Monday, January 16, 2017

आस ...
आकाशाच्या देहात खुलती मेघांची झुंबरे
निळाईत विहरती आठवणींचे पक्षी
डोळ्यात उतरुनी शोधिती तस्बीर तुझी मोरपंखी,
नजरेतला आरस्पानी मेघमल्हार किनखापी !
कललेला सूर्य माथ्यावरुनी गाई तुझीच विराणी. 
अजुनि दिशा धुंदलेल्या तुझ्या त्या अबोली देहगंधाने
भेगाळल्या मातीच्या अंकुरात दिसशी
तू गायीच्या दमट डोळा
न पुसले तुझे ठसे शुष्क पाऊलवाटेवरचे
नुठले तरंग थिजलेल्या सैरभैर वाऱ्यावर
अवचित तू येशील परतुनी,
मन बसले आस लावूनी ....

- समीर गायकवाड.