Sunday, October 2, 2016

कथा एका गाण्याची - 'ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही...'एखादा नवा मित्र वारंवार चुकत असेल तर त्याला कधी कधी गच्चीला धरून त्यावर जाब विचारावा असं वाटत राहतं. निर्माता,दिग्दर्शक चेतन आनंदला राजकुमारबद्दल एके काळी असंच वाटायचे. १९६९ चे साल होते, चेतनच्या 'हिर रांझा'मधील 'ये दुनिया ये मेहफिल..'मधील गाण्याचे शूट सुरु होते. राजकुमारने चेतनला पार पिसाळून सोडले होते. चेतन मनातल्या मनात त्याच्यावर दातओठ खात होता पण 'जानी'ला सुनावणारा कुणीच बॉलीवूडमध्ये नाही हे त्यालाही ठाऊक होते. त्यामुळे तो नुस्ताच चडफडतच राहिला. त्याच्या चडफडाटामागची कारणेही तशीच होती. सिनेमा फ्लोअरवर गेल्यापासून राजकुमारने त्याला हैराण करून सोडले होते. अर्थात त्या काळात राजकुमारची मनस्थिती फार वाईट होती. 'पाकिजा'चे संपत आलेले चित्रीकरण आणि मीनाकुमारीची ढासळत गेलेली तब्येत यामुळे त्याचे सारे मनःस्वास्थ्य बिघडले होते. आधीच सणकी असलेला राजकुमार या काळात अधिक आडमुठा होत गेल्याचे जाणवते. असो ...
'हिर रांझा'चे आउटडोअर शूट सुरु झाले अन चेतनला 'राजकुमार' हा काय प्राणी आहे हे चांगले कळून चुकले. सिनेमाचा पीक पॉइंट ज्याला म्हणता येईल त्या 'ये दुनिया ये मेहफील...' या गाण्याच्या चित्रीकरणाचे ते दिवस होते...

डायलॉग किंग राजकुमारला काही केल्या या गाण्यावरचा एकही शॉट फटक्यात ओके करता येत नव्हता, आत्तापर्यंत असा देवदास पठडीतला इंटिमेट सॉंगसीन त्याने कधी दिला नव्हता. या आधी 'दिल एक मंदिर', मध्ये तो इमोशनल झाला होता. पण इथे गाण्यातले भाव चेहऱ्यावर आणायचे होते. राजकुमारसाठी हे मुश्कील काम होतं. त्याच्याकडून परत परत रिटेक घेताना दिग्दर्शक चेतन आनंदला दडपण आल्यासारखे वाटू लागले ! शेवटी त्याने गाण्यातील मधले दोन सीन शूट करून घेतले अन बाकीचे सर्व 'शॉट पेंडिंग' ठेवले !

चेतन आनंद ओळखून होता की हे गाणं हाच ह्या सिनेमाचा प्राण आहे. काहीही करून याचे शूट परफेक्ट व्हायला हवे हेच त्याच्या डोक्यात पक्के झालेले. हे गाणं गाताना रफी खूप हळवे झाले होते त्यांनी बोलता बोलता सांगून देखील टाकले की "मेरे इंतकाल के बाद मेरे जनाजेमें इसे जरूर बजाना चाहिये !"

नेमक्या याच गाण्यासाठी गीतकार कैफी आझमी अन कधी नव्हे ते संगीतकार मदनमोहन यांनी देखील शुटींग परफेक्शनसाठी चेतनला विनंती केली होती. मदनमोहन हे चेतनच्या 'हकीकत' या एकमेव सुपरहिट सिनेमाचे संगीतकार असल्याने अन कैफी आझमींचा त्याच्यावरचा अधिकार मोठा असल्याने इथे त्याची फार पंचाईत झाली होती. 'हकीकत' नंतर आलेल्या, अन सपाटून मार खाल्लेल्या 'आखरी खत'च्य अपयशाने चेतन आनंद आधीच धास्तावला होता. त्यात त्याला 'हिर रांझा' च्या कास्टिंगमधला आपला प्रिया राजवंशचा, राजकुमारचा निर्णय चुकला आहे की काय असं वाटावे असा सिलसिला तिथे सुरु झाला होता. गोंधळून गेलेल्या चेतनने शौकत आझमीना (कैफी आझमींच्या पत्नी ) फिल्मीस्तानमध्ये सेटवर बोलवले. त्यांचा या सिनेमात छोटासा रोलदेखील होता, त्यामुळे त्या तिथे आल्या. राजकुमारच्या अडचणी चेतनने त्यांच्या कानावर घातल्या. शौकत आझमींनी घरी आल्यावर आपले पती कैफी आझमींना सगळा किस्सा कथन केला. कैफी आझमी चांगलेच नाराज झाले त्यांनी चेतनला कळवले की काहीही झाले तरी या गाण्याचे चित्रीकरण जोवर मनाजोगते होत नाही तोवर सिनेमाला अर्थ नाही !

दुसऱ्याच दिवशी कैफींनी मदन मोहनजींना गाठले सगळी अडचण त्यांच्या पुढे मांडली. चेतनच्या सिनेमांना १९६० पर्यंत सचिनदांनी संगीत दिले होते. हकीकत नंतर 'साहेब बहादूर' पर्यंत मदन मोहन राहिले, 'कुदरत' पासून पुढे आरडी आले होते. त्यामुळे मदन मोहन यांचे चेतनशी चांगले सख्य होते. शिवाय मदनमोहन हे चेतनच्या 'हिमालया फिल्म्स'च्या बॅनरच्या निर्मितीपासून त्याच्या सोबत असल्याने आणि राजकुमारच्या 'कलागुणांना' ते चांगलेच परिचित असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन चेतनची भेट घेतली अन त्यांनी राजकुमारला बोलून बघण्याचे पक्के केले. पण ऐकेल तो राजकुमार कसला ? त्याने मदनमोहनजींच्या तोंडालाही पाने पुसली.

'हिर रांझा' मध्ये सगळे एकापेक्षा एक सणकी अन हेकेखोर अभिनेते चेतनकडून घेतले गेले होते ! राजकुमार, प्रिया राजवंश, पृथ्वीराज कपूर, अजित आणि प्राण अशी सगळी मंडळी त्यात होती. राजकुमारला दोन गोष्टी सुनावून सांगण्याची यापैकी कोणाची हिंमत नव्हती. 'ये दुनिया ..'च्या चित्रिकरणाचा तिढा सुटत नव्हता. शेवटी चेतनने स्वतःच यावर मार्ग काढला. त्याने गाण्याच्या चित्रीकरणाचे अनेक तुकडे केले. संपूर्ण गाण्यात राजकुमार भटकत फिरताना दाखवायचे ठरवले अन सर्व गाणे एका सिक्वेन्समध्ये ने घेता मागे पुढे करत पूर्ण केले. मात्र यामुळे या गाण्यात राजकुमार कुठेच समरस झाल्याचे दिसत नाही,शिवाय त्याच्या चेहऱ्यात देखील बारीक फरक दिसून येतात.

पहिल्या चार ओळींचे धृपद गातानाच्या सीन्समध्ये राजकुमार एका कुरणात उभा दिसतो, गाण्याचा अंतरा "किस को सुनाऊँ हाल दिल-ए-बेकरार का बुझता ....किस धूम से उठा था, जनाज़ा बहार का .." शूट करताना त्याच्या चेहऱ्यावर दाढी आलेली दिसते, हे सीन बारकाईने पाहिले तर राजकुमार इथे फुल टेन्स असल्यागत वाटतो. तो कुठेच कम्फर्टेबल वाटत नाही . गाण्याच्या तिसऱ्या तुकड्यात फकिराच्या वेशाताला राजकुमार दर्ग्यातून बाहेर येतो असे दृश्य होते पण या शॉटला त्याने भयंकर छळले शेवटी चेतन आनंदने यावर सॉलीड डोके लावले, त्याने दुरूनच असं शूट केलं की, राजकुमार दर्ग्यातून गाण्याच्या ओळी म्हणत म्हणत बाहेर येतो पण दर्ग्याच्या कमानीखाली आला की तिथल्या अंधारात चालताना त्याचा चेहराच दिसत नाही, फक्त त्याची काळी बॉर्डरलाईन शेड दिसते ! राजकुमारचा चेहरा व्यवस्थित दिसता कामा नये याची पुरेपूर खबरदारी त्याने घेतली.

'अपना पता मिले, ना ख़बर यार की मिले दुश्मन को भी ना ऐसी सज़ा प्यार की मिले...' या पंक्तींच्या वेळी त्याला चेतनने मोठी लांब दाढी दिली होती राजकुमारने ती नाकारली अन त्याच्या पसंतीने बोचकारल्यासारखी दिसणारी दाढी लावून घेतली अन मग हा 'आडमुठा' फकीर फिरत निघाला ! त्यातही चेतनने डोके चालवले, वाळवंटाच्या जुन्या क्लिप्स जोडून फक्त राजकुमारचे पायच वाळवंटात चालताना दाखवलेत, पूर्ण राजकुमार वाळूत दिसतच नाही. जिथे राजकुमार दिसतो ते शॉट लांब अंतरावरून चित्रित केलेत त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील हावाभावाचा मुद्दा त्याने अशा प्रकारे बरयापैकी निकालात काढला.

चेतन आपल्याशी असं का वागतोय हे न कळण्याइतका राजकुमार दुधखुळा नव्हता. त्यानेही पुरेपूर वचपा पुढच्या कडव्यात काढला.
'सहरा में आके भी, मुझ को ठिकाना ना मिला ...एक जीती बाजी हार के, मैं ढूँढू बिछड़े यार को' या चार ओळी राजकुमारने एका सलग सीनमध्ये एकाच टेकमध्ये दिल्या मात्र त्याने एकदाही कॅमेरयाला नजर दिली नाही, त्याने चक्क डोळे झाकून या चार ओळी शॉट ओके केल्या.

गाण्याच्या शेवटच्या कडव्यात राजकुमार साधूच्या गेटअप मध्ये दिसतो, यात त्याने डोक्यावर दुसरा विग लावू दिला पण दाढी आधीचीच फकिराचीच ठेवली, चेतन आनंदने देखील त्याला तसेच फाट्यावर मारले!
त्याने हा साधू इतक्या लांबून शूट केला की त्याच्या चेहऱ्यावरचे काहीही दिसता कामा नये !
एखाद दुसरा क्लोजअप त्याने घेतला पण तोही क्लिअर लेन्सचा नसून ब्लरड व्हिजनचा आहे, एका पंक्तीत रडवेली प्रिया राजवंश देखील दाखवली आहे पण तिचा पडद्यावरचा हा अभिनय बघवत नाही.

कसे तरी करून चेतन आनंदने गाणे पूर्ण केले. चित्रपट रिलीज झाला अन चेतनसहित सगळ्यांना दिलासा मिळाला, सिनेमा सुपरहिट झाला, गाण्यांनी लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले. रफी, मदन मोहन, राजकुमार, चेतन आनंदसह सगळे खुश झाले.राजकुमारने जरी इतके छळले तरी चेतनने त्याला पुढे 'हिंदुस्थान की कसम' आणि 'कुदरत'साठी रिपीट केले कारण या दोघांची मैत्री आता घट्ट झाली होती !

चेतनने प्रिया राजवंशला तर त्याच्या सर्व सिनेमात रिपीट केले. पुढे हे दोघे अखेरपर्यंत लिव्ह इन मध्येही राहिले ! पुढे काही दशकांनी मात्र काळाचे फासे उलटे पडले. चेतनचे निधन झाल्यावर काही काळातच त्याच्या मुलांनी प्रियाचा खून केला. काळ्या छटेच्या या बॉलीवूडमध्ये सोनेरी आशयाचे लिखाण करणारे कैफी - मदनमोहन सारखी माणसं म्हणूनच फारच उठावदार वाटतात ....

'हिर-रांझा' हिट होऊनही कैफी मात्र 'ये दुनिया ये मेहफिल..'च्या चित्रीकरणाबद्दल नाराजच राहिले ! कैफींनी या सिनेमासाठी नुसती गाणीच नव्हे तर पद्यात्मक बाजाचे कसदार संवाद देखील लिहिले होते.
कैफींचे त्यांच्या गाण्यावर, साहित्यावर प्रेम होते. त्यातील अस्सलता त्यांना अभिप्रेत असायची अन पडद्यावर त्याप्रमाणे त्याला न्याय मिळावा अशी त्यांची रास्त अपेक्षा असायची.

कैफींची अनेक गाणी हिट झाली पण हे गाणं सर्वात जास्त लोकप्रिय होतं आणि पुढेही राहील. पण याचे चित्रीकरण अन्य अभिनेत्यावर वा अधिक चांगल्या पद्धतीने झाले असते तर या गाण्याला खरा न्याय मिळाला असता अशी रुखरुख आपल्याला देखील गाणे पहाताना वाटते.

अत्यंत भुक्कड पद्धतीने इतके सुंदर गाणं चित्रित केल्यामुळे त्यांनी पुन्हा चेतन आनंदसाठी संवाद वा गाणी दयायची नाहीत असं ठरवलं होतं पण त्यांनी त्याच्या 'हिमालया फिल्म्स'च्या बॅनरसाठी शब्द दिलेला असल्याने ते नाही म्हणू शकले नाहीत.

१९७२ मध्ये कैफींनी चेतनच्या 'हिंदुस्थान की कसम' साठी 'हर तरफ अब यही अफसाने है, हम तेरी आंखोके दिवाने है..' हे रसाळ गाणं दिलं. मदन मोहन यांचं स्वर्गीय संगीत आणि मन्नाडेंचा जादुई आवाज असं कॉम्बो त्याला लाभलं. पण पुन्हा राजकुमार आणि प्रिया राजवंश या जोडीने या गाण्यावर जमेल तितके पाणी फिरवले. कैफी खूपच नाराज झाले त्यांनी चेतनसाठी लिहिणं थांबवायचे ठरवले.

गंमत म्हणजे कैफींनी ठरवले होते की चेतनला पुन्हा गाणी दयायची नाहीत पण त्याने फार अजिजीने मिनतवाऱ्या केल्या तेंव्हा त्यांनी चेतनच्या १९७३ मधल्या 'हसते जख्म' साठी अत्यंत सुंदर गाणं दिलं.
तुम्ही सर्वांनी ते ऐकलंही असेल आणि गुणगुणलंही असेल.
'तुम जो मिल गये हो, तो जहां मिल गया है. एक भटके हुए राही को कारवां मिल गया हैं !' हे ते गाणं.

चेतनने या गाण्याचे शूट स्टुडीओतील इमुव्हेबल फिक्स्ड कार मध्ये केलं आणि नवीन निश्चल - प्रिया राजवंशने मिळून उरलेले वाट्टोळे पूर्ण करून गाण्याचा फियास्को केला. नाराज झालेले कैफी सिनेमाच्या प्रीमिअरला देखील गेले नाहीत. चेतनला त्यांची दारे कायमची बंद झाली. बॉलीवूडचे अनेक रंगढंग अशा किश्श्यांतून आपल्यासमोर येत राहतात.असो..
दूर निगाहों से आँसू बहाता है कोई,
कैसे ना जाऊ मैं, मुझ को बुलाता है कोई,
या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो,
ऐ परबत रस्ता दे मुझे, ऐ काँटों दामन छोड़ दो....
ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही ....

कैफींच्या या पंक्ती मनाच्या तारा छेडण्यात आजही तितक्याच समर्थ आहेत. इतकं सुंदर गाणं पडद्यावर मात्र बघवत नाही !
हीच तर बॉलीवूडची खरी गंमत आहे...\

- समीर गायकवाड .