Thursday, October 20, 2016

घर ....


आडवळणाचे काटया कुटयाचे
घाटखिंडींचे ओढया नाल्यांचे रस्ते ओलांडून
पाठीवरच्या बिऱ्हाडाची चिंता करत मी मार्गस्थ होतो
तेंव्हा नदीच्या मंदप्रवाहातले आत्ममग्न पाणी ओशाळते.
जसजसे पुढे जात राहतो तसे सावल्यांची पाखरे पायाशी फेर धरतात.
तिरक्या, उभ्या काटकोनी उदासवाण्या सावल्या संथ लयीत मागेपुढे होत राहतात.
वाटेत कुठे शिदोरीचे फडके उघडले की पेंगलेल्या झाडावरची तृष्णपाखरे टक्क जागी होतात,
हलकेच थोडी पाठ टेकली की गंधवेड्या मातीवरून वाहणारे शीतल जलद अलगद वाहू लागतात.
पोटापाण्याची गाठ घालताना वणवणती भ्रमंती भाळी लिहूनच पुढे पुढे जावे लागते.
तिरपी होत जाणारी उन्हे कलताना जिंदगानीचे पहाडओझे हळूहळू हलके होते.

पाय माघारी वळतात अन विरलेली जीर्ण स्वप्नं डोळ्यापुढे तरळतात,
आईची औषधे, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न अन 'तिच्या'साठीची नवी साडी
यात हरवलेला मी झिजून गेलेल्या सायकलचे तुटके पॅडल जोरात हाकतो.
भेगाळलेले पाय अन धूसर होत चाललेली नजर यांची फिकीर नसते,
वायगोळा आलेल्या पिंढऱ्या दुखतात अन नादुरुस्त ब्रेक चिडवतो.
परतीच्या वेळी सकाळचे ओशाळलेले पाणी खळाळत असते,
गायींचे घंटारव पश्चिमेच्या जास्वंदी सूर्यबिंबात विरघळतात.
गाव जवळ येताच मंदिराच्या शिखरावरचे पक्षी मस्त शिळ घालतात,
मस्जिदीतून येणारी आर्त अजान वाऱ्याच्या देहात विरते.
वेशीवरून आत शिरताच चुलीवरचा गंध पोटात शिरतो.
मी दारात येताच घर उभे असते हसतमुखाने
खरे तर मी जेंव्हा कधी कुठेही बाहेर जातो तेंव्हा मी एकटा नसतो, माझ्यासवे सगळे घर चालत असते  

माझ्या काळजामध्ये !   

- समीर गायकवाड.