Saturday, December 10, 2016

'चित्र्या' - एका कुत्र्याची हृदयस्पर्शी कथा ..."आज्जे हे बग, चित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग !"
नातवाच्या हाकाटीने कावरीबावरी झालेली मथुराबाई आपल्या जीर्ण झालेल्या इरकली नऊ वारीचा पदर नीटनेटकाच असूनही पुन्हा ठीकठाक करत, उजव्या हाताने कपाळावर ओढत ओसरीत आली. जणू काही कुणी जीवाभावाचे माणूस घरी आलंय, अन त्याच्या समोर आदबीने जावं तशी मथुराबाई लगबगीने बाहेर आली होती. मथुरा दारापाशी येताच चित्र्याने तिचे हात चाटायला सुरुवात केली तशी मथुराआजीच्या डोळ्याला धार लागली. पदराचे टोक डोळ्याला पुसत ती झपकन आता गेली. त्या बरोबर चित्र्याही आत आला. मथुराआजीने ढेलजेत बसकण मारली अन डोळयाला लागलेली धार पुसू लागली. ते बघून चित्र्या तिच्या पुढ्यात जाऊन बसला, हळूच तिच्या मांडीवर त्याने डोकं टेकवलं. चित्र्याचा श्वास वेगात होत होता, त्याच्या छातीचा पिंजरा जोराने खाली वर होत होता. तोंडातून लाळ गळत होती, पाय धुळीने माखलेले होते. मथुराने स्वतःला सावरले आणि प्रल्हादला, आपल्या नातवाला चित्र्याला खायला प्यायला देण्यास फर्मावले.

"मुक्कं जनावर आहे बाबा, त्याला खाऊ घाल काही तरी. आपल्या धन्याच्या ओढीने कुठून आलंय बग ! कशी माया रे ह्याची ! जणू माझ्या पोटचा गोळाच की रे..."असं बोलून मथुरा आजीने पुन्हा डोळ्याला पदर लावला. काही केल्या त्यांना रडू आवरेना. मथुरा आजींच्या या हुकुमाचीच प्रल्हाद वाट बघत असावा. आधी त्याने रांजणातलं थंड पाणी जर्मनच्या वाडग्यात आणून दिले. चित्र्याचं पाणी पिऊन झाल्यावर आत जाऊन दुरडीत ठेवलेली भाकरी आणि लोटकंभर दुध दिले. चित्र्याने दुधभाकरीच्या वाडग्याकडे नुसते बघितले पण तोंड लावले नाही. तो आपला त्याच्या मालकिणीच्या पायाशीच बसून राहिला. चित्र्या दुधाला तोंड लावत नाही हे पाहून मथुराआजीला अजूनच उमाळे दाटून आले. तिने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्याच्या मऊ अंगावरून हात फिरवत त्याच्याशी बोलू लागली.
"खा रे माझ्या वासरा. न्हायतर तुझ्या मालकाची आण हाये बग तुला ...'" मथुराआजीची ही मात्रा चित्र्याला लागू पडली. तिच्या पायातून उठून ते मुकं जनावर त्या वाडग्याकडे गेले आणि त्याने एका झटक्यात कुस्करलेली दुध भाकरी साफ केली. खरे तर दोनेक दिवसापासून चित्र्याने काही खाल्लेले नव्हते त्याला भूक तर फार होती पण त्याच्या वयोवृद्ध धन्याला डोळे भरून बघितल्याशिवाय त्याच्या पोटात अन्न जाणे मुश्कील होते. चित्र्या हा रंगनाथ लोहाराच्या वस्तीवरला कारवानी कुत्रा ! त्याची ही अद्भुत कथा ...

मोहोळ तालुक्यातील डिकसळ जवळील घारेवाडीत रंगनाथ लोहारांची शेतीवाडी होती. आठदहा एकर कोरडवाहू जमीन. पाऊस लहरीनुसार पडायचा कधी पिक यायचे तर कधी आभाळ वाकुल्या दाखवत राहायचे. जे काही पिकलं तेव्हढ्यावरच घास गोड मानून दिवस कसेतरी काढायचे असा रंगनाथ आबाचा स्वभाव. वय झालं होतं तरी सुद्धा त्यांची रानातली रोजची फेरी चुकत नसे. शेताच्या बांधावरून चालत जाणारे आबा बघितल्याशिवाय जणू सूर्याला उगवतीला मावळतीला चैन पडत नसावी. अलीकडच्या दोनेक वर्षात तर ते रानातच राहत होते. गावात घरी त्यांचे मन लागत नसे. ते आणि मथुराबाई  दोघेच त्या वस्तीत मुक्कामाला असत. कामाला गडी मिळत नसल्यामुळे आपल्या शेतशिवारात जी काही कामे करावी लागत ती रंगनाथ आबा स्वतःच करत असत. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली होती. धाकटा मुलगा प्रकाश हा चिंचोळी एमआयडीसीत कामाला जाई तर थोरल्या मुलाने सुरेशने माळशिरसजवळ त्यांच्याच नात्यातील एका सोयऱ्याची दहा एकर बागायती जमीन खंडाने करायला घेतली होती. आबांच्या घरात नातवंडे आणि वस्तीवरल्या गोठयात गायी अशी त्यांची दुबार माया चालत असे. आबांना एक मुलगी होती तिचेदेखील लग्न सोयऱ्यात करून दिलेले होते.

आबा कधी दुपारी गावातल्या घरी निवांत वामकुक्षी घेत बसले आहेत असे कधी घडले नव्हते. रानात असले की मात्र दुपारी थोडी पाठ टेकत. तेव्हढाच काय तो आराम. मात्र दिवसभर कशात तरी स्वतःला ते गुंतवून ठेवत. त्यामुळेच त्यांच्या अंगाला सुई कसली ती अजून लागली नव्हती. पूर्वी रोज रामपारी उठून रानात जाणारे रंगनाथ आबा अलीकडच्या काळात शेतातच राहत असल्याने त्यांचे अंग रापले होते. मथुराबाईच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्याचे जाळे थोडेसे गडद होऊ लागले होते. जे काही चार घास मिळत होते त्यात त्यांचे कुटुंब समाधानी होते. मुले, सुना वा नातवंडे कोणीही वसवस करणारे नव्हते. मात्र आबांचा जीव वस्तीवर जास्ती रमत असे त्यामुळे ते दोघे बरेच दिवस वस्तीवर राहून झाले की दोनेक दिवसांसाठी गावात राहत असत. ते कुठे जरी राहत असले तरी प्रसन्नचित्ताने राहत.

आबांची मुलगी मंजुळा हिचं लग्नकार्य जेंव्हा काढलं होतं तेंव्हा रानालगत असणारया पाझर तलावापाशी पारध्यांची काही पाले पडली होती. त्या पारध्यांसोबत दिवस भरत आलेली एक केशरी ठिपक्यांची पांढऱ्या रंगाची कारवानी कुत्री होती. ज्या दिवशी मंजुळेच्या अक्षता पडल्या त्या दिवशी ती कुत्री व्याली. तिला सहा सात पिले झाली. पोरीच्या लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी आबा शेतात गेले तेंव्हा डोळे मिटून किरटया आवाजात विव्हळत असणारया पिलांचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुतुहलापोटी आवाजाच्या दिशेने जात तलावालगत असणारया गर्दनिळ्या धोतरयांच्या डेचक्यात डोकावून पाहिले तर त्यांना पिलांना कुशीत घेऊन बसलेली कुत्री नजरेस पडली. ते थोडे पुढे होणार इतक्यात बिस्कुटया पारध्याने हाळी दिली,
सरकार पुढं जाऊ नगासा, कुत्री व्यालीय तितं..जवळ ग्येलासा तर अंगावर यील ती...तवा लांबूनच बगा.. तो बोलतच होता. रंगनाथ आबाचं सगळं ध्यान मात्र त्या कुत्रीच्या अंगाला घट्ट बिलगून असलेल्या पांढऱ्या रंगावर तांबडया ठिपके असणाऱ्या पिलाकडे होते. त्यांनी ओठावर उजव्या हाताची तर्जनी ठेवून गप्प बसण्याचा इशारा बिस्कुटयाला केला. त्यासरशी खेळणीची चावी काढून घेतल्यावर ती जशी जागेवरच आहे त्या अवस्थेत बंद पडते, तसा बिस्कुट्या जागेवर गप झाला. आबांनीच मग त्याला धोतऱ्याच्या डेचक्याजवळ बोलावले. पावले न वाजवता बिस्कुटया जवळ आल्यावर बायका बारीक आवाजात कानगोष्टी करतात तसं त्यांनी त्याच्या कानाजवळ जाऊन सांगितलं की, ‘तुझी पालं जेंव्हा कधी इथून उठतील तेंव्हा हे पिलू मला देऊन जा ! मी सांभाळ करेन त्याचा. तो कुणाला त्रास देणार न्हाई. कुत्रा असो वा कुत्री त्याला पार माणासाळून टाकतो, तू कशाची बी चिंता करू नकोस. माझं हात आखडतं हायेत, त्यांमुळ तुला जादा काय देत नाही. वस्तीवर येऊन दोन पायल्या जवारी घेऊन जा. गोड मालदांडी हाय बग.
धनी ही चावरी जमात हाय. सुधारणार न्हाई. तुमच्या जीवाला नस्ता घोर लागंल.
आता तू मला शिकवणार का ? जास्त पाल्हाळ लावू नगंस, गप गुमान ऐकतो का जोर लावू ?’
ही मात्रा चांगलीच लागू पडली. 

आठ दहा दिवसांनी पारधी निघून गेले. जाताना बिस्कुटयाने ते पिलू रंगनाथ आबांच्या हाती दिले.आबांनी हलकेच त्याला वर उचलून बघितले तर तो कुत्रा होता. ते पिलू बघून त्यांना कोण आनंद झाला होता. त्याच्या पांढरया अंगावरील ठिपके बघून आबांना वाटले ह्याच्या अंगावर कुणी तरी चित्रच काढली आहेत. त्यामुळे त्याचे नाव ठेवले - चित्र्या !खरे तर कारवानी कुत्र्यात अशी ठिपके असणारी कुत्री आढळत नाहीत, पण बिस्कुटयाच्या कुत्रीचा संकर कुठल्या तरी अन्य प्रजातीतल्या कुत्र्याबरोबर झाल्याने चित्र्या एकटाच वेगळा दिसत होता. बाकीची सारी पिले पक्की कारवानी बेण्याची होती. आबांनी चित्र्याला मायेने आपल्या कवेत घेतले आणि त्या दिवसापासून चित्र्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला.          

दिवस जात राहीले. आबांच्या पायात अडखळणारा चित्र्या आता थोडा मोठा झाला होता. आबांनी त्याला कधी बांधून ठेवले नाही. चित्र्या कायम मोकळा सोडलेला असायचा. आबांची नातवंडे शेतात आली की त्या गोजिरवाण्या पिलाला उचलून घेत, त्याच्या अंगावर आपला गाल घासत. त्याच्या मऊशार कानांना कानाशी लावत. त्याचे मुके घेत तेंव्हा मथुराआज्जी ओरडायची,
"आता कुत्र्याला चाटतूस का काय म्हणावं बाई ! म्हथाऱ्याचं एक चित जाग्याव नाही, तुमाला काय धाड भरलीया तवा माणसं सोडून कुत्र्या मांजराला बिल्गाया लागलासा ? माणूस दिसं ना का काय म्हणावं ?"

खरे तर मथुराबाई खोटं बोलायची. रंगनाथाचा तिथल्या प्रत्येक फिक्या पडलेल्या पानाफुलावर, विस्कटलेल्या फांदयांवर, चिल्बटलेल्या पाखरांवर, मोडकळीस आलेल्या घरटयांवर, अंगात काहूर भरलेल्या वारया वावदानावर, गुराढोरांवर, गायींच्या हंबरडयावर, कोरडया पडलेल्या विहिरीवर, मोहर आटलेल्या आंब्यांवर, आभाळात रेंगाळणारया घारींवर, सांदाडीला लपणारया पाकोळीवर, ढोलीत बसणाऱ्या होल्यांवर, पाटात दडून असणाऱ्या मातीखालच्या जुन्या ओलीवर, शेतवाटेच्या कडेने डोलणारया दगडफुलांवर, चिंचांच्या दाट सावलीवर, चाफ्याच्या रंगावर, सदाफुलीच्या भोळेपणावर, ऊन सावलीच्या शिरवळी खेळावर, सांजेच्या गोधुळीवर, चुलीतल्या विस्तवावर, गोठ्यातल्या चरवीवर, कडब्याच्या गंजीवर, फुटलेल्या पायरयांवर, तुटलेल्या दारावर, गळक्या छपरावर, अगदी दगड धोंडयावर सगळ्या शेतशिवारावर त्याचा अपार जीव होता. त्याने कधी सजीव  निर्जीव असा दुजाभाव केला नव्हता. चित्र्यावर तर त्यांचा फार जीव होता. 

आबा जिथवर आणि जिथं जिथं म्हणून चालत जात चालत जात तिथं तिथं हा बहाद्दर मागे मागे जाई. वाटेने कधी दुसरं मोठं कुत्रं आडवं आलं तर आबांच्या पायाआड लपून एकसारखं भुंकत राही. बांधापासून ते विहिरीपर्यंत आणि वस्तीपासून ते शिवंपर्यंत चित्र्या आबांच्या संगटच असायचा. ते जेवायला बसले की हा शेपटी हलवत हलवत समोर उभा राही अन आपल्यालाही भूक लागलीय याची जाणीव करून देई. त्याचे ते लाडिक वागणं बघून मथुराबाईंचा जीव हरखून जाई. 'माझा वाघीर गं बाई' असं म्हणत मथुराबाई त्याच्यासाठी दुध भाकर कुस्करून देत. लपक लपक आवाज करत तो दोन मिनिटात अख्खं वाडगं चाटून पुसून साफ करून टाकी. दुपारी ते पिंपळाखाली अंग टेकायला गेले की हा त्यांच्यामागोमाग जाई. त्यांनी अंथरलेल्या चवाळयावर अंग मुडपून एकटक त्यांच्याकडे बघत बसून राही नाहीतर पाय लांब करून जीभ बाहेर काढून धापा टाकत शांत बसून राही. त्यांनी जागं होताच हा आपल्या अंगाला आळोखे पिळोखे देई. पुढच्या दोन पायांना लांबवून अंगाचा धनुष्यबाण करे, शेपटीचा गोंडा वर्तुळाकार हलवत हलवत आबांच्या अंगचटीला जाई. आबा देखील त्याच्या पाठीवरून हात फिरवत, त्याला थापटंत, धोपटंत. मग तो आणखीनच लाडात येई. वेगवेगळ्या भावमुद्रा करून तो त्यांच्या अंगावर पुढचे पाय रेलुन उभा राही, त्याची बाहेर लोंबणारी जीभ आणि आपल्या अंगाचा डोलारा कसाबसा सावरत तो त्यांच्या पायावर आपलं ओझं टाकून उभा राही. दोघांचा आळस झटकून झाला की पुन्हा एकदा शिवारफेरी होई. कधी शेजारच्या पवारांच्या वस्तीत आबा जात, तेंव्हा चित्र्या अगदी कावराबावरा होऊन जाई. भेदरलेला असे. कधीकधी तर तो थरथर कापे कारण पवारांच्या वस्तीवरची शिकारी कुत्री एकदम पिसाट होती. ती अजिबात माणसाळलेली नव्हती. चित्र्या त्यांच्या वस्तीवर गेला की ते सगळे जण मिळून एका सुरात मोठमोठ्या आवाजात त्याच्याकडे पाहून भुंकायला सुरुवात करत. कधी कधी त्याच्या अंगावर पण जात. तरीही चित्र्या मात्र आबांच्या मागे जाणे बंद करत नसे. याला आणखी एक कारण होते, ते म्हणजे पवारांच्या वस्तीवर गेल्याबरोबर तिथल्या कुत्र्यांच्या भीतीने घाबरलेल्या चित्र्याला रंगनाथ आबा आपल्या मांडीवर घेऊन बसत. कधीकधी त्यांच्या गावगप्पा तासंतास रंगत तोवर ही स्वारी मांडीवर ! हा जहागिरदार त्यांच्या मांडीचे सिंहासन करून बसून राही अन इतर सर्व कुत्री त्याच्याकडे भेदरल्या नजरेने बघत राहत. तेंव्हा चित्र्याला फार भारी वाटे. 

सांज उतरणीला लागली की मथुराबाई हलकेच पश्चिमेला हात जोडायची, गोड आवाजात एखादा अभंग गायची, एखादी गवळण देखील म्हणायची. ती गायला लागली की एरव्ही हुंदडत फिरणारा चित्र्या वस्तीतल्या घराच्या पायरीपाशी कसलेल्या श्रोत्यासारखा बसून राही. सारं शेतशिवार हरखून जाई आणि पानाफुलात कान आणून निसर्ग तिच्या आवाजाचा आस्वाद घेई ! मथुराबाईचे गाणं ऐकताना त्यांच्या पुढ्यात बसलेल्या चित्र्याचे डोळे मिटलेले असत पण कान मात्र एकदम ताठ उभे ! तो एकाच वेळी मथुराबाईच्या भक्तीभावाकडे ध्यान दयायचा आणि वस्तीकडे कुणी येतंय का याचा कानोसा पण घ्यायचा. मथुराबाईचे गाणं ऐकायला निळ्या आभाळातून चांदण्या उतरत, त्यांचं गाणं ऐकता ऐकता जवारीच्या कणसात हळूच झोपी जात. चोरपावलाने आलेली रात्र तुळशी वृंदावनाभोवती हाताची घडी घालून मथुराबाईकडे एकटक बघत उभी राही, उभं राहून तिचे पाय भरून आले की देवळीत लावलेल्या दिव्याभोवती अंधार कोंडाळे करून बसे. मथुराबाईने लावलेल्या मंद सुवासिक उदबत्तीच्या धुराची वलये कुठल्या दिशेला जातायत याकडे मधूनच डोळे उघडून पाहणारा चित्र्या त्या पिवळसर उजेडात एखाद्या हरणासारखा दिसे.

मथुराबाईचे गाणे उरकले की चुलीतला आर पेटून उठे. आधी काटवटाचा आवाज येई अन मग भाकऱ्या थापल्याचा धपक धपक आवाज आला की चित्र्या आळस झटकून ताठ उभा राही. त्याचं सारं लक्ष चुलीवरच्या वासाकडे असे. काही वेळाने स्वयंपाक झाला की ते तिघंही काळ्यानिळ्या अंधारात कंदीलाच्या फिकट केशरी पिवळ्या उजेडात जेवायला बसत. आबांच्या पुढ्यात जर्मनचे ताट आले की चित्र्या तिथं दाखल होई. त्याच्या वाडग्यात त्याच्या वाटेचं वाढून झालं की मथुराबाई आपल्या ताटात वाढून घेत. जेवताना कधी आबांना ठसका लागला की मथुराबाई कासावीस होण्याआधी चित्र्याचाच ऊर धपापायचा. तो खाता खाता थांबायचा. जेवणं आटोपली की मथुराबाई आणि रंगनाथ आबा जुन्या गप्पा मारत बसत. तेंव्हा चित्र्या त्या दोघांच्या भोवती फेऱ्या मारायचा, नाही तर कंदीलाभोवती उडणाऱ्या लाईटच्या पाकोळ्यांच्या मागे धावत सुटायचा. फिरून फिरून दमला की तो पुन्हा आबांच्या शेजारी येऊन बसे. 

रात्र गडद झाली की मथुराबाई कंदीलाची वात बारीक करत. वस्तीतल्या ओसरीत आबांची बाज आडवी केली जाई. त्यावर दोन वाकळी अंथरून झाल्या की डोईखाली एक उसवशी अन अंगावर पांघरायला गोधडी येई. ह्या  सगळया अंथरूण पांघरुणाचा सोपस्कार सुरु असताना चित्र्या 'सावधान'च्या स्थितीमध्ये उभा असे. आबांनी बाजेवर अंग टाकले की चित्र्या त्यांच्या बाजेच्या पुढच्या पायापाशी अंगाचे वेटोळे करून बसून राही. आभाळातला चंद्र रंगनाथआबांना बघून तृप्त होत गालातल्या गालात हसे तेंव्हा चित्र्या देखील हसरया चेहरयाने चंद्राकडे पाही. चित्र्याला मध्येच पेंग येई. मधूनच कधी काही आवाज कानी आला तर तो सावधपणे आवाजाच्या दिशेने पळत जाई. पण आपल्या भुंकण्यामुळे आबांची अन मथुराबाईची झोपमोड होऊ नये म्हणून होता होईल तो रात्री भुंकत नसे. कारण त्याचा आवाज इतका जबरदस्त होता की ऐकणारा गर्भगळीत होऊन जावा. त्याच्या आवाजात मोठी दहशत होती. बघता बघता पहाटेचा गारवा अंगाशी लगट करून जाई अन चित्र्याने दिलेल्या जांभईने आबा जागे होत, आबा सकाळची कामे उरकून घेत तोवर चित्र्या मस्तपैकी चक्क आबांच्या बाजेवर चढून 'ताणून' देई ! आबा अंघोळ करून आले की त्यांच्या चाहुलीने तो टुन्नदिशी उडी मारून खाली येई. त्या दोघांचा पुन्हा नवा दिवस सुरु होई...... 

काळ असाच पुढं जात राहिला. चित्र्या आता बारा साडेबारा वर्षांचा झाला होता. आता तो पुरता थकला होता. त्याच्या हालचाली शिथिल झाल्या होत्या. अंगावरचे केस विरळ झाले होते. आवाजातली जरब विरून गेली होती. मान सदा खाली वाकलेली असे. नजर सदा न कदा आबा अन मथुरा आजीकडे लागून असे. ते दोघेही कधी वस्ती सोडून गावात गेले तर त्याला संगं घेऊन जात. गावात गेल्यावर त्याचा मुक्काम घराच्या पडवीत असे. तिथे त्याच्या बडदास्तीला आबांची खंडीभर नातवंडे असत. पणा हा मानापानाचा अन दीड कानाचा लाडोबा मथुराबाईच्या हाताने वाढलेलेच खायचा !

मागच्या तीन दिवसांपूर्वी रंगनाथ आबा थकलेल्या चित्र्याला चुकवून गावात आले होते. गावातल्या त्यांच्या भेटी गाठी उरकल्यावर पोरांनी त्यांना 'गाडीवरनं  वस्तीत सोडायला येतो' असं विनवून देखील हट्टीपणाने पायी चालतच ते शेताच्या रस्त्याला लागले होते. दुपारची वेळ होती. ऊन फारसे कडक नव्हते. हवा मात्र थोडीशी कोंदट होती. झाडाचे एकही पान हलत नव्हते. रमत गमत शेताकडे चालत जाणाऱ्या आबांना एकाएकी डोक्यात आणि छातीत सणक भरल्यागत वाटू लागले. त्यांचा जीव घाबरा घुबरा झाला. काय होतेय हे कळण्याआधीच ते जमिनीवर कोसळले. खाली पडताना त्यांच्या डोक्याखाली एक बऱ्यापैकी मोठा धोंडा आला अन त्यांचे डोके त्यावरच आपटले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. काही क्षणात रंगनाथ आबा बेशुद्ध झाले. नेमक्या त्याच वेळेस चित्र्याला जणू ज्ञानेंद्रियाने काहीतरी सूचित केल्यागत वागू लागला. तो पाय खरडू लागला. एकाच वेळी तो ओरडूही लागला अन विव्हळूही लागला. मान हलवत हलवत डोकं दगडावर घासू लागला. त्याचं रडणं, भुंकणं काही केल्या थांबेना, त्याचं हे चमत्कारिक वागणं मथुराबाईंनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे मथुराबाई त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत थिजल्यागत  उभीच राहीली. काही क्षणात भानावर येताच ती त्याच्या जवळ गेली. तिने जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवला तसा चित्र्या आणखीनच विव्हळू लागला. मथुराबाईला अकारण घाबरल्यासारखे वाटू लागले, भीतीने तिचा चेहरा उतरला. ऊर धपापू लागला. 'उगी उगी राहा माझ्या बाबा' असं पुटपुटत ती बिचारी गावाकडच्या रस्त्याला आपला धनी दिसतोय का हे बघू लागली...

तोवर इकडे वस्तीच्या वाटेवरल्या एका वाटसरूने आबाला खाली पडलेले बघितले आणि तत्काळ गावात खबर धाडली. मिळेल त्या बैलगाडीत घालून आबाला आधी त्यांच्या गावातल्या घरात नेलं. तोवर अख्खा गाव त्यांच्या घरापुढं गोळा झाला होता. रंगनाथाच्या डोईतून वाहणारे रक्त बघून बायाबापड्यानी रडायला सुरुवात केल्यावर जाणत्या माणसांनी त्यांना हुसकून लावले. जीप मागवून आबाला तालुक्याच्या गावी मोहोळंत नाहीतर सोलापूरच्या नाक्यानजीकच्या पहिल्या कुटल्याबी दवाखान्यात नेण्याचे ठरले. 

दहा मिनिटात जीप आली. त्यात मागच्या सीटवर आबाला झोपवले. तोवर माळशिरसमधील आबाच्या पोराला सुरेशला सांगावा धाडला गेला. ईकडे ही वाईट बातमी प्रकाशच्या पत्नीने पारूबाईने शेतात येऊन मथुराबाईला सांगितली, तेंव्हा तिला भोवळच आली. तोंडावर पाणी मारून थोडंसं सावध झाल्यावर तिलाही बैलगाडीत घालून गावात आणले. गावाकडे निघताना पारूबाईने   पवाराच्या वस्तीवरील गड्याला आबांच्या वस्तीवर मुक्कामी राहायला सांगितले. दिवस मावळेपर्यंत पारूबाई आणि मथुराबाई गावात आले.

मथुराबाई गावाकडं जाताना चित्र्यानं ओरडून ओरडून आकाश पाताळ एक करायचे बाकी ठेवले होते. काही केल्या तो गप बसत नव्हता त्यामुळे त्याला गुराच्या दावणीला असणारया साखळीला बांधले गेले. बैलगाडी नजरेआड होईस्तोवर चित्र्या त्या साखळीला जीवाच्या आकांताने हिसके देत होता. त्याला प्रचंड धाप लागली होती, जीभ बाहेर लवलवत होती, लाळंच्या तारा तोंडातून लोंबत होत्या. डोळ्यातून अखंड पाणी वाहत होते. बैलगाडी गावाकडं जाणाऱ्या रस्त्याला लागली आणि चित्र्या भुंकायचा थांबला. त्याने हिसके देणे थांबवले. त्यानंतर जवळ जवळ दोन दिवस तो तिथंच एकाच जागी बसून होता. त्याने न पाणी पिले न कशाला तोंड लावले. रात्र झाल्यावर मात्र उभ्या करून ठेवलेल्या बाजेकडे बघत तो मूक अश्रू ढाळत बसे, त्याला रडताना बघून चंद्र खाली उतरून काळ्या चिखलपाण्याच्या डोहात उतरून आपलं मन  हलकं करून घेई. आभाळातल्या चांदण्या हिरमुसल्या तोंडाने अल्वारपणे त्या चंद्रमौळी घरावर उतरत. एकमेकाच्या गळ्यात गळा घालून हमसून हमसून रडत. तेंव्हा चित्र्या कावराबावरा होऊन जाई. तिसरया दिवशी त्याला थोडं मोकळं काय सोडलं त्याने क्षणभराचा देखील उशीर केला नाही, तडक गावाकडं जाणारा रस्ता धरला. दगड धोंडे, खाच खळगे, काटे कुटे यांची तमा न बाळगता तो वारं पिलेल्या घोडयाच्या वेगाने सुसाट पळत सुटला. वाटेने जाताना आबा जिथं भोवळ येऊन पडले होते, त्यांचे साकळलेले रक्त ज्या दगडावर होते त्या ठिकाणी तो काही काळ घुटमळला. पुन्हा धावत पुढे निघाला. वाटेने आडवी येणारी  कुत्री चुकवत तर कधी उलट त्यांच्याच अंगावर जात तो गावातल्या लोहाराच्या घरासमोर पोहोचला तेंव्हा दुपार उलटून गेली होती. नवऱ्याच्या काळजीने मथुराबाई देवापुढे बसून जप करत होती. ओसरीवर कावऱ्या बावऱ्या अवस्थेत उभ्या असलेल्या, दमून गेलेल्या चित्र्याला तशा अवस्थेत बघून आबांचा नातू प्रल्हाद ओरडला,
"आज्जे हे बग, चित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग !"     

चित्र्याने जवळपास दोन दिवसानंतर पाणी पिले. पोटात दोन घास घातले. मात्र त्याचे सगळे चित्त त्याच्या मालकाचा ठाव घेत होते. त्याला वाटत होते की आपला धनी आपल्या घरात असेल. तो टकामका सगळीकडे बघत होता. भिंतीवर लटकत असलेल्या रंगनाथआबा सारख्याच चेहऱ्याच्या आबांच्या वडिलांच्या तसबिरीकडे गोंधळून गेल्यागत बघत होता. थोड्याच वेळात त्याने ओळखले की, आपला लाडका मालक घरात नाही. मान वाकवत त्याने जमीन हुंगायला सुरुवात केली आणि आबांना जखमी अवस्थेत घरी आणल्यावर ढेलजेत जिथं ठेवलं होतं, बरोबर त्याच जागी तो जाऊन बसला. बराच वेळ तो तिथे बसून होता. मग तो थोडया वेळाने त्याच्या नेहमीच्या जागी पडवीत जाऊन बसला. तिथं अस्वस्थ वाटल्यावर पुन्हा ढेलजेत आला. त्याच्या वागण्यात बेचैनी होती. बघता बघता त्याला घरी येऊन पाचसहा दिवस झाले. त्याचे आपले ढेलजेतून पडवीत आणि पडवीतून ढेलजेतचे चक्र अव्याहत सुरुच होते.

दहाव्या दिवशी आबांचा थोरला मुलगा सुरेश त्याच्या बायकोपोरांसह घरी आला. घरात आल्याबरोबर तो मथुराबाईच्या गळ्यात पडून रडला. तो दवाखान्यातूनच आबांना भेटून आला होता. तो आणि प्रकाश दोघेही मागच्या नऊ दिवसापासून दवाखान्यातच होते. मात्र आबांची तब्येत जास्त बिघडल्यावर त्याने आपली बायकोपोरे वडीलांच्या पायावर घालून आणली होती. दवाखान्यातली हालहवा आपल्या आईला सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते. हळव्या मनाच्या मथुराबाईला तिच्या पतीला काय झालेय हे संपूर्णतः सांगितलेले नव्हते. ती बिचारी आपला नवरा आज न उदया घरी परत येईल अन आपले राहिलेले आयुष्य समाधानात जाईल या भाबडया कल्पनेत होती. पण मथुराबाईची थोडीफार का होईना मानसिक तयारी व्हावी, तिला अचानक धक्का बसू नये म्हणून सुरेशने तिला आबांच्या तब्येतीची अर्धीमुर्धी  माहिती सांगितली. 'आबा अजूनही बेशुद्ध आहेत, त्यांची तब्येत मात्र थोडीशी खालावलीय' असं त्याने सांगितले. ते ऐकताच मथुराबाईने त्याला नवरयाकडे दवाखान्यात नेण्याचा हट्ट धरला. सुरेशने दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊ असं सांगितलं. त्या मायलेकरांचे बोलणे, रडारड याकडे ढेलजेत बसलेल्या चित्र्याचे बारीक लक्ष होते. बघता बघता त्याचा चेहरा उतरला. त्याने पायाची नखे जमिनीत घासणं सुरु केलं. डोक्यात काही तरी विचार आल्यासारखा तो अचानक उठून सुरेशच्या जवळ आला. त्याच्या पायांना आपले डोके घासू लागला. त्याचे पाय चाटू लागला आणि तो एकाएकी सावध झाला. सुरेशच्या दर्पात मिसळलेला आबांचा वास त्याच्या बरोबर लक्षात आला. बोलून चालून तो एक शिकारी कुत्रा होता. भलेही तो माणसाळलेला असला तरी त्याचे मुळचे गुणधर्म शाबित होते त्यामुळेच त्याची घ्राणेन्द्रीय तीक्ष्ण होती. तो वेगाने धावू शकत होता, आडव्या येणाऱ्या कुत्र्यांना वेळप्रसंगी फाडूही शकत होता. 

सुरेशच्या देहातून आबांचा तो चिरपरिचित वास येताच जणू त्याच्या डोक्यात विचारांचे रणकंदन माजले. तो शांत होऊन ढेलजेतल्या त्याच्या ठराविक जागी जाऊन बसला. तो अंधार पडण्याची वाट बघत होता. त्याने एकदा सुरेशच्या चपला हुंगल्या अन अंधार पडताच तो पडवीतून हळूच पसार झाला. त्याने थेट मोहोळचा रस्ता धरला. डिकसळ - नरखेड - मलिकपेठ - धैंगडे वाडी - मोहोळ मार्गे तो धावत राहिला. काळवेळेची पर्वा न करता, कर्कश्श्य हॉर्न वाजवत राक्षसी वेगाने धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता, आपल्या हद्दीत आलेल्या नवख्या कुत्र्याच्या अंगावर धाऊन येणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीना टक्कर देत तो वासाच्या मागावर धावत राहिला. आपल्या लाडक्या आबांच्या ओढीमुळे आपल्या वयाचा, थकलेल्या शरीराचा त्याला जणू विसर पडला होता...

दुसरा दिवस उजाडला..सकाळचे दहाएक वाजले असावेत. सुरेशने मथुराबाईला टमटममधून सोलापुरात आणलं. पुणे नाक्याजवळील हायवेच्या रस्त्याला लागून असणाऱ्या ज्या रिद्धी हॉस्पिटलमध्ये आबांना ठेवलं होतं तिथं तो त्यांना घेऊन आला. तिथे पहिल्या दिवसापासून आबांच्या अहोरात्र सेवेत असलेला प्रकाश हताश चेहऱ्याने आपल्या आईचीच वाट बघत होता. डॉक्टरांनी त्याला सकाळी पुन्हा तेच सांगितलं होतं, 'आबांच्या प्रकृतीत सुधारणा होणे जवळपास अशक्य आहे..' मेंदूतील रक्तस्त्रावामुळे बेशुद्धावस्थेत गेलेले आबा शुद्धीवर आलेच नव्हते. एव्हाना रंगनाथ लोहाराची सगळी भावकी तिथे गोळा झाली. मथुराबाई तर सैरभैर होऊन गेली होती. आपल्या कपाळाचं कुंकू पुसले जातेय की काय या भीतीने तिच्या घशाला कोरड पडली. काही मिनिटातच तिची दातखीळ बसली, सगळीकडे एकच कालवा उडाला. आता पुढे काय करायचे याविषयी तिथे खल सुरु झाला. जो तो आपआपल्या परीने काही तरी सांगत होता. आबांच्या पोरांच्या मते जे काही ठरवायचे ते सर्वानुमते ठरवायचे असे निश्चित होते. बरीच चर्चा झाली, काथ्याकुट झाला. त्यात दुपार टळून गेली. आणि शेवटी काळजावर दगड ठेवून तो अप्रिय निर्णयच घेण्यात आला. त्याला कारणेदेखील तशीच होती. मागच्या दोनचार दिवसात पैशाची तजवीजसुद्धा होत नव्हती, आजवर इतका पैसा घालून काही उपयोग झाला नव्हता, आबाच्या तब्येतीत तसूभरही फरक पडला नव्हता. दागिने गहाण टाकून झाले होते. घरातील किडूक मिडूक विकून झाले होते. इतकं होऊनही आपल्या जन्मदात्या बापासाठी प्रकाश आणि सुरेश तर आपलं घरदार, जमीन जुमला देखील गहाण टाकायला तयार होते पण गावातल्या जाणत्या मंडळींनी त्यांना काळीज घट्ट करायला सांगितले.
'आपल्या माणसाचा जीव असा दवाखान्यात नाकातोंडात नळी घालून इथं तिथं जाऊ देऊ नगासा, त्या परीस आपल्या घरात, रानात आपल्या हवेत त्याचा शेवटचा श्वास घेऊ दयात' असं भावकीतल्या जाणत्या माणसांनी आबांच्या मुलांना बजावून सांगितलं. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही त्यांच्या या निर्णयावर फारसे आढेवेढे घेतले नाहीत. त्यामुळे न्युरो आयसीयूत दाखल असलेल्या रंगनाथ आबांच्या डिस्चार्जची तयारी सुरु झाली. रिसेप्शनवर बिल तयार झाले. पोरांनी बिल अदा केले. मथुराबाईला दवाखान्याच्या बाहेर आणले. तिचा अश्रूंचा बांध सुटला होता. एव्हाना अंधारून यायला सुरुवात झाली होती. 

पश्चिमेला रक्तिमा चढला होता. बघता बघता आबांना आयसीयूतून बाहेर आणले गेले. एन्ट्रन्स लॉबीत सुसज्ज ऍम्ब्युलन्स तयार ठेवली होती. आतून आबांना स्ट्रेचरवरून आणले गेले. वॉर्डबॉईजनी त्यांना उचलून आत ठेवले, ऍम्ब्युलन्स घारेवाडीला येईपर्यंत एक डॉक्टर आणि नर्स सोबत येणार होते. त्यांनी ड्रायव्हरला बाहेर निघण्याची खुण केली आणि ऍम्ब्युलन्स गेटच्या बाहेर नेऊन उभी राहीली. मथुराबाई आणि सुरेश पुढे जाऊन बसले. प्रकाश मागे असणाऱ्या सीटवर येऊन बसला. ऍम्ब्युलन्सचे दार आतून लावून घेणार इतक्यात धुळीने माखलेल्या एका कुत्र्याने विव्हळण्याचा आवाज करत थेट आत उडी मारली. अनेकांनी घाबरून किंचाळी मारली. तो कुत्रा दुसरा तिसरा कुणी नव्हता, तो तर चित्र्या होता ! रंगनाथ आबांची सावली होऊन जगणारा चित्र्या !!

अख्खी रात्र माग काढत काढत अनेक कुत्र्यांशी आणि माणुसकी हरवून बसलेल्या अनेक खवीस माणसांशी पंगा घेत तो जवळपास ४५ किलोमीटरचा प्रवास करून आबा दाखल असलेल्या हॉस्पिटलपाशी बरोबर पोहोचला होता. आबांना गावाकडे परत न्यायला आणि त्याने तिथे यायला एकच गाठ पडली होती. आतल्या डॉक्टरांनी चित्र्याकडे भेदरल्या नजरेने बघत प्रकाशला सांगितले की 'कुत्र्याच्या पायावर, पाठीवर अनेक ठिकाणी जखमा झाल्याचे दिसतंय, त्याचे शरीर धुळीने माखलेय. आबांना ह्याचे इन्फेक्शन होऊ शकते, तेंव्हा कुत्र्याला खाली उतरवलेले बरे ..' पण प्रकाशने चित्र्याला आपल्या मांडीवर घेतले, गाडी सुरु करून पुढे नेण्याची खुण केली. त्यावर डॉक्टरांचा नाईलाज झाला. अखेर ऍम्ब्युलन्स तिथून बाहेर पडली. स्ट्रेचरवर शांतपणे पडलेल्या आबांच्या म्लान चेहऱ्याकडे बघणाऱ्या चित्र्याच्या डोळ्यातून थेंब ओघळत होते. तो डोळे भरून त्यांच्याकडे पाहतच राहिला....

धोतराचा सोगा हातात धरून शेतात पुढेपुढे चालणारे, त्याच्याशी मस्ती करणारे, मांडीवर घेऊन बसणारे, मथुराबाईची गाणी ऐकताना तल्लीन होऊन जाणारे आणि सरतेशेवटी बाजेवर आभाळाकडे तोंड करून झोपणारे आबा आठवले. प्रकाशच्या मांडीवर बसलेला चित्र्या अगदी रडवेला झाला होता. त्याचे सर्वांग ठणकत होते. वाटेत अनेक कुत्र्यांनी त्याला चावे घेतल्याने, पोराठोरांनी दगडधोंडे फेकून मारल्याने जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्याचा एक डोळा टम्म सुजला होता. पळून पळून पाय भरून आले होते. पायाच्या नख्या तुटल्या होत्या. सर्वांगात केसात माती साठली होती. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यावर माती चिटकून बसली होती, डोळे चिपडून गेले होते. आता आबांना बघून त्याच्या जीवात जीव आला होता. पण आपला धनी निश्चल पडून आहे हे त्या मुक्या जीवाने ताडले होते. त्याचे सारे लक्ष आबांच्या धीम्या होत चाललेल्या श्वासाकडे होते. 

उजेडाला हरवत सगळीकडे सहज पसरत चाललेल्या अंधाराला कापत ऍम्ब्युलन्स वेगाने पुढे निघाली. तिचा वेग जसजसा वाढत गेला तसा चित्र्या आणि आबांच्या श्वासाचा वेग मंदावत गेला. बघता बघता टिपूर चांदण्यांची रात्र उजाडली. घारेवाडीची वेस ओलांडून ऍम्ब्युलन्स लोहाराच्या घरापुढे उभी राहिली, सारं गाव तोवर तिथं गोळा झालं होतं. ऍम्ब्युलन्सचे दार उघडले, खिडक्यांचे पडदे सरकवले, त्या सरशी बाहेरचे लख्ख चांदणे झपकन आत शिरले आणि दोन जीव हलकेच आपल्या अंगाखांद्यावर घेऊन ते लखलखते चांदणे क्षणात लोहाराच्या रानातल्या वस्तीकडे रवाना झाले...

लहानगा चित्र्या आता आबांच्या पायाशी पुन्हा खेळत होता, ते दोघे शेतशिवारातील माती तुडवत आपल्याच तालात चालले होते. पानेफुले हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे डोळे भरून बघत होती. शेळीचे एक करडू उड्या मारत मारत त्यांच्यामधून आडवे पळत गेले, गायींनी हंबरायला सुरुवात केली. वस्तीच्या अंगावर रोमांच उठले, झोपी गेलेली रानपाखरे जागी झाली त्यांनी पंखांची एकच फडफड सुरु केली. चांदण्यांनी नृत्य सुरु केले, काजव्यांनी फेर धरले, जणू सगळा आसमंत आनंदात न्हाऊन निघाला होता. आपल्या भरघोस मिशांवर ताव देत आबा चित्र्याकडे लाडाने बघत बघत शेतातून तरंगत तरंगत ढगांच्या दिशेने जात राहिले. त्यांच्या पाठोपाठ चित्र्याही शेपूट हलवत हलवत निघून गेला...

ऍम्ब्युलन्समध्ये एकाएकी निपचित झालेल्या आबांकडे बघून संशय आल्याने डॉक्टरांनी क्षणात स्टेथोस्कोप काढून आबांच्या छातीला लावला, एक दोन सेकंद त्यांच्या नाकपुडयांना हात लावून पहिले आणि सारं काही संपल्याची खुण केली. थिजून गेलेल्या प्रकाशच्या लक्षात आलं की आपल्या मांडीवरील चित्र्याचेही अंग थंड झालेय. त्याचाही श्वास थांबलाय...काही वेळ भयाण निशब्द शांततेत गेला. अन निमिषार्धात लोहाराच्या घरात किंकाळ्या आणि हुंदक्यांचे उस्मारलेले धुमारे दाटले. इकडे मेघांच्या दाटीत आबा आणि चित्र्या चांदण्यात न्हाऊन निघाले होते....

 - समीर गायकवाड.

( माझ्या वैकुंठवासी वडीलांना आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या काळू नावाच्या कुत्र्यास समर्पित...)   


No comments:

Post a Comment