Thursday, October 6, 2016

'आई गेल्यानंतरचे वडील' आणि इतर कविता - दासू वैद्य यांच्या कवितांचे रसग्रहण ....


आई गेल्यानंतरचे वडील
अबोल झाले, पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्‍यात
देवांना न्हावू-जेवू घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो,
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ़ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात,
ओट्यावर बसतात
आभाळाकडे पहातात
जुन्या पोथ्या काढून
पुन्हा बांधून ठेवतात,
वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात,
जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने
खुप वेळ दात कोरतात
मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी,

अंथरुणावर पडल्यावरही
बराच वेळ जागे असतात,
बोटाच्या पेरावर काही तरी मोजतात
हे नाम्स्मरण तर नक्कीच नव्हे
कारण ती शांतता
तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडत नसते

मग ते काय मोजत असतील ?

आयुष्याच्या एका टप्प्यावर सर्वाना विवाहबंधनात अडकावे लागते. बहुतांश करून वयाच्या पंचविशीच्या मागेपुढे व्यक्ती विवाहबद्ध होतो. जन्मदात्या आईवडिलांपाशी राहून माणूस लहानाचा मोठा होतो. त्याचे बालपण संपून तो तारुण्यात पदार्पण करतो. प्रौढत्वाच्या एका अनाहूत वळणावर आईवडिलांची साथ संपते. तर तारुण्यात असताना लग्नबंधनामुळे आयुष्याचा जोडीदार मिळतो. तारुण्यातील साथीदाराच्या सहवासाच्या जोरावर आईवडिलांच्या जाण्याचे दुःख थोडेसे हलके होते. आईवडिलांसोबतची पन्नासेक वर्षे आणि जोडीदारासोबतची पन्नासेक वर्षे असं आयुष्य ढोबळमानाने व्यतीत करताना जीवनाच्या मधल्या टप्प्यात होणारा मधला विवाह हा जीवनाच्या एकंदर वाटचालीत सुख-समाधान आणि शांती या मनोभावनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. प्रत्येक व्यक्तीला बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था ही जशी निसर्गतः ठरलेल्या काळात येते तसे आधी मुलगा या भूमिकेतून अन नंतर वडीलांच्या नात्यातून जावे लागते. जगात हे गणित कुणाला चुकलेले नाही. आईवडील हयात असताना आयुष्यातील पंचविशी कशी पार पडते हे कळत नाही. त्यांच्या छत्रछायेत संकटांची उन्हं, दुनियादारीचा पाऊस, धोकाधडीचा वारा आपल्याला शिवत देखील नाही. मात्र आईवडिलांच्या पश्चात एकमेकाला सुखदुःखात आधार देतो तो आयुष्याचा जोडीदार असतो.                    


या कवितेत कवीनी आपल्या वृद्ध वडिलांच्या भावना अगदी हळुवार पद्धतीने, नेमक्या शब्दातून अतिशय व्यापक आशयात सहृदयतेने व्यक्त केल्या आहेत. पानावरचे दवबिंदू जसे नितळ अन नाजूक असतात तशी ही कविता आहे. अतिशय आशयसमृद्धता आणि नितांतसुंदर नेमकेपण हे तिचे वैशिष्ट्य. जन्माचा जोडीदार गमावल्याने जे वडील आधी बोलके होते, निर्झराप्रमाणे जे खळखळत्या आयुष्याचे चैतन्य बनून होते ते त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर म्हणजेच कवीच्या भाषेत 'आई गेल्यानंतरचे वडील' हे अनामिक पद्धतीने अबोल होऊन जातात. खरे तर या एका ओळीत कवितेचे सार आहे. पण कविता जसजशी पुढे जाते तसतसे प्रेमाचे, स्नेहाचे, आस्थेचे अधीर गहिरे रंग अधिक गडद करत जाते.

आई गेल्यानंतर अबोल झालेले वडील यंत्रवतपणे त्यांची दिनचर्या पार पाडतात. मध्यम वर्गीय मराठी माणसाचा देव्हारा स्वयंपाक घराच्या कोपरयात असतो याचा मार्मिक उल्लेख करत कवी लिहितात, स्वयंपाक घरातल्या कोपरयात वडील देवांना न्हाऊ घालतात, नैवेद्य अर्पण करतात. ते हे सर्व जरी यंत्रवत करत असले तरी शेवटी आरती करताना कुठेतरी पत्नीची उणीव जाणवून त्यांचा हात थरथरतो.देवपूजा झाल्यावर ते पडवीत येतात, आरती करताना पत्नीच्या असीम आठवणीनी व्याकुळलेला त्यांचा जीव इथे रमतो. कारण कधीकाळी पत्नीने लावलेल्या बदामाचे झाड इथे आहे. घरातील बाकीचे सदस्य आपल्यावर लक्ष ठेवून असल्याने ते त्या झाडाभोवती कचरा गोळा करण्याचे निमित्त करून तिथच रेंगाळत राहतात. तिथे रेंगाळत राहिल्याने त्यांचे मन हलके होते. पत्नीच्या सहवासाचे सुख मिळते. आणखी काही वेळ ते ओट्यावर बसून राहतात. बसल्या बसल्या वर बघतात, जणू काही आकाशस्थ पत्नीशी ते संवाद साधत असावेत असं वाटत राहते.

काही वेळ असंच तिथे बसून राहिल्यावर ते घरात येतात. काहीतरी आठवल्या सारखे करून पुन्हा देव्हारयापाशी जातात, मघाशीच बांधून ठेवलेल्या पोथ्या काढतात अन पुन्हा बांधून ठेवतात. खरे तर हा एक बहाणा असतो, पत्नीच्या स्पर्शाचा रेशमी अनुभव ते पोथ्यांना पुन्हा पुन्हा हात लावून घेत असतात. नंतर ते खोलीत जातात, जुने वर्तमानपत्र चाळतात कारण त्यांचे मन हे भूतकाळात रमणारे आहे ; वर्तमानाशी त्यांची नाळ तुटलेली आहे अन भविष्याची फारशी ओढ नाही असं त्यांचं काहीसं तुटक तुटक वागणं झालेलं आहे. खरे तर पत्नी गेली तेंव्हाच त्यांचा काळ थांबला आहे त्यामुळे वर्तमानपत्र देखील एक सवय म्हणून ते हातात घेऊन बसले आहेत, त्याचे नवे वा जून संदर्भ त्यांना नकोसेच असतात.

दुपारच्या वेळेस ते जेवण उरकतात, जेवण झाल्यावर सवयीप्रमाणे उदबत्तीच्या काडीने दात कोरत बसतात. खरे तर ते किती जेवले असतील, त्यांना दात ते किती असतील अन दातात असे कितीसे अन्न अडकले असेल ? काहीच नाही पण सकाळपासून ते सर्वच गोष्टी सवयीने करत आलेत त्या ओघातच ही क्रियादेखील तशीच उस्फुर्तपणे पण सवयीने घडते असे कवी सुचवतात. रोजरोजच्या त्या सराईत सवयीना ते अगदी यांत्रिक रित्या सामोरे जात असतात पण कधी आठवणींचे उमाळे अन्तः करणातून दाटून आले तर मात्र ते कवीच्या आईची आठवणीत अगदी तल्लीन होऊन जातात. यांचे वर्णन कवींनी अगदी प्रत्ययकारी शब्दात केले आहे,'मळकट आंब्याच्या कोयीतून हिरवी काडी वर यावी तशी जुनाट आठवण सांगतात' !

शेवटच्या कडव्यात अगदी भावपूर्ण शब्दात कवी वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतात. रात्री अंथरुणावर पडल्यावर त्यांना साहजिकच झोप येत नाही. ते बराच वेळ जागे असतात. पडल्या पडल्या ते बोटांच्या पेरांवर काही तरी मोजत असतात. त्यांची ही जी काही मोजदाद चाललेली असते ती नामस्मरणाची निश्चितच नसते कारण या वेळी त्यांचा चेहरा अस्वस्थ असतो, त्यावर समाधान झळकत नाही. वडील सवयीने रोजच अंथरुणावर पडल्या पडल्या मोजदाद करतात ती नेमकी कशाची करत असावेत ? असा प्रश्न ते वाचकांवरच सोडून देतात. खरे तर हातातून पारा निसटावा तसा निघून गेलेला काळ अन त्यात जगायचे राहिलेले अगणित क्षण यांची ती मोजदाद असते. पत्नीच्या पश्चात जगावयाचे राहिलेले आयुष्य नेमके आहे तरी किती याची ती मोजदाद असते. आपल्या आधी आपली पत्नी आपल्याला असे उदासवाणे करून पुढे निघून गेली याची कारणे तरी किती आणि कोणती याची ती मोजदाद असते. पत्नीशिवाय जगताना आयुष्यात येणारया एकाकीपणाचे दुःख तरी किती असते याची ती मोजदाद असते. काळीज हेलावून टाकणारया या कवितेच्या शेवटी संवेदनशील डोळ्यात अश्रुंचे झरे ओपाआप पाझरू लागतात.प्रेम आणि विरह याचे एकाच वेळी अचूक प्रकटीकरण करताना कवींनी मानवी भावभावनांचे कल्लोळ सशक्ततेने शब्दबद्ध केले आहेत. एका सुंदर काव्याचे आत्मिक समाधान ही कविता देते यात कवीचे यश आहे.
                                                 
मराठीतील सध्याचे आघाडीचे कवी आणि साहित्यिक दासू वैद्य यांची ही अत्यंत हळवी आणि विलक्षण बोलकी कविता 'तूर्तास' या काव्यसंग्रहातली आहे. तूर्तास हा दासू वैद्य यांचा पहिला कवितासंग्रह. दासू वैद्यांची कविता निसर्गापेक्षा मानवी जीवनात अधिक रमते, जीवनातील अंतर्गत विरोधांचा आवर्जून वेध घेते. हा विरोध अभिव्यक्त करण्यासाठी ते व्यावहारिक बोलीभाषेचा अवलंब करतात. भाषेची प्रस्थापित काव्यात्म रूपे आणि अलंकरण यांपासून दासू आपल्या कवितेला कटाक्षाने दूर ठेवतात. तूर्तासमधील कवितांमधून ते मानवी जीवनातील वास्तवाच्या अलिप्त, कोरड्या आणि क्वचित मिस्कील कथनातून आपल्या क्षुब्ध आणि तीव्र भावना व्यंजित करतात . यातील कविता समकालीन असूनही ती समकालीन काव्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. या काव्यसंग्रहाला साहित्य क्षेत्रातले अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. दासू वैद्यांची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. त्यांची कविता जीवनाच्या व्यामिश्रतेचा अनुभव देते, तिची भाषा आणि संघटना अतिशय साधी आणि सोपी असते.  किंबहुना तिच्या साधे आणि सोपेपणातूनच ही कविता अर्थगर्भ होत जाते.

‘दासू वैद्य यांची कविता समकालीन असूनही ती समकालीन काव्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे,’ हे समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे हे वक्तव्य आणि ‘पदोपदी दंश करणारा वर्तमानकाळ, सडत चाललेली समाजव्यवस्था नि वाळलेल्या पाचोळ्यासारखे कालप्रवाहाबरोबर वाहत जाणारे आमच्यासारख्यांचे आयुष्य एका बाजूला विसरायला लावण्याची शक्ती ‘तूर्तास’ या दासू वैद्य यांच्या काव्यसंग्रहात आहे,’ हे साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांचे विधान याची प्रचीती वैद्यांच्या कवितेत जागोजागी येत राहते..

'दगडाखाली ओल शिल्लक ठेवणारयांना' हा संग्रह अर्पण केला आहे अस काव्यसंग्रहाच्या अर्पणपत्रिकेच्या पानावर लिहून कवी दासू वैद्य आपल्यातल्या अनोख्या वेगळेपणाचा पहिला अन मार्मिक प्रत्यय प्रस्तावनेच्या आधीच देतात..

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘तूर्तास’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे की, ‘ग्रामीण जीवनातील असंख्य संदर्भ दासू वैद्य यांच्या कवितेला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून देतात. म्हणूनच नद्यांचे कोरडेपण त्यांना अस्वस्थ करून जाते. एखाद्या प्रदेशातून पाऊस गायब होतो किंवा अतिवृष्टीमुळे एखादा प्रदेश उद्ध्वस्त होऊन जातो, या दोन्ही बाबी कवीला व्यथित करून जातात. कधी कधी कृषीजीवनातील दुखाशी कवी कमालीचा एकरूप होतो आहे याचाही अनुभव येतो.’

वसंत आबाजी डहाके दासू वैद्य यांच्या कवितेबद्दल म्हणतात की, 'दासू वैद्य यांची कविता ही सर्वसामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांविषयीची आहे. ९५ टक्के माणसांच्या चिंता, काळज्या, संकटे, स्थिती-गती, भवितव्य यांविषयीच्या या कविता आहेत. त्याचबरोबर पाच टक्क्यांच्या जगण्यातली कृत्रिमताही त्यात व्यक्त झालेली आहे. एकंदरीतच दासू वैद्य यांची कविता आपल्याला अस्वस्थ करते, विचार करण्यास भाग पाडते. कविता आणि गाणी असा भेद आपल्याला त्यांच्याबाबतीत करता येत नाही. तरीही दोन्ही गोष्टीत त्यांना प्रचंड यश मिळाले आहे. ‘तूर्तास’मधील कविता वाचकांना मुखोद्गत आहेत, तर त्यांची गीतं जनसामान्यांच्या ओठी रुळत आहेत. कवितेवर त्यांची आत्यंतिक निष्ठा आहे. कवितेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ आहे. जगण्याचा अंतप्रवाह कवितेकडे वळवता आला पाहिजे आणि श्वासाची लय कवितेत उतरवता आली पाहिजे, यावर त्यांचा विश्वास आहे.' दासू वैद्यांच्या कवितेतील विषयवैविध्य डहाके यांच्या निरीक्षणास पुष्टी देते..

त्यांची कविता जीवनाच्या व्यामिश्रतेचा अनुभव देते, तिची भाषा आणि संघटना अतिशय साधी आणि सोपी असते. किंबहुना तिच्या साधे आणि सोपेपणातूनच ही कविता अर्थगर्भ होत जाते .
"आम्ही पुरतो मातीत
गरज म्हणून बिया
आणि छंद म्हणून संस्कृती
आम्हाला आवडतं
पुन्हा पुन्हा आदिम व्हायला."

निरीक्षणाचे नवे आयाम देणारी त्यांची शब्दरचना अचंबित करायला लावणारी आहे..
"नाकाने पाणी पिणारयाकडे पाहावे
तशा उत्सुकतेने पाहतात लोक
या जमान्यात
पोस्टकार्ड लिहिणारया वडिलांकडे"

मागचे पुढचे संदर्भ अगदी बेमिसालपणे ते इतके चपखल एकत्र आणतात की त्यातून नवनिर्मितीचा प्रतिभाशाली अर्थ अगदी सहजगत्या व्यक्त होतो..
"दगडी शस्त्र हातात घेऊन
शिकारी मागं पळणारा
नंगा माणूसच आवृत्त होतोय
टॅंकरमागे पळणार्या माणसाच्या निमित्तानं ."

विकासाच्या व्याख्या आणि मानवी समाजमन याच्या बदलत्या मानसिकतेवर ते इतक्या अणकुचीदार शब्दात प्रहार करतात पण त्यासाठी त्यांनी परजलेले हत्यार मात्र अदृश्य राहते..
"एक नदी निर्मळ वाहत असेल
तर तिला आम्ही आटवतो- गोठवतो
मग कुठे मिळतो विकसित मेंदुला वाव ,
ओसाड रिकाम्या पात्राचे
संशोधन करून
शोध लावता येतो
कधीकाळी वाहणार्या
पाण्याच्या अस्तित्वाचा "

सर्वच अर्थांनी जे 'रिते' आहेत, ज्यांचाकडे फक्त जाणिवांचा बोथट पण अनावृत्त जीवनानुभव बाकी राहिला आहे त्यांच्या साठी तर ते अगदी नेमक्या पण दुर्लक्षित शब्दांचा आधार घेऊन लिहितात..
"ज्यांच्यात काही विकत घेण्याची
ताकदच निर्माण होऊ शकली नाही
त्यांनी पाच रूपयाला
हंडा भरून पिण्याचं पाणी विकत घ्यावं
हे एकेक दिवस जिवंत राहण्याची
परवानगी घेतल्यासारखं "

राजकारणी आणि त्यांची मनोवृत्ती यावर सहसा साहित्यिक कवी उघडपणे लिहिणं शक्यतो टाळतो, त्यातही बोचरे ओरखाडे ओढणे त्याला जमू शकते पण तसं फारसे कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीत. पण दासू वैद्य इथेही अपवाद ठरतात, ते राजकारण्याना पुरते निर्वस्त्र करून त्यांचे सत्य उघड करतात..
"इतिहासातल्या राज्यकर्त्या बाप्याने
स्वतःच्या तहानेकरिता पोसली बाई
आणि
बाईच्या तहानेकरिता बांधली बारव
बाईची गोष्ट संपते इथेच
राज्यकर्ता बाप्या मात्र
चिकटून बसला
इतिहासाच्या पानांना शाईसारखा "

माणूस कुठेही राहो अगदी वाडीवस्तीच्या गावात अथवा देशाच्या राजधानीत राहो, त्याची एक गर्दीची आणि एक लोकभावनेची अशी वेगळी मानसिकता असते ती लपून राहत नाही याचा समाचार ते वेगळ्या पंक्तीत घेतात..
"हे शहर पाहताना
कवीच्या नव्हत्याच पोरकट अपेक्षा ,
शेवटी राजधानी म्हणजेसुद्धा
जगण्यासाठी धडपडणार्या लोकांचंच एक गाव.."

दासू वैद्य प्रत्येक कवितेतून एक संदेश सूचक पद्धतीने मांडतात. पण त्यासाठी कवितेचे रुपांतर निरुपणात वा प्रबोधनाची एकसुरी कविता यात होऊ न देता शब्दांच्या नीटस नियोजनातून अपेक्षित अर्थ साध्या मांडणीत व्यक्तवतात, त्यासाठी त्यांची कविता शब्दबंबाळ होऊ देत नाहीत हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल..
"कॅम्पस अलगद बुडून गेलाय अंधारात
स्ट्रीटलाईटची अंधार फोडण्याची व्यर्थ धडपड..
रस्ते वांझ ठरलेत
सुब्बालक्ष्मीच्या व्यंकटेश स्तोत्रात
मशिदीतली अजान निःसंकोच मिसळून गेलीय"

'लाल पोपटी पानातून' या कवितेतले त्यांचे सिद्धहस्त ओघवतेपण वाचकाला अंतर्बाह्य हलवते, कवितेच्या शीर्षकापासून ते कवितेच्या शेवटापर्यंत ते वेगवेगळ्या वळणावर शब्दाचे आसूड ओढतात तेंव्हा कवितेची सुरुवात    "अचानक उसळलेल्या दंगलीसारखा रखरखत्या उन्हात वादळवारा अशी धगधगणारया ओळीने करतात आणि
"खोड-फांद्या काढून झाल्यावर
पानं काढण्यासाठी
चित्रकाराला हिरवा रंगच
सापडू नये
तशी निष्पर्ण झाडं उभी "
अशा शब्दात कवितेच्या शेवटी मनाची झाडाझडती घेतात.
त्यांची ही सहजसुलभ मांडणी अस्वस्थ करायला लावण्यास पुरेशी सक्षम आहे.

कवीचे कवित्व आणि काव्योत्तर आयुष्याची इतिश्री झाल्यानंतर कवीला दिला जाणारा स्मारकस्वरूपाचा बेगडी आकार यावर ते अगदी खोचक भाष्य करतात..
"धान्य निवडणारया
आईच्या जवळ येऊन
बिनधोक चिमण्या टिपायच्या दाणा
तसे अव्यक्तातले पक्षी
न घाबरता कवीजवळ येतात
तोपर्यंत मरण नाही कवीला
कवी मरत नाही
कुठल्यातरी मानवी रोगानं ,
पक्षी नुस्तेच उडून जातात
कवीच्या डोक्यावरून
उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर
तेव्हा कवी होतो घामाघूम ...."

दासू वैद्य यांना ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहासाठी केशवराव काेठावळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात अाला त्या वेळी ज्येष्ठ समीक्षक दिगंबर पाध्ये यांनी म्हटले होते की, "अगदी अातून अालेल्या ऊर्मीची, अस्वस्थतेची, भावावस्थेची कवितेतून हाेणारी अभिव्यक्ती एकदा मनाला भावली की तिच्यातले मर्म हळूहळू कळत जाते. कवी दासू वैद्य यांची कविता अशीच अलवार अाणि तरीही खाेलात शिरणारी अाहे. कवितेतील उत्स्फूर्तता अाशयाइतकीच महत्त्वाची अाहे हे त्यांच्या कवितेतून जाणवते,’"

दासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड येथे गेले. शाळेत असताना त्यांना  ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात त्यांचे कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या. "आई-वडील व बंधूनी तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असे दासू स्वतः बाबत सांगतात. पुढे पदव्यूत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. ते या विद्यापीठात मराठी विभागात विभागप्रमुख म्हणून अध्यापन करतात.

दासू वैद्य यांनी १९८७ पासून विविध वाङमयीन नियतकालिकांत नियमित लेखन केलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धातून त्यांनी लेखन केले आहे. साहित्य अकादमीची तरूण लेखकांसाठी असलेली सन्मानवृत्ती त्यांना मिळाली आहे. अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे. त्यांच्या काही कवितांचे हिंदी इंग्रजी मल्याळम तेलुगू आणि उर्दू भाषांत भाषांतर झाले आहे. अल्फागौरव, मटा सन्मान आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे. दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव, तुकाराम सारख्या काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. त्यांचे सर्व काव्यसंग्रह रसिकमान्य झाले आहेत. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. पॉप्युलरने प्रकाशित केलेला त्यांचा 'क कवितेचा' हा बालकवितासंग्रह बालांसोबत  मोठ्यांनाही आकर्षित करुन घेणारा ठरला होता.
अशा या बहुआयामी लेखकाची - कवीची ही कविता मनाला प्रेमाची उभारी देऊन जाते आणि नात्यातला स्नेह अधिक दृढ करताना विलक्षण तृप्तता देऊन जाते.

- समीर गायकवाड.