Friday, October 14, 2016

मौनाचे अरण्य ....

विद्रोहाचे गीत

विद्रोहाची गीते आता लिहिली जात नाहीत,
ज्या तरवारींना धार लावली जायची, त्या आता म्यानबंद होऊन घुसमटत असतात.
ज्या लेखणीने दाह प्रसवला जायचा, ती आता शाईवाचून शुष्कोदात्त असते.
ज्या हातांच्या मुठी वळल्या जायच्या, ते हात आता सदैव घडीबंद असतात.
जी मनगटे पोलादासारखी घुमायची, ती आता कालबद्ध पिचून गेली आहेत.
विद्रोहाची गीते आता लिहिली जात नाहीत,
ज्या छातीवर वज्रप्रहार झेलले जायचे, ती आता फुलूनसुद्धा येत नसते.
ज्या ललाटावरती धमन्या तटतटायच्या, तिथे आता आठयांचे जाळे असते.
ज्या बाहुंमध्ये दशगजांचे बळ होते, ते आता बुरूजागत ढासळून पडले आहेत.
ज्या डोळ्यांमध्ये अंगाराचा लाव्हा होता, तिथे आता लाचारीचे अश्रू असतात..

विद्रोहाची गीते आता लिहिली जात नाहीत,
ज्या ओठांवर एल्गाराच्या बुलंद घोषणा होत्या, तिथे आता याचनेचे आर्जव असते.
ज्या चेहऱ्यावर संतापाचा उद्रेक वाहायचा, तिथे आता तडजोडींचे डाव असतात.
ज्या मस्तकात विद्रोहाचा टणत्कार असायचा तिथे आता सांसारिक विखार असतो.
ज्या काळजात परिवर्तनाचा वणवा असायचा, तिथे आता अल्पतुष्टीचा मारवा असतो.

विद्रोहाची गीते आता लिहिली जात नाहीत, कारण आत्म्यांचा बाजार आता जोरात भरतो !
विद्रोह्यांच्या देहातले शिसे थंड पडले आहे, त्यांच्या सत्वाचा पारा आता निसटतो आहे.
कपटांच्या थडग्यात काही विद्रोही पुरलेले आहेत, त्यावरही आता बाभूळकाटा सलत असतो.
पावलापावली मिळतात दांभिक विद्रोही, ज्यांच्या निष्ठांचा देखावा गोजिरवाणा दिसतो.
गलितगात्र जग आता फाटक्या शिडातून तुफानाला तुडवून येणाऱ्या नव्या द्रोह्याच्या प्रतिक्षेत असतं..

मी मात्र तप्तशब्दांतून जाळ लावित सुटतो, मुर्दाडांच्या जगात मी मौनाचे अरण्य शिलगावित फिरतो !

- समीर गायकवाड.