Thursday, January 5, 2017

गोष्टीवेल्हाळ माणसं - श्री.ना.पेंडसे ....
हर्णेच्या परिसरातलं गारंबी हे छोटेखानी गाव. इथल्या यशोदा-विठोबाच्या दारिद्रय़ात पिचणाऱ्या घरात बापूचा जन्म झाला. विठोबा हा निरुपद्रवी, सरळमार्गी माणूस. परिस्थितीनं पार वाकलेला. अण्णा खोतांच्या घरी पाणक्या असलेला. यशोदाचाही कामानिमित्तानं अण्णा खोतांच्या घरात सतत राबता. अठराविश्व दारिद्रय़ात जन्मलेल्या बापूचं मात्र आपल्या ब्राह्मण आळीपेक्षा गुरवांच्या वस्तीत जास्त उठणं बसणं. त्यामुळे समस्त ब्राह्मणांचा त्याच्यावर राग. विशेषत: अण्णा खोतांचा! तशात गुरव आणि ब्राह्मणांत उभा दावा. साहजिकच ब्राह्मण बापूचं गुरववाडय़ातलं उठणं-बसणं, त्यांच्याकडं खाणं ब्राह्मणांना खुपणारं.अशात गुरवांच्या यमीला दिवस गेल्याचं प्रकरण बापूवर शेकवलं जातं. बापूला वेसण घालण्यासाठी अण्णा खोतांनीच हे कुभांड रचलेलं असतं. काटय़ानं काटा काढावा तसं गुरवांना बापूच्या विरोधात फितवून त्याला आयुष्यातून उठवायचा अण्णांचा यात डाव असतो. वर साळसूदपणे पंचायतीत दंड भरून बापूला सोडवण्याचं केलेलं नाटक हाही त्याचा कटाचा भाग. बापू अण्णांना पुरेपूर ओळखून असतो. पण कात्रीत सापडल्याने तोही हतबल होतो. दंड भरल्यानं त्याआळातून सुटका झाली असली तरी त्याच्यावरचा डाग गेलेला नाही हे बापू जाणून असतो. सतराशे साठ भागनडी करूनही गावात उजळ माथ्याने फिरणाऱ्या भ्रष्ट माणसांचा वीट येऊन बापू पुलावरच्या रावजीच्या हॉटेलात नोकरी पत्करतो आणि गाव सोडतो.


अस्थम्यानं बेजार झालेल्या रावजीला बापूच्या रूपात परीस सापडतो. बापूच्या मित्रमंडळींच्या राबत्याने त्याच्या हॉटेलला बरकत येते. रावजीची बायको राधालाही बापूचं नितळ माणूसपण भुरळ घालतं. विजोड रावजीच्या संसारात परिस्थितीनं आणून टाकलेल्या राधाला बापूचं पौरुष साद घालतं. बापूही या बुद्धिमतीकडे आकर्षित होतो. गारंबीत त्यांच्यातील जवळिकीची चर्चा सुरू होते. परंतु परस्परांबद्दल कितीही आकर्षण असलं तरी त्यांनी आपल्या मर्यादांचा भंग केलेला नसतो. बापूच्या मावशीच्या कानावर ही चर्चा जाते आणि ती बापूला जाब विचारायला रावजीच्या हॉटेलात येते. बापू खरं काय ते तिला सांगतो. तरीही तिची समजूत पटत नाहीच. असल्या उनाड गप्पांना आपल्या लेखी कुठलंही स्थान नाही असं बापू निक्षून सांगतो.

पण विठोबाच्या आकस्मात मृत्यूनं मात्र बापू हादरतो. त्याला दिलेलं वचन त्याला आठवतं. भरपूर पैसा कमवून विठोबाला सुखात ठेवायचं वचन! रावजीच्या हॉटेलात राहून हे वचन पूर्ण करता येणार नसतं. तो जड अंत:करणानं राधा आणि रावजीच्या हॉटेलचा निरोप घेतो.

मुसा काजीकडे पडेल ती कामं करून व्यापाराचं तंत्र बापू अवगत करतो. आणि एके दिवशी स्वत:चा व्यापार सुरू करून गडगंज पैसा करतो. दरम्यान, रावजीचा मृत्यू झालेला असतो. बापू राधाला पत्नी म्हणून स्वीकारतो. वयानं ती त्याच्यापेक्षा मोठी असली आणि विधीवत लग्न झालेलं नसलं तरीही मनानं ते पती-पत्नी झालेले असतात. बापू गावात शाळा, दवाखाना उघडतो. अनेक अडल्यानडलेल्यांना सढळ हस्ते मदत करतो. त्यामुळे राधा-बापूचं हे लोकविलक्षण नातं गावाला मंजूर नसलं तरी गावकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. अण्णा खोतांच्या पोटात त्यामुळे खदखदत असतं.

आता बापूला सरपंच होण्याचे वेध लागलेले असतात. अण्णांच्या नाकावर टिच्चून त्यांना संपवण्यासाठी त्याला सरपंच व्हायचं असतं. राधा परोपरीनं त्याला समजवायचा प्रयत्न करते, की तू या नसत्या भानगडीत पडू नकोस. पण बापू हट्टाला पेटलेला असतो. साम-दाम दंड भेद अशा कुठल्याही मार्गानं त्याला सरपंचपद काबीज करायचं असतं. अण्णांचा सूड घेण्यासाठी! कारण आईचे आणि अण्णांचे अनैतिक संबंध त्याला आयुष्यभर छळत आलेले असतात. विठोबाच्या मृत्यूतही अण्णांचाच हात असावा असा त्याला संशय असतो. या साऱ्याचा हिशेब तो सव्याज चुकता करतो....

श्री. ना. पेंडसे यांची गारंबीचा बापूही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. गारंबीच्या बापूची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे! म्हणूनच श्री. ना. पेंडसे यांना या कादंबरीचा पुढचा भाग गारंबीची राधालिहावा लागला. त्यात अर्थात पहिल्या कादंबरीतलं झपाटलेपण नाही. डोंगरदऱ्यांतून प्रचंड आवेगाने रोरावत येणारी नदी मैदानी प्रदेशात आल्यावर शांत, स्थिर व्हावी, तद्वत ही दुसरी कादंबरी असल्यानं वाचकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा (कदाचित) तिनं भंग केला असावा. असो. पण पुढे श्री. नां. नी गारंबीचा बापूहे नाटकही लिहिलं. आणि यातल्या बापूच्या आईवर स्वतंत्रपणे यशोदाहे नाटकसुद्धा. या कादंबरीतल्या प्रमुख पात्रांवर स्वतंत्रपणे कलाकृती रचाव्यात, इतकी ही माणसं गुंतागुंतीची, गहन व गूढ आहेत. गारंबीचा बापूनाटकालाही लोकांनी भरपूर वाखाणलं. म्हणूनच दोनदा पुनरुज्जीवित झालेलं हे नाटक अनेक वेळा रंगभूमीवर विविध संचात दाखल झाले आहे. पीरियड प्लेम्हणून त्याचं महत्त्व आहेच, परंतु त्यातली हाडामासांची माणसं आणि त्यांचं जगणं हेही एका अभेद्य चक्रव्यूहाचा भेद करण्याइतकंच आव्हानात्मक आहे. आणि यासाठीच अशी नाटकं पुन: पुन्हा रंगभूमीवर यायला हवीत. आजकालच्या गल्लाभरू आशयांच्या भाऊगर्दीत अस्सल कथाबीजं असणारी नाटके दुर्मिळ होत चालली आहेत त्यामुळे ही जुनी नाटके पुन्हापुन्हा आठवत राहतात. पेंडसेंनी लिहिलेली 'रथचक्र'ही देखील एक अफाट रसिकप्रिय कादंबरी ठरली.

'रथचक्र' ही आपली सर्वात यशस्वी कादंबरी आहे, असे स्वतः लेखक श्री. ना. पेंडसे सांगतात. त्यावरूनचं लेखनाची थोरवी समजते. पेंडसे यांनी ही कादंबरी एका वेगळ्या तंत्राने हाताळली आहे. मराठी कादंबरीच्या विकासाने १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या 'रथचक्र'ने एक नाव टप्पा गाठला असल्याचे प्रशंसा समीक्षकांकडून त्यावेळी करण्यात आली होती.यातील कृष्णाबाई सारखी काही पात्रे वास्तवातून आली आहेत. नायिकेच्या नियतीशी चाललेला मुकाबला हे कादंबरीचे सूत्र आहे.आपल्या पोटच्या मुलांनी शिकावं, त्यांना समाजात मानाने जगता यावं; यासाठीच केवळ आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या 'आई' ची ही कहाणी. संन्यासी नवरा, त्रासदायक दीर - जावा या सगळ्या कचाट्यातून एकटी बाहेर पडून ती मुलाला शिक्षण देते परंतु खस्ता खाऊनही आयुष्याच्या शेवटी आत्महत्येशिवाय तिचाकडे कोणताच पर्याय उरत नाही. कादंबरी ही नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करते हे माहित असूनसुद्धा चित्रपटाप्रमाणे 'सुखांत'ची सवय लागलेल्या मनाला 'रथचक्र' चा शेवट चटका लावून जातो. 'गारंबीच्या बापू'स तोडीस तोड कादंबरी म्हणता येईल. 'एका आईने आपल्या मुलाचं भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीची मूळ कल्पना होती', असे पेंडसे यांनी नमूद केले आहे.

पेंडसेंनी लिहिलेल्या 'एक होती आजी'मध्ये आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे.
ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक कौटुंबिक प्रसंग पेंडसेंनी उलगडून दाखवले आहेत. नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने कथाबीज गुफलेले आहे.
तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती ?
लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्याप्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तऱ्हेने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `तेअमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल.

श्री.नां.नी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी लिहीली. ती म्हणजे 'तुंबाडचे खोत'. मुळातच या द्वीखंडी कादंबरीचा आवाका प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्यातील ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटीश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगीचा म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे. तरी स्थळ मात्र एकच : तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. चार पिढ्यांच्या कहाणीची ही कादंबरी चौदाशे पानांची दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते.

एका मध्यमवर्गीय तरुणाचा जीवनप्रवास त्याच्या रोजनिशीच्या रुपात श्री नां.नी 'लव्हाळी'मध्ये मांडला आहे. १९३७ ते १९४७ पर्यंत महायुद्ध आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, यांच्याकडे पाहण्याचा मध्यमवर्गीयांचा दृष्टीकोन या पुस्तकात दिसतो. 'लव्हाळी'प्रमाणेच त्यांनी लिहिलेल्या ऑक्टोपसला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ऑक्टोपसचे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते.

स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी वाङ्मयाचा विचार करायचा झाला तर या प्रवासातील ठळक नाव म्हणून श्री. ना. पेंडसे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.किंबहुना मराठी कादंबरी वाङ्मयाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करावयाचा झाला तर हरिभाऊ (ह. ना. आपटे), शिरूभाऊ (श्री. ना. पेंडसे) आणि भालचंद्र नेमाडे या तीन ठळक टप्प्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. फडके-खांडेकरांनी मराठी कादंबरीला कलारंजन आणि स्वप्नरंजनात अडकवून ठेवल्याने ती सत्त्वहीन आणि कृतक होऊ पाहत होती. अशा वळणावर ज्या कादंबरीकारांनी मराठी कादंबरीला तिचे सत्त्व बहाल करण्याचे, वास्तवाचे अधिष्ठान देण्याचे महत्त्वाचे कार्य केले, त्यापकी श्री. ना. पेंडसे हे एक होत. पेंडसेंना यासंदर्भात झुकते माप देण्याचे कारण असे की, मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबर्‍यांपासून रूढ झाली. म्हणूनच मराठी कादंबरीचा विचार करताना पेंडसेंचा विचार ठळकपणे करावा लागतो, तो या अर्थाने. मराठीतील ट्रेंड-सेटरकादंबरीकार म्हणून पेंडसेंचे महत्त्व अमान्य करता येत नाही.

कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच. खडकावरील हिरवळहे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. याचा अर्थ पेंडसेंच्या लेखनाची सुरुवात व्यक्तिचित्रांपासून झाली. पण हे एकमेव व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सोडले तर त्यांनी पुढे या प्रकारचे लेखन केले नाही. तीच गोष्ट त्यांच्या कथालेखनाच्या संदर्भातही सांगता येईल. जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. पण या दोन्हीचा उपयोग त्यांच्या कादंबरीलेखनासाठी, त्यातील आशयद्रव्यासाठी पुरेपूर झाला. त्यातही त्यांच्या खडकावरील हिरवळया पुस्तकाच्या संदर्भात हे विधान अधिक ठोसपणे करता येईल. व्यक्तीचा शोध घेणे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पदर, पैलू जोपर्यंत आपल्याला गवसत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हे पेंडसेंच्या लेखनधर्माचे एक लक्षण सांगता येईल.

पेंडसेंची पहिली कादंबरी एल्गार१९४९ मध्ये प्रकाशित झाली. हिंदू-मुसलमानांच्या दंग्याच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आधारलेली होती. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी एल्गारही लेखनदृष्टय़ा त्यांची पहिली कादंबरी नव्हे. त्यापूर्वी त्यांनी संक्रमणनावाची कादंबरी लिहून कादंबरीलेखनाचा प्रयत्न केला होता. पण तिच्यावर फडके-खांडेकरांच्या प्रकृतीची दाट छाया होती. १९३५ ते ४५ या काळातील जे सामाजिक-राजकीय वातावरण होते, नव्या पिढीच्या उरात जो ध्येयवाद होता, जे स्वप्नाळू विश्व होते, तो प्रभाव- पर्यायाने फडके-खांडेकर- माडखोलकर या कादंबरीकार त्रयीचा प्रभाव पेंडसेंना तीत टाळता आला नव्हता. पण आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी, ही खूणगाठ पेंडसेंच्या मनात पक्की होती आणि त्यामुळेच संक्रमणपुस्तकरूपाने प्रकाशित न करता सरळ पाणी तापवायच्या बंबात टाकून ते मोकळे झाले.

एल्गारने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. तत्पूर्वी मराठीत ग्रामीण आणि नागर अशा स्वरूपाच्या कादंबऱ्या अस्तित्वात होत्या. तथापि मध्यमवर्गीय, पांढरपेशा माणसांचे मनोरंजन म्हणून एकीकडे सदाशिवपेठी गुलछबू, तर दुसरीकडे गांधीवादाचा भाबडेपणाने स्वीकारणारे, कृतक वाटावा अशा नागरी जीवनदर्शनाचा सुकाळ तत्कालीन कादंबरीत पाहायला मिळत होता. नाही म्हणायला या काळातही कादंबरीच्या क्षेत्रात काही वेगळे प्रयोग होत होते. या प्रयत्नांना पुढे सलग असा हातभार पेंडसेंनी लावला, हे नाकारता येत नाही.

आज श्री. ना. पेंडसे यांचा जन्मदिवस. ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी त्यांचा जन्म झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचेच. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही पेंडसेअसा होण्याऐवजी शिरूभाऊअसाच होत होता, याची प्रचीती श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूसया त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
१९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची जीवनकलाही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९६२ साली लिहिलेल्या रथचक्रया कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबरयांमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येतात.
कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या अकरा नाटके लिहिली. त्यातील राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलंआणि रथचक्रही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दारही वेगळ्या पिढीतली नाटके. नाटककार म्हणून पेंडसेंचे यश फार मोठे नाही; तथापि ते वैशिष्टय़पूर्ण मात्र आहे.

हे एवढे सगळे लेखन करूनही पेंडसे कलावंत म्हणून आतून सतत अस्वस्थच असायचे. आपल्या लेखनप्रवासात जे आपल्याला पकडता आले नाही, मांडता आले नाही, ते पकडण्याचा, मांडण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. महानगरीय उद्योगप्रधान संस्कृतीला कवेत घेणारी एक मोठी कादंबरी त्यांना लिहायची होती. कादंबरीचे शीर्षकही त्यांनी ठरवले होते- दद्दा!त्यांना लव्हाळीनंतर हे लेखन करायचे होते. निर्मितीप्रक्रियेच्या या प्रवासात, चिंतनात त्यांना माणसे दिसायला लागली. माणसांचे आंतरसंबंध खुणवायला लागले आणि दद्दाचा असा चिंतनाच्या पातळीवर प्रवास सुरू असताना मिनी मोडक आणि तिच्या मत्रिणीचे हॉटेलातील संवाद पेंडसेंना सुचले. त्यातून ऑक्टोपसचा जन्म झाला. पुढे दहा वर्षांनंतर आकांतचा जन्म झाला. त्याहीवेळी चिंतन दद्दाचे आणि निर्मिती आकांतची- असा काहीसा प्रकार झाला. त्यानंतरही दद्दाचा विचार करीत असताना तो मागे पडला आणि कोकणातील चार पिढय़ांची कहाणी सांगणारी तुंबाडचे खोतपुढे आली. थोडक्यात काय, तर पेंडसे जेव्हा जेव्हा दद्दाचा विचार करीत, तेव्हा तेव्हा हा विषय त्यांना हुलकावणी देऊन ते पुन्हा कोकणातल्या मातीत मुरलेल्या, वाढलेल्या माणसांचाच विचार करू लागत, इतकी ही नाळ घट्टपणे बांधली गेली होती. पेंडसेंच्या मनात अखेपर्यंत घर करून असलेली दद्दामात्र त्यांना लिहिता आली नाही. कदाचित ही कादंबरी पेंडसेविश्वातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली असती.त्यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थानपुरस्कार प्राप्त झाला होता. २४ मार्च २००७ रोजी त्यांचे निधन झाले.   

मानवी स्वभावाचे बारकावे अत्यंत निष्णातपणे शब्दबद्ध करणारे आणि कोकणच्या निसर्गरम्य परिसराची देणगी मराठी रंगभूमीला - साहित्यशारदेला देणारे एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून श्री.ना.पेंडसेंचे नाव मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेलेले आहे. ही शब्दसुमने त्यांच्या स्मृतींना अर्पण ...

- समीर गायकवाड.

लेखनसंदर्भ - श्री.ना.पेंडसे - लेखक आणि माणूस,
'कातळावरची हिरवळ : एक धांडोळा' - ले. डॉ.रवींद्र शोभणे,
'जगावेगळा बापू' - रवींद्र पाथरे