Thursday, December 22, 2016

किन्नरांच्या (हिजडयांच्या) दुनियेत ....हिजडा किन्नर

कामाठीपुरयाबद्दलचे लेखन वाचून एका वाचकाने तृतीयपंथीयांवर लिहिण्याची विनंती केली होती. तिथल्या अशा व्यक्तीरेखांवर सविस्तर नंतर कधी लिहीन, आज थोडीशी माहिती शेअर करतो. सुरुवात त्यांच्या अंतापासून ; एखाद्या किन्नराचा जेंव्हा मृत्यू होतो तेंव्हा त्याचा चेहरा पांढरया कपड्याने झाकला जातो. कोणालाही त्याचा चेहरा दाखवला जात नाही. त्याच्या अंत्यविधीस किन्नर वगळता कुणालाही सामील होऊ दिले जात नाही. याबाबत जमेल तेव्हढी गुप्तता राखली जाते. याविषयी बोलताना वयस्क किन्नर सांगतात की. "असे करण्यामागचा हेतू असा असावा की, त्या अभागी जीवाला पुन्हा असाच जन्म लाभू नये. या दैन्यातून त्याची मुक्ती व्हावी हे या मागचे कारण असावे." किन्नराची अंत्ययात्रा दिवसा न काढता रात्री काढली जाते.
आता जरी अशी प्रथा रूढ झाली असली तरी यामागचे कारण वेगळे असावे पूर्वीच्या काळी अठरा पगड जातींच्या स्वतःच्या स्मशानभूमी - दफनभूमी होत्या त्यामुळे किन्नरांचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यविधी आपल्या जातीसमाजाच्या स्मशान वा दफनभूमीत होऊ नयेत असा दम भरलेला असे. त्यामुळे किन्नरांचे अंत्यविधी अंधार पडल्यावर उरकले जात असावेत. किन्नराच्या अंत्ययात्रेत सामील झालेले कोणीही रडत नाहीत वा दुःख व्यक्त करत नाहीत. नाचगाणे करत प्रसंगी रंग उडवत वाद्यांच्या गजरात ही अंत्ययात्रा निघते. किन्नर कोणत्याही धर्मात जन्मलेला असला तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दफनच केले जाते. पूर्वीच्या काळी किन्नराचा मृतदेह जेंव्हा तिरडीवरून उतरवला जाई तेंव्हा त्याचे दफन करण्याआधी दफनविधीस उपस्थित असणारे सर्व किन्नर त्या कलेवरास आपल्या पायातील चप्पलने मारत. जणू काही ते सूचित करत की, "तुझा जन्म या लायकीचा होता आणि मृत्यूही काही वेगळा नाही. तू आयुष्यभर अवहेलना झेलल्यास आता अखरेच्या अपमानाची ही वेळ आहे. तेव्हढे तर तुला सोसावे लागणारच !" दफनविधीनंतर अन्य कोणतेही विधी केले जात नाहीत. कोणी शोक करत नाही की कोणी अश्रू गाळत नाहीत, सर्वाना चहा दिला जातो. जे ते आपआपल्या घरी परत जातात. घरी परतल्यावर मात्र मेलेल्या किन्नराचा जीवश्च कंठश्च असा जो कोणी स्नेही असतो तो ऊर बडवून असा काही विलाप करतो की पाहणारयाच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागतात, त्याचे हे रडणे सहन होत नाही. मृत किन्नराची जी काही म्हणून संपत्ती असते त्यातील कवडी ना कवडी दान केले जाते. (आजकाल उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि कानपूर व मध्य प्रदेशातील भोपाळ इथे प्रसिद्ध किन्नरांच्या मोठ्या संपत्तीवरून वाद होताना दिसतात ) मृत किन्नराची सर्व संपत्ती दान करून त्याची आठवण मिटवली जाते. स्वतःला पुरुष म्हणवणारे जिवंतपणीची संपत्ती आणि मेल्यानंतरच्या संपत्तीची विल्हेवाट स्वार्थीपणे करतात पण किन्नर इथे पुरुषांना पुरून उरतात. किन्नराच्या मृत्यूनंतर तो ज्या वर्तुळात वा टोळीत राहत असतो त्यातील सर्व किन्नर सदस्य सात दिवस कडकडीत उपवास करतात. हे सात दिवस संपल्यानंतरच ते आपली रोजची जीवनचर्या सुरु करतात. एक प्रकारे त्यांनी अर्पण केलेली ही श्रद्धांजलीच असते.

असा भयाण मृत्यू ज्यांच्या वाटेला येतो त्या किन्नरांच्या जगात जसे दुःख आहे, तसा आनंदही आहे. पराकोटीची वेदना आहे तसेच स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याचे समाधानही आहे. समाजाच्या अवहेलनेचे शल्यही आहे. अनेक भावबंधात त्यांची दुनिया गुंफलेली आहे. त्यांच्या जगाबद्दल सांगाव्या अशा काही वेदनादायी आणि तितक्याच रोचक गोष्टी आहेत. त्यांचे विश्व निराळे असते, त्यातील रिती भाती आणि संस्कार वेगळे आहेत. हिजडा किंवा किन्नर म्हणजे शरीर रचना पुरुषाची असणारा आणि त्याची लैंगिक ओळख, वेषभूशा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असणारा व्यक्ती, तसेच स्त्रीत्वाची ओढ असणारा व्यक्ती होय. (जन्माला आलेले मुल हिजडा आहे किंवा नाही हे काही निष्णात दायी सांगू शकतात) किन्नरांना तृतीयपंथी किंवा छक्का असेही म्हणतात. हिजडा आणि ट्रान्सजेन्डर यात फरक आहे. ट्रान्सजेंडर आपल्या शरीरात स्वतःहून लिंग बदल करवून घेतात, किन्नरांचे तसे नसते त्यांची जन्मतःच तशी अवस्था असते. (आजकाल लैंगिक दृष्ट्या सुदृढ असणारया पुरुषांना बळजोरीने हिजडा बनवले जात असल्याच्या घटना समोर येताहेत.) किन्नरांना आता तिसरे जेंडर म्हणून कायदेशीर मान्यता देखील मिळाली आहे. कायद्याने हिजडा असणारया मुलाचा त्याच्या वडीलोपार्जित संपत्तीत समान वाटा असतो पण याची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी अशा मुलांना घराबाहेर काढून किन्नरांच्या टोळीत त्याला ढकलले जाते. तिथे तो स्वतःचे अस्तित्व आणि ओळख गमावून बसतो. त्यामुळे त्याचा संपत्तीवरील हक्क हिरावला जातो. अल्पशिक्षण, शारीरिक स्वास्थ्याकडे केलं जाणारे दुर्लक्ष आणि अंधकारमय भवितव्य ही किन्नरांची दुखणी आहेत.   


लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर, क़्विर, इंटरसेक्स आणि असेक्सुअल असे ( L, G, B, T , Q, I, A ) असे सात प्रकार विदेशात लिंग- सेक्स निश्चितीच्या संदर्भात वार्गीकृत केले गेले आहेत. आपल्याकडील किन्नर वेगळे आणि हे सर्व प्रकार वेगळे. खरा किन्नर सेक्स उपभोगण्यासाठी या जथ्यात आलेला नसतो तर त्याच्या आवडीनिवडी जेंव्हा त्याला बंड करायला भाग पाडतात तेंव्हा तो त्याचा मार्ग निवडतो. किंवा मग कुमार वयात मुले किन्नरांच्या स्वाधीन केली जातात तृतीयपंथीयांना 'किन्नर' असे म्हटले जाते याची एक आख्यायिका आहे. हिंदूंच्या पुराणांनुसार कश्यप ऋषींनी ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याच्या १७ कन्यांशी विवाह केला होता. पृथ्वीवरील सर्व प्रजाती त्यातून जन्मास आल्या असे मानले जाते. या १७ मुलींपैकी अनिष्टा या मुलीपासून यक्ष, गंधर्व किन्नर आदि उपदेवता जन्मास आल्या असे मानले जाते.  हे किन्नर हिमालयीन पर्वतरांगात वास्तव्यास होते अशी मान्यता आहे. किं + नर अशी त्याची शब्दफोड होते. त्या नुसार त्यांची योनी आणि आकार सर्वसाधारण मानवी देहासारखी मानली जात नाही. (पुरुष असूनही नसलेला) शिवाय किन्नरांना देवतांचे भक्त व गायक समजले जाते. किन्नरांच्या या वर्णनाशी तृतीयपंथीयांचे शारीरिक व  मानसिक वर्तन मेळ खाते. या समानतेमुळे तृतीयपंथीयांना किन्नर संबोधले जाते....किन्नर जन्मजात दोष घेऊन येतात हे जरी खरे असले तरी आजकालच्या विमनस्क सामाजिक परिस्थितीमुळे गोंधळून जाऊन पुरुषत्व असूनही स्त्रीत्वाकडे झुकलेले किंवा स्त्रीसदृश वर्तनाची ओढ असणारे तरुण मोठ्या प्रमाणात स्वतःला किन्नरांच्या जथ्यात सामील करून घेताना दिसत आहेत. किन्नरांचा आयुष्यात एकदा विवाहही होतो ! मात्र हे लग्न एक दिवसाचे असते. या विवाहातील कथा महाभारताशी निगडीत आहे. या कथेनुसार गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्य याच्या उलूपी ह्या नागकन्येशी वनवासात असणारया अर्जुनाचा विवाह झाला आणि त्याच्यापासून जन्मलेला पुत्र इरावन  होय. (इरावन हा किन्नरांचा देव ! ही उलूपी अर्जुन सदेह स्वर्गाच्या मार्गावर जाईपर्यंत त्याच्या सोबत होती.) महाभारतानुसार कुरुक्षेत्रात १८ दिवस चाललेल्या पांडव - कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावनने स्वतःला कालीमातेस अर्पण केले, आपले अंगदान केले. शिवाय आपले शिर धडापासून अलग केले. त्याच्या या निश्चयामुळे कृष्णाने त्याला जीवदान दिले. मात्र इरावनने ते नाकारत मरण्याआधी विवाहाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या इच्छेला कृष्णाने मान दिला पण त्याच्या स्त्रीरुपाला पसंती दिली. यावर इरावनने स्त्रीरूप धारण केले ते म्हणजेच मोहिनी ! (इरावनाने धारण केलेले हे स्त्रीरूप इतके देखणे होते की आजही मोहिनी या शब्दाचा अर्थ एखाद्यावर गारुड होणे असा घेतला जातो)  धडावेगळे शिर झालेल्या जखमी अवस्थेतील इरावनास कृष्णाने आणखी एक वरदान देत अशी दिव्य दृष्टी दिली होती की ज्या योगे त्याला कुरूक्षेत्रातील घटना डोळ्यासमोर दिसत होत्या. जसजसे युद्ध पुढे जात राहिले तसतसे त्याच्या निखळून पडलेल्या डोक्याचे भेंडोळे मोठे होत गेले आणि अठराव्या दिवशी पांडवांच्या विजयानंतर जखमी अवस्थेतील इरावनचा मृत्यू झाला. इरावनचे मस्तक आजही दक्षिणेकडील अनेक देवळात दर्शनी भागात लावलेले आढळते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर संकटे कमी होतात आणि संततीप्राप्ती होते असे दक्षिण भारतात मानले जाते. इरावनने स्वतःच्या सत्वाचा त्याग करून सत्याच्या विजयासाठी देह पणाला लावला आणि देवाच्या सांगण्यावरून स्त्री देह धारण केला, त्या नंतर साक्षात कृष्णाने त्याच्याशी विवाह केला या आख्यायिकेमुळे इरावन हा किन्नरांचा देव आहे. ते त्याच्याशी लग्न करतात. आजही तामिळनाडूमधील कुवागम या गावामध्ये तमिळ नव वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून अठरा दिवसाचा हा सोहळा चालतो ज्यात किन्नर इरावनशी विवाहबद्ध होतात. महाभारतात अर्जुनाने घेतलेले बृहन्नडेचे रूप आणि स्त्री असूनही पुरुषाप्रमाणे वाढलेला शिखंडी ही उदाहरणे किन्नर नेहमीच देत असतात.

कुवागम येथे होणारया लग्नविधीस आता जगभरातून किन्नर येत असतात. अठरा दिवस चालणारया या सोहळ्यात पहिले सोळा दिवस नाचगाणे चालते. त्यात गोल रिंगण बनवून सगळे किन्नर ठेक्यात टाळ्या वाजवत यात सामील होतात. आनंदाने नाचगाणे करत करत लग्नाची तयारी केली जाते. या काळात खिदळून आणि विविध चित्कार करून आपल्या मनातील ख़ुशी ते प्रकट करत असतात. सुगंधी कापूराचा आणि मोगऱ्याचा गंध सर्व वातावरणाला भारून टाकत असतो. सतराव्या दिवशी किन्नराचे इरावनच्या मूर्तीशी मंदिराचे पुजारी किन्नराच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून, इरावनास नारळ चढवून किन्नराचे विधिवत लग्न लागते. अठराव्या दिवशी इरावनच्या मूर्तीला गावातून मिरवले जाते. गावभर मिरवल्यानंतर ही मूर्ती फोडली जाते. त्या नंतर इरावनची पत्नी झालेला किन्नर आपले मंगळसूत्र तोडतो. त्याच्या चेहरयावरचा सर्व शृंगार इतर किन्नरांकडून पुसला जातो. त्याला पांढरी वस्त्रे परिधान करायला लावली जातात. त्या नंतर त्याला छाती बडवून जोर जोराने हमसून हमसून रडायला लावले जाते. आधी तो दबावाखाली रडतो पण रडता रडता एक क्षण असा येतो की त्याचे खरेखुरे रडणे त्यात मिसळते. काळीज हेलावून जाईल असा शोक तो करतो. मला वाटते या घटकेस त्याच्या स्वतःच्या आयुष्यभराच्या अपमानाच्या - अवहेलनेच्या वेदना यात एकजीव होत असाव्यात. ज्यामुळे आधी नाटकी वाटणारे रडणे नंतर हृदयाला पीळ पाडून जाते. पुढच्या वर्षी पुन्हा भेटीगाठी घेण्याच्या आणाभाका घेऊन दुसऱ्या दिवशी ते सगळेजण आपआपल्या ठिय्याकडे परतीच्या प्रवासाला निघतात. पण हा सर्व सोहळा विधी करायला लाखोंचा खर्च येतो. दक्षिण भारतातील किन्नरास गुरुपद हवे असेल तर त्याने कुवगमला विवाहविधी करणे क्रमप्राप्त ठरते अन्यथा आयुष्यभर तो एक सामान्य किन्नर बनून राहतो.       

सध्याच्या घडीला देशभरात पन्नास लाखाहून अधिक किन्नर आहेत आणि त्यांच्यात दरवर्षी वेगाने भर पडत आहे. याला अनेक सामाजिक घटक कारणीभूत आहेत. किन्नर आपल्या परिवारात लहान मुले देखील सामील करून घेत असतात. आजकाल काही आईबाप गरिबीमुळे आपली मुले यांच्या स्वाधीन करताना आढळले आहेत. तर काही पालकांना आपल्या मुलाच्या लैंगिक वर्तनाचा संशय आला की त्याची इच्छा असो वा नसो त्याला किन्नरांच्या हवाली करतात. काही किन्नर आपल्या ताब्यातील मुलांचा हौसेने लाडाकोडाने सांभाळ करतात. पण त्यांच्या शिक्षणाची हेळसांड ही होतेच यात शंका असायचे कारण नाही. या बहुतांश मुलांची कथा मोठी करुण असते. ही मुले वयात येतानाची लक्षणे त्यांच्या शरीरात दिसून येतात, मग त्या मुलांना किन्नर बनवून घेण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम केला जातो. त्या मुलाला एक दिवस आधी सर्वापासून वेगळे केले जाते. सगळे किन्नर बोलावले जातात, एकाच चुलीवर स्वयंपाक केला जातो. नाचगाणे होते. दुसऱ्या दिवशी त्याला न्हाऊ माखू घातले जाते. अंगभर अत्तर लावले जाते. ज्येष्ठ भाविणीकडून वा एखाद्या ज्येष्ठ किन्नराकडून त्यला फुलांचे हार घातले जातात. त्याची पूजा केली जाते. याला ते 'शुद्धीकरण' म्हणतात. या शुद्धीकरणानंतर त्याला समारंभाच्या उंच जागेवर वा एखाद्या चौरंगावर बसवले जाते. तिथे त्याचे जननेन्द्रिय कापले जाते. यावेळी कधी कधी भुलीचे औषध लावले जाते तर कधी झाडपाला वापरला जातो. या विधीनंतर त्याला सर्वांच्या समोर साडी चोळी नेसवली जाते, दागिने घातले जातात आणि शेवटी बांगड्या घालून कुंकू लावले जाते. मगच तो स्वतंत्र किन्नर म्हणून ओळखला जातो. ( हा विधी सर्वच किन्नरांच्या बाबतीत होतो असे नाही आजकाल याचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे आढळते ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे )

आयुष्यभर अपमान आणि दुःख सहन करणारया किन्नरांची दुवा लागते असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे एखाद्या घरी मुल जन्मले किंवा एखादा विवाहसमारंभ असला की किन्नर बोलावले जातात, त्यांना ओवाळणी दिली जाते, ते आपल्या दुवा देतात. कधी कधी याच्या उलट चित्रही पाहायला मिळते. ज्याने आपले जीवन दुःखात तळतळाटात काढले आहे त्याचा तळतळाट लागतोच या समजापायी अनेक लोक यांची बददुवा नको म्हणून ते काय मागतील ते देऊन आपली सुटका करून घेतात. अशी कमाई सोडता किन्नरांना भीक मागून पोट भरण्याशिवाय वा देहविक्रय केल्याशिवाय गुजराण करणं अशक्य होऊन बसतं. अशा वेळी अनेक किन्नर दमदाटी करून वा अब्रू चव्हाटयावर आणण्याची भीती दाखवून पैसे उकळतात. मी त्यांचे समर्थन करत नाही पण त्यांना रोजगाराचे साधन नसते हे ही नमूद करू इच्छितो. एक तर त्यांचे रक्ताचे कुणी नातेवाईक त्यांच्याकडे पाठ फिरवून असतात अन समाज तर त्याची आजीवन कुचेष्ठा करतो. त्यांनी पोट कसे भरायचे ? भरीस भर त्यांचे अज्ञान, रिती रिवाजांचे जोखड, शिक्षणाची अनस्था वा आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे बहुतांश किन्नर व्यसनाधीन होतात. त्यांना विविध आजार जडतात आणि त्यांची अधिकच परवड होऊ लागते. तमिळनाडू वगळता अन्य राज्यात किन्नरांच्या विकासाचे प्राधिकरण आढळून येत नाही. त्यांना कोणी नोकरीस ठेवून घेत नाही की त्यांना कुठे समान हक्क मिळत नाहीत, त्यामुळेच न्यायालयाने नुकतेच त्यांना जेंव्हा तिसरया लिंगघटकाचा दर्जा दिला तेंव्हा अनेक किन्नरांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

अशी दारूण अवस्था असूनही बहुसंख्य किन्नर आपल्या आत्ममग्न आनंदात स्वतःला जखडून टाकतात. लोक त्यांना नाचगाण्याला बोलावतात तेंव्हा त्यांना फार बरे वाटते. तिथे क्वचित त्यांच्या अंगचटीलाही काही लोक जातात. पण त्यांच्याशी मनमोकळी मैत्री करायला घाबरतात, त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण होणे तर अशक्यच. आजकाल अनेक किन्नर वेश्यांच्या वा तत्सम स्त्रियांच्या दलालीचे काम करताना आढळतात यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. काही किन्नरांनी अलीकडील काळात राजकीय निवडणुका लढवून त्यात यश मिळवल्याची काही उदाहरणे समोर आलीत. यंदाच्या कुंभमेळ्यात किन्नर साधूंनी स्वतंत्र आखाडयाची मागणी केल्याची घटना ताजी आहे. किन्नरांनाही गुरु असतो ते त्याला नित्य दक्षिणा देत असतात. आपल्या कमाईतला चौथा हिस्सा ते आपल्या गुरूला देतात. यामुळे ज्या गुरूचा शिष्य संप्रदाय मोठा असतो तो लक्षाधीश झाल्याची काही उदाहरणे आहेत. स्थानिक भावसार लोकांकडून किन्नर कधीही पैसे घेत नाहीत. भावसार हा बाहुसार या शब्दाचा अपभ्रंश आहे, सहस्त्रार्जुन, भावसार व स्वकुळ ह्या क्षत्रिय समाजातील पोटजाती आहेत. कश्यप ऋषी व दक्ष राजाच्या १७ कन्येपैकी अनिष्टा नामक कन्या यांच्या संबंधातून जन्मास आलेल्या यक्ष, किन्नर, गन्धर्व यांचे रक्षण करण्याचे काम बाहुसारांनी केले अशी किन्नरांची मान्यता असल्याने काही ठिकाणी किन्नर भावसार लोकांकडून पैसे घेत नाहीत. ..


किन्नर एकमेकाप्रती कमालीची आस्था आणि स्नेहभाव ठेवतात. हे सर्व ते आपल्या हरवलेल्या आत्मसन्मानासाठीच करत असतात. किन्नरांची अपेक्षा धनदौलतीपेक्षा सन्मानाचीच जास्ती आहे, लोकांनी आपल्यावर हसू नये. आपल्याला समजून घ्यावे इतकीच त्यांची अपेक्षा आहे. समाजात जे स्थान अपंग, विकलांग लोकांना आहे ते ही स्थान त्यांना नाही याची त्यांना खंत आहे. चरितार्थ ही त्यांची सगळ्यात मोठी समस्या असल्याने ते समाजातील कुठल्याच घटकाविरुद्ध भूमिका घेत नाहीत. किन्नर जातपात धर्मभेद करत नाहीत या बाबीचाही विचार होत नाही. किन्नर स्वतःला 'मंगलमुखी' म्हणवून घेतात कारण ते मंगल कार्यातच बोलावले जातात पण एरव्ही त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. सर्वांच्या कुचेष्टेचा विषय बनून राहतात. कधी ना कधी या निर्भत्सनेच्या आयुष्यातून सुटका होण्याची स्वप्ने उराशी कवटाळून जगणारया लाखो किन्नरांची एव्हढी माफक अपेक्षा पूर्ण करणे सुजाण समाजाला सहज शक्य आहे.

किन्नरांची इतकी दुरावस्था असूनही काही धडधाकट 'पुरुष' साडी नेसून किन्नरांची नकल करत लोकांकडून पैसे उकळत फिरतात तेंव्हा अशा पुरुषांना जनामनाची जरा सुद्धा लाज कशी वाटत नाही हा सवाल संताप देतो. विशेषतः रेल्वेत पकडले गेलेले निम्म्याहून अधिक किन्नर पुरुष निघालेत. अशा नकली किन्नरांमुळे खरया किन्नरांची जी हानी होते आहे ती कधी भरून निघेल असे वाटत नाही. काही ठिकाणी अशा 'कर्तृत्ववान' पुरुषांना किन्नरांनी मारले तेंव्हा लोकांनी किन्नरांनाच धमकावले, त्यावेळी त्यांना त्या नकली किन्नराचे कपडे उतरवावे लागले. पुरुषांना सारे काही उपलब्ध होऊ शकते तरीही त्यांना किन्नर बनून किन्नरांच्या हक्कावर हात मारावे वाटतात तेंव्हा ती पुरुषांची शोकांतिका आहे की किन्नरांची हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

पूर्वीच्या काळी काही ठिकाणी किन्नराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जेंव्हा जागेवरून उचलला जाई तेंव्हा कपड्यात गुंडाळून तो उभ्याने तिरडीपर्यंत खुरडत आणला जाई. कधी कधी त्याला भिंतीवरही धडकवले जाई, भिंतीवर धडकावण्याचा प्रघात उत्तर भारतात काही ठिकाणी आढळतो. ..कधी कधी झोळीवजा कापडात त्याला नेले जाई ...एकंदर त्याच्या मृतदेहाची जमेल तेव्हढी विटंबना केली जाई.... पण आता काळ बदलला तसा काही नव्या विचाराचे किन्नर या अघोरी प्रथांना फाटा देताना आढळत आहेत ही एक चांगली बाब आहे......वय झालेले अनेक किन्नर क्वचित मृत्यूला घाबरत असतात कारण त्यांनी मृत्यूपश्चातचे हे सोपस्कार इतक्या वेळा केलेले असतात की त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊन जातात...माझ्या पाहण्यात एकही वयस्क किन्नर असा आला नाही जो व्यसनाच्याआहारी गेला नव्हता ....नियतीचा भाग म्हणून कोरडे सुस्कारे टाकत त्यांना असेच सोडून दयायचे की माणूस समजून घ्यायचे हे सर्वतः आपल्याच हाती आहे ..

 - समीर गायकवाड.

( 'किन्नर कस्तुरी' ही NGO किन्नरांसाठी काम करते तर 'किन्नरअस्मिता' ही NGO ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करते... 'किन्नर मां' आणि 'हमसफर ट्रस्ट' ह्या दोन संस्थाही काम करतात. या शिवाय अलीकडच्या काळात अनेक जण समोर येत असल्याचे चित्र दृष्टीस पडते आहे... लक्ष्मी नारायण त्रिपाठी ही एकटी एका संस्थेच्या बरोबरीचे काम करते, काही काळापूर्वी ती बिग बॉस ह्या शो मध्ये सामील झाली होती..सकारात्मक दृष्टीकोनातून बदल घडू शकतात.. लेखातील अनुभव राज्यानुसार वेगवेगळे असू शकतात किंवा व्यक्तीसापेक्ष त्यात बदलही असू शकतात

लेखन प्रयोजन - किन्नरांचे आयुष्य समोर आणणे हा लेखाचा हेतू नसून अकारण त्यांना कुत्सितपणे टाळले जाते त्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकणे हा आहे. लोकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा हे लेखनप्रयोजन आहे )