Monday, November 28, 2016

अथांग वेदना जगलेले परिपूर्ण लेखक डॉ. आनंद यादव ...

रात्री आनंद यादव गेले आणि वाचनसंस्कारवयीन वयात वाचलेल्या त्यांच्या पुस्तकांनी डोळ्यापुढे फेर धरला. त्यांचे लेखन वाचून 'एखादा माणूस इतकं कमालीचे हलाखीचे जिणंच जगू शकत नाही' असा समज आजकालच्या पिढीतील वाचकाचा झाल्यास त्यात नवल वाटणार नाही. यादवांच्या सर्व पुस्तकांत लक्षणीय ठरले ते त्यांचे 'झोंबी' हे आत्मचरित्रपर पुस्तक. झोंबी म्हणजे लढाई ! एकाने दुसर्‍याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. या पुस्तकाला पुलंनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याला त्यांनी समर्पक शीर्षक दिलंय - “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड”, बालकांड म्हणजे बालपणावर अन बालमनावर झालेले अनन्वित अत्याचार ! प्रस्तावनेत पु.ल. पुढे लिहितात की, "हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे आणि जर हे असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. ... " पुलंनी असं लिहिण्यामागचं कारण ही तसंच आहे. कमालीचे दुराग्रही, हेकट व ऐतखाऊ प्रवृत्तीचे वडील, आपल्या अकरा पोरांचा आकाश पाताळ एक करून रक्ताचे पाणी करून त्यांना सांभाळत संसाराचे गाडे हाकणारी सोशिक आई आणि अंगावर काटा आणणारे, डोके बधीर होईल इतके कमालीचे दारिद्र्य या सर्वांचे जिवंत वाटणारे ओघवत्या शैलीतले शब्दांकन वाचकाला प्रचंड अस्वस्थ करून जाते. दारिद्र्य, रिती रिवाज,निसर्गाचा चंचलपणा ,समाजातील अज्ञान, अजब मानसिकतेचा गावगाडा व गावकऱ्यांचा तऱ्हेवाईकपणा अशा अनेक घटकांशी संघर्ष करताना कुटुंबात एकामागून एक घडत राहणारया दुर्दैवी घटना यात आहेत. अठराविश्वे दैन्यावस्थेत असलेल्या आईची वडिलांकडून होत राहिलेली परवड, तिच्या वाटयाला येणारे भोग अन तरीही आईचा छळ मांडणारे वडील यांचे झोंबी मधले वर्णन काळीज हेलावून टाकते.... गावातील जत्रा, उरूस, सणवार, परंपरा यांचे भेदक चित्रण 'झोंबी'त आहे. या सर्वावर मात करते आनंद यादवांची शिक्षण घेण्याची अभूतपूर्व उर्मी ! खरे तर यातील सर्व घटना दुर्दैवी आहेत. कुणाच्याही वाटयाला असे दुःख येऊ नये असे राहून राहून वाटत राहते. पण यादव तशी भूमिका कुठेही मांडत नाहीत, किंबहुना त्यांच्या वाटयाला आलेल्या दुःखभोगासाठी ते कुणालाही जबाबदार धरत नाहीत. एका कमालीच्या संवेदनशील सृजन मनाने केलेलं ते एक आर्त चिंतन आहे असे 'झोंबी'बद्दल म्हणावे वाटते...


प्रत्येक दिवशी यातनांच्या वादळाशी लढणारया आनंद यादवांनी आपल्याच वाट्याला का असले जगणे आले अशी कैफियत कुठेही केलेली नाही एक भीषण सत्य त्यांनी निर्भीडपणे मांडले आहे. मनामध्ये शिकण्याची उर्मी आणि सभोवताली कामचा पडालेला गराडा आणि नीट खायला ही मिळत नसताना उलगडणारया सर्व गोष्टींचे पदर मन थक्क करुन जातात. कुमार वयीन आनंद बरोबरच संसारात फ़रफ़रट होणारी त्याची आई, आणि शेतकरयाचे हात फ़क्त शेतात काम करण्यासच अस्तात बाकी शाळा बिळा सगळं भिकारचोट पणाचे लक्षण असे म्हणनारा त्या चा बाप यांचे चित्रण काळजाला होरपळून काढते. वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामर्थ्य या कादंबरीत आहे. दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी ही कादंबरी आजही रसिकप्रिय आहे.

कुमारवयीन आनंदला शिक्षणाची, शाळेची, कलेची मनापासून आवड असते . खरं तर त्यांच्या जातीत अशी काही आवड ठेवणं हाच जणू काही गुन्हाच असावा अशी परिस्थिती होती. अतिशय हलाखीच्या दिवसातही त्याच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. ज्या प्रकारची कामं करुन तो शाळेत धडपडत जातो त्याला तोड नाही. वेळप्रसंगी चोरी सुद्धा ! बरोबरीच्या मुलाची शिकवणी, नकलांचे कार्यक्रम, रोजंदारी……. हे सगळं करुन तो शिकतो. आपला मुलगा शिकला तर त्याच्या वाटेची कामे आपल्याला करावी लागतील आणि जिथे दातावर मारायला पैसे नाहीत तिथे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे या वंचनेपायी त्यांच्या वडिलांनी त्यांना सतत विरोध केला. त्यांना शिक्षणाबद्दल समजावण्याचे महत्कठीण काम यादवांना करावं लागलं. हे करताना प्रसंगी वडिलांचा बेदम मार देखील खावा लागला. एक वेळ अशी येते की आनंद यादव शिक्षणापायी आपले घर सोडून जातात पण तरीही त्यांच्या वडिलांच्या विचारात काही फरक पडत नाही..

घरात अकरा भावंडं. अगदी एका पाठोपाठ झालेली त्यामुळे रोगट, अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत ! शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाही. शेतातल्या कामामुळे शाळेत यायला उशीर ह्या सगळ्या कारणांमूळे त्याला शाळेत खूप शरमिंदं वाटायचं. भरीस भर म्हणजे वडीलांचा शिक्षणाला विरोध ! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एकेक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्याची परिस्थिती समजून त्याला मदत केली तर काही वेळेला त्याला मुद्दाम त्रासही दिला. जात्याच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे त्यानेच वेगवेगळे प्रकार शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्याने कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही त्याने कायम पहिला, दुसरा नंबर ठेवला शाळेमधे. त्याच्या शिक्षणाच्या वेडाला जरी त्याच्या वडीलांनी कधी दाद दिली नसली तरी शेवटी त्यांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने त्याला एस.एस.सी ची परिक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली आणि आनंदने त्याचं सोनं केलं. इथंपर्यंतचा जीवनप्रवास 'झोंबी'त आहे. त्यापुढचा प्रवास 'नांगरणी'त आहे

प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या "झोंबी'मध्ये चित्रित झाला आहे. 'नांगरणी' मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. 'झोंबी'पेक्षा नांगरणीतला आनंद यादवांचा दृष्टिकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा 'नांगरणी'चा गाभा आहे. यातील सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, हे तिचे ठळक यश होय...

इतक्या हाल अपेष्टातून आपलं शिक्षण पूर्ण करून मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणारया डॉ. यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील कागलचा. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी मराठी व संस्कृत विषयांत पदव्युत्तर पदवी मिळवली होती. ‘मराठी लघुनिबंधाच्या प्रेरणा, प्रवृत्ती आणि विकास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएचडी मिळवली होती. काही काळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांनी नोकरी केली होती. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते अध्यापक झाले आणि १९९५ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. यादवांच्या ‘झोंबी’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यावरील ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ आणि संत तुकाराम महाराज यांच्यावरील ‘संतसूर्य तुकाराम’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या लेखनामुळे यादव वादग्रस्त ठरले होते. या कादंबऱ्यांतील लेखनावर वारकऱ्यांनी आक्षेप घेऊन डॉ. यादव यांना २००९ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यापासून (अध्यक्षीय भाषण करू न देता) वंचित ठेवले होते. या प्रकारामुळे यादव यांनी नवे लेखन थांबवले होते. त्यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवर चित्रपट निर्माण झालेला चित्रपट मात्र गाजला आणि यशस्वी झाला. ग्रामीण साहित्य संमेलन आणि समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

'खळाळ', 'मैना',' घरजावई', 'डवरणी', 'आदीताल', 'उखडलेली झाडं', 'भूमिकन्या', 'झाडवाटा', 'शेवटची लढाई', 'उगमती मने' ह्या त्यांच्या गाजलेल्या कथा होत तर 'हिरवे जग', 'मळ्याची माती', 'मायलेकरं', 'रानमेवा - बालकविता', 'सैनिकहो तुमच्यासाठी' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'गोतावळा', 'नटरंग', 'एकलकोंडा', 'माऊली', 'कलेचे कातडे' ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. 'झोंबी', 'नांगरणी', 'घरभिंती', 'काचवेल' असे चार टप्प्यातले आत्मचरित्र चार पुस्तकातून त्यांनी मांडले आहे. 'रात घुंघुराची' नावाचे वगनाट्य त्यांनी लिहिले होते. 'मातीखालची माती' (व्यक्तिचित्रे), 'स्पर्शकमळे', 'पाणभवरे', 'ग्रामसंस्कृती', 'साहित्यिकाचा गाव' ह्या त्यांच्या ललित साहित्यकृती आहेत. याशिवाय ग्रामीण साहित्यविषयक समीक्षापर लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे काही संपादित लेखनही प्रसिद्ध आहे. जसे की, 'मातीतले मोती', 'निळे दिवस', 'तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा', 'मराठी ग्रामीण कथा', 'कथावैभव', 'माझ्या आठवणी आणि अनुभव' :विठ्ठल रामजी शिंदे. राष्ट्रीय हिंदी अकादमी, कोलकता यांचा उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मितीबद्दलचा सन्मान व साहित्य अकादमी पुरस्कारासह महाराष्ट्र राज्य शासनाची १३ पारितोषिके त्यांना मिळाली होती.

ग्रामीण भागातून आपली वाटचाल करणारया माझ्यासारख्या अन्य कुणाही व्यक्तीस ते आपल्यापैकीच एक वाटतात. गावाकडच्या मातीतून तयार झालेला हा साहित्यिक आजही अस्सल वाटतो तो केवळ त्याने जगलेल्या अभूतपूर्व वेदनानुभूतीमूळे ! मातीशी असलेली ओढ आणि नात्यातली वीण त्यांनी कधी ढिली पडू दिली नाही म्हणून आनंद यादव हे मराठी मातीतले सच्चे साहित्यिक ठरतात. अत्यंत विपन्नावस्थेतून पुढे येऊन संघर्षमय जीवन जगून समाजाची बांधिलकी जपत आपल्या अभिजात प्रतिभेचा उत्कट उत्तुंग अविष्कार घडवत स्वतःचे स्थान निर्माण करणारया डॉं.आनंद यादव यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एक दिव्य तारा निखळून पडला आहे. त्यांचे लेखन उदयोन्मुख लेखकांसाठी दीपस्तंभाचे काम करत राहील. येणारया पिढीतील वाचक त्यांचा जीवन संघर्ष व त्यांची स्तंभित करणारी लेखनसंपदा पाहून त्यांना स्मृतीपटलात जतन करून ठेवेल यात शंका नाही ....

महाप्रलयंकारी वादळवाऱ्यातही शीतलतेने तेवत राहिलेल्या ह्या साहित्यनंदादीपास भावपूर्ण श्रद्धांजली.......

- समीर गायकवाड.