Thursday, December 29, 2016

ए लेटर टू राजेश खन्ना ...


'आनंद मरते नही' असं तू सांगून गेलास. पण तू मरावास असं तुझ्याच लोकांना वाटत होतं की काय अशी शंका कधी कधी मनात येते. तुझे स्वप्न होते की, तुझ्यापश्चात कार्टर रोड स्थित तुझ्या निवासस्थानाचे संग्रहालयात रूपांतर व्हावे. तुला अखेरच्या ध्यासपर्वाची चाहूल लागल्यागत तू बोलून गेला होतास.
खरे तर ९०च्या दशकापासूनच तुझी परवड सुरु होती. तुझे सिनेमे चालत नव्हते अन तुला नवे काम मिळत नव्हते. तुझे व्यक्तिगत दुःख समजून घेण्यास जवळ कुणी हक्काचं माणूस नव्हतं. त्यातच तू दारूच्या प्रचंड आहारी गेलास. छातीचा पिंजरा करून घेतलास. स्मोकिंग आणि ड्रिंक्सने तुझा गोजिरवाणा चेहरा काळवंडून गेला. तुझे पाठपोट एक झाले. तू केलेली हॅवल्स पंख्याची जाहिरात पाहून डोळ्यात पाणी आलं होतं. ते तुझे अखेरचे दर्शन ठरले. लोकांनी तू म्हातारपणी पंख्याची जाहिरात केलीस म्हणून टोमणे मारले त्यावर शेवटी तू खुलासा केलास की, "माझे दिवस राहिलेत माहिती नाही, पण माझ्या चाहत्यांचा मी किती मोठा फॅन आहे हे मला हॅवल्स फॅनच्या जाहिरातीतून दाखवून द्यायचे होते." तू चाहत्यांचा भारीच फॅन निघालास कदाचित तुझे चाहते तुला रक्ताने पत्रं लिहीत या गोष्टीने तुझ्या काळजात घर केलं असावं....

तू शेवटी जगापासून स्वतःला अलिप्त केलंस. बायकोला दूर लोटलंस. पोरींशी तात्पुरता संबंध ठेवलास. तू असं का केलंस हे ओपन सिक्रेट आहे. तुझी मैत्रीण अनिता अडवाणीनेच दोन दशके तुझ्यासवे काढली, तुझी सुख दुःखे वाटून घेतली. तू चाहत्यांना घरात घेत होतास पण पत्नी डिम्पलला तू घराची दारे बंद केली होतीस. मुलींना मात्र तू भेटायचास. त्यांच्याशी तुझा संपर्क होता. तुझ्या आजाराने गंभीर वळण घेतल्यावर मुलींच्या मध्यस्थीने तुझे डिम्पलसोबतच्या मूक संबंधांना संवाद लाभला. तुझं आजारपण वाढत गेलं. २०१२ च्या पावसाळयात तू अखेरचा श्वास घेतलास आणि तुझ्या चाहत्यांनी अश्रूंना वाट करून दिली. तू म्हणायचास की, 'जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये' अगदी तसच झालं. दुनियेला तुझा वीट येऊपर्यंत तू जगला नाहीस. पण तुझ्या लोकांना तुझ्याबद्दल नेमके काय वाटत होते हे कधी कळेल असे वाटत नाही. तू गेलास आणि तुझे नाव एका रस्त्याला दिले, तिथेच एक छोटासा पुतळा बसवला गेला. डिम्पल आणि तुझ्या मुली तुला इतक्याच औकातीचा समजत असावेत. तुझ्या एक्झिटनंतर तुझ्या इस्टेटचा वाद न्यायालयात गेला. अनिता आडवाणीने सेवेचे मोल मागितले. पत्नीने कायदेशीर हक्क सांगितला. २००९ मध्ये जी गोष्ट तू मुलींदेखत 'बॉम्बे टाईम्स' ह्या फिल्मी नियतकालिकाच्या वार्ताहरास बोलून दाखवली होतीस त्याकडे तुझ्या लाडक्या लेकींनी कानाडोळा केला. तू तेंव्हा म्हणाला होतास की माझ्या मुलींकडे सर्व काही आहे, त्यांचा माझ्यावर जीव आहे. मी असेन नसेन पण माझ्या घरात त्या माझं संग्रहालय उभं करतील. माझ्या चाहत्यांनी माझ्यावर अनावर प्रेम केलं त्याची फुल ना फुलाची पाकळी स्वरूपातील भेट म्हणून हे संग्रहालय तुला लोकांना अर्पण करायचे होते.

पण इथेच तू चुकलास. तू चाहत्यांना वेळ देत होतास, भेटत होतास पण बायकोला भेटत नव्हतास याचं तिला शल्य जाणवलं असेल याचा अंदाज तुला आला नाही का ? तुझ्या दवापाणीवर केलेला तिचा खर्च नको का निघायला ? लोकांना कोणी शंभर करोडची जागा भेट देतं का ? तू म्हणायचास की, "पब्लिक सब जानती है !' खरंच आहे ते. लोकांना सर्व माहिती आहे. तुझ्या इस्टेटीवरील वादात डिम्पल जगासमोर एक्सपोज होईल असे लक्षात आल्याबरोबर तिच्या लाडक्या जावयाने अक्षयने मध्यस्थी केली. अनिता आडवाणीचा रीतसर खिसा गरम केला. मामला न्यायालयाबाहेर रफादफा झाला, तुझा 'आशीर्वाद' बंगला पोरींच्या आणि बायकोच्या हिश्श्यात आला. पोरींनी तुझा 'आशीर्वाद' ९० कोटीत विकला. फार घाई झाली होती त्यांना. ना जाणो तुझे सायको चाहते पुढे आले असते आणि इथे तुझ्या वस्तूंचे संग्रहालय करा म्हणून आंदोलन करत बसले असते तर त्यांची पंचाईत झाली असती. अनिताचा अडसर दूर होताच तुझ्या मृत्यूनंतर दोन वर्षात त्यांनी तुझे स्वप्न विकले. त्या तुझ्या सारख्या अविचारी नाहीत. त्यांना पैशाचे मोल कळते रे बाबा. शशिकिरण शेट्टी नावाच्या उद्योगपतीने तो बंगला विकत घेतला. आधी हवा झाली की तो तुझे स्मारक उभं करणार पण कशाचे काय ? या वर्षीच्या फेब्रुवारीत हा बंगला जमीनदोस्त झाला. आता कार्टर रोडला काही खास उरलं नाही, आठवणींचा एक महाल होता तो देखील काही व्यवहारचतुर माणसांनी उध्वस्त केला. बंगल्याच्या प्रॉपर्टी पेपर्सवर जतीन चुनीलाल खन्ना असं नाव होतं ते आता पुसलं गेलंय.

का कुणास ठाऊक पण तुझ्या एव्हरग्रीन 'अमरप्रेम' मधला तुझा डायलॉग तुलाच ऐकवावासा वाटतो. त्यात तू म्हणतोस, "जिंदगी के कुछ चक्कर ऐसे होते है जिसका मजा सिर्फ वही लोग ले सकते है, जो जिंदगी का शेअर जानबुझकर घाटे मे खरीदते है !"
तू जाणून बुजून घाटयाचे सौदे करून निर्विकारपणे निघून गेलास, चुटपूट मात्र आमच्या काळजाला लागून राहिली...
तुझ्या चाहत्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत... आज तुझी जयंती आहे असे काही नतदृष्ट लोक सांगताहेत... जयंती मृत व्यक्तींची केली जाते. तू तर जिंदा आहेस कारण तूच सांगून गेलास की, "आनंद मरते नही ...."

- समीर गायकवाड .