Saturday, December 3, 2016

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावे ....


कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावे, लोकांना आवडेल असेच खरडावे.

निर्जीव चंद्र ताऱ्यांवर, समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर मधुर गीते लिहावीत.

दोन दिसाच्या क्षणभंगुर प्रेमावर जगड्व्याळ शब्दांची कवने लिहावीत.

काँक्रीटच्या जंगलात राहून कुसुंबी झाडांच्या हिरवाईची शब्दफुले वेचावीत.

गुलछबू तुंदिलतनू व्हावे, बुभुक्षित चेहरे दुर्लक्षून गोडगुलाबी चित्र रेखावे.

कोणाच्याही बेगडी सौंदर्यावर आसक्त होत फुकाची लेखणी झिजवावी.

सृष्टीशी तादात्म्य पावू नये ; शुष्क यमक, अलंकार, वृतांवर बेसुमार प्रेम करावे.

भावहीन आशयाच्या शब्दांचे इमले रचून त्यात इमानाचे कलेवर चिणावे. 

विश्वासघातक्यांवर स्तुतीसुमने उधळत खोट्या थोरवीचे पोवाडे लिहावेत.

गंधभ्रांतीच्या शोधातील गुलाबाच्या पाकळ्यावर प्रतिभा खर्चत राहावे.

मनातले पंगु सत्य सांगू नये, लाचारीच्या परिघावरती गोल गोल फिरावे.

दैन्य -विषमता, अन्याय-उपेक्षा शोषण याकडे सराईत डोळेझाक करावी.

चिमणी पाखरे जगवली नाहीत तरी जाळीदार घरटयावर मजबूत लिहावे.

कोरडया नात्यांत जगून अथांग माणूसकीच्या सुमार कविता कराव्यात.

भणंग विद्रोहाचे जहर प्राशू नये, भ्याड समाजाविरुद्ध गरळ ओकू नये.

टीका करणे टाळावे, प्रस्थापितांची थुंकी झेलत बधिर रचना कराव्यात.

मंगलाष्टके लिहावीत भाटगिरी करावी लूत भरलेले कुत्र्याचे जिणे जगावे.

शब्द विकावेत, आशयाचा लिलाव करावा, खुंटलेली प्रतिभा गहाण टाकावी.

डोळ्याला झापडं लावून जगावे, जगाला कोलावे, आपल्याच कोषात जगावे.

आहेव पुरुषीपणाची कड घ्यावी, इभ्रतीचे बांडगूळ माथ्यावर वाढवावे.

गोठलेल्या रोमरोमात अंगार फुलवू नये, पोलादी लेखणीचा पारा करावा. 

दोनतोंडी गांडूळ व्हावे, पायातली वहाण व्हावे पण सत्यासूड होऊ नये.

डोळ्यादेखत माणसे मरू दयावीत, मेलेल्यांवर आदर्श सूक्ते रचावीत.

कणाहीन विचार ठेवावेत, लाळघोटेपणा करत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करावे.

सत्याची बाजू घेऊ नये, बोथट आत्म्याशी बेगुमान बदफैली करत जगावे.

कविता न ऐकताच दाद देणाऱ्या श्रोत्यांसाठी खोटे स्मितहास्य करावे.

पुरस्कारासाठी मुजरे करावेत, उष्ट्या संमेलनासाठी झोळ्या पसरव्यात.

सरकारकडे याचना करावी, सत्ताधिशांचे सोनेरी जोडे उराशी कवटाळावेत.  

घरासाठी अनुदाने मागावीत, खड्डयातल्या रस्त्यांना नाव देऊन घ्यावे.

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावे, लोकांना आवडेल असेच खरडावे.- समीर गायकवाड.