Thursday, October 6, 2016

स्टारडम नसलेला अस्सल अभिनेता - संजीवकुमार ...

संजीवकुमार
संजीवकुमार म्हटलं की आजही डोक्याला झिणझिण्या आणणारे अनेक संवाद, अभिनयसंपन्न विविध
भूमिका अन एकाहून एक सरस चित्रपट आठवतात. त्याच्या खर्जातल्या स्वरातला 'ठाकूर न झुक सकता है न टूट सकता है ठाकूर सिर्फ मर सकता है' हा डायलॉग आठवला की आजही अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटते. 'आंधी' मधला त्याचा हॉटेल मॅनेजरचा रोल पहिला की आजही जीव घुसमटून जातो. 'मौसम'मधला त्याचा जिवलग पत्नीच्या शोधातला वृद्ध बाप वेश्या झालेल्या आपल्याच मुलीसोबत(शर्मिला टागोर) अगतिक होताना पाहिला की काळीज कासावीस होऊन जातं.
'त्रिशूल'मधला आपल्या पोटच्या मुलासमोर(अमिताभ) हाराकिरी करणारा संजीवने रंगवलेला बाप पोटात गोळा आणतो. हिंदी चित्रपट शौकीनांना तुमचा आवडता अभिनेता कुठला असा प्रश्न विचारल्यास बरीच मनोरंजक उत्तरे मिळतील. इम्रान हाश्मीपासून अमिताभ बच्चनपर्यंत आणि इरफानखानपासून ते केएल सैगल पर्यंत कुणीही लोकांचा आवडता अभिनेता होऊ शकतो. या यादीत हरीभाई जरीवाला उर्फ संजीवकुमार हे उत्तर असेल, नाही असं नाही, पण काही विशिष्ट लोकांनी दिलेलंच. जनसामान्यांचा लोकप्रिय अभिनेता / नायक होण्याचं भाग्य संजीवकुमारला फारसं लाभलं नाही. त्याचे चित्रपट चालले, समीक्षकांनी त्याची वाहवा केली पण हिंदी चित्रपटसृष्टीवर एक न पुसला जाणारा ठसा उमटवणारा हा गुणी अभिनेता तसा उपेक्षितच राहिला. लोकांनी त्याच्यापेक्षा त्याच्या भूमिकांवर जास्त प्रेम केले असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे- काही वर्षांपूर्वी 'शोले'चा खरा हिरो कोण, असा प्रश्न 'मटा'ने वाचकांना विचारला होता, तेव्हा हिरोसाठीची सर्वात जास्त मते ठाकूर बलदेवसिंग अर्थात संजीवकुमारच्या पारड्यात पडली होती. 

काळाच्या कसोटीवर उतरतो आणि आपले अस्तित्व अधोरेखित करतो, तोच खरा कलाकार. असे मोजकेच कलाकार होऊन गेलेत ज्यांची दखल काळाच्या कसोटीवर घेतली जाईल. हरीभाई जरीवाला अर्थात संजीवकुमार तसा होता. त्याला अवघे सत्तेचाळीस
वर्षांचे आयुष्य लाभले, त्यात गुजराती रंगभूमीपासूनचा अभिनय प्रवास मोजला तर त्याला पंचवीस वर्षांची कारकीर्द लाभली. त्यात हिंदी चित्रपटातील वाटचालीचा विचार करताना फक्त वीसच वर्षे मिळाली. तरी तेवढय़ातही त्याने आपल्या अष्टपैलू कारकिर्दीचा कायमस्वरूपी ठसा उमटवला. मात्र त्याची कायम उपेक्षाच होत गेली. ही उपेक्षा संजीवकुमारला काही नवीन नव्हती. ‘हीरो’ होण्यासाठीचं लौकिकार्थानं आवश्यक ‘मटेरिअल’ त्याचाकडं फारसं नव्हतं. सर्वसाधारण उंची, तरूण वयातच बेडौल होऊ लागलेलं शरीर, काहीसा बसकट  आणि वरच्या टीपेला पोचल्यावर पिचणारा आवाज – नाही म्हणायला तरुण वयात त्याचा चेहरा निरागस आणि गोड होता. पण या सगळ्याचा विसर पडावा अशी दिपवून टाकणारी अभिनयक्षमता त्याच्याकडे होती. ही क्षमताच कधीकधी त्याला घातक ठरली. अमिताभ बच्चन या एकछत्री साम्राज्यात, जिथं शशी कपूर, धर्मेंद्र, विनोद खन्ना यांनी मांडलिक होऊन रहाण्यात धन्यता मानली, तिथं संजीवकुमार अमिताभच्या पुढं समर्थपणे उभा राहिला. तसा पूर्वी तो
दिलीपकुमारच्याही पुढे तितक्याच ताकदीने उभा राहिला होता. मग कुणीतरी मध्येच त्याच्या केसांना पांढरा रंग लावला. या पांढऱ्या कलपाने बाकी मग त्याची पाठ सोडली नाही. स्वतःच्या वयाच्या नायकनायिकांचे बाप संजीवकुमारने रंगवले उत्तम, पण मग त्याच्याकडे तशाच एकसुरी भूमिका येत राहिल्या. नाईलाजाने तो त्या करतही राहिला.

लौकिक अर्थाने संजीवकुमार ‘स्टार’ कधीच नव्हता, पण ‘गुणी अ‍ॅक्टर’ मात्र होता. ६ जुलै १९३८ ते ६ नोव्हेंबर १९८५ एवढा त्याचा जीवनप्रवास! सुरतमध्ये जन्म झालेल्या संजीवकुमारची कर्मभूमी मुंबई ठरली. १९६० सालच्या सुनील दत्तची भूमिका असणाऱ्या ‘हम हिन्दुस्थानी’त छोटीशी भूमिका साकारत संजीवकुमार हिंदी चित्रपटाच्या विश्वात आला, पण त्याला ‘पूर्ण लांबीची भूमिका’ मिळण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न करावे लागले. त्यानंतरही ‘निशान’ या स्टंटपटात त्याला ‘नायक’ पदाची संधी लाभली. मिशा वाढलेला,
तलवारबाजी करणारा, चक्क नाटकी संवाद बोलणारा असा संजीवकुमार असू शकतो ही वस्तुस्थिती होती. सुरुवातीच्या दिवसात त्याने 'स्मगलर', 'हुस्न और इश्क', 'बादल', 'गुनहगार' अशा ‘दे-मार’ चित्रपटांतून भूमिका केल्या. हे दारासिंग-रंधवा यांच्या पठडीतील चित्रपट होते. देवकुमार अशा चित्रपटातूनच वावरायचा. चित्रपटसृष्टीच्या आपण लक्षात येण्यासाठी आणि मिळणाऱ्या प्रत्येक संधीतून स्वत:चे अस्तित्व वाढवत नेण्यासाठी अशाही चित्रपटातून वाटचाल करावी लागे, ही त्या काळाची गरज होती.

तो काळ दिलीपकुमार, देव आनंद व राज कपूर या त्रिमूर्तीचा प्रचंड दबदबा असणारा होता. राजेंद्रकुमार त्या वेळी कुमार म्हणून लोकप्रिय होता. बलराज साहनी, सुनील दत्त, शम्मी कपूर, राजकुमार या
चौघांची चार वैशिष्टय़े होती. शशी कपूर, धर्मेद्र जम बसवण्यासाठी धडपडत होते. राजेश खन्ना, जितेंद्र यांचे याच काळात आगमन झाले. पाठोपाठ अमिताभ बच्चनही आला. विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा याच गर्दीत खलनायकाकडून नायकाच्या भूमिकेकडे वळले होते. विश्वजीत, जॉय मुखर्जी, नवीन निश्चल, विनोद मेहरा ही नाणी काही काळ चालली, या हिंदी चित्रपटसृष्टीला नेहमीच ‘गल्लापेटी’वर चकाकणारी नाणी हवी असतात.

या साऱ्यात अभिनयाचे खणखणीत नाणेच संजीवकुमारला उपयोगी पडणारे होते. एच.एस. रवेल दिग्दर्शित ‘संघर्ष’मध्ये छोटीशी भूमिका साकारतानाही दिलीपकुमारबरोबरच्या एका दृश्यात संजीवकुमारने आपला प्रभाव दाखवला आणि संजीवकुमार नावाला सर्वप्रथम वलय आणि वजन प्राप्त झाले.
संजीवकुमारची वाटचाल विविध प्रकारे आकाराला येत गेली. त्याने अन्य नायकांच्या चित्रपटात दुसरा नायक साकारणे (‘शिकार’मध्ये धर्मेद्र, ‘बंधन’ व ‘आप की कसम’मध्ये राजेश खन्ना नायक, असे अनेकदा घडले), आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा मोठय़ा वयाच्या भूमिका साकारणे (‘शोले’तील ठाकूर बलदेवसिंग, ‘शतरंज के खिलाडी’मधील मिर्जा सज्जाद, 'आंधी', 'मौसम' ) चरित्र भूमिकाही केल्या.
संजीवकुमार कोणत्याही ‘चौकटी’त मावणारा अथवा सामावणारा ‘कलाकार’ नव्हता. म्हणूनच तो ज्या सहजतेने ‘खिलौना’मध्ये विजयकमल सिंह हा वेडा साकारण्यात यशस्वी ठरला, तेवढाच तो ‘स्वर्ग नरक’मध्ये पंडित सोहनलाल त्रिपाठी असा खूप गोड बोलत आपले हित साधण्यातही तेवढाच प्रभावी ठरला.

गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’ , ‘कोशिश’, ‘मोसम’ व ‘आंधी’ या चित्रपटांतील संजीवकुमार एकमेकांपेक्षा वेगळा ! संजीवकुमारने यातल्या बारीकसारीक छटा खुबीने खुलवल्या आहेत! बोलताबोलता भरून येणं, आवाज दाटून येणं, डोळ्यांच्या कडा पाणावणं यात तर संजीवकुमार ‘मास्टर’च होता. संताप दाखवतानाही त्याची देहबोली खुलून यायची. ‘आप की कसम’ चित्रपटात गैरसमजातून राजेश खन्ना त्याच्या थोबाडीत मारतो, क्षणभर संजीवकुमारचा संताप अनावर होतो, त्याचा हातही प्रतिवारासाठी वर जातो, पण तो स्वतःला सावरतो आणि संतापाने शरीर थरथर कापत असतानाही म्हणतो “खुश रहो दोस्त…” या प्रसंगात संजीवकुमारच्या जागी इतर कोणत्याही
अभिनेत्याची कल्पनाही करवत नाही!  चष्मा काढून तो पुसून परत घालणं या साध्या कृतीचा पण संजीवकुमारने काय सुंदर वापर केला आहे! ( आठवा, ‘त्रिशूल’ मधले अमिताभबरोबरचे, ‘काला पत्थर’ मधले राखीबरोबरचे प्रसंग). ‘कोशिश’मध्ये जया भादुरीसोबत त्याने मुका-बहिरा साकारताना आपली गुणवत्ता दाखवून दिली ‘मौसम’मधील त्याची भूमिका प्रियकर ते दुर्दैवी पिता अशी होती. हा चित्रपट गुलजार यांनी आपल्या नेहमीच्या ‘फ्लॅशबॅक’ तंत्राने साकारला. या पित्याची एका शरीरविक्रय करणाऱ्या युवतीशी (शर्मिला टागोर) भेट होते नि तो आश्चर्यचकित होतो. कारण तिचा चेहरा त्याच्या तरुणपणाच्या प्रेयसीच्या (शर्मिला टागोर) चेहऱ्याशी साम्य साधणारा असतो. ही आपलीच मुलगी असल्याची त्याला खात्री पटते, पण दरम्यान
त्याच्या आयुष्यात काय बरे घडलेले असते ? आपण संजीवकुमारच्या व्यक्तिरेखेशी एकरूप होत होत चित्रपट पाहतो. तेवढा विश्वास त्याने आपल्या अभिनयातून निर्माण केला. ‘आंधी’त त्याची पत्नी आरतीदेवी (सुचित्रा सेन) राजकारणातील एक मोठी शक्ती असते. तिचे राजकीय शह-काटशह-डावपेच यामध्ये गुंतून जाणे त्यांच्या भेटीत विघ्न आणते. राजकारणाच्या पार्श्वभूमीवरील ही अनोखी प्रेमकथा होती.

संजीवकुमारने कायम व्यक्तिरेखेला प्राधान्य दिले म्हणूनच तर यश चोप्रा यांच्या ‘त्रिशूल’मध्ये त्याचा उद्योगपती आर.के.गुप्ता खूप वेगळा ठरला. वयात आलेला विजय (अमिताभ बच्चन) कायम त्याचा दुस्वास करतो, कारण आपल्या आईची (वहिदा रहेमान) त्याने पूर्वी फसवणूक केली व त्यातून आपण अनौरस पुत्र म्हणून जन्माला आलो अशी त्याची भावना असते.

रवी टंडनच्या ‘अनहोनी’तील वेडा, राहुल खेर दिग्दर्शित ‘बीवी ओ बीवी’मधील नाटक्या, राजा नवाथे दिग्दर्शित ‘मनचली’मधील गुलछबू अशा त्याच्या किती प्रकारच्या भूमिका सांगाव्यात तेवढे थोडेच ! ‘चेहरे पे चेहरा’तील दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, ‘नया दिन नयी रात’मधील नऊ रूपे अशी केवढी तरी विविधता त्याने सहजतेने दिली. ‘शतरंज के खिलाडी’ मध्ये श्याम बेनेगलनी
संजीवकुमारचे सोने केले पण प्रेक्षकांनी या सिनेमाला नाकारले. ‘परिचय’ मधल्या कडक शिस्तीच्या प्राणचा कलासक्त मुलगा या भूमिकेचं संजीवकुमारनं सोनं केलं आहे. त्याचे आणि जया भादुरीचे प्रसंगही अत्यंत तरल आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘अंगूर’ म्हणजे तर निव्वळ धमाल. त्यातला संजीवकुमार आणि मौसमी चटर्जीचा पकोडे खातानाचा प्रसंग आठवला तरी हसू फुटतं “क्या बात कर रही हैं आप… आपने नंगा देखा है मुझे?” म्हणताना संजीवकुमारने ‘नंगा’ हा शब्द असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! त्याचं “लेकिन बहादुर मैं ये क्या सुन रहा हूं… तू बाप बननेवाला है….” हे पालुपदही गमतीदार.

सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’त एका आक्रमक दृश्यात दिलीपकुमारला तो गप्प करत धाडकन दरवाजा लावून घेतो आणि चित्रपटाचे मध्यंतर होते, त्यावरून संजीवकुमारने दिलीपकुमारला पुरते खाल्ले यावरून प्रचंड चर्चा झाली. दिलीपकुमारच्या एकनिष्ठ भक्तांना हे पचवणे जड जात होते, संजीवकुमरचे चाहते खूप होते, पण ते त्या काळातील राजेश खन्ना व अमिताभ यांच्या निस्सीम चाहत्यांसारखे आक्रमक नसत. म्हणूनच तर तेव्हा नेहमी असे म्हटले जाई की, संजीवकुमार कितीही गुणी असला तरी तो अन्य
नायकांसमोर आपले अस्तित्व दाखवू शकतो, पण एकटय़ाच्या बळावर चित्रपट यशस्वी करू शकत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी कायम ‘हुकुमी गर्दी खेचणाऱ्या’ चेहऱ्यांना पसंती देते, संजीवकुमारचे ‘एकटा हिरो’ असणारे अनहोनी, मनचली (दोन्हीत लीना चंदावरकर नायिका), उलझन ( सुलक्षणा पंडित)असे काही मोजकेच चित्रपट यशस्वी ठरले.तरीही संजीवकुमार सर्व धाटणीचे सिनेमे करत राहिला. अशा अनोख्या चित्रपटापैकीच एक होता ‘बीवी ओ बीवी’ हा वेगळ्या ढंगाचा दुहेरी भुमिकेतला विनोदी चित्रपट. ‘बर्मा फ्रंट’ च्या आठवणीत अडकून पडलेला विक्षिप्त कर्नल आणि भुरटा चोर शंकर या दोन्ही भूमिकांत संजीवकुमारने जान ओतली आहे! आपल्या मुलीसाठी वरसंशोधन करायला गेलेल्या कर्नलच्या प्रेमात पडलेली शशीकला, कर्नलचा तितकाच विक्षिप्त ऑर्डर्ली (राजेंद्रनाथची कारकिर्दीतली बहुदा सर्वोत्तम भूमिका!), कर्नलची घाबरगुंडी उडवणारी त्याची आई आणि या सगळ्यांनी मिळून घातलेला गोंधळ अफलातून आहे. 
काही चित्रपटांच्या निर्मितीकाळात तो आपल्या या नायिकांच्या प्रचंड प्रेमात पडल्याचे प्रकरण गाजले. इतके की, त्याच्या अकाली निधनामुळेच तर सुलक्षणा पंडित कायम अविवाहित राहिली. ‘देवी’ चित्रपट निर्मितीच्या काळात तो नुतनकडे आकर्षित झाला, पण तो नुतनला ओळखण्यात बहुधा कमी पडला असावा. तसा तो हेमामालिनीच्याही अखंड प्रेमात होता, तिलाही ते न आवडल्याने दोघांची भूमिका असणाऱ्या ‘धूप छाँव’ चित्रपटासाठी हेमाने तारखा देण्यात प्रचंड टाळाटाळ केली.

मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेले चित्रपटक्षेत्र मैत्रीच्या भावनेपासून वेगळे राहणे अशक्य आहे. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे अनेकांशी सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच मैत्रीचे बंध बांधले गेले. त्यामुळेच विशिष्ट जोडी एकत्र आली की त्यांची कलाकृती चांगली होते. तिला प्रतिसादही चांगला मिळतो. चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री किंवा संगीतकार यांचे कॉम्बिनेशन तयार झाले आहे. हिट कॉम्बिनेशन म्हणून ते ओळखले जाते. अशा मैत्रीची उदाहरणे किती तरी उदाहरणे दिसून येतात. मागे डोकावले तरी बरीच उदाहरणे दिसून येतील. गुलजार - संजीवकुमारची जोडीही अशीच. अगदी परफेक्ट. एकाच्या उक्तीतून दुसर्‍याची कृती उमटणार. 'आंधी', 'मौसम', 'कोशीश' हे चित्रपट बघितले की त्यांच्या केमिस्ट्रीतून पडद्यावर
साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीचा प्रत्यय येतो....

संजीवकुमारच्या अनेक कसदार भूमिका आहेत पण त्याने रंगवलेला 'शोले'मधला ठाकूर बलदेवसिंग काही केल्या डोक्यातून बाहेर निघू शकत नाही. त्याचे स्थान अढळ आहे. खांद्यावरून शाल घेतलेल्या संजीवकुमारची ती उग्र, निग्रही नजर आणि त्याखाली अग्नीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेलं 'शोले' हे नाव असं ते पोस्टर मला आजही आठवतं. 'लोहा गरम है मार दो हथौडा', 'ये हाथ नही फांसी का फंदा है', 'ठाकूर न झुक सकता है न टूट सकता है ठाकूर सिर्फ मर सकता है', 'किमत जो तुम चाहो ... काम जो मै चाहु', 'सांप को हाथ से नही पैरोंसे कुचला जाता है', 'तुम मुझे नौकर होने से क्या रिटायर करते हो मै तुम्हे मालिक होनेसे रिटायर करता हुं' (विधाता) हे त्याचे संवाद आजही भाव खाऊन जातात. 'जानी दुश्मन' मधील भूत, 'हम पांच' मधला कृष्ण या वेगळया वाटेवरच्या भूमिकाही गाजल्या होत्या.

संजीवकुमारने प्रेमप्रकरणात सतत मार खाल्ला, म्हणूनच तो अविवाहित राहिला. या संदर्भात त्याचा एक किस्सा सांगितला जातो. एके काळी जेंव्हा संजीवकुमार सिनेमाच्या चंदेरी दुनियेत राहूनही स्वत:ला एकही अभिनेत्री बायको म्हणून वश का होत नाही हे रडगाणे मित्रांसमोर गात होता तेव्हा एका मित्राने त्याला सल्ला दिला," त्यात काय आहे, उद्या तू एक सुंदरशी आणि महागडी साडी घेऊन ये. त्याला एक चिठ्ठी लाव, जी कोणी सुंदर व्यक्ती ही साडी घेऊन जाईल ती मिसेस संजीवकुमार होईल. बस्स सेटवर हे तू उद्या करच." झालं. संजीवकुमारने त्याप्रमाणे एक भारीशी साडी चिठ्ठी लावून सेटवर प्रतीक्षा करत बसला. तिकडून सायरा बानू आली, तिने ती साडी पाहीली, उचलली, चिठ्ठी वाचून दूर भिरकवून दिली आणि संजीवकुमारच्या हृदयावरून आपला बुलडोझर चालवत दुष्टपणे निघून गेली. एवढ्यातेवढ्यावरून निराश होईल तो संजीवकुमार नव्हताच. पुन्हा त्याने रडगाणे मित्रांसमोर गायले. पुन्हा मित्रांनी सल्ला दिला, "अरे, लव्ह सीन्सच्या वेळेस हिरोईनला जरा प्रेमाने जास्त जवळ घे . तुझे प्रेम जरा तिला जाणवू दे. मग पहा ती तुझ्या गळ्यात पडते की नाही ते. " लगेच आपला संजीवकुमार 'देवी' च्या सेटवर दुसरया दिवशी नुतनबरोबर काम करताना ते लक्षात ठेवून वागला. काय आश्चर्य ? नुतनने लगेच संजीवकुमारच्या श्रीमुखात भडकावली व त्याच्याबरोबर पुढे काम नं करण्याची शपथही घेतली. या प्रसंगाची चर्चा तिखटमीठ लावून झाली आणि संजीवकुमारचा कमनशिबीपणा पुन्हा सिद्ध झाला. अशा कितीतरी प्रेमळ चकमकी सहन करत करत जेव्हा संजीवकुमार ह्या नावाला वलय लाभले तेव्हा परिस्थिती बदलली. सुलक्षणा पंडित संजीवकुमारला त्याच्या घरच्या पार्ट्यांमध्ये हवं नको ते बघायची. त्याच्याबरोबर आयुष्यभर राहण्याची तिची तयरी होती. पण हाय रे दैवा! येथे संजीवकुमारची आई आडवी आली असे म्हणतात. तिला सुलक्षणा सून म्हणून नापसंत होती. सुलक्षणाचे हे दुसरे अपयश! आधी ती किशोरकुमारच्या वाद्यवृंदात रहायची. त्यानंतर संजीवकुमारच्या आयुष्यात नीता मेहता आली . कर्ज आठवतो? त्यात तीच त्याची बायको होती. पण तिला डोळ्यांची समस्या निर्माण झाली आणि तिला पडद्यावरच संजीवकुमारची बायको होण्यावर समाधान मानावं लागलं.

तसा संजीवकुमार हा शौकिनच म्हणावा लागेल ! अमेरिकेवरून बायपास शस्त्रक्रिया करून आल्यावरही त्याने आपले सिगारेट वगैरे शौक थांबवले नाहीत. मधूनच तो लहरी बेफिकीरही वाटे. वयाची पन्नाशीही न पाहता हिंदी चित्रपटातले काही सर्वोत्तम म्हातारे रंगवणाऱ्या  संजीवकुमारच्या वैयक्तिक आयुष्यातही काहीसे असेच झाले असावे, असे मला वाटते. त्याच्या अंत्यदर्शनाचा अनुभव या क्षेत्राचा वेगळा रंग दाखवणारा ठरला. तो तेव्हा पाली हिलवरील पेटीट हायस्कूलच्या शेजारच्या इमारतीत राहायला होता. संजीवकुमारचा मृतदेह निपचित पडून असतानाच राजेश खन्ना आला आणि पटकन काही दिग्दर्शक व फोटोग्राफर त्याच्या भेटीसाठी धावले. त्यांचे तरी काय चुकले ? संजीवकुमार हयात असतानाही तसा स्वत:च्याच कर्तृत्वाने मार्ग काढत होता, आता तर तो या जगातच नव्हता. तत्कालीन प्रिंट मिडीयाने संजीवच्या अंत्यविधीची बातमी ज्या आकारामध्ये छापली होती त्याच आकारामध्ये त्याच्या अंत्यविधीस आलेल्या सुपरस्टार्सची बातमी फोटोसह छापली होती. आयुष्यभर आणि मृत्यूनंतरही त्याच्या वाट्यास उपेक्षाच आली ती अशी. खरे तर त्याच्या भूमिकात इतके वैविध्य आहे की यातला नेमका कोणता संजीवकुमार जास्त उजवा हे ठरवणं भल्याभल्यांना देखील कठीण जावं तरीही त्याला इतर फडतूस कोस्टार्सपेक्षा फेम आणि पब्लिसिटी खूप कमी मिळाली. अर्थात तो यासाठी जगलाच नव्हता अन यासाठी कामही करत नव्हता. कारण तो स्टार नव्हता तर तो एक प्रतिभाशाली, बहुआयामी अभिनयाची अद्भुत देणगी असलेला अभिजात कलावंत होता. 

- समीर गायकवाड.

(टीप -लेखातील सर्व माहिती संकलन जालावरून केलेलं आहे)


No comments:

Post a Comment