Tuesday, February 14, 2017

प्रेम ....


प्रेम कुणावर करावं ? 
मातीत उगवणाऱ्या हिरव्यापिवळ्या कोंबावर करावं
गव्हाच्या लोंब्यावर, जुंधळयातल्या चांदण्यांवर, चंद्राच्या गोंदणावर करावं. 
दंडातून वाहणाऱ्या पाण्यावर, विहिरीत घुमणाऱ्या पारव्यावर 
निळ्या जांभळ्या आकाशावर, त्यातल्या शुभ्र मेघांच्या अभ्रांवर करावं.
पुर्वाईच्या अपार लालीवर, मावळतीच्या जास्वंदी झिलईवर, 
झाडांच्या किनखापी नक्षीवर, वडाच्या पारंब्यांवर अन धुक्याच्या दुलईवर करावं
प्रेम मातीच्या रोमरोमावर करावं पण प्रेमाची माती न करावी...

प्रेम गाईच्या करूण डोळ्यातल्या पाझरावर, माळरानातून वाहणाऱ्या निर्झरावर
शिवारातल्या चंद्रमौळी घरावर अन गावातल्या मायाळू पारावरही करावं !
झाडाच्या सावलीवर, रंगीबेरंगी फुलांच्या वेलीवर, रानातल्या तालींवर 
बैलाच्या मखमली कातडीवरल्या नक्षीदार झुलीवरही प्रेम करावं..
प्रेम, देवळात दडून बसलेल्या पाकोळयांवर, तुळशी वृंदावनातील मंजुळांवर,
बांधावरून दिसणारया नितळ पारदर्शी लवलवत्या मृगजळावरही करावं.
प्रेम दवातल्या मोत्यासारखं असावं, चकाकलं तरी हाती न लागणारं !

प्रेम बोरीच्या काट्यावर करावं, सूरपारंब्याच्या वेड्यावाकड्या फाट्यांवर,  
बाभळीच्या स्थितप्रज्ञ बाण्यावर, आंब्याच्या मोहरावर, गुलमोहराच्या बहरावर 
चिंचेच्या घनगर्द पानांवर, पिंपळपानांच्या जीवनगाण्यावर करावं !     
प्रेम मुंगळयांच्या रांगेवर, बैलगाडीच्या धावेवर, वासराच्या लडिवाळ मायेवर
भुकेजलेल्या चुलीतल्या धगीवर करावं अन कडब्याच्या गंजीवरही करावं. 
कापसाच्या बोंडावर, बैलाच्या रुबाबदार वशिंडावर, ओबडधोबड धोंडयांवर,
गुरांच्या दमलेल्या खुरांवरही प्रेम करावं, अश्रापांचं दुःख आपल्या अश्रूतून व्हावं ! 

प्रेम धुंवाधार कोसळणाऱ्या जलधारांवर करावं, काळ्याकुट्ट ढगांवरही करावं
लकाकणाऱ्या सौदामिनीवर प्रेम करावं, रणरणत्या उन्हावही प्रेम करावं,
प्रेम मभावर करावं, कुंद ढगांवर करावं, त्याहून अधिक निरभ्र नभावर करावं. 
झुळझुळत्या शीतल हवेच्या लाटांवर, बंडखोर वादळाच्या विद्रोही वाऱ्यांवर
प्रेम वैशाखातल्या उष्म झळांवर, दगडाखालच्या जीर्ण ओलाव्यावर करावं,
पत्थरातल्या झऱ्यांवर, झऱ्यांच्या खळखळाटावर, आटलेल्या पाटावरही करावं 
प्रेम अतिवृष्टीवही करावं अन त्यात टिकून राहणाऱ्या लव्हाळयावरही करावं
  
प्रेम बळीराजाच्या थकलेल्या हातांवर करावं, भाळावरच्या घामावरही करावं
प्रेम श्रमिकाच्या काबाडकष्टावर, निढळ कमाईवर, इमानी नियतीवरही करावं
संन्यस्थ औदुंबराच्या विरक्तपणावर, केळीच्या नजाकतदार पानावर प्रेम करावं
पानातल्या वेणूनादावर, घरट्यातल्या पिलांवर, पक्षिणीच्या अथक पंखांवर  
धारदार विळ्यावर, जात्याच्या जड पाळ्यावर, गवताच्या तेजतर्रार पात्यावर
नांगराच्या फाळावर, शेकोटीतल्या जाळावर, सुगीतल्या खळयावरही प्रेम करावं 
इतकंच नव्हे तर सृष्टीचं मोल शिकवणारया होरपळत्या दुष्काळावरही प्रेम करावं 

प्रेम शेतशिवारांच्या प्रसन्न भूपाळीवर, लयबद्ध दुपारच्या निरव पानगळीवर, 
सांजेच्या पणतीतल्या मंद ज्योतीवर करावं, प्रेम सर्व प्रहरांवर करावं !
लक्ष चांदण्याच्या नेत्रांनी शेतात डोकावणाऱ्या अंधारवेळांवरही प्रेम करावं  
आईच्या दंड घातलेल्या रजईवर प्रेम करावं, खडबडीत वाकळेवर करावं
शेणाने सारवलेल्या जमिनीवर करावं, अंगणातल्या बाजेवरही प्रेम करावं !
प्रेम मंदिरांच्या शिखरांवर, मस्जिदीच्या मिनारांवर, मायबापाच्या चरणांवर 
डोळे मिटल्यावर दिसणाऱ्या विश्वनिहंत्यावर प्रेम करावं, प्रेमाचा धर्म व्हावा !  
प्रेम आत्म्यातल्या सृष्टीवकरावं अन चराचराचा आत्मा होऊनी जावं !

- समीर गायकवाड.