Tuesday, December 27, 2016

रेड लाईट एरियातील कायाचक्र - निर्मला !वय झाल्यामुळे थोराड वाटणारी वेश्या लचके तोडलेल्या देहाची कातडी ढिली झाल्यावर कसे जगते याचं एक अलिखित शास्त्र आहे. मेकअपने चेहरा झाकण्याची मर्यादा संपल्यावर टवाळकीचा विषय होणाऱ्या अशाच एका वयस्क वेश्येची, अभागी निर्मलाची ही पोस्ट...
१९८० - ८१ चे साल असावं. लखनौपासून सत्तर किमी अंतरावरील नटपुरवा गावातून पाच किशोर वयीन मुली एका संध्याकाळी पळून लखनौला आल्या.

तिथून गोरखपूर मुंबई रेल्वेने विनातिकीट प्रवास करून त्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास मुंबईला आल्या. व्हीटीला त्या उतरल्या खरया पण इथून पुढे काय करायचे आणि कुठे जायचे हेच त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या गावात राहिलो तर आपल्याला वेश्याव्यवसाय करावा लागेल आणि आयुष्यभर त्याच्या नरकात सडत जगावं लागेल याची त्यांना कल्पना होती. त्या पाचही जणी जिवलग मैत्रिणी होत्या, त्यांचा हा एकमेव प्लसपॉइंट होता. एकमेकीसाठी त्या जीव दयायला तयार होत्या. रेल्वेतून उतरल्यानंतर बराच वेळ त्या प्लॅटफॉर्मवर बसून होत्या. खाण्यापिण्याच्या सर्व जिन्नस प्रवासात संपून गेल्या होत्या. दोन दिवसापासून अंघोळ नव्हती. सकाळपासून पोटात काही नव्हतं. भूकेने जीव व्याकूळ झाला होता. त्यातल्या एकीला घरची आठवण येत होती. एकदोघींना आईची बहिणीची आठवण येऊ लागली होती. जवळ पैसा अडका काहीच नव्हता. कुठंतरी मिळेल ते काम करून आधी पोटाला घातले पाहिजे या विचारावर त्यांची सहमती झाली. मनात भीती दाटून आलेली, काम मिळाले नाही तर पुढे काय होईल. कसा निभाव लागणार ? एव्हढे मोठे अजस्त्र रेल्वे स्टेशन त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांचा पहिला तासभराचा वेळ तर भोवतालच्या निरीक्षणात गेला. चौदा ते सोळा वयोगटातील भेदरलेल्या त्या मुलींना पाहून रेल्वे पोलिसांच्या ऑन ड्युटी पथकातील पोलिसास शंका आली. तो दुरूनच त्यांच्याकडे पाहू लागला. त्या मुलींच्या घोळक्यातील एका मुलीचे लक्ष त्या पोलिसाकडे गेले. पोलिसांनी धरून नेले तर आपल्याला जेलमध्ये घातले जाईल अशी त्या भाबडया जीवांना भीती वाटू लागली. आपल्या घरी कळवले तर घरातले लोक चामडी सोलून निघेपर्यंत मारतील याची त्यांना खात्रो होती, त्यामुळे घरी परत जाण्याचा बेत रद्द करून त्या तिथेच बसून होत्या. गस्तीच्या पोलिसाला जरा संशय आला त्यामुळे उठून तो मुलींजवळ येऊ लागला तसे त्या सर्वांचे धाबे दणाणले. त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. पोलिस आपल्याकडेच येतो आहे हे पाहून त्यातल्या दोन मुली मागचा पुढचा कोणताही विचार न करता पाय नेतील तिकडे तर्राट पळत सुटल्या. त्यांना पळताना पाहून पोलिसाने शिटी वाजवली पण तोवर त्यांनी बाहेरचा रस्ता गाठला होता.

बाहेर सगळीकडे दिव्यांचा झगमगाट होता आणि वेगाने जाणाऱ्या गाड्यांची रेलचेल होती. जिकडे गर्दी कमी वाटली तिकडे त्या दोघी पळत सुटल्या. एव्हढा वेळ स्टेशनच्या आवारात सावज हुंगत फिरत असलेल्या आसिफची पारखी नजर त्या पळणाऱ्या मुलींवर पडली. त्यांचे मळलेले कपडे, पिंजारलेले केस आणि घाबरून पांढरे पडलेले चेहरे बघून काय ओळखायचे ते त्याने बरोबर ओळखले. त्यांच्या मागे पळत गेले तर त्यांचा आपल्याबद्दल गैरसमज होईल हे त्याने ताडले आणि टॅक्सी पकडून त्यांच्या विरुद्ध दिशेने समोरून यायचे ठरवून तो त्यांच्या पाठलागावर निघाला. अवघ्या काही मिनिटात तो त्यांच्या समोरच्या दिशेला आला. टॅक्सीवाल्यास काही वेळ साईडला थांबायला सांगून तो खाली रस्त्यावर उतरला. समोरून पळत येणाऱ्या मुलींना हातानेच अडवत तो म्हणाला,"डरो मत पुलिससे भागोगी तो पुलिस पीछा करते रहेगी...इससे अच्छी बात तो ये होगी अगर तुम दोनो मेरे साथ आओगी तो मै तुम्हे मह्फुज जगह पे छोड सकता हुं.." पोलिसापेक्षा याच्याबरोबर गेलेले बरे, जे काय होईल ते होईल या विचाराने त्या राजी झाल्या. सडकेच्या कडेला उभ्या केलेल्या टॅक्सीत त्याने त्या दोघींना घेतले. काही अंतर जाताच त्याने एका हॉटेलजवळ टॅक्सी थांबवली त्यांना पोटभर खाऊ पिऊ घातले. तोपर्यंत त्याने त्यांची काहीही चौकशी केली नाही. पण ह्या पोरी आपल्याला काही हजार कमवून देऊ शकतात आणी बऱ्याच दिवसापासूनची आपली तंगी दूर होऊ शकते हे त्याने ओळखले होते. पोरीचे खाऊन झाल्यावर त्याने टॅक्सी चर्नीरोडकडे नेण्याचे फर्मान सोडले. मग मात्र मुलींना विश्वासात घेऊन त्यांची बारीक चौकशी त्याने सुरु केली. आईवडील, नातेवाईक, मित्र, शाळायाची माहिती विचारली. ह्या भल्या माणसाने आपल्याला पोलिसांपासून वाचवले, आपल्याला खाऊ पिऊ घातले याचे त्यांना समाधान वाटले होते. तरीही सगळं खरं सांगितलं तर आपण पुन्हा पोलिसांच्या हवाली केले जाऊ शकतो हे ओळखून त्या दोघी जणी त्याच्या प्रश्नांची काही खरी तर काही खोटी उत्तरे देऊ लागल्या. नावं मात्र त्यांनी खरी सांगितली, 'ये मेहर है और मै निर्मला' मनाशी आडाखे बांधत असिफने अखेरचा प्रश्न विचारला, " बेटा तुम्हारा गांव कौनसा है ?' या प्रश्नावर त्या दोघींनी चमकून एकमेकीकडे पाहिले....

स्टेशनवर सापडलेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींची रेल्वेपोलिस कसून चौकशी करत होते. खोदून खोदून माहिती विचारत होते. पण बावरलेल्या मुली फक्त हमसून हमसून रडत होत्या. त्यांना बोलायचे सुचत नव्हते. आपल्यासोबत आलेल्या आपल्या दोन मैत्रिणींचे पुढे काय झाले असेल या विचाराने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. आता पोलिस आपल्याला काहीतरी मोठी शिक्षा करणार या भीतीने त्यांची आधीच गाळण उडाली होती. महिला पोलिसांनी त्यांचा ताबा घेतल्यावर त्यांना आधी खायला प्यायला दिले. त्यांना विश्वासात घेतले आणि मग हळूच त्यांच्या गावाचे नाव विचारले. त्यांच्यातली एक जण लगेच उत्तरली, 'हम नटपुरवासे है! संदील के पास हायवे पे गांव है हमारा. ..' पोलिसांनी गावाचा पत्ता कळल्यावर त्यांनी सगळी माहिती काही तासात काढली. कितीजणी आल्या होत्या, कुठून निघाल्या आणि कसा प्रवास केला होता इथंपासून ते गाव कशासाठी सोडावे लागले याची सर्व माहिती त्यांनी मिळवली. या मुलींनी दिलेल्या माहितीवरून पळून गेलेल्या दोन मुलींचे वर्णन, नाव, गाव पत्ता मुंबई पोलिसांच्या हेडक्वार्टरला कळवून रेल्वे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. रोज डझनावारी 'मिसिंग'च्या केसेस जिथं येतात तिथं अज्ञात मुलींच्या मिसिंगची तक्रार फार मोठी बाबा नव्हती. मिसिंगच्या तक्रारीचा निपटारा करणारया पोलिसाकडे मुलींची वेशभूषा, चेहरापट्टी आणि मूळ पत्त्याची माहिती जमा झाली होती. त्या मुलींची नावं खरी का खोटी हे जिथं नव्हती. तिथं पत्ता खरा की खोटा हे कळायला मार्ग नसतो हे पोलिसांना चांगले ठाऊक होते. तरीही त्यांनी नाव गाव वाचले, निर्मला यादव आणि मेहेर सरीन, राहणार नटपुरवा, तेहसील - संदील, जिल्हा हरदोई उत्तर प्रदेश ! गावाच्या नावापाशी पोलिस जरा अडखळले. त्याचे कारणच तसे होते.

नटपुरवा हे गाव युपीच्या हरदोई मधील संदील तालुक्यातले एक छोटेसे गाव जरी असले तरी त्याची पोलिस रेकॉर्डला त्याची ख्याती वेगळी होती. पाच हजार लोकवस्तीच्या या गावाचा वेश्याव्यवसायाचा चारशे वर्षाचा इतिहास आहे. या गावातील अनेक मुलांना आपल्या वडीलांचे नाव माहिती नाही. अनेकांना आडनावे नाहीत. इथं लोक येतात मौजमस्ती करून एखादीच्या गर्भात आपल्या वासनेचं बीज रोवून जातात. कधी कधी वेगळ्या प्रलोभनातून गर्भधारणा राहते तर कधी फसवणूकीतून तर कधी नजरचुकीने ! ७० आणि ८० च्या दशकात इथल्या अनेक स्त्रियांना मुंबई, दिल्ली, कोलकता येथे नेऊन विकण्यात आलं होतं. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक कुमारवयीन मुलींनी धंद्याच्या भीतीने पलायन केलं होतं. काही लोकानी तर हा पिढीजात व्यवसायच बनवला आहे पण त्यांची संख्या कमी आहे. नटपुरवा गावातली बाई म्हणजे तिला रस्त्यावर वा उकिरडयावर नेऊन भरदिवसा ओरबाडले तरी चालते अशी तिथं ख्याती. यामुळे या गावाची नोंद मोठ्या शहरातील पोलिस रेकॉर्डवर विनासायास झाली होती. मुली नेमक्या कुठे गेल्या असतील याचा काहीसा अंदाज पोलीसांना आला पण अशा शेकडो हजारो फाईल त्यांच्यापुढे असल्याने त्यांनी ठरवलेल्या क्रमानुसार आपला तपास सुरु ठेवला...

असिफने चर्नी रोडला त्याच्या चाळीतल्या घरात त्या दोघींना नेले. त्याच्या त्या कुबट अजागळ खोलीत त्या दोघींना कसेसेच वाटले. तिथले भिंतीवरचे फोटो आणि जागोजागी अस्ताव्यस्त पडलेले कपडे, तुटलेली ट्रंक, कापूस बाहेर निघालेली गादी अन सगळ्या खोलीत भरून राहिलेला उग्र दर्प यामुळे तिथे मळमळायला होत होतं. "थोडा वेळ बाहेर जाऊन येतो मग माझ्या बहिणीकडे तुम्हाला सोडून येतो, तिथे तुम्हाला बरे वाटेल. जीव लागेल." असं त्यांना सांगून आसिफ तडक कामाठीपुरयात लाजवंतीकडे आला. युपी बिहारच्या बायका पोरी तिच्याकडे मोठ्या संख्येने होत्या.

"एकदम कोरा माल आहे..... शेट लोकांना फोन लावून बोली लावशील तर पैशाचा पाऊस पडेल.... अस्सल युपीच्या काळजातला रानमेवा आहे....बोल मला किती देणार ?....अजून नथ उतरलेली नाही ... बहोत साल काम आयेंगी, रसीली है !" आसिफच्या बोलण्याला न भुलता लाजवंतीने नेहमीप्रमाणे घासाघीस सुरु केली. पाच हजारांला सौदा ठरला. एक पोरगी लाजवंतीकडे आणि एक कम्मो उर्फ कमलाला देण्याचे नक्की झाले. रात्री उशीरपर्यंत 'जिन्नस' आणून देतो असं सांगून असिफ तिथून निघाला. लाजोने शंभर रुपये सुपारी म्हणून असिफला दिले होते, त्या पैशातूनच त्याने वाटेत दारू ढोसली, मनसोक्त मटण खाल्ले आणि सिगारेट फुकत रात्री उशिरा घराकडे निघाला. घर जवळ येताच सिगारेट टाकून कपडे नीटनेटके करून दाराची कडी उघडून तो आत शिरला. असिफ निघून गेल्यानंतर प्रवासाने व मानसिक त्रासाने थकलेल्या दोन्ही मुली झोपी गेल्या होत्या. त्या दोघींकडे पाहून खरे तर असिफच्या वासना अनावर झाल्या होत्या पण लाजवंतीचा रासवट चेहरा समोर येताच त्याने स्वतःला आवर घातली. त्याने हलकेच मुलींना जागे केले. चला मावशीच्या घरी जायचे आहे असे सांगत त्याने त्या दोघींना जागे केले. टॅक्सी करून ते तिघे कामाठीपुरयाच्या दिशेने रवाना झाले. टॅक्सीत बसल्या बसल्या त्या दोघी पेंगत होत्या. त्यांना असिफचे बोलणे खरेच वाटले होते. आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना जरा सुद्धा कल्पना नव्हती.

जवळपास मध्यरात्र झाली होती. टॅक्सीच्या ब्रेकच्या आवाजाने त्या दोघी जाग्या झाल्या. त्यांना घेऊन असिफने घाईघाईने झपाझप पावले टाकत अकराव्या गल्लीतील लाजवंती राहत असलेल्या तीन मजली कुंटणखान्यात आणले. रात्र खूप झाली असली तरी झिंगलेली हेलकावे खात गुणगुणत जाणारी तुरळक माणसे अजूनही बऱ्याच प्रमाणात होती. त्या दारूडयांचा वास, खोल्यातून येणारे उस्मरणारे आवाज, अधून मधून येणारा लहान मुलांचा रडण्याचा आवाज, अजूनही एकही गिऱ्हाईक न आल्यामुळे ताटकळत उभी असलेली एखादी दुसरी उमर ढळलेली बाई, हवेत विरत चाललेली सिगारेटची धुम्रवलये, सिनेमाची फाटलेली पोस्टर्स, जागोजागी लालभडक पिचकाऱ्या मारलेल्या भिंती, पायाखाली येणारी सिगारेटची थोटके आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या, वाऱ्यावर उडणाऱ्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग अन कागदाचे तुकडे, इतस्ततः वाळत घातलेले विटून गेलेले कपडे, एखाद्या खोलीतून येणारा स्टोव्हचा आणि त्यावर रटरटत असलेल्या डाळीच्या आमटीचा आवाज असे नानाविध आवाजदृश्ये एकत्र येऊन त्या परिसराला एक वेगळंच रूप प्राप्त झालं होतं. दोन्ही पोरी आता जराश्या घाबरल्या होत्या कारण त्यांच्या गावाकडे अगदी असेच वातावरण नसले तरी अशा प्रकारची घरं आणि अशी माणसं शिगोशिग होती. पण असिफवर त्यांचा भरवसा असल्याने त्या कहीही न बोलता निमूटपणे त्याच्या मागे चालल्या होत्या. वाटेत जिना चढताना दुसऱ्या मजल्यावरची एक बाई निर्मलाकडे बघून विक्षिप्त नजरेने हसली अन तिने जोरात टाळी वाजवली. असिफने तिला जोरात शिवी हासडली तेंव्हा निर्मला जरा सावध झाली. पण तोवर फार उशीर झाला होता. पुढच्या खोलीत दार उघडून लाजवंती त्यांची वाट बघत उभी होती. तिने त्या दोघींना आपल्या पोटाशी कवटाळून घेतलं. त्यांचे मुके घेतले. त्यांना तिच्या खोलीत घेऊन गेली. काही वेळाने बाहेर येऊन तिने आधी असिफचा हिशोब चुकता केला. कम्मो काही क्षणातच तिथं आली. तिने तिच्या हिश्श्याचे पैसे लाजोला दिले. कम्मो ही लाजोची सख्खी लहान बहिण होती. पण तिथंला व्यवहारात नातं बितं काही न बघण्याचा रिवाज दोघीही कटाक्षाने पाळत असत. कम्मोने पैसे देताच लाजवंती तिच्या खोलीपाशी तिला घेऊन गेली. खोलीत आल्यावर पाचच मिनिटात त्या दोघीही झोपी गेल्या होत्या. त्यांना लाजोने जागं केलं. 'देखो बेटा अपना घर बहोत छोटा है ना इस लिये एक गुडीया को छोटी आंटी के साथ रहना पडेगा' असं म्हणत म्हणत तिने मेहेरला कम्मोच्या हवाली केलं. डोळे चोळत चोळत ती चौदा वर्षाची कोवळी पोर रात्री बारा एकच्या सुमारास कराकरा वाजणाऱ्या जिन्यांवरून चढ उतार करत चालली होती आणि तिच्या धूसर होत जाणाऱ्या छोट्याशा आकृतीकडे बघत डोळ्यातले पाणी लपवत निर्मला दोन्ही हात छातीशी घेऊन जीव मुठीत घेऊन बसली होती. ही त्या दोघींची अखेरची भेट ठरली. या दिवसानंतर निर्मलाने मेहेरला कुठेही पाहिले नाही, तिचे काय झाले, ती पुढे कुठे गेली याची नेमकी माहिती तिला कधीच मिळाली नाही. या दुनियेची ही खासियतच आहे की इथं हरवलेला माणूस कधीच सापडत नाही....

दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच निर्मलाने ओळखले की आपल्या सोबत काय घडले आहे. लाजवंतीच्या घराच्या मुख्य खोलीत बसलेल्या दोन काळ्या कभिन्न अजस्त्र गुंडांची तिथल्या सर्व बायकापोरींवर सतत करडी नजर होती. निर्मलाला देखील हे कळून चुकले. काही दिवसांत तिची सजवून धजवून नथ उतरवली गेली. तिला विरोध करायला कुठली संधी नव्हती. नाहीतरी निर्मला फार सोशिक होती, तिच्या वाटेला जे काही भोग आले त्याला ती निमूटपणे सोसत गेली. खरे तर ती गावातून पळून सुद्धा आली नसती पण मेहेर तिची जीवश्च मैत्रीण असल्याने तिच्या नादाला लागून ती गावातून पळून आली होती. पण आता तिचाच काही पत्ता नव्हता. त्या दिवसानंतर कमी वयाची कोवळी कळी म्हणून अनेकांनी तिला कुस्करले, अनेकांनी ओरबाडले तर अनेकांनी तिला झोडपून काढले. मारणारे, चावणारे, तुडवून काढणारे, चटके देणारे अनैसर्गिक कृत्ये कारणारे असे सहस्त्रावधी पुरुष तिच्या विस्कटलेल्या शय्येत येऊन गेले आणि तिच्या देहाच्या चिंध्या होत राहिल्या. एकदोन वेळा गर्भपात झाले. महिन्याकाठच्या चार दिवसांत सुद्धा तोंड उशीत खुपसून झोपायची जिथं सोय नव्हती तिथं एबोर्शनची काय कथा ! निर्मलाने कधी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण जायचे तरी कुठे हा तिच्यापुढे प्रश्न होता. गावाकडे गेले तरी हेच भोग येणार होते त्या पेक्षा इथे मेहेरच्या प्रतिक्षेत चार दिवस जगता येईल असा सीधासाधा विचार ती करत असे. वर्षामागून वर्षे गेली आणि एकदा निर्मलला कम्मोच्या घरातल्या एका जुन्या पोरीने बातमी दिली की, 'मेहेर पुण्याच्या बुधवार पेठेत आहे. कम्मोने तिला कधीच विकले आहे.'

ही माहिती कळताच निर्मलाने दलालांचा संपर्क वाढवला. त्यांच्यापाशी ती मेहेरचे वर्णन देऊ लागली कारण तिच्याकडे मेहेरचा कोणताही फोटो नव्हता. नुसत्या वर्णनावरून शोध लागणे अशक्य आहे हे माहिती असूनही तिला फुकटात उपभोगून तिच्या काही पैशावर हात मारता यावा म्हणून दलाल तिला खोटी माहिती देऊ लागले. काही दिवसात ही माहिती लाजोच्या कानी पडली. तिने निर्मलाला खूप समजावले. शेवटी तिने आपला हट्ट सोडत तिला सांगितलं की. 'कम्मोने तिला पुण्यात देऊन आता दहा पंधरा वर्षे झालीत. ती आता कुठे असेल काहीच सांगता येत नाही. आता कम्मोसुद्धा या दुनियेत नाही, नाहीतर मी तिच्याकडून माहिती घेऊन तुला दिली असती. असे दलाल लोकांवर पैसे उडवण्यात काही अर्थ नाही. 'खरेतर लाजोला मेहेर कुठे आहे हे पक्के माहिती होते पण मेहेरचा पत्ता लागला की निर्मलासारखी गरीब गाय बाई आपल्याला सोडून जाईल या हेतूने तिने खरी माहिती कधीच निर्मलाला कळू दिली नाही. पण निर्मलाने मनाचा हिय्या केला आणि आपला पुण्याला जाण्याचा तिला निर्णय कळवला. लाजवंतीने हातावर टिकवलेले मिळतील तितके पैसे घेऊन काही महिने गेल्यावर एका दलालास हाताशी धरून निर्मला पुण्यात आली. बुधवारातल्या मुर्तुजा ह्या इमारतीतल्या सुरेखाच्या कुंटणखान्यात तिला गादीपलंग मिळाला. लाकडी फळकुटाच्या दोन बाय चारच्या जगात राहून ती मेहेरसाठी जीव टाकू लागली. तिला पुण्यात येऊन दहा वर्षे झाली. तिने अनेक अड्डे पालथे घातले. एजंटाना शेकडो रुपये दिले पण काहीच हाती लागले नाही....

जवळचा पैसा संपलेला. जिच्यासाठी गाव सोडलं तिचा पत्ता नाही, अब्रूचे धिंडवडे निघालेले अन देहाची रया गेलेली अशा विलक्षण कोंडीत आता निर्मला सापडली होती. निर्मलाचे वय आता पंचेचाळीसच्या पुढे गेले होते. तिच्या शेजारच्या खोलीत दोन नवाडया गिर्रेबाज पोरी आल्या होत्या. त्या तिची येता जाता टिंगल करायच्या. गिऱ्हाईकाने पाडलेल्या दातांवरून तिला टोमणे मारायच्या. कुणी पन्नाशीतला हिरवा माणूस आला की निर्मलादादी के पास जाओ म्हणून फिदीफिदी हसायच्या. कुणी मिसरूड फुटलेला पोर तिच्या खोलीकडे वळताना दिसला तर घाणेरडा विनोद करायच्या. लाल भडक लिपस्टिक लावलेले सुजल्यागत दिसणारे ओठ, समोरचे दात पडलेले असल्याने कसनुसे दिसायचे. गालफाडे आत गेलेली, कपाळावर रेषांचे जाळे तयार झालेले, कानाच्या लोंबू लागलेल्या पाळ्या, खोल गेलेले डोळे आणि त्या खालची काळी वर्तुळे ओघळलेली छाती अन केसाचा बुरखंडा झालेला अशा अवस्थेतली निर्मला भेसूर दिसायची. तिच्या अंगावर साडया देखील अगदी तशाच पोतेरा झाल्यागत असत. तिच्या या जिण्यापुढे शेवटी शेवटी ती अगदी हतबल होऊन गेली पण तिने कुणा गिऱ्हाईकाच्या पाकिटात हात घातला नाही की कुठल्या वस्तूला हात लावला नाही. तिच्याकडे येणारी माणसे जवळपास बंद झाली. तिची मोठी उपासमार सुरु झाली. त्यातच तिचे दारूचे व्यसन वाढत गेले, तंबाखूच्या जोडीला गुटख्याच्या रूपाने नवा साथीदार आला. अखेरीस ती तिथे येणाऱ्या लोकापुंढे हात पसरू लागली तशी तिच्या मालकिणीने तिला तंबी दिली. तिचे भाडे देणेसुद्धा तिला अशक्य होऊ लागले. निर्मलाचे खाण्याचे देखील वांधे होऊ लागले. इकडे त्या दोन्ही पोरींची चेष्टा - माकडचाळे वाढत गेले. मालकिणीची त्या दोघींना फूस होती. कारण या दोघींच्या त्रासाने निर्मला घर सोडून गेली तर नवी कोवळी पोरगी आणणे तिला सहज शक्य आणि फायद्याचे होते. त्यामुळे ती ह्या चेष्टामस्करीला कधीच आळा घालत नसे. एकदा ही चेष्टा मस्करी टोकाला गेली आणि त्यात निर्मलाचे त्यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले. त्या दोघींनी मिळून निर्मलाच्या झिंझ्या धरून तिला जाम सोलून काढले. असला तमाशा तिथं रोज कुठे न कुठे घडत असल्याने कुणी मध्ये पडले नाही.

त्या दिवशी निर्मलाने हाय खाल्ली. काही महिन्यानंतर वर्तमानपत्रात बातमी आली होती. 'पुण्यातील बुधवार पेठेत दोन तरुणींचा डोक्यात पाटा वरवंटा घालून तिथल्याच महिलेकडून खून करण्यात आला'. बातमीतील तपशील वाचला तर त्यात निर्मलाचे नाव होते. एकदोन वर्षांनी २०१४ साली येरवडयातील महिला कैद्यांच्या कारागृहात जाण्याचा योग आला तेंव्हा निर्मलाची आठवण झाली. तिची काही माहिती मिळाली तर निदान भेट होईन या हेतूने तिची थोडीशी चौकशी करताच ती इथंच असल्याचे कळले. तुरुंग अधीक्षकांना तिच्या भेटीसाठीचे लेखी पत्र दिल्यावर त्यांनी भेटण्याची परवानगी दिली. निर्मलाचा खटला अजून सुरु आहे, तिला सजा लागलेली नाही. पण तिच्यावरचे आरोप गंभीर आहेत. शिवाय तिला जामीन देण्यासाठी कुणी पुढे आले नाही. त्यामुळे तिला इथे जेलमध्ये ठेवले आहे. तिला इथं आणल्यापासून आजपर्यंत कुणीही भेटायला आलेले नाही, शिवाय तिनेही कुणाला भेटायची इच्छा व्यक्त केली नाही. तुरुंग अधिक्षक आपली माहिती देत होते पण त्यांना काय माहिती होते की या बाईने काय भोग भोगले होते. भेटीच्या खोलीपाशी काही वेळ थांबल्यानंतर जाळीच्या पलीकडे हळू हळू चालत येणारी निर्मला दिसली. कैद्याच्या कपड्यातल्या निर्मालेच्या चेहरयावर किंचित स्मित उमटले. पुन्हा चेहरा कोरा करकरीत झाला. बराच वेळ शांत बसल्यावर तिनेच बोलायला सुरुवात केली, "मी तशी लहानपणापासून शांत मुलगी. जीवनाबद्दल माझ्या फार काही अपेक्षा नव्हत्या. पण आजूबाजूला जे चालत होते ते कधी आवडले नव्हते, म्हणून मेहेर जेंव्हा गावातून पळून जाण्यासाठी विनवू लागली तेंव्हा तिला फार विचार न करता निघून आले. मुंबईत आल्यावर कळले की, गाव असो वा शहर वैश्यी दरिंदे सगळीकडे असतात. मग मेहेर पासून मी अलग झाले. मी सरेआम लुटली गेले पण माझ्याबाजूने कधीच कुणी बोलले नाही. एक कुत्रीसुद्धा बरी असते ठराविक दिवसच तिच्या मागे कुत्रे लागतात पण आमचं जिणं त्याहून वाईट...' ती बोलत होती अन कानात शिसं ओतल्यागत वाटत होतं...

कुणी तरी सांगितलं की मेहेर पुण्यात आहे, मी इकडे आली पण तिचा काही पत्ता लागला नाही. तिला शोधता शोधता मी स्वतःला हरवून बसले. माझी उमर ढळली, जवानी गेली, बुढापा तोंडावर आला आणि माझे वाईट दिवस सुरु झाले. दारूपासून तंबाखूपर्यंत सगळ्याची उधारी झाली, पोटाची उपासमार होऊ लागली. तशात त्या दोन पोरी माझं डोकं खाऊन टाकू लागल्या, कारण नसताना मला त्रास देऊ लागल्या. माझ्या डोक्याचं भरीत झालं. एकदा त्यांनी मला मारलं. काही दिवसांनी मी त्यांना मारलं..."

निर्मला शून्यात बघत सांगत होती. पण ती काहीतरी लपवत होती असे वाटत होते. तिचं सांगून झालं तशी ती काही वेळ गप्प बसली एक मोठा सुस्कारा सोडत पुन्हा बोलती झाली. "खरे तर मी गरीब स्वभावाची असूनही खून कसा काय केला असाच सवाल पडला ना तुला ?' .....ठीक आहे कधी न कधी, कुणाला तरी सांगावे लागणारच आहे ते... त्याचे काय झाले की माझ्याकडे एक म्हातारा वकील यायचा... त्याला माझी सगळी हकीकत कळली होती...त्याला त्या दोन पोरींचा खूप राग यायचा ....त्याने दर महिन्याला दिलेल्या पैशावरच माझे शेवटचे सहा सात महिने गेले..त्याला माहिती होते की माझी खाण्याची ददात आहे ते ...एकदा तो आला आणि रडून सांगू लागला की चार दिवसापूर्वी माझी बायको मेल्याची बातमी आलीय, आता मी माझ्या गावाकडे जाईन. पण पुन्हा इथे येणार नाही, हे घे काही पैसे. यावर तुझे काही दिवस जातील, तुझी रोजी रोटी चालेल. पण त्या नंतरही तुला निवांत रोजी रोटी खायची असेल अन या दोन बदमाश पोरींचा काटा काढायचा असेल तर मी सांगतो तसे कर' असे म्हणत त्याने ही आयडीया कानात सांगितली.....त्या नंतर कित्येक दिवस मी स्वयपाक करण्याच्या निमित्ताने वरवंटा पाटा उचलण्याची सवय करू लागले. काही महिन्यात मला ती ट्रिक जमली. एके दिवशी त्या दोघी पिऊन फुल्ल झाल्या होत्या. मी सुद्धा अगदी थोडीशी घेतली होती. पण जजमेंट घेत रात्रीच तयारी करून ठेवली होती....सगळे जण गाढ झोपी गेल्यावर मी त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला. नंतर पाटा घातला ...काही वेळानी पोलिस येऊन मला घेऊन गेले...माझ्या रक्ताची तपासणी झाली...मी दारूच्या नशेत धंद्यातील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचा आरोप माझ्यावर आहे. मी नशेत हे केलं असल्याने मला फाशी लागणार नाही हे नक्की .....मी कुणाला हवीशी नसल्याने मला जामीन घ्यायला कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता...आता इथे मी शांत बसून असते...टाईमपास साठी जेलमध्ये शेतकाम सुरु झालेय त्या शेतात काम मी करते...दोन टाईमचे पोटभर जेवते, मुख्य म्हणजे मला त्यासाठी कुणा जनावराखाली झोपावे लागत नाही....आता कधी मेहेर भेटली तर भेटली नाही तर आणखी काही वर्षे इथं समाधानात जाणार हे नक्की..."असं म्हणत म्हणत ती उठली. जाताना तिने क्रीम बिस्किटाचा जेल मध्ये तयार केलेला पुडा हातात दिला....खरे तर तिला काही तरी द्यायला हवे होते पण अकस्मात भेट झाल्याने तिला काही देताच आले नाही पण तिने तिला जे शक्य होते ते दिले....

त्या पुडयातील बिस्किटांना जी चव होती ती जगातल्या कुठल्या बिस्किटांना नव्हती. निर्मलाला हा सल्ला देणाऱ्या वकिलाचे सांगणे योग्य की अयोग्य याचा उलगडा कधीच होऊ शकला नाही. निर्मलाच्या जागी जीन पँट टी शर्ट घालणारी, मोबाईल वापरणारी मुलगी राहते. निर्मालाच्या आधीही आणि नंतरही तिथं काही वेगळं घडत नव्हतं आणि भविष्यातही घडणार नाही. हे 'कायाचक्र' सुरूच राहणार आहे .....

- समीर गायकवाड.

(सूचना- मूळ घटनेतील व्यक्तींची नावे बदलली आहेत. यामागील लेखन हेतू या स्त्रियांचे दुःख वेदना समाजासमोर मांडणे हा असून, त्याबद्दल कुणाला आपत्ती वा हरकत असल्यास ते मला अन्फ्रेंड वा ब्लॉक करू शकतात, लेख शेअर करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही मात्र तो नावासहित शेअर केल्यास मला जास्त समाधान वाटेल. एनजीओसाठी काही योगदान दयावे वा सहभाग नोंदवावा असे वाटत असेल तर येथे भेट दयावी .. मेहेरवर पुन्हा कधी तरी लिहीन....)


No comments:

Post a Comment