रेमिकेच्या नावावर चेतन आपल्या दोन्ही भावांना राजी करु शकला नाही. त्यामुळे त्यांनी देव आनंद यांना माला सिन्हाच्या नावावर आपला विरोध दर्शवला आणि वहिदा रहमानच्या नावाचे समर्थन केले. अशाप्रकारे 'गाईड' सिनेमात वहिदा रहमानने काम केले आणि सिनेमा सुपरहिट ठरला. इथून आनंद बंधुतले सख्य कमी झाले. देव आणि विजय नवकेतनमध्ये राहिले तर चेतनच्या 'हिमालया'त ते कधी सामील झाले नाहीत. 

चेतन आणि प्रियाचे एकमेकावर निस्सीम प्रेम होते. त्यांनी व्यवासायिक तडजोडींची, नातेसंबंधांची कशाचीच पर्वा केली नाही. आपल्या प्रेमाला नात्याचे नाव दिले नाही. त्यांनी विवाह केला नाही. तसेच आपल्या प्रेमाला कधीही ओव्हररीएक्ट केले नाही की कुठला थिल्लरपणाही केला नाही. सप्तपदीच्या फेऱ्या मारलेल्या दांपत्याहून अधिक पारदर्शकता त्यांच्यात होती आणि नात्यात अधिक गहिरेपणा होता, एकमेकाप्रती अगाध विश्वास होता. तब्बल पस्तीस वर्षे ते एकत्र राहिले. शेवटच्या सहा वर्षात जुहूच्या रुईया पार्कमध्ये त्यांनी दोन घरे केली होती. प्रिया दिवसातून दोनदा चेतनच्या घरी जायची. दुपारचे लंच घेऊन परत यायची रात्रीचे ड्रिंक्सडिनर घेऊन सकाळी परत यायची. त्यांचे घनिष्ट सहकारी सांगतात की, शेवटच्या दशकात एखाद्या सामान्य पतीपत्नीप्रमाणेच त्यांच्यातही  किरकोळ वाद व्हायचे, रुसवे फुगवे व्हायचे आणि पुन्हा पहिल्याहून अधिक उत्कट एकोपा व्हायचा. शेवटी नियतीने ही जोडी तोडली. वयाच्या शहात्तराव्या वर्षी सहा जुलै एकोणीसशे सत्त्याणवला चेतन आनंदचे मुंबईत निधन झाले. या वेळी प्रियाने साठी गाठली होती. इथून पुढे प्रियाच्या आयुष्यात काळोख दाटत गेला....

आपल्या प्रिय जोडीदाराच्या दुःखद निधनातून ती कधीच सावरली नाही. ती एकांतात राहू लागली. तिच्या मनात विमनस्कता दाटून आली. त्याहून अधिक तिला भीती वाटू लागली. होय भीतीच ! चेतनच्या पाठीमागे त्याची गडगंज संपत्ती, त्याच्या सिनेमांचे कॉपीराईटस यांचा वाद सुरु झाला. चेतनची पहिली पत्नी उमा आनंदने यात मोठी फूस लावली. तिची मुले आता मोठी झाली होती. आपल्या पित्याच्या हयातीत ते प्रियाला अडवू शकले नाहीत, पण पित्याच्या मृत्यूनंतर त्यांनी रुईयापार्कमधील अलिशान बंगल्यातून प्रियाला हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरु केले. ते तिला धमकावू लागले. प्रियाने आपल्या प्रिय साथीदाराच्या नावाला बट्टा लागायला नको म्हणून पोलिसांकडे रीतसर तक्रार देणं टाळलं आणि हेच तिला महागात पडले. 

प्रियाकडे हिंदी सिनेमात दाखवतात तशी नोकरांची एक जोडी होती. माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी त्यांचं नाव. उमा आनंदची मुले केतन आणि विवेक यांनी या दोघांशी संधान बांधले आणि एक कट शिजवला. २७ मार्च २००० रोजी तिचा गळा आवळून आणि मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. आधी तर ही आत्महत्या असल्याचे भासवण्यात आले पण प्रत्येक खून काहीतरी सुगावे मागे ठेवून जातो तसेच या खूनाचे झाले. चेतनच्या मृत्यूनंतर  प्रियाने डायरीत काही नोंदी केल्या होत्या. शिवाय आपल्या दिवंगत प्राणसख्याच्या नावाने एक पत्र लिहिले होते. यात आपल्या जीविताला धोका असल्याचे, धमक्या दिल्या जात असल्याचे आणि इस्टेटीपायी आपले बरेवाईट होण्याचे संकेत दिले होते. आपल्याला वाटणारी भीतीही तिने अधोरेखित केली होती. प्रियाने लिहिलेली ही पत्रे न्यायालयाने मोठा परिस्थितीजन्य पुरावा मानून चौघाही आरोपींना दोषी मानून जन्मठेपेची सजा सुनावली...

प्रिया काही फार प्रतिभावंत अभिनेत्री होती अशातली बाब नाही. पण बॉलीवूडसारख्या बेगडी प्रेमाच्या विश्वात राहून प्रिया आणि चेतनने प्रेमाचा नवा आदर्श घालून दिला होता. सुखवस्तू घराण्यात जन्मून केवळ आपल्या जोडीदाराच्याच होमप्रॉडक्शनमध्ये काम करणारी, त्याच्या आवडी निवडी सांभाळणारी, त्याला कामात मदत करणारी प्रिया एक उत्कृष्ट सहचारिणी होती. तिची अखेर अशा पद्धतीने झाल्यावर डोळ्यात ग्लिसरीन घालून खोटं खोटं रडणाऱ्या बॉलीवूडच्या डोळ्यात खरेखुरे पाणी दाटले होते...   

चेतनच्या हीर रांझामध्ये प्रियाचे एक गाणं होतं. "मिलो न तुम तो जी घबराये, मिलो तो आंख चुराये, हमें क्या हो गया हैं ...." चेतन गेल्यावर या गाण्याने प्रियाला नक्कीच सतावले असणार आणि गाण्यातील नवे अर्थ शिकवले असतील. मी ही जेंव्हा कधी हे गाणे ऐकतो तेंव्हा चित्रपटातील हीर रांझाची कथा डोळ्यापुढे येण्याऐवजी या खऱ्या खुऱ्या हीर रांझाची जोडी समोर येते... 

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment